संदेश कुलकर्णी यांच्या ‘मॉंटुकले दिवस’ या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया उलगडून दाखवली आहे.. अमृता सुभाष यांनी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी एक पुस्तक होताना पाहिलं आहे. मी ते पाहू शकले- फार जवळून, कारण ते संदेशनं लिहिलं आहे.. माझ्या नवऱ्यानं. त्याचं नाव ‘माँटुकले दिवस’! ही गोष्ट आहे आमच्याच मजल्यावर राहणाऱ्या तीन वर्षांच्या माँटूची आणि संदेशची. लिहू पाहणाऱ्या संदेशची. ती गोष्ट जशी छोटय़ा माँटूची आणि मोठा झालेल्या संदेशची आहे, तशीच ती मोठा झालेल्या माँटूची आणि छोटय़ा राहून गेलेल्या संदेशची पण आहे. कसं, ते वाचल्यावरच कळेल. तर या गोष्टीच्या जन्मदात्याबरोबर मी राहत असल्यानं तिच्या जन्मापासून ते आता तिचं पुस्तक होण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा मी जवळून अनुभवला आहे. कुठलीही गोष्ट- मग तो सिनेमा असेल किंवा नाटक किंवा पुस्तक- ती होत असताना पाहणं ही चित्तथरारक गोष्ट आहे. प्रेक्षकांसमोर किंवा वाचकांसमोर येण्याआधी तो सिनेमा किंवा ते नाटक किंवा पुस्तक कशा-कशातनं जातं.. जन्माला येतं, रांगतं, अडखळतं, उभं राहतं, चालायला लागतं. आपण पाहत असणाऱ्या गुळगुळीत वेष्टनाची, सुंदर चित्रांची, नव्या पुस्तकाच्या त्या अनोख्या वासाची ती गोष्ट नेमकी कुठून सुरू होत असेल? कागदापासून? शाईपासून? शाईत जीव भरणाऱ्या हातापासून? त्या हाताला लिहितं करणाऱ्या मनापासून? आपण स्वत: लिहीत असताना आसपासचं काहीच दिसत नसतं. फुरसतच नसते तेवढी. पण दुसऱ्या कुणी असं काहीसं आपल्यासमोर घडवताना हा सगळा सुंदर प्रवास छान पाहता येतो. बऱ्याचदा लेखक कल्पनेतलं काहीसं एका ऊर्मीनं कागदावर उतरवायला घेतो. पण ते वेगळं. ‘माँटुकले दिवस’ याबाबतीत मी दुपेडी प्रवास अनुभवला. मी पुस्तकाच्या आतही होते आणि बाहेरही. कारण माझ्या आसपास घडणारंच किती काय काय त्या पुस्तकात होतं. माझ्या भवतालातलं, माझंच आयुष्य संदेश लिहीत होता. पण ते जसंच्या तसं होतं का? भवताल जरी तेच असलं तरी संदेशला ते जसं दिसत होतं तसं ते मला दिसू शकत होतं का? म्हणजे वरवर पाहता या पुस्तकाचा लेखक संदेश आणि मी एकाच घरात राहत होतो. पुस्तकात वर्णन केलेल्या त्याच इमारतीत. दोघांकडे एकाच दाराची चावी होती. दोघं तेच दार ‘धडाम्!’कन् आपटून आपापल्या कामांना बाहेर पडत होतो.. त्याच पायऱ्यांवरून दडदडत. सगळं काही तेच होतं असं वाटत असतानाच एका जादूच्या क्षणी संदेशच्या हातात एक गोबरा, गोजिरवाणा हात आला आणि सगळंच बदलून गेलं.. सगळंच!
म्हणजे झालं असं की, आमच्या शेजारी दोन घरं सोडून एक चष्मेवाला युवक राहत होता. त्याचं एका गोड मुलीबरोबर लग्न झालं. आमच्या इमारतीच्या गच्चीत त्यांच्या लग्नाचं जेवण मी आणि संदेश दोघंही जेवलो. त्या जोडप्याला एक गोड मुलगा झाला. त्याचं नाव ‘नील’! काहीच दिवसांत या ‘नील’चा ‘माँटू’ झाला! हे नाव त्याला कुणी ठेवलं, कुणास ठाऊक! तो झाला त्या काळात मी इतकं काम करत होते की, तान्ह्य़ा माँटूनंतर मला आठवतो तो एकदम तीन वर्षांचाच माँटू! ही तीन र्वष मी ‘अवघाचि संसार’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सकाळी सहा ते रात्री साडेअकरा घराबाहेर! त्या धकाधकीच्या काळात शांतता कशी ती सापडतच नव्हती. त्या गदारोळात एकदा संदेशनं या पुस्तकाच्या जन्माची बातमी दिली- त्याचं पहिलं प्रकरण वाचून दाखवून. खरं तर माँटू संदेशला दिसायचा तसाच मलाही दिसायचा. कधी उशिरा चित्रीकरण असेल तर घाईघाईनं आवरून निघताना पायऱ्यांपाशी पॅसेजमध्ये खेळताना.. मी कामाचं हसून ‘माँटू, प्लीज हटोगे, मुझे जाना है जल्दी!’ असं म्हणून त्याच्या गोडुल्या गोबऱ्या हाताला धरून त्याला अलगद बाजूला सारून पायऱ्यांवरून दडदडत सुटायचे. ते चूक होतं असं नाही; पण खूप काही माझ्या आसपासचं माझ्या नजरेतनं, मनातनं सुटत होतं, हे नक्की.
संदेशनं त्या पुस्तकाचं दुसरं प्रकरण वाचलं- ‘नवी खिडकी’- तो दिवस मी कधीच विसरणार नाही. खूप दिवसांनी पळता पळता थांबायला मिळाल्यासारखं वाटत होतं. त्यात वर्णन केलेला तो जिना, त्या पायऱ्या, रोज दडदडत उतरते मी.. ती िभत, त्यावरचा तो एक काळा ठिपका- संदेशने लिहिण्याआधी इतक्या वर्षांत दिसलासुद्धा नाही मला. त्या ठिपक्यातनं निर्माण झालेल्या त्या काल्पनिक खिडकीतनं किती काय काय पाहिलं होतं- माँटूनं आणि संदेशनं. ती वासरं, माकडं, कारंजी उडवणारे हत्ती. या प्रकरणाची शेवटची ओळ आहे- ‘माँटू घरी गेला. जाताना एक खिडकी मागे सोडून गेला.’ मी आमच्या घराचं दार उघडलं आणि समोरच्या िभतीवरचा तो काळा ठिपका शोधला. माझ्या धकाधकीत तो मला नुसता काळा ठिपका दिसत असला तरी कुठूनशी आलेली एक वाऱ्याची झुळूक मला सांगून गेली- हे पुस्तक मला या ठिपक्यातली खिडकी बघायला शिकवणार आहे, नक्कीच! तसंच झालं. या पुस्तकाच्या घडण्यानं माझ्या त्या धावपळीत मला सुशेगाततेचा.. निवांतपणाचा पस दिला. काही पानांवर मला माझ्या डोळ्यात डोळे घालायला भाग पाडलं.
‘शाब्बास म्हणणार..’ या प्रकरणात माँटू आणि संदेश एक खेळ खेळत असतात. खेळ तसा साधाच. संदेश माँटूला शाबासकीचा खेळ शिकवतो आहे. संदेश म्हणेल तसं माँटूनी त्याच्यामागे म्हणायचं. संदेश- ‘माँटू कैसा है? होशियार.. बोलो.’ माँटू- ‘होशियार!’  संदेश- ‘माँटू कैसा है? प्यारा.. बोलो.’ माँटू- ‘प्यारा!’ संदेश- ‘माँटू कैसा है? सुंदर.. बोलो.’  माँटू- ‘सुंदर!’ यानंतर अचानक माँटूच संदेशला विचारतो, ‘संदेश कैसा है?’ संदेश गप्प होतो. याक्षणी एक वाचक असलेली मीही झपकन् त्या खेळात ओढली गेले. आतलं दडवलेलं काहीसं उघडं पडल्यासारखं वाटलं. शाबासकी घेणं, आपण आपलं कौतुक करणं म्हणजे शेफारणं, हे वर्षांनुवर्षांचं वाटणं माँटूच्या त्या निरागस प्रश्नांनी वितळायला लागलं. संदेशनं लिहिलं आहे- ‘त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला वेळ लागतो आहे असं पाहून त्यानं त्याच्या इवल्याशा हातात माझा चेहरा पकडला आणि त्याच्या दिशेनं वळवला. पुन्हा विचारलं, ‘संदेश कैसा है? होशियार! बोलो..’ त्याक्षणी माँटूचे ते गोबरे मऊ हात मला माझ्याही चेहऱ्याभोवती जाणवले. त्याच्या आवाजात मलाही ऐकू आलं- ‘अमृता कैसी है? होशियार! बोलो..’ इथे पुस्तकातल्या संदेशच्या गळ्यात दाटलेला आवंढा माझ्याही गळ्यात दाटला! त्या आवंढय़ातनं उमललेलं स्वच्छ पाणी आपल्या गालावर सांडायच्या आतच पुढच्याच प्रकरणात माँटू आमच्या घरातल्या लाकडी खुर्चीवरून पडल्यानंतर ढुंगण चोळत उभा राहिल्याचं वर्णन वाचून फस्सकन् हसूही आलं.
फुलाचा एक परागकण वाहून नेणाऱ्या मुंग्यांचं वर्णन वाचताना त्यांच्याबरोबर आपणही कुठल्याशा सूक्ष्म जगात निघून जातो- ‘अ‍ॅलिस इन् वंडरलॅण्ड’सारख्या. मी ही हसण्या-रडण्याची, स्वत:पाशी येण्याची, स्वत:वर आणि माँटूसारख्या बछडय़ावर प्रेम करण्याची सर खूपदा केली. माँटूचा गोडवा इतक्यांदा वाचूनही मला पुन:पुन्हा भुलवतो आहे याचं अप्रूप आहे. मुठीत असलेली आवडती गोष्ट मूठ उघडून आपल्या जीवाभावाच्या माणसांना दाखवण्यात कोण निरागस आनंद असतो! या पुस्तकामुळे तो आणि तसा आनंद संदेशइतकाच मलाही झाला आहे. या पुस्तकानं मला दिलेला ‘माँटुकला आनंद’ तुम्हा सर्वाच्या घरातल्या छोटय़ांच्या, मोठय़ांच्या आणि मोठय़ांमधल्या छोटय़ांच्याही मनभर पसरून राहावा, ही सदिच्छा!

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Montukle divas book released by actor writer sandesh kulkarni
First published on: 14-06-2015 at 12:10 IST