कलापिनी कोमकली
सध्या पावसानं सभोवतालचं सारं वातावरण उल्हसित, चिंब झालेलं आहे. निसर्गानं तृप्ततेची अलवार हिरवी शाल पांघरली आहे. तन-मन प्रसन्न करणारा हा बरखा ऋतू. सर्जनाचे उत्कट कोंब प्रसवणारा. आनंदाची थुईथुई कारंजी बरसवणारा. या ऋतूमधलं मानवी भावभावनांचं उत्फुल्ल नर्तन संगीतातून फार हळुवारपणे, कोमलतेनं व्यक्त झालंय. त्या आनंदाची ही झड..
आपल्या जीवनात वर्षांऋतू हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सर्व ऋतूंमध्ये या चातुर्मासाचा वरवर जरी विचार केला तरी लक्षात येईल की आपल्या जीवनाचा ‘आधार’ आहे हा ऋतू! विशेषत: भारतात तिन्ही ऋतू- म्हणजे वसंत, वर्षां आणि हेमंत- परिपूर्णतेनं आपले पंख पसरवून बाराही मास आपला डोलारा सजवीत नृत्य करीत असतात! सर्व ऋतूंमधील राजा जरी ‘वसंत’ मानला गेला असला तरी ‘वर्षां’ ऋतूचे महत्त्व आणि सर्वाना त्याचे आकर्षण हे केवळ निर्विवाद आहे. अनेकस्वरूपी भावनांचा पिसारा आहे हा ऋतू! मेघांची आळवणी, गरजणारे ढग, आकाश भरून चमकणाऱ्या दामिनी, कोसळणाऱ्या आणि लपंडाव खेळणाऱ्या जलधारा, धरित्रीवर अलगद भुरभुरणारी रिमझिम, विराण्या, श्रावणातला हर्ष आणि शोक.. भरगच्च सणांची सुरुवात.. काय नाही या ऋतूत?
शास्त्रीय संगीताचा विचार केला तर असे दिसून येते की ‘वर्षां’ (म्हणजे ‘मल्हार’) आणि ‘वसंत’ या दोन ऋतूंना त्यांच्या नावाच्याच रागांनी सन्मानित केले गेले आहे. परंपरागत रागदारी बंदिशींमध्ये शृंगार रसात- आणि विशेषत: वियोग रसात चिंब भिजलेल्या बंदिशींवर भर आहे. उदाहरणार्थ :
१) सूरमल्हार : ‘बरखा रितू बैरी हमारी/ मास आखाड घटा घन गरजत/ पियु परदेस हमारे।’
२) गौड मल्हार : ‘पिहरवा अजहून आये/ येरी माई अब कहूँ कौन से तरसत जियरा..’
३) गौड मल्हार रागातील एका बडा ख्यालातील अंतरा बघा- ‘चहूं और बिजली चमके/ डर पावे/ पिया बिन जियरा तरसे।।’
वर्षां ऋतूचा कालखंड ज्येष्ठ महिन्यापासून सुरू होऊन अश्विन महिना येईपर्यंत धरला गेला आहे. या कालखंडात आकाशीचा पर्जन्यदेव भारतात एक नृत्यनाटय़ सुरू करतो. ज्येष्ठात अस्वस्थ करणारा उकाडा असतो. वसुंधरा सूर्याचा ताप सहन करीत रखरखीत होऊन कासावीस झालेली असते. समस्त प्राणी आणि वृक्षसंपदा आकाशाकडे टक लावून पावसाच्या अमृतथेंबांची वाट पाहत असतात. अशा वातावरणाचे चपखल वर्णन करणारी पं. कुमार गंधर्वाची बंदिश इथे आठवते..
राग- मारवा..
स्थाई- ‘घाम परे रे/ बाऊ ना चाल्यों हे। तपरिया हे, अत घणा रे, भूमरी।।’
(ऊन, उकाडा आहे. जराही वाऱ्याची झुळूकदेखील नाही. ही भूमी खूप तापली आहे..)
मारवा रागातीलच एक आणखी बंदिश-
‘सूझोना कछु मोहे। अबु मैं का करूं रे। बेकल जिया होय उखमासे।।’
(उकाडय़ामुळे काहीच सुचेनासे झाले आहे. काय करावे? या उष्णमासात जीव व्याकूळ झाला आहे..)
आणि मग हळूच मेघांच्या पखवाजाची नांदी वाजू लागते. लहरी मेघांची नुसतीच ये-जा सुरू होते. असे वाटते.. हे जे ‘गरजत’ आहेत, ते ‘बरसतील’ की नाही?
कवी सुमित्रानंदन पंत म्हणतात-
‘बरसो हे घन! निष्फल है यह नीरव गर्जन
चंचल-विद्युत-प्रतिभा के क्षण
बरसो उर्वर जीवन के कण!
बरसो हे घन!’
पखवाजावर एखादा तुकडा वाजवल्यासारखा मेघांचा गडगडाट ऐकू येतो. मधूनच सौदामिनीही चमकून जाते. आकाशाच्या रंगमंचावर हा खेळ चालू असताना खाली वसुंधरेवर मात्र सर्व प्राणिमात्र कासावीस झालेले असतात.
राग मिया मल्हार (स्थाई)
‘कारे मेघा बरसत नाही रे।
हरी हरी दूब सुख रहयो।।
हाहाकार मच्चो चहूं ओर।।’
।। अंतरा।।
‘सूख गयो रे ताल तलैया तरफत जीव सब व्याकूल तरसत मोर, शोर करे पपिहा चहूं ओर।’ – पं. कुमार गंधर्व
ज्येष्ठ महिन्यात उकाडय़ाचा कळस असताना, उन्हाने जीव घाबरा झालेला असताना पावसाची चाहूल लागते आणि ‘नयो नयो मेह जेठ संग निकरे। ताप उमस बऊ लागे पियारे’ ही कुमारजींची सोरठ देस रागातील बंदिश स्मरते.
‘बाऊ ना हालै, जिया घबरायरे। तुम बिन मोहे शोक पिया रे।।’
..आणि मग ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ त्या धारानृत्याची सुरुवात होते. नाचाला आकाश अपुरे पडते. धारा बरसू लागतात-
‘पाऊस आला रे आला।
धारा झेला रे झेला।
झाडे झाली हिरवी गाणी।
रूणझुण पैंजण पानोपानी’
– मंगेश पाडगांवकर
आषाढात दाही दिशा गरजू लागतात. हा खास इंद्राचा महिना. निरनिराळे सुंदर आकार घेत हे ‘बरसन को आये बादर कारे’ सर्वाचे मन मोहून टाकतात. हे श्यामल मेघ जीवनात उत्साह भरतात. अशा वातावरणात जेव्हा- ‘उमंग (उत्साह) जीबन (यौवन) पर घटा झूम आये’ तेव्हा मन गाऊ लागते. मनुष्यच काय- कोकिळ, मोर आणि खास पावसाळ्यात जन्मलेले ‘झिंगूर’ पण नाद करायला लागतात. सदारंगची एक परंपरागत बंदिश आहे.. (राग मियां मल्हार)
‘बोल रे पपैयरा, अब घन गरजे।
हून हून कर आयी बदरिया।
बरसन लागे सदारंगीले।
मेहरवा, दामिनी सी कौंघे, चौंद,
सुमनवा लरजे।।’
सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांच्या ओळी बघा..
‘हे वर्ष के हर्ष!
बरस तू बरस- बरस रसधार
पार ले चल तू मुझको
बहा, दिखा, मुझको भी
नीज गर्जन- भैरव संसार।’
पं. कुमार गंधर्व म्हणतात.. (राग- गौड मल्हार)
‘घन गरजे बरखा आई
गरज गरज मोहे डरावे
नाद दिलावे मोहे याद पिया की।’
राग- जलधर देस
‘मेघा को रितू आयो रे मिता
दल बादल दल आवन लागे।
रूप सुहोवे मन लुभायो रे..’
आणि पुढे बा. भ. बोरकर किती सुंदर रीतीनं व्यक्त होतात..
‘सरींवर सरी आल्या गं
सचैल गोपी न्हाल्या गं
गोपी झाल्या भिजून चिंब
थरथर कापति कदंब-िनब!’
श्रावणसरी येऊ लागल्या की घरच्या कुमारिका आणि माहेरी आलेल्या विवाहितांना आंबा, कडूिलब आणि कदंबाच्या झाडावर बांधलेल्या ‘सावन के झूले’चे आकर्षण नसेल तरच नवल!
राग- मघवा..
‘सावन झर आयो
चलोरी सखी खेलें
आंगन बिच आज
बीराजी बांधो झूला’
आणि हा ‘झूला’ बीराने (मोठय़ा भावाने) बांधला असल्याने तो अधिकच सुखकारक आहे.
बालकवी म्हणतात तसे-
‘श्रावण मासी, हर्ष मानसी।
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवें,
क्षणात फिरुनि ऊन पडे’
हा ऊन-सावल्यांचा, सरींचा खेळ श्रावणात सतत चालू असतो. या खेळात ढगांच्या समूहातून मधूनच एक तारा लख्ख चमकून जातो..
‘दळ रे बादल बिच चमक्यो है तारा..’
अशा ‘सांझ’ समयी प्रियकराची आठवण होणे साहजिकच नाही का? माळवी लोकगीताच्या या ओळी..
‘दळ रे बादल बिच चमक्यो है तारा
तो सांझे पडे पियू लागे प्यारा।’
श्रावणातल्या सरी लागोपाठ यायला लागल्या की वसुंधरा पाचूने नटलेली भासते. सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. वनराई पावसाच्या सरींनी न्हाऊन निघाल्या आहेत. पाने, फुले, फांद्या पाण्याच्या वजनाने वाकल्या आहेत.
राग- गौड मल्हार..
‘झुकि आई बदरिया सावन की,
सावन की मन भावन की
सावन में उमगे जोबनवा
छांड चले परदेस पिहरवा
सुध न रही घर आवन की।।’
पाऊस.. पाऊस आणि पाऊस..!! सतत धार लागली आहे..
राग- कामोद..
‘ऐसन कैसन बरसत बरखा।
घिरि घिरि आई छाय दिस चहुंवा।’
किती दिवस ही संततधार चालणार?
‘बहुदिन ते छिप गयो सूरजवा..’
सूर्यदर्शन होऊन कितीतरी दिवस लोटलेत!
‘ऊब गई बरसन ते मनवा..’
– पं. कुमार गंधर्व
आता मात्र कंटाळा आला आहे या पावसाचा! भाद्रपद (भादव) मास लागत आहे. नद्या पाण्याने भरभरून प्रवाहित आहेत. आंब्याच्या पानांवर पाण्याचे थेंब विश्रांती घेत आहेत. तिकडे तलावात दादुर (बेडूक) आपले गाणे रंगवीत सुटलाय. पाऊस चांगला झाला तर शेतात हिरे- माणकांसारखी पिकं तयार होणार. म्हणजे धरणी प्रफुल्लित.. मनं प्रफुल्लित.
नजीर अकबराबादी म्हणतात-
‘यह रूत वह है जिस में खुर्दो कबीर खुश है।
अदना, गरीब, मुफ्लिस, शाही वजीर खुश है।’
वर्षां ऋतूच्या निरनिराळ्या छटांनी चातुर्मास भरून पावतो. जलधारांप्रमाणे वेगवेगळ्या रंगढंगांच्या गीतधारांनी भारतीय संगीत नटलेलं आहे. त्यात रागदारीतील बंदिशी आहेत, कजरी- ठुमरी आहेत, भावगीते आणि लोकगीते आहेत..
असे म्हणावेसे वाटते की, कुमारजींनी पारंपरिक बंदिशींच्या थोडं पलीकडे जाऊन वर्षां ऋतूत होणाऱ्या नैसर्गिक हळुवार बदलांना आपल्या स्वरचित बंदिशीमध्ये गुंफून एक निराळाच परिमाण साधला आहे.. ज्याच्यामुळे कुमारजींच्या बंदिशीतला पाऊस हा फक्त ‘पिया परदेस’ आणि इथे नायिका ‘बैठी हूं अकेली’च्या वर्णनापलीकडे जाऊन आपल्या पुढे बरंच काही व्यक्त करतो. हरिवंशराय बच्चन म्हणतात तसं..
‘यह बूँद ही कुछ और है
यह प्यास ही कुछ और है
जल- थल- गगन में यह भ्रमा
कहता पपिहा पी काहां?’
kalaapini@gmail.com
(लेखिका शास्त्रीय संगीत गायिका आहेत.)