पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चांदा (चंद्रपूर आणि गडचिरोली) तसेच भंडारा (गोंदिया) या चार जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही एक वैशिष्टय़पूर्ण बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द या बोलीने सामावून घेतले असले तरी ती स्वतंत्र आहे. पण अलीकडे तिच्यावर हिंदीचं आक्रमण होत आहे. किंबहुना ती हिंदीमय होऊ लागली आहे.
अ मेरिकेतील एका कंपनीत मुलाखत सुरू आहे.
मॅनेजर : व्हेअर आर यू फ्रॉम?
उमेदवार : इंडिया, सर.
मॅनेजर : अरे वा भाई, इंडिया में कहाँ से?
उमेदवार : महाराष्ट्र, सर.
मॅनेजर : बाप रे! कुठला रे तू?
उमेदवार : नागपूर, सर.
मॅनेजर : बाप्पा बाप्पा, बम दूर आला बे तू?
उमेदवार : हौना, सर.
नागपुरी बोलीचे भौगोलिक केंद्र आणि भाषिक रूप स्पष्ट करणारा हा संवाद आहे. भारताचा भाषिक सव्‍‌र्हे करणाऱ्या डॉ. ग्रियर्सन यांच्या मते, पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चांदा (चंद्रपूर व गडचिरोली) व भंडारा (गोंदिया) या चार जिल्हय़ांत प्रामुख्याने नागपुरी बोली बोलली जाते. मध्य प्रदेशातील शिवनी, िछदवाडा, बालाघाट व रायपूर या चार जिल्हय़ांचा समावेशही त्यांनी नागपुरी क्षेत्रात केला आहे. प्रा. सुरेश डोळके यांच्या मते, वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या दुआबातला प्रदेश हा ‘नागपुरी मराठी’चा मुलुख होय. परंतु अलीकडे हरिश्चंद्र बोरकर यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्हय़ांतील म्हणजे झाडीपट्टीतील ‘झाडीबोली’चा स्वतंत्र संसार थाटून वऱ्हाडी आणि नागपुरीपासून तिला वेगळे केले आहे. तरीही प्राचीन गोंडवनाचा हा सगळा परिसर नागपुरी बोलीच्या टापूतच येतो असे व्यापकपणे म्हणता येते.
नागपूर हे इसवी सनाच्या दहाव्या शतकात एक महत्त्वाचे केंद्र होते. झाडीपट्टीतील मराठीभाषिकांची वसाहत ही तर फारच प्राचीन आहे. आद्यकवी मुकुंदराज नागपूर जिल्हय़ातील अंभोऱ्याचा. ‘विवेकसिंधु’ हा त्याचा ग्रंथ इ. स. ११८८ चा. पण त्याच्याही आधी ४८ वर्षांपूर्वी चांद्याच्या दिनकरसिंह या गोंड राजाने मराठीला- म्हणजेच पर्यायाने बहुजन समाजात प्रचलित नागपुरी बोलीला आपल्या राजभाषेचे स्थान दिले होते. द्रविड भाषा कुलोत्पन्न गोंडी ही मातृभाषा असूनही नागपूरकर गोंड राजांनीही स्थानिक मराठीलाच आश्रय दिला होता.
थोडक्यात- नागपुरी मराठीला आठ-नऊ शतकांची परंपरा आहे. प्रारंभी संपूर्ण विदर्भाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही विभागांतील बोलीभाषेला ‘वऱ्हाडी’ असे संबोधले गेले. पण वऱ्हाडी ही फक्त अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा या पश्चिम विभागापुरतीच मर्यादित आहे. नागपुरीला वऱ्हाडीचेच एक रूप मानल्याने नागपुरीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झालाच नाही. १९४० मध्ये ग. त्र्यं. माडखोलकरांनी सर्वप्रथम मुंबई नभोवाणीवर ‘नागपुरी मराठी’वर भाषण दिले. नागपुरी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांनी १९७२ मध्ये प्रसिद्ध केला. अत्यंत विस्तृत अशा या प्रबंधात अखेरीस नागपुरी बोलीचे काही संग्रहित नमुने दिले आहेत. संपूर्ण विदर्भ म्हणजे वऱ्हाडी असे समजणाऱ्यांना पुढील संवादावरून नागपुरी बोली कशी वेगळी आहे, ते लक्षात येईल.
‘‘कायचं व लगन्! नाव् तालेवाराचं आन् करनी ७७७७७वानी! धड् वाहाड्न्याची येवस्ता न्हाइऽऽ का बसाची सोय न्हाइ! कितिक् मान्साचा सय्पाक् सिजव्ला हाये, आंधी पाहुन् न्हाइ घ्या व्? सम्द्यायले पानार्व बसव्लं न मंग् दांदर्ल्यावानी येथी वाहाडू का तेथी वाहाडू कराले लागल्या! तुपाची धर्ा असी का जसा उंदर्ि मुतुन् ऱ्हाय्ला! लाहान्या पोराय्ची त लगीत् बंडर्ा झाली! भुकेच्या मार्ल्या पोट्टे बोम्लू बोम्लू आखरि निजुन् गेलेऽऽ र्प त्याय्च्या पोटात् वक्तार्व काइ दोन् घास् गेले न्हाइ!’’
नागपुरी बोलीत वऱ्हाडी व झाडीबोलीही मिसळल्या आहेत आणि या तिन्ही बोलींवर हिंदीचा प्रभाव आहे. उदा. ‘मी जात आहे, मी काम करीत आहे’ असे प्रमाण मराठीत बोलतात, तर नागपुरीत ‘मी जाउन राहय़लो, मी काम करून राहय़लो’ असे बोलतात. तसेच प्रमाण मराठीत िलगानुसार ‘जातो’ किंवा ‘जाते’ असे बोलले जाते. पण नागपुरीत दोन्हीत ‘जातो’ असेच बोलले जाते. प्रमाण मराठीत एखादी स्त्री आपल्या पतीच्या संदर्भात ‘ते शेती करतात’ असे म्हणेल, तर नागपुरीत ‘ते शेती करतेत्’ असे म्हणेल. मुलगा वा मुलगी जेवत असेल तर त्याविषयी ‘जेवण करत’ असे बोलले जाते.
कोणत्याही बोलीप्रमाणेच नागपुरीत संस्कृतोद्भव आणि परभाषेतील शब्द पुष्कळ आढळतात. िहदीतूनच बरेच शब्द आले आहेत. ‘पना’ हा प्रत्यय लागून काही मजेदार शब्दप्रयोग नागपुरीत दिसतात. उदा. चोरचोट्टेपना, पोरपोट्टेपना, उडानचोट्पना, खुटीउप्पड्पना, इत्यादी.
नागपुरीतील काही वाक् प्रयोग वैशिष्टय़पूर्ण आहेत. आंगात येणे (बेपर्वा वृत्ती), आंग झटकणे (जबाबदारी नाकारणे), उभ्यानं लवणे (मस्तीत येणे), तोंडचोपडय़ा गोष्टी करणे (गोडीगुलाबी करणे), भाड झोकणे (निर्थक काम करणे), मायबहीण घेणे (आई-बहिणीवरून शिव्या देणे), वान वाटत िहडणे (विनाकाम वेळ घालवणे), हागुन ठेवणे (काम बिघडवून ठेवणे), बाप तसा लेक अन् मसाला येक! (मुलगा वडिलांच्या वळणावर जाता तेव्हा आई या शब्दात आपला संताप व्यक्त करते.) इ.
खरे तर संत तुकाराम महाराजांच्या काव्यातील भाषा पाहिली तर आजची मराठी ही विकृत (‘प्रदूषित’ या अर्थाने) आहे असे म्हणता येईल. नागपुरीत मात्र आजही सहजपणे आणि नेमक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या जातात- ज्याला प्रमाण मराठीत शिवी वा अशिष्ट व असभ्य मानले जाते.  
प्रमाणभाषा ही लिपीबद्ध असते. पण बोलीला लिपीच्या मर्यादा नसतात. त्यामुळे कोणत्याच बोलीचे क्षेत्र काटेकोरपणे निश्चित करता येत नाही. ती एक सजीव, सतत बदलणारी सामाजिक गोष्ट असते. शेंडे यांनी केलेल्या संकलनातील एक नागपुरी लोकगीत पाहा-
का वो सांगू माहय़ा करमाची गत
हातची बांगळी माये टिचकली!
अवस पुनव सये बोथरीच्या झाल्लरी
ठिगराचे उसले धागे आली बंकट डिग्री
हातची बांगळी माये टिचकली!
 या गीतातून झाडीबोली, नागपुरी व वऱ्हाडी वेगळ्या करता येत नाहीत.
डॉ. वऱ्हाडपांडे यांच्या मते, ‘बोलीतील जिवंत शब्द, वाक्प्रचार लिपीच्या जड माध्यमातून प्रकट करू पाहणे हे फुलपाखराच्या पंखावरले रंग वेचू पाहण्याइतकेच दुष्कर आहे. त्यामुळे बोली ही भावात्मक असते. ते भाव प्रमाण मराठी रूपात व्यक्त करणे कठीण असते. गीतात्मक आघात हा बोलीचा विशेष आहे. म्हणूनच ‘एचएमव्ही’ने नागपूरच्या दादा कोठीवान यांच्या नागपुरी बोलीतील ‘भिकारणीच्या नकले’ची रेकॉर्ड बाजारात आणली होती- ‘‘हय़े माहय़ा भाग्याच्ये सके.. बये वे.. हय़े भुऱ्या टोंडाचे मयनो.. बये.. व दे व माय कोरभर भाकर टुकडा..’’
वस्तुत: जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ही माणसाला हादरवून टाकणारी घटना असते. पण खेडय़ातील स्त्रिया आपला शोक व्यक्त करताना अक्षरश: गातात. नागपुरी बोलीत एक आई पुत्रशोक कसा व्यक्त करते, त्याचा हा नमुना : ‘‘आगा .. माहय़ासंग.. माहय़ासंगे बोलत न्हाई का रे सोन्या.. आगा तुनं मले मुंदी मांगतली होती.. आता मि मुंदी कोनाच्या बोटात घालन गा माहय़ा पिल्या..! माहय़ावर असा काउन राघो भरला गा..! येखांदा सबद् तरी बोलनं गा..’’
महानुभावांचे गद्यलेखनही वऱ्हाडी भाषेतच आहे. नागपूरकर भोसल्यांच्या पत्रव्यवहारात मात्र नागपुरी आढळत नाही. कारण भोसले नागपूरकर असले तरी त्यांचे कारकून शिष्टमान्य दरबारी लेखणीचे गुलाम होते. पण पुढच्या काळात नागपुरातल्या लेखकांनी जाणीवपूर्वक नागपुरी बोलीचा वापर आपल्या साहित्यात केला. नागपुरी बोलीची फोडणी असलेली ज. कृ. उपाध्ये यांची ‘चालचलाऊ भगवद्गीता’ प्रसिद्धच आहे. याशिवाय ग. त्र्यं. माडखोलकर, वामन चोरघडे, शांताराम, गो. रा. दोडके आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांचाही उल्लेख करता येईल. अलीकडे सुधाकर गायधनी, लक्ष्मीकमल गेडाम आणि अनंत भोयर यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या नागपुरी बोलीत लिहिल्या आहेत.
अलीकडच्या काळात नागपुरी बोलीवर हिंदीचं आक्रमण होत आहे. त्यामुळे ती हिंदीमय होऊ लागली आहे. या भागात नवनवीन उद्योग, इमारतबांधणी, छोटे-मोठे व्यवसाय यास्तव उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून खूप मोठय़ा प्रमाणावर हिंदीभाषिक कामगार येत आहेत. त्यांच्यामुळे हा परिणाम होतो आहे. त्यापासून ही बोली वाचवण्याच्या प्रयत्नांना बळकटी येण्याची गरज आहे.

chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा
Meteorological department predicted heat wave in Raigad Thane Palghar along with Mumbai Pune
मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये उकाडा वाढणार; यवतमाळ, अकोला, चंद्रपुरात तीन दिवस उष्णतेची लाट
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला