‘नेपाळचा प्रवास’- संपतराव गायकवाड, पहिली आवृत्ती- १९२८, प्रकाशक- लेखक स्वत:च,  पृष्ठे- ७२, मूल्य- आठ आणे.
बडोद्याच्या गायकवाड संस्थानिकांच्या कुटुंबातील एक सदस्य संपतराव गायकवाड १९२५ साली नेपाळला गेले होते. त्यावर आधारित त्यांनी एक व्याख्यान बडोदे येथील सहचारिणी सभेचा अध्यक्ष या नात्याने दिले. नंतर त्यांनी ते पुस्तिकारूपाने प्रसिद्ध केले. पुढे काही दिवसांनी काही पुस्तकांच्या साहाय्याने त्यात अधिक माहिती घालून ‘नेपाळचा प्रवास’ हे पुस्तक तयार झाले. संपतरावांच्या प्रवासवर्णनाचे (Travelogue) मूळ अशा प्रकारे व्याख्यानात आहे.
पुस्तकात १६ प्रकरणे आहेत. नेपाळचे भौगोलिक स्थान, नेपाळचा इतिहास, नेपाळमधील धर्म, हिंदू लोक, भाषा, खाद्यपेये, सण व उत्सव, विवाहपद्धती, शासनपद्धती, पोशाख आदी सामाजिक परिस्थितीचे बरेच तपशील त्यात आहेत. नंतरच्या अध्र्या भागात नेपाळचा प्रवासमार्ग, प्रमुख शहरे, प्रेक्षणीय स्थळे, अर्वाचीन नेपाळ, माझा नेपाळमधील अनुभव आणि सर्वात शेवटी ‘नेपाळच्या राजांची वंशावळ’ (त्यावेळच्या) असा एकंदर मजकूर आहे.
ज्याला रूढार्थाने प्रवासवर्णन म्हणता येईल असा भाग फार थोडा आहे. १२- २- २५ ते २८- २- २५ अशा सोळा-सतरा दिवसांचे नेपाळमधील अनुभव या प्रकरणात आहेत. या पुस्तकातल्या विशेष नोंदण्यासारख्या गोष्टी म्हणजे लेखकाचा साधेपणा व निरीक्षणक्षमता.
‘‘बडोद्याच्या राजघराण्याशी आपला संबंध आहे हे जाहीर होऊ नये म्हणून आम्ही इंग्रजी पद्धतीचा पोशाख केला होता. प्रवासाचा बेतही साधाच ठेवला होता. कारण नेपाळ सरकारची अशी चाल आहे की, त्यांच्या राज्यात जर कोणी बाहेरचा मोठा मनुष्य गेला तर ती बातमी टेलिफोनने काठमांडू येथे कळविली जाते व मग संस्थानचा पाहुणा म्हणून संस्थानच्या खर्चाने त्या मनुष्याची आगाऊ कळविले असल्यास सरबराई ठेवली जाते.’ (पृष्ठ ५६) काठमांडू येथे संपतराव धर्मशाळेत उतरले होते.  संपतराव स्वत: जातपात पाळणारे नव्हते. त्यामुळे बडोद्याहून नेपाळमध्ये स्थलांतरित झालेल्या एका मुसलमान बँडमास्तरकडे एक रात्र उतरण्याचा त्यांनी बेत केला. ही बातमी राजघराण्यात समजताच राजांच्या प्रधानांनी संपतरावांना म्हटले, ‘‘मी महाराजाधिराजांच्या नावाने आपल्याला विनंती करतो की, आपण काठमांडू येथे गेल्यावर पशुपतिनाथाच्या मंदिरात दर्शनाला जाल तेव्हा मूर्तीस स्पर्श करून पूजा वगैरे करू नये.’’ (पृष्ठ ६१) ‘‘नेपाळच्या राजघराण्यात गोशाची किंवा पडद्याची चाल नाही. परंतु प्रजाजनांत व सरदारवर्गात गोशा पाळतात.’’ (पृष्ठ ६२)
त्यांनी नेपाळच्या राजांच्या प्रधानाबरोबर जे संभाषण झाले त्याची विस्तृत हकिकत दिली आहे. बडोदे संस्थानच्या कारभाराविषयी प्रधानांना बरीच माहिती होती आणि ती त्यांना निरनिराळ्या संस्थानांच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टवरून मिळाली होती. (पृष्ठ ६६) ब्रिटिशकाळात सरकारची संस्थानिकांवर कशा प्रकारे नजर होती, हे यावरून जाणवते.
नेपाळच्या सामाजिक जीवनाबद्दल (१९२५ मधील) काही मनोरंजक माहिती लेखक देतात. ‘‘संस्थानात इंग्रजी शिक्षणाचा फारच अभाव आहे. शहरात (काठमांडू) सर्व ठिकाणी विजेची रोषणाई आहे. तिला तेथील लोक ‘चंद्रज्योती’ म्हणतात. रात्री नऊ वाजल्यानंतर शहरात रस्त्यावरून फिरण्याची अगर बाहेरून प्रवेश करण्याची बंदी आहे. नेपाळात बँडची सलामी मोठय़ा व्यक्तींना निरनिराळय़ा रागांच्या सुरात देण्यात येते. सलामीच्या सुरावरून व्यक्तीचा बोध होतो.
पशुपतिनाथाच्या यात्रेसाठी सरकारच्या खास हुकुमाने जागोजागी दुकाने आणि उपाहारगृहे उघडण्यात येऊन खाण्यापिण्याची, मुक्काम करण्याची व्यवस्था होत असे. याहीपेक्षा विशेष म्हणजे काठमांडू येथे जितके म्हणून हिंदुस्थानातील यात्रेकरू पशुपतिनाथदर्शनासाठी येतील तितक्या सर्वाची खाण्यापिण्याची व मुक्कामाची सर्व बडदास्त सरकारदरबारातून ठेवली जाते व त्याप्रीत्यर्थ सरकारला दरवर्षी पुष्कळच खर्च करावा लागतो.’’ (पृष्ठ ६८)
हे वाचल्यावर आपल्याला जगमोहन काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांनी वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंच्या प्रवासाच्या बाबतीत तो सुखकर व्हावा म्हणून केलेल्या उपाययोजनांची आठवण होते. त्याचबरोबर एकेकाळचे हे हिंदू राज्य आता ‘निधर्मी’ झाल्याने यात्रेकरूंच्या ‘हालात’मध्ये काय फरक पडला असेल, असेही वाटून जाते.
‘हिमालयात’ या पुस्तकात चापेकरांनी टेहरी संस्थानातील अनेक पुरुषांनी एक पत्नी करायची चाल होती, असे म्हटले आहे. तर इथे गायकवाड नेपाळमध्ये गुरखे लोकांत बहुपत्नीत्वाची चाल कशी आली, व्यभिचाराची शिक्षा कशी दिली जात आहे, सती जाण्यावर र्निबध कसे होते, याची माहिती देतात.
प्रवासवर्णनापेक्षा नेपाळवर लिहिलेले पुस्तक असे याचे स्वरूप आहे. नवल याचे वाटते, की ते जवळजवळ ९० वर्षांपूर्वी लिहिलेले आहे. आणि तेही एका श्रीमंत संस्थानच्या साध्या स्वभावाच्या संस्थानिकाने. म्हणून ते मुळातूनच वाचावयास हवे.
मुकुंद वझे – vazemukund@yahoo.com
(हे पुस्तक विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध आहे.)                    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nepal travelogue
First published on: 01-03-2015 at 01:01 IST