मोकळे आकाश.. : मनपसंत अपयश

यश माणसाला धुंद करते. अपयश पाय जमिनीवर आणते. एकदा घसरून पडल्यावर आपण पाय सावधपणे टाकायला शिकतो.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

वैद्यकीय व्यवस्थापनामध्ये दीड दशक काढल्यामुळे अनेक मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्समधून व्याख्यानाची निमंत्रणे येतात. जेव्हा जमेल तेव्हा मी ती स्वीकारतो, कारण तरुण व्यवस्थापकीय विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा प्रश्नोत्तरे आणि गप्पा रंगतात तेव्हा मलाही चार नवे विचार आणि योजनांची बीजे मिळतात. ‘थिंकिंग आऊट ऑफ बॉक्स’.. पारंपरिक आणि पठडीपलीकडचे विचार गवसणे आजकाल दुर्मीळ झाले आहे. कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये ‘इनक्युबेटर सेल’ अर्थात नवनवीन विचारांना प्रोत्साहन देणारा विभाग असावा असा माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. या पार्श्वभूमीवर परवाच एका इंजिनीअरिंग-मॅनेजमेंटच्या संयुक्त कोर्स करणाऱ्या एमबीएच्या पदव्युत्तर स्नातकांशी प्रश्नोत्तरे चालू होती आणि अचानक एका २२-२३ वर्षांच्या उमद्या विद्यार्थ्यांने विचारले- ‘‘सर, विच इज युअर फेवरेट फेल्युअर?’’

कार्यक्रम संपवून परतताना त्याचा प्रश्न मला भंडावून सोडत होता. प्रश्न बुद्धिमान होता. विचार करायला भाग पाडणारा, अंतर्मुख करणारा होता. मी गेल्या सहा दशकांतल्या मिळकतीची चिरफाड करू लागलो. अपयश असे की ज्याने तुम्हाला बदलले आणि पुढची मार्गक्रमणा त्याच्यामुळे प्रभावित झाली. कधी धोरण बदलले, तर कधी ध्यानसाधना.. कधी मार्ग बदलला, तर कधी गन्तव्य स्थळ. पण ते अपयश असे की आज मागे वळून बघताना त्या आठवणी नकारात्मक वाटण्याऐवजी संस्मरणीय वाटाव्यात. १९७७ साली मी इंटर सायन्स पास झालो. त्याच वर्षी बारावीची पहिली बॅचही पास झाली. जून-जुलैत पहिल्या धारेत मला मेडिकल अ‍ॅडमिशन मिळाली नाही. मी खचलो. ते अपयश जिव्हारी लागले. रोजच रडायचो. आणि नोव्हेंबरमध्ये वाढीव सीट्समध्ये मला मिरजेला शासकीय महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळाली. एमबीबीएस, एमएस (सर्जरी) उत्तीर्ण होईपर्यंत मी मिरज वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठातील पहिला-दुसरा क्रमांक सोडला नाही. या गोष्टीला आता पस्तीस वर्षे झाली आहेत. या साडेतीन दशकांत अनेकदा हरण्याचे, अपयशाचे प्रसंग आले. कधी मानभंग, तर कधी खोटेनाटे आरोपही सहन करावे लागले. ज्या ज्या वेळेला परिस्थितीने मला भतीत चिरडण्याचा प्रयत्न केला, त्या- त्या वेळेला मी फक्त मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळालेले ते सहा महिने आठवले. माझ्या फेवरेट फेल्युअरने मला पुन्हा उसळी मारण्याची शक्ती दिली आणि मला पुढच्या प्रयत्नांची ‘स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स’ अर्थात धोरण आणि ध्येयटप्पे शिकविले. प्रयत्नांशिवाय धोरण कुचकामी ठरते आणि धोरणाशिवाय प्रयत्न दिशाहीन होतात, ही प्रगल्भता मला माझ्या मनपसंत अपयशाने दिली आहे. ती माझी तहहयात न संपणारी शिदोरी आहे. माझ्यासाठी कधीही न रिकामी होणारी द्रौपदीची थाळीच आहे जणू!

अपयश येणारच. सुरुवातीचा निराशेचा काळ जितका लवकर संपेल तितके चांगले. त्यानंतर त्या संपूर्ण प्रसंग-प्रक्रियेवर रवंथ करायला हवे. एकेका गोष्टीची फोड व्हावी. निष्णात सर्जन शरीरातील गुंतागुंत दूर करून नेमकी कॅन्सरची गाठ काढतो, किंवा प्रकांड कायदेपंडित वकिली वाक्चातुर्याने लावलेल्या कलमांतून आरोपीची मान सोडवतो तसे चातुर्य हवे. झाल्या पराभवाकडे परकायादृष्टीने पाहण्याची सवयही लावून घ्यायला हवी. कधी आपले वागणे, तर कधी आपली वेळ चुकते. कधी स्वर चुकतो, तर कधी संयम सुटतो. कधी आततायी वृत्ती नडते, तर कधी आत्मघाती वक्तव्य आड येते. अपयशाची आणि पराभवाची सगळीच कारणे सदासर्वदा आपल्या नियंत्रणात असतात असे नाही. जे आपल्या क्षमतेत नाही ते ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून त्याच्यावर ढकलावे आणि असे म्हणावे की, ‘‘अगर अपने दिल का हुआ तो भला, और अगर न हुआ तो और भला. क्यूँ कि वह ‘उसके’ दिल का हो रहा है।’’

यश माणसाला धुंद करते. अपयश पाय जमिनीवर आणते. एकदा घसरून पडल्यावर आपण पाय सावधपणे टाकायला शिकतो. ही सावधानता अपयश आपल्याला शिकवते. पराभवाने पाठ टेकली की माती झटकून उभे राहणे महत्त्वाचे. त्यासाठी प्रत्येकाने आपले मनपसंत अपयश निवडायला हवे. तेच आपल्यातील युयुत्सु वृत्तीला जोपासते आणि खतपाणी घालते. १९७७ चे ते सहा महिने माझ्या दृष्टीने मला आजही सोन्याचे वाटतात ते त्याचमुळे.

..गाडीतून मी हॉस्पिटलकडे निघालो होतो. सुदर्शन फकिरची अजरामर गजल चित्राजींच्या गळ्यातून मला पुन: पुन्हा बजावत होती..

‘किसी रंजीश को हवा दो

के मैं जिंदा हूँ अभी।

मुझको एहसास दिला दो

के मैं जिंदा हूँ अभी॥’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mokale aakash thinking out of the box author dr sanjay oak zws

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या