प्रस्तूत पुस्तकाला सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज, मुंबई यांचे तत्कालीन प्रिन्सिपॉल एच. आर. हॅमले यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात पुस्तकाची प्रेरणा स्पष्ट होते. ‘नव्या शिक्षणपद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे विषय आणि विषयातील वज्र्य मजकूर यांच्या मानवी पैलूंची जाणीव. आता आपल्याकडे मानवी भूगोल, मानवी विज्ञान, एवढेच नव्हे, तर मानवी गणितही आहे. इतिहास या विषयाची मानवी बाजू अधोरेखित करण्याची गरज नाही असे लोक जणू धरून चालले आहेत.’
हे तत्त्व स्वीकारून वि. द. घाटे यांनी मुलांना इतिहास रंजकपणे शिकवावा व तो वाचताना, अभ्यास करताना रूक्षपणा अनुभवास येऊ नये, यासाठी इतिहासातील महत्त्वाच्या घटना नाटय़रूपाने सांगितल्या. ‘‘नाटय़पद्धतीने हेच शिवाजी-संभाजी मुलांना इतर माणसांसारखे चालता- बोलताना आढळतील. मुले मौजेने शिवाजी-संभाजी झाली, हातात भाले आणि डोकीस मुंडासे चढवून ती जुनी भाषा बोलू लागली व अभिनय करू लागली म्हणजे रंगून जाऊन मराठय़ांच्या इतिहासाशी तादात्म्य पावतील.. माझे पुस्तक वाचून मुलांना जुनी साधने वाचावीशी वाटली तर मी कृतार्थ होईन..’’ असे घाटे यांनी म्हटले आहे. या पद्धतीचे लेखन करताना आपण कुणाचीही बाजू घेतलेली नाही, वा कुणाच्या दोषांवर पांघरूण घातले नाही, किंवा जातीधर्माची नालस्ती केली नाही, असा दावाही लेखकानी केला आहे.
मालोजीराजे भोसले (छत्रपतींचे आजोबा) यांनी शेती सोडून शस्त्र हाती घेतल्यापासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतच्या २२५ वर्षांतले ४३ प्रसंग नाटय़रूपाने या पुस्तकात येतात. काही प्रवेश फार छोटे- संभाषणाच्या चार-पाच तुकडय़ांचे; तर काही २०-२५ तुकडय़ांचे. सर्वात लांबीने मोठा असा प्रवेश छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा आहे. वेगवेगळ्या कलशांची स्थापना गागाभट्टांनी विविध मंत्र-उच्चारणे, अष्टप्रधानांनी विविध जलांचा द्रव्यांचा अभिषेक करणे, अशा कृती या प्रवेशात घडतात. प्रत्यक्ष सिंहासनावर आरूढ झाल्यावर छत्रपतींनी अष्टप्रधानांना वेगवेगळे किताब, पद, वेतन व इतर मानसन्मान यांची घोषणा करणे, परदेशी वकिलांनी नजराणे देणे, यांतून वाचकांच्या डोळ्यासमोर सारा प्रसंग जिवंत होतो.
औरंगजेबाचा मृत्यू हा शेवटचा प्रवेशही तेवढाच प्रत्ययकारी आहे. इतर प्रवेशांत ताराबाई, संभाजीराजे, शिवाजी-रामदास भेट, राजाराम महाराजांना अभिषेक अशा व्यक्ती/प्रसंग येतात. संताजी-धनाजी यांच्यातील बेबनाव, संभाजीच्या काळात माजलेली फितुरी यांचेही दर्शन घडते.
हे नाटय़प्रवेश लिहिताना विस्तृत कालखंडातील घटना मांडायच्या व त्याही लांबण न लावता- हे आव्हान होते. वि. द. घाटे त्यात यशस्वी झाले असं म्हणता येईल. नाटय़प्रवेशाचा घाट स्वीकारला तरी आपण मनोरंजनासाठी हे लिहीत नसून इतिहास कंटाळवाणा होणार नाही हे बघणे, हा इरादा त्यांच्या मनात पक्का होता. मात्र, इतिहास रंजक करताना आवश्यक ते संदर्भ देणे व खुलासा करणे, अर्थ समजावणे हे नियम त्यांनी पाळले आहेत. संवादात आलेल्या अनेक शब्दांचा अर्थ तळटिपा देऊन स्पष्ट केला आहे. (जसे.. घमघमे- मोर्चासाठी केलेले उंचवटे. कौले घेणे- शरण येणे. आम दरफ्ती- येणे-जाणे)
कित्येक ठिकाणी इतिहासातील घटनांचे कागदोपत्री पुरावे दिले आहेत. लेखकानी प्रस्तावनेत म्हटले आहे की, नाटय़संवादातील व्यक्ती त्याकाळच्या बोलीभाषेत बोलतात. ही बोलीभाषा प्राकृत तर होतीच; पण शिवकालीन परिस्थितीत मराठीत काही उर्दू शब्दही रुजले होते. अशा मिश्र बोलीची उदाहरणे अनेक दिसतात..
संभाजी- आमचा खासा जिलबीचा घोडा खंडबाला बसायला द्या. (स्वारीत पुढे चालणारा घोडा)
शिवाजी- जंजिऱ्यास आमच्या लोकांनी शह दिला आहे. त्यांना उपराळा करा. (उपराळा = मदत)
खऱ्या शिक्षकाच्या भूमिकेतून केवळ इतिहासच नव्हे, तर त्यावेळच्या चालीरीती, प्रशासन, सामाजिक मूल्ये, बोलीभाषा या साऱ्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी खूप योजनापूर्वक आणि परिश्रम घेऊन हे लेखन केल्याचे जाणवते. आपल्या पाठय़पुस्तक निर्मिती मंडळास अशा प्रयत्नांची कास धरावीशी वाटली तर ते फार मोलाचे होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नाटय़रूप महाराष्ट्र’ भाग- १ (१५७५-१७०७)-
लेखक-प्रकाशक : वि. द. घाटे, प्रकाशन- नोव्हेंबर १९२६. पृष्ठे : १४२, किंमत : १ रुपया.
 मुकुं द वझे – vazemukund@yahoo.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Natyarup maharashtra bhag
First published on: 21-06-2015 at 12:16 IST