भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवरचे सर्व सजीव हे नवग्रहांच्या थेट प्रभावाखाली असतात. चंद्र-सूर्य तसेच नवग्रहांच्या जन्मवेळच्या स्थितीनुसार पूर्वजन्मकर्माचे फलित म्हणून आणि या ग्रहांच्या भ्रमणानुसार शुभ-अशुभ घटनांचा अनुभव येतो असे मानले जाते. अशुभ व पाप ग्रहांच्या प्रभावामुळे तसेच शुभ ग्रहांच्या अनिष्ट स्थितीमुळे येणारे दु:ख, व्याधी इ.ची तीव्रता कमी करून ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नवग्रहांची उपासना करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. या ज्योतिषीय उपासनेत नवग्रहांच्या प्रतिमांच्या पूजनात धार्मिक विधींचा समावेश आहे. त्यासाठी नवग्रहांची ही मंदिरं स्थापित करण्यात आली आहेत. तंजावर कुंभकोणम् या जिल्ह्य़ाचं हे आज एक वैशिष्टय़ ठरलं आहे. भारताचं भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कावेरी नदीच्या या निसर्गसंपन्न, सुपीक प्रदेशात अनेक श्रद्धाळू आपल्या आध्यात्मिक इच्छापूर्तीकरता तसेच मन:शांतीसाठी इथं येतात.
मोक्षदायी तीर्थावर तपस्या करण्यासाठी श्री शंकराने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन मानवी स्पर्श न झालेल्या या पावन भूमीत हजारो वर्षांपूर्वी आराधना केली गेली. मानवी पीडांचं हरण करण्यासाठी अत्यंत कलात्मक, भव्यदिव्य अशा नवग्रह मंदिरांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. ही मंदिरं चेन्नईपासून साधारणपणे ३०० कि. मी.च्या अंतरावर आहेत.
सूर्य मंदिर : थिरूमंगल कुडी येथे सिंह राशीचा स्वामी सूर्यनार कोविल या सूर्यमंदिराला अग्रपूजेचा मान आहे. नवग्रह यात्रा इथूनच सुरू केली जाते. पाच एकरात वसलेल्या या मंदिराच्या भव्य आवारात प्रथमदर्शनी मोहक सूर्यप्रतिमा, अन्य ग्रहांची मंदिरे, प्राणनाथ (शिव) व मंगलांबिका (पार्वती) यांच्या कलात्मक मूर्ती आहेत. इथे दर रविवारी दुपारी १२ वाजता पूजा व तमीळ महिन्याच्या पहिल्या रविवारी महाभिषेक होतो. बारा ऋषींनी पूजलेल्या या सूर्यमूर्तीच्या दर्शनाने असाध्य ज्वर, हाडांचे व डोळ्यांचे विकार, तसेच पाठीच्या कण्याच्या आजारापासून मुक्ती होते असे म्हटले जाते. सूर्यनार कोविलचे दर्शन घेण्यापूर्वी प्रणवादिश्वर व मंगलनायकी यांचे दर्शन घ्यावे लागते. सूर्यनार कोविलच्या प्रांगणात वेल्लरक्कू हा स्थलवृक्ष असून, मंदिराच्या मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूला पुण्यतीर्थ असलेली पुष्करणी आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी भिंत आहे. नैऋत्येला गणेशतीर्थ, महामंडप, स्थापनामंडप, सबनामगर मंडप व नर्तना मंडप हे अतिशय सुबक बांधणीचे, आकर्षक व मजबूत दगडी बांधकामातील आहेत. बाराव्या शतकात कुलातुंगा राजाने बांधलेल्या या मंदिराचे वैशिष्टय़ हे की, इथे नवग्रहांची स्वतंत्र मंदिरे असून हे सर्व ग्रह नि:शस्त्र, कृपाळू आहेत.
चंद्र मंदिर : थिंगलूर गावाच्या पूर्व भागात कर्क राशीचा अधिपती असलेल्या चंद्रग्रहाचे सुबक बांधणीचे मंदिर तंजावरपासून दहा कि. मी. अंतरावर आहे. येथील शिवमूर्ती ही कैलय नादर व पार्वती पैरीयन नायकी म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रग्रहाचे स्वतंत्र गर्भगृह आहे व त्यावर एक सुंदर गोपूरही आहे. पूर्व दिशेला असलेल्या मुख्य द्वारापाशी चंद्रतीर्थ असून जवळच पुण्यवृक्ष (स्थलवृक्ष) बेल व केळ आहे. चंद्र मंदिरातील मोठय़ा मंडपात उपासनेसाठी विशेष स्थानाची व्यवस्था आहे. थिंगलूर इथल्या कावेरी नदी व चंद्रतीर्थातील स्नान हे सर्व रोग-व्याधी नष्ट करणारे मानले जाते. तसेच फाल्गुन महिन्यात आलेल्या उत्तरा नक्षत्राच्या योगावर दिवसा सूर्य व रात्री चंद्राची किरणं येथील शिवलिंगावर पडतील अशा तऱ्हेने त्याची बांधणी आहे.
मंगळ मंदिर : मेष व वृश्चिक राशीचा अधिपती असलेल्या कुज, अंगारक व भूमिपुत्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाचे मंदिर वैथिश्वरन् कोईल हे सिरकाळीपासून सहा कि. मी. अंतरावर आहे. वैथिश्वरन गावात वसलेल्या या मंदिराला अत्यंत मजबूत अशी दगडी संरक्षक भिंत आहे. मंदिराचे पालकदेवता पूर्वेला भैरव व पश्चिमेला वीरभद्र, दक्षिणेस करपविनायक व उत्तरेस कालीमाता यांची आत उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर अर्थातच मंगळाचे आहे. इथे वैद्यनाथ व चैथल नामकी नावाने शंकर-पार्वतीच्या प्रसिद्ध मूर्ती आहेत. येथील जटायू समाधी व सिद्धामृत तीर्थ जे दुर्धर रोगनाशासाठी प्रसिद्ध आहे. येथील उपमंदिरांतील मुत्तुकुमारस्वामी आदींचे दर्शनही पुण्यप्रद मानले जाते. मुख्य द्वारावर सातमजली गोपुर व समोरच हत्तीची भव्य मूर्ती आपले चित्त आकर्षित करते. या परिसरात प्रचंड ‘कडुलिंब’ हा स्थलवृक्ष आहे.
बुध मंदिर : मैलउदुरैच्या रस्त्यावर तिरुवेंकाडू या गावात बुध ग्रहाचे मंदिर असून, तिथे ब्रह्मविआम्बिका नटराज, अष्टभुजादेवी, कालिमाता इ.च्या मूर्ती आहेत. इथे पुण्यवृक्ष बेल व पिंपळ असून वडाच्या झाडाजवळ बुध ग्रहाचं मंदिर आहे- जिथे ब्रह्माला विश्वरहस्याचे ज्ञान झाले असे म्हटले जाते. येथील विनायक मंदिराजवळ प्रशस्त पुष्करिणी आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून परिसर अत्यंत स्वच्छ व येथील सर्व व्यवस्था चोखपणे राखली जाते.
बृहस्पती मंदिर : कुंभकोणम्पासून १५ कि. मी. अंतरावर थिरुअलन इथे गुरू ग्रहाचे अतिप्राचीन मंदिर आहे. येथील दक्षिणा मूर्ती व भगवान शंकर यांची पूजा गुरू मानून केली जाते. गुरू ग्रहाच्या भ्रमणामुळे होणाऱ्या राशीबदलाच्या वेळी येथील मूर्तीला प्रदक्षिणेच्या रूपात नेले जाते. या मंदिराचे रक्षण द्वारपाल व नंदी करतात असे मानले जाते. इथे पुण्यतीर्थ पूलम नावाने ओळखले जाते. सामाजिक प्रतिष्ठा, प्रभाव व शुभ घटना, सौख्यप्राप्तीसाठी इथे दर्शन व पूजन करण्याचा प्रघात आहे.
शुक्र मंदिर : सूर्य मंदिरापासून केवळ दोन कि. मी. अंतरावर सर्वपरिचित शुक्र ग्रहाचे मंदिर कंचनूर या निसर्गरम्य ठिकाणी आहे. येथील शिवमूर्ती व शुक्रतत्त्व एकच असून, हा शिव अग्निपुरिश्वर, तर पार्वती माता करपगाम्बा नावाने ओळखली जाते. येथे पळस हा स्थलवृक्ष असून, अग्नितीर्थ व प्रसादतीर्थ नावाने परिचित पुष्करिणी आहेत. सर्व प्रकारचे सौख्य व ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी इथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. अन्नदान, नित्य संगीतसेवा व गोसेवा ही येथील उपासनेचाच एक भाग मानली जाते.
शनी मंदिर : कराईकळपासून पाच कि. मी. अंतरावर पाँडिचेरीजवळ तिरुनल्लार (थिरूनल्लार) इथे शनी ग्रहाचे प्रसिद्ध मंदिर आहे. जवळच नळतीर्थ, नलराजाची पत्नी व मुलांच्या मूर्ती तसेच तलावाजवळ नवग्रहांच्या नऊ विहिरी असून, इथे प्रथम स्नान करून श्रद्धाळू शनीच्या दर्शनास जातात. पाच मजल्यांच्या भव्यदिव्य मुख्य द्वारावरील गोपुरानंतर या विशाल शनीमंदिराचे दर्शन होते. इथे शिवतत्त्व दर्भनारायणेश्वर हे पाचूचे शिवलिंगस्वरूप व पार्वती माता पूनमुलैयलम् नावाने पूजली जाते. या अतिप्राचीन मंदिरांच्या भिंतीवर नळराजाची गोष्टी चितारली असून, मकर व कुंभ राशीच्या भव्य शिलाप्रतिमाही आहेत. ६३ शैव संतांच्या तसेच नलेश्वरलिंग, भगवान मुरुगन, आदिशेष भैरव व महालक्ष्मीच्या दगडी मूर्तीही आहेत. विविध प्रकारच्या दोषांच्या निवारणासंबंधी शिलालेखही इथे आढळतो. थारूप्पा ही येथील पवित्र वनस्पती आहे. साडेसाती, शनीपिडा, दु:ख व दारिद्य्रनाशासाठी येथील उत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी जमते.
राहू मंदिर- कुंभकोणम्पासून सहा कि. मी. अंतरावर श्री तिरूनागेश्वरम् नावाचे राहू ग्रहाचे प्रशस्त मंदिर आहे. हे लोकप्रिय मंदिर नागनाथ स्वामी मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. इथे नाटय़गणपती व नंदी यांच्या भव्य प्रतिमा व मंदिर असून, त्यास प्रशस्त मंडप आहे. कलाकुसर, कोरीवकाम व शिलालेख यांनी परिपूर्ण अशा या मंदिरात शेषनाग राहू व दोन पत्नींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. राहूकाळात केलेल्या अभिषेकाचे दूध फक्त राहूच्या मूर्तीवर पूर्णपणे (विषामुळे) निळे झालेले पाहता येते. सेनबकिश्वर हा शिव व श्री गिरीकु जांबिका ही पार्वतीरूपात आहे.  शत्रू -पीडा, रोग, दु:ख व भयनाशासाठी इथे राहूकाळात रोज भाविकांची गर्दी होते. इथे सूर्यतीर्थ नावाचा तलाव असून सनबगा हा स्थलवृक्ष आहे.
केतू मंदिर : मैलाडदुराईपासून २० कि. मी. अंतरावर हे केतूचे ख्यातनाम स्थान असून, इथे शिवतत्त्व नागनाथस्वामी व पार्वती माता सुंदरनायगी या नावाने प्रसिद्ध आहेत. हे किठा पेरूपल्लम या गावात असून, हे स्थान अत्यंत निसर्गरम्य आहे. पूर्वाभिमुख भव्य अशा या मंदिराच्या चारही बाजूंनी दगडाची संरक्षक भिंत आहे. मंदिराच्या समोरच ‘नागतीर्थ’ नावाची पुष्करिणी आहे. इथे अरसा व कडूलिंब हे स्थलवृक्ष असून, प्रदक्षिणामार्गात लक्ष्मीनारायण, दुर्गा, राजलक्ष्मी, विनायक आदींच्या आकर्षक मूर्ती आहेत. क्षय, दुर्धर त्वचारोग व अनामिक पीडा यांच्या निवारणासाठी येथील सौंदर्य नायकी या भव्य मंडपात केतू, नागनाथस्वामी व नंदी यांच्या उपासना- मूर्ती आहेत. नवग्रह मंदिर मालिकेतील हे महत्त्वपूर्ण मंदिर शिल्पकला, नक्षीकाम व कलाकुसर यांचा आस्वाद घेणाऱ्यांस पर्वणीच आहे.
चौघडा व नागस्वरम् या वाद्यांचे कानात सतत गुंजणारे स्वर, सहा ते आठ मीटर उंचीचा प्रवेशद्वाराजवळील ध्वज, हत्ती, विशिष्ट संख्येत मिळणारे तुपाचे दिवे, अष्टलक्ष्मीक ईशान्य लिंग, तसेच दक्षिण दिशेस तोंड केलेला सेनापती चंडिकेश्वर, मंदिराबाहेर मिळणाऱ्या पारंपरिक फुलं व हारांचा सुगंध तसेच खास दक्षिणी पद्धतीने बनवलेला प्रसाद हे या मंदिरांचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
प्रत्येक ग्रहाच्या मंदिरातील गर्भगृहाखाली असलेल्या सिद्धऋषींच्या समाधीमुळे जागृत असलेली ही नऊ मंदिरे मुळात र्सवकष वैयक्तिक उत्कर्षांसाठी निर्माण झाली असली तरी कलाकुसर, सौंदर्यशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पकला व इतर शास्त्रांना आश्रय व प्रतिष्ठा देणे हाही उद्देश त्यांच्या निर्मितीमागे आपल्या पूर्वजांनी केला असावा असं ही मंदिरे पाहताना जाणवते. श्रद्धा व आस्था यामुळे हजारो वर्षांपासून जतन केलेला निसर्गस्नेही परिसर, गोशाळा, स्थलवृक्षांचे जतन, जलसंधारण व निसर्गदत्त औषधी गुणांचा वापर, पशुपक्षी व जलचरांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या भव्य शिल्पकृती या दक्षिणी राज्याने जोपासल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navagraha temples in south india
First published on: 16-06-2013 at 12:39 IST