अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

सध्या ठप्प पडलेलं जगभरातलं पर्यटन पुन्हा चालू झालं तर जगाचा ओढा पूर्वीप्रमाणेच राहील. देशातली व परदेशातील प्रेक्षणीय ठिकाणं ठरलेली आहेत. त्यात दृष्टी सुखावणाऱ्या नव्या स्थळांचीही भर पडते. असं आपल्याकडे दाखवण्यासारखं नवं काय आहे? विख्यात साहित्यिक व्ही. एस. नायपॉल हे दर दोन-तीन वर्षांनी भारतात येत असत. दरवेळी हंपी, बदामी, हाळेबिडला न चुकता भेट देत. त्याचं कारण विचारल्यावर म्हणत, ‘स्वातंत्र्योत्तर काळात आवर्जून पाहाव्यात अशा किती सुंदर वास्तूंची निर्मिती आपल्याला शक्य झाली आहे?’ त्यांनी ३० वर्षांपूर्वी विचारलेला हा प्रश्न आजही तेवढाच त्रासदायक आहे.

Savitri Khanolkar Swiss born woman who designed the Param Vir Chakra award Eve Yvonne Maday de Maros
स्वीस वंशाच्या सावित्री खानोलकर ज्यांनी तयार केलं परमवीर चक्र
Art and Culture with Devdutt Pattanaik | How pottery offers glimpses of cultures
देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  
Hundred years of Bhiskrit Hitkarini Sabha founded by Dr Babasaheb Ambedkar
‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे
Kedarnath Temple, Uttarakhand
मोक्ष प्रदान करणाऱ्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती ठरतेय वादग्रस्त; काय आहे या मंदिराचा प्राचीन इतिहास?
History of Budget in Marathi | अर्थसंकल्पाचा इतिहास
History of Budget : भारतातील अर्थसंकल्पांचा इतिहास; स्वातंत्र्यपूर्व अन् नंतर कसं बदललं चित्र?
Kedarnath temple controversy
“दिल्लीतील प्रति केदारनाथ मंदिर म्हणजे हिंदू परंपरेचा अपमान”, विरोध होण्याचं नेमकं कारण काय?
Kalki 2898 AD
Kalki 2898 AD हिंदू धर्मासारखेच ‘या’ देशांनाही आहेत ‘चिरंजीव’ वंदनीय; निमित्त ‘कल्की’चे… काय आहे चिरंजीव ही संकल्पना?
tadoba andhari tiger project ticket
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तिकीट घोटाळा: ठाकूर भावंडांना नेमका कुणाचा आशीर्वाद?

आपला ऊर भरून येतो अशा काही प्राचीन वास्तूंचा वारसा आपण सांगतो. त्या वास्तूंमध्ये आपल्या मनाची अवस्था कशी असते, तो अनुभव कसा असतो, हा विचार मनाला शिवतो का? धोरणकर्त्यांच्या, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांच्या तरी? शांतता, प्रसन्नता देणाऱ्या या वास्तू पाहिल्यावर त्यांची तुलना छछोर, उग्र, उदासीन, उन्मत्त, कर्कश्श, केविलवाण्या वास्तूंशी करून पाहा. वास्तूंचाच नव्हे, तर शहरांचाही असा विचार करायचा असतो. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ असं सर्व ‘उच्च’ असणाऱ्यांना तरी यात काही खटकतं का? प्रत्यक्षात असं काही दिसत नाही. कारण त्यासाठी सौंदर्यदृष्टी असावी लागते.

‘सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं’ असं म्हणण्याची प्रथा आहे. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ते अर्धसत्य आहे. अमेरिकेतील मेंदूशास्त्रज्ञ डॉ. अंजान चटर्जी यांनी ‘द अ‍ॅस्थेटिक ब्रेन : हाऊ वुई इव्हॉल्व्हड् टू डिझायर ब्युटी अँड एन्जॉय आर्ट’ या पुस्तकात या मूलभूत प्रश्नाला हात घातला आहे. कला म्हणजे काय? आपल्याला कलेची उपजत प्रेरणा असते का? सौंदर्य म्हणजे काय? ते सार्वत्रिक असते का? डॉ. चटर्जी यांच्या मते, ‘सौंदर्य हे आनंदप्राप्तीशी निगडित आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला इच्छा होत असते आणि इच्छेनुसार आवड निर्माण होत राहते. सौंदर्य ही संस्कृतीने निर्माण केलेली कल्पना असते. सौंदर्य ही प्रभावशाली लोकांनी सत्ता टिकवण्यासाठी व मूल्य वाढवण्यासाठी वापरात आणलेली कल्पना असू शकते,’ असं सांगत डॉ. चटर्जी यांनी प्राचीन कला व समकालीन कला यांची अनेक उदाहरणं दिली आहेत. सौंदर्यशास्त्र व आकलनात्मक मेंदूविज्ञान या विषयाच्या संशोधक जी. गॅब्रियल स्टार यांनी ‘फीलिंग ब्युटी’ या पुस्तकात सौंदर्याचा बोध कसा होतो, त्यानुसार वर्तन कसे होते याचं मेंदूशास्त्रानुसार विश्लेषण केलं आहे. २००० साली मेंदूजीवशास्त्र व वर्तनातील संशोधनासाठी प्रो. एरिक कँडल यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी ‘द एज ऑफ इनसाइट’ या पुस्तकात स्मरण कसं होतं, मेंदूत प्रतिमा कशा साठवल्या जातात व त्या कशा बाहेर येतात, कलेचा आपल्या मनावर काय परिणाम होतो, या साऱ्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे.

आपला साधारणपणे ९० टक्के  काळ हा कोणत्या तरी वास्तूच्या सान्निध्यात जातो. मन आणि वास्तू यांची परस्परांवर प्रक्रिया (इंटरॅक्शन) होत असते. ती कशी व का? ‘वास्तूंचा आपल्या मनावर नकळत होणारा परिणाम’ या विषयावर ‘द अ‍ॅकॅडमी ऑफ न्यूरोसायन्स फॉर आर्किटेक्चर’ ही अमेरिकी संस्था २००३ पासून काम करीत आहे. वास्तुविशारद, मानसोपचारतज्ज्ञ, अभियंता, मेंदूवैज्ञानिक हे एकत्रितपणे संशोधन करीत आहेत. वर उल्लेखिलेल्या विद्वानांचा त्यात सहभाग आहे.

‘विवेकी वास्तू व शहररचना’ या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर जगात सातत्याने मंथन घडत आहे. गेल्या वर्षी लंडनमध्ये झालेल्या परिषदेत घर अणि शहररचना विशेषज्ञ अ‍ॅलिसन ब्रुक्स म्हणाल्या, ‘घर व शहररचना करताना मानसशास्त्राकडून मर्मदृष्टी (इनसाइट्स) मिळणं, ही आज व भविष्यकाळातील गरज आहे. आपल्या मनाला आल्हाददायकता कुठे जाणवते, तसंच कुठे अनुत्साह वाटतो, हे लक्षात आल्यास मन प्रसन्न करणारे अभिकल्प कसे असू शकतात याबद्दलच्या आकलनात वाढ होईल. त्यातून उत्तम अभिकल्प व कारागिरी (डिझाइन) यांना न्याय मिळेल. अभिकल्पांची गुणवत्ता वाढीस लागेल.’

विविध वास्तूंमध्ये आपलं शरीर व मन कसं प्रतिसाद देतं याचा अभ्यास करण्यासाठी अनेक उपकरणं उपलब्ध आहेत. चटपटीत चलत्ध्वनी, ईईजीने (इलेक्ट्रो एनसेफॅलोग्राफी) तपासणी केल्यास मेंदूतील प्रतिक्रि या व भावनिक अवस्था समजून येते. कित्येक वेळा आपण ‘ठीक आहे’ म्हणत असतो तेव्हा आतली घालमेल दिसत नसते. ती समजून घेण्यासाठी अशा तपासणीचा उपयोग होतो. मेंदूशास्त्रज्ञ व अभिकल्प सल्लागार कॉलिन एलार्ड म्हणतात, ‘इमारतीचा दर्शनी भाग हे वास्तूचं प्रथमदर्शन! गायकाचा पहिला सूर बरंच काही सांगून जातो. पहिल्या नजरेत व्यक्तीविषयी काही आडाखे बांधले जातात. त्याचा आपल्या मनावर थेट व मोठा परिणाम होत असतो. वास्तूत प्रवेश करतानाच दर्शनी भाग हा एकसुरी आहे की आकर्षण वाढवणारा आहे, यावर व्यक्तीचा प्रतिसाद अवलंबून असतो.’ विशाखापट्टणम् येथील वास्तुकलेचे प्रो. सुधीर पसाला यांनी ‘साधे आकार, सममिती (सिम्रिटी) या आकारांवरून वास्तू आपल्या मनाला सुखकारक वाटतात, तर आकारांची गुंतागुंत वा असमानता असल्यास मनाला खटकतात..’अशी मांडणी केली आहे.

शहररचनेचा विचारही अनेक अंगांनी होत आहे. शहरांची बेसुमार वाढ व दाट वस्तीमुळे विषण्णता, चिंताग्रस्तता, छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) यांसारखे मानसिक विकार वाढीस लागतात. मेंदूचं जीवशास्त्र बिघडतं. ताण येतो. यावर अनेक अंगांनी अभ्यास सुरू आहे. २००८ साली इंग्लंडमधील अभ्यासातही हे विशेषत्वाने जाणवलं होतं. त्यामुळे शहरांचा तोंडवळा प्रसन्न करण्यासाठी सार्वजनिक जागा सुशोभित व निसर्गसंपन्न करून तेथे माणसांचा वावर वाढवण्यावर भर दिल्यास लोकांच्या परस्परसंवादात वाढ होते असं लक्षात येत आहे. कॅनडात व्हँकोव्हरमध्ये शहरवासीयांना प्रसन्न वाटावं असं निसर्गदृश्य पाहता येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभतं असं सर्वेक्षण दर्शवतं.

एकविसाव्या शतकात अनेक कला व विज्ञानात जीवसृष्टीपासून प्रेरणा घेण्याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. निसर्गाजवळ जाण्यासाठी जीववास्तुकला (बायोआर्किटेक्चर) व मेंदूला सुखावणारे बदल घडवून आणणारी मेंदूवास्तुकला (न्युरोआर्किटेक्चर) उदयास आली आहे. आपण निसर्गाजवळ होतो तेव्हापासून प्राणी व पक्ष्यांपासून शिकत गेलो व सर्व कलांचा जन्म होत गेला. उडते पक्षी पाहून लिओनार्दो दा विंचीला उडणारं यंत्र तयार करावंसं वाटलं. ही जीवप्रेरणा (बायो-इन्स्पिरेशन) व जीवानुकरण (बायोमिमिटिक्स) अतिशय स्वाभाविक मानलं जातं.

विसाव्या शतकात वास्तुकलेचे तत्त्वचिंतक फ्रँक लॉईड राइट यांनी (१८६७-१९५९) सेंद्रियवास्तुकलेची (ऑरगॅनिक आर्किटेक्चर) संकल्पना मांडली होती. त्यांनी निसर्ग, भूरचना, आकार, पोत व वास्तुसामग्री यांना एकसंध रूप देणाऱ्या अनेक वास्तूंची निर्मिती केली. त्यांनी ‘अ‍ॅन ऑरगॅनिक आर्किटेक्चर : आर्किटेक्चर फॉर डेमॉक्रसी’ या ग्रंथात ‘वास्तूने निसर्गाचा आदर केला तरच सृष्टीशी एकात्मता साधता येईल,’ हे वास्तुकलेचं घोषवाक्य घुमवलं. ‘सर्व प्रकारच्या विषमता फेकून देणाऱ्या रचना अमेरिकेत आणण्यासाठी वास्तुकलेनंही पूरक भूमिका घ्यावी. वास्तुविशारदांनी अभिकल्प करताना याचं भान ठेवणं आवश्यक आहे,’ असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाकडे संशयानं पाहणाऱ्या वृत्तीचा स्वीकार न करता ‘यंत्र, तंत्रज्ञान टाळण्याची गरज नाही. मानवतेच्या कल्याणासाठी यंत्र हे मानवाचं गुलाम राहिलं पाहिजे,’ अशी भूमिका घेतली. त्यांनी वास्तुकलेला काळानुरूप समकालीनत्व देणारे अभिकल्प दिले.

उपरोल्लेखित मेंदूवास्तुकला, सेंद्रियवास्तुकला, जीववास्तुकला यांची सारी वैशिष्टय़ं एकत्रितपणे स्थानिक वास्तुकलेत आढळतात. इजिप्तमध्ये हसन फादी यांनी वास्तुकलेतील आधुनिकवाद नाकारून स्थानिक वास्तुकलेलाच आधुनिक रूप दिलं. ‘मानव हाच वास्तुकलेच्या केंद्रस्थानी आहे. तसंच मानव हा निसर्गाचा एक भाग आहे, म्हणून निसर्गनियमांनी बांधलेला आहे. खोली, अवकाश व वास्तू एकमेकांशी संगीतमय संवादी असाव्यात. स्वर, ताल, लय यांच्यातील सहसंवाद वास्तूमध्येही प्रतीत व्हावा,’ असं सांगून त्यांनी वाळवंटी व अतिउष्ण इजिप्तमध्ये उष्णतेचा प्रतिरोध करण्यासाठी मातीची घरंच योग्य आहेत हे दाखवून दिलं. अनेक प्रकारच्या झोकदार कमानी, नक्षीदार जाळ्यांच्या भिंती, तऱ्हेतऱ्हेचे घुमट फादींनी रचले. आकारांशी खेळणाऱ्या वास्तूंमधून नैसर्गिक प्रकाशाचा प्रवास होतो. ऐतिहासिक वास्तूंची सर्व तत्त्वं असणारी घरं फादींनी सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली. इजिप्तमध्ये ग्रामीण भागात जाऊन त्यांनी अकुशल कारागिरांना प्रशिक्षण दिलं. त्यांच्याकडून अप्रतिम वास्तुरचना करवून घेतल्या. मोठमोठय़ा प्रकल्पांना नाकारून आयुष्यभर फादींनी ‘नाही रे’ वर्गासाठी घरं, वाडय़ा तयार केल्या. ‘गरीबांसाठीचं घर कुरूप असतं, हा रूढ समज दक्षतापूर्वक नष्ट केला पाहिजे,’ हे आपलं प्रतिपादन त्यांनी खरं करून दाखवलं. विस्मरणात गेलेल्या इजिप्तच्या वास्तुकलेला विसाव्या शतकात ‘अल्पखर्ची, समुचित’ असे गौरव प्राप्त झाले ते फादी यांच्यामुळेच!

लॉरी बेकर म्हणत, ‘बेकर वास्तुकला म्हटलं जातं ती खरी तर स्थानिक वास्तुकला आहे.’ त्यासाठी त्यांनी गांधीजींचा ‘पंचक्रोशीतील सामुग्रीतून गरजा भागवल्या पाहिजेत’ हा सल्ला प्रमाण मानला. ‘देशाची पुनर्रचना कशी व्हावी याविषयी सातत्यानं मांडणी करणारे गांधीजी हे एकमेव नेते होते. पाश्चात्त्य विचार व वास्तुकलेचे संस्कार असल्यामुळे वयाच्या तिशीत मला त्यांचा सल्ला पचत नव्हता. परंतु वय व अनुभव वाढत गेले तसं गांधीजींचं द्रष्टेपण उमजत गेलं. हिमालय व केरळमधील आदिवासी भागात राहताना स्थानिक सामुग्रीचा कल्पक उपयोग समजत गेला,’ असं बेकर नेहमी सांगत. लोककला हा सामान्यजनांचा सहजत्स्फूर्त भावाविष्कार असतो. पं. कुमार गंधर्व म्हणत, ‘लोकसंगीत हे स्वत:साठी असतं. जात्यावरचं असो वा शेतातलं काम असो, त्यांच्या गळ्यातून सहज गीत येत जातं.’ तशीच लोकवास्तुकलाही त्या भागातील गरजांनुसार तयार होत जाते. कुमार गंधर्व यांनी लोकसंगीताला, तर बेकर यांनी स्थानिक वास्तुकलेला अभिजाततेचं कोंदण देऊन परंपरेला आधुनिक रूप दिलं. एकविसाव्या शतकात ‘हरित इमारत’ हा सर्वत्र वापरला जाणारा मंत्र होऊन त्याचं प्रमाणीकरण सुरू झालं. या संकल्पना बेकर यांनी काळाच्या खूपच आधी अंगिकारल्या होत्या. ‘वीट तयार करण्यासाठी कसदार माती वापरू नका. मातीचा खालचा थर वापरा,’ असं ते कळकळीनं सांगत. दगड, वीट, कौलं, बांबू यांच्या अप्रतिम रचनेतून त्यांनी वास्तू रचल्या. प्रत्येक टप्प्यावर अनावश्यक ते काढून टाकण्याचा त्यांचा अट्टहास होता. भोवतालच्या निसर्गाला चुकूनही धक्का लावायचा नाही याबाबत ते जागरूक होते. त्यांच्या सर्व रचना या पर्यावरणसंवादी, निसर्गाचा आदर करणाऱ्या, मेंदूस सुखावणाऱ्या आहेत. माणूस व निसर्ग, उपयोगिता व सौंदर्य, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून समग्रता साधणे हेच बेकर यांचं वैशिष्टय़ होतं. त्यांना सरळ रेषा ही अतिशय कृत्रिम वाटत असे. त्यांच्या भिंती लयदार वळणं घेतात. त्यांच्या वास्तूत अनेक नयनरम्य आकार आढळतात.

हिमाचल प्रदेशातील दीदी काँट्रॅक्टर यांचंही स्थानिक वास्तुकलेतील कार्य अपूर्व आहे. त्या म्हणतात, ‘स्थानिक वास्तुकला म्हणजे २०००-३००० वर्षांपासूनचे संशोधन व विकास यातून आलेलं उत्क्रांत रूप आहे. उपयोगिता व टिकाऊपणा हा त्याचा गाभा आहे. ते सदोष असतं तर टिकलंच नसतं. स्थानिक वास्तुकला ही मातृभाषेसारखी जिव्हाळा व आत्मीयता व्यक्त करते, म्हणून ती ऊब तिथे लाभते.’ हे त्यांच्या वास्तूंमधून प्रतीत होते. अनेक ज्ञानशाखांनी एकत्र येऊन केलेल्या संशोधनातून स्थानिक वास्तुकलेला नवीन आयाम प्राप्त होत आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेत वास्तुकलेचा मेंदूवर नकळत होणारा परिणाम पडताळण्यासाठी आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. तेव्हा काटेकोर चौकोनी भिंतींपेक्षा वळणदार भिंतींमध्ये राहणं आनंददायी आहे, हे अनेकांच्या नव्यानेच लक्षात आलं. आपल्या अबोध मनाशी आदिबंध असणारे आकार शोधून तशा रचना केल्या तर ती वास्तुकला समकालीन ठरणार आहे. भारतासह अनेक देशांतील तरुण वास्तुविशारद असे अभिकल्प वास्तवात आणण्याच्या प्रयत्नांत आहेत. घर असो वा वसाहत, गाव असो वा शहर- बेकर, फादी व दीदी यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी माणूसच होता. सामग्रीची काटकसर, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर, अत्यल्प कार्बन व पर्यावरणीय पदचिन्हे हे गुण पाहून वास्तूंचे पर्यावरणीय निकष ठरवायचे असतील तर याच मार्गानी जावं लागेल. कोपनहेगन स्कूल ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजीमधील प्रो. कॅथरीन लार्सन या ‘पारंपरिक घरे व शाश्वतता’ याविषयी संशोधन करीत आहेत. डेन्मार्कमधील लाएसो भागात ३०० वर्षांपासून घरांवर समुद्रतणांचे आच्छादन घालण्याची प्रथा टिकून आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी लार्सन यांनी सर्पाकृती गवताची (इल ग्रास) पूर्वरचित तावदाने तयार करून छतावर टाकली. हे आच्छादन उष्णतारोधक असल्याचं त्यांच्या तेव्हा लक्षात आलं. गवताचं छत ही संकल्पना मागास व जुनाट असल्याचा लोकसमज दूर करण्यासाठी त्यांनी २०१९ मध्ये समुद्रतणांच्या मंडपांचं प्रदर्शनच भरवलं. त्या छताखाली बसून प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी लोकांना दिली. गवती छतांची घरे ही नैसर्गिकरीत्या उष्णतारोधक असतात. त्यामुळे संपूर्ण बांधकामाचं श्वसन व्यवस्थित होऊन हवेची गुणवत्ता सुधारते. याउलट, आधुनिक बांधकामातून हवा खेळत नसल्याने हवेचा दर्जा वाईट असतो. नूतनीकरणाची पात्रता असणारी नैसर्गिक सामुग्री वापरल्यामुळे निसर्गाची हानी कमी होतेच, शिवाय घरांची गुणवत्ताही सुधारते, हे जाणणारे लार्सन बांधकाम उद्योगाची पारंपरिक घरबांधणीबद्दलची तुच्छता बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. डेन्मार्कमध्ये गवताची तोडणी, ते सुकवणं व घर बांधण्याचं तंत्र त्यांनी समजावून घेतलं. आता त्याच्या प्रसारासाठी त्या झटत आहेत. आपल्याकडे तर छतासाठी गवताचे अनेक प्रकार, भात, नारळ, तुराटय़ापासून अनेक पिकांची काडं सहज उपलब्ध आहेत.

आपण कला आणि कलावंतांना किती मान व महत्त्व देतो हे आपल्या व्यवहारांतून दिसतंच. वास्तू ही एक कला आहे याचं भान आपल्याकडे दिसतं का? या प्रश्नाचं उत्तरं नकारार्थीच मिळतं. आपल्याकडे ‘विकासकशाही’त (बिल्डरशाही) अभियंते हेच सर्व काही असतात. त्यात अभिकल्प करणाऱ्या वास्तुविशारदाला स्थानच नाही, किंवा लेखापालाचे आक्षेप टाळण्याइतपत ते नाममात्र असतं. त्यामुळे आपल्या सरकारी इमारती बेसुमार खर्च करूनही दिसायला बेंगरूळ असतात. क्वचित सौंदर्यदृष्टी आढळलीच तर तो योगायोग मानावा. आपल्याकडे लॉरी बेकर, सतीश गुजराल, राज रेवाळ, नरी गांधी, चार्ल्स कोरिया, बाळकृष्ण जोशी यांच्यासारखे वास्तुशिल्पी होते. त्यांच्यामुळे देशात अनेक ठिकाणी अर्थपूर्ण वास्तू उभ्या राहिल्या. परंतु याबाबतीत महाराष्ट्राचे पाऊल कधी पुढे पडले नाही. भव्य वास्तुसंकुलातून विधान करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या गेल्या. भूकंपानंतर लॉरी बेकर यांना काहीही न करता माघारी जावं लागणं, हे त्याचं ठळक लक्षण! वास्तविक देशात अनेक तरुण वास्तुशिल्पी निसर्गसंवादी सुंदर वास्तू व वसाहतींची रचना करत आहेत. बांबू, मातीच्या वापरातून आकर्षक पर्यटन केंद्रे तयार करत आहेत. पण ते विकासक, अधिकारी व राज्यकर्त्यांना पसंत नाहीत. त्यामुळे बेसूर व भेसूर सार्वजनिक इमारती व वसाहती याच आपल्या भाळी आहेत व असतील.

बेकर यांना केवळ वास्तूच नव्हे, तर संपूर्ण शहराची रचना सुंदर करण्याची आस होती. त्यांनी ‘कुठल्याही शहराची झोपडपट्टी हटवून पुनरुत्पादक वसाहत होऊ शकते. माझ्या कल्पनेतील झोपडपट्टी ही क्रीडांगणासारख्या आकाराचं छोटं गाव असेल. घराखाली दुकान, गोदाम, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, शाळा, रुग्णालय, वाचनालय, सभागृह यांची सोय असेल. जनावरांसाठी गोठे व बायोगॅस संयंत्रं असतील. ही वसाहत शहराच्या मध्यवर्ती भागात असणं हे सर्वाच्या सोयीचं व अल्प वाहतुकीचं असेल,’ अशी संकल्पना मांडली होती. अशा नवोन्मेषी संकल्पनांना साकार करून कर्ब-उत्सर्जन कमी करा, हाच या काळाचा आग्रह आहे. अन्यथा आहेत तशाच शहरांना व वास्तूंना स्वच्छ व सुंदर ठरवून आपण मिरवू शकतो. परंतु जगाच्या आरशात आपली शहरं पाहिली तर यांना सुंदर कोण करणार, या प्रश्नाचं उत्तर कधीतरी द्यावंच लागेल. त्यावेळी ‘संस्कृतीपासून वास्तुकलेने फारकत घेतलेली संस्कृती (सिव्हिलायझेशन) असभ्य असते व तिचं पतन अटळ आहे,’ हा फ्रँक लॉईड राइट यांचा भविष्यवेध ध्यानी घ्यायला हवा.