‘टुएरर इज ह्य़ुमन’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा रोखठोक अनुवाद करायचा झाला तर, ‘चुकतो तो माणूस’ असा करता येईल. त्यातला अर्थ अधिक गडद करायचा असेल तर ‘जो चुकतो तोच माणूस’ किंवा ‘आपण चुकतो हे कळूनही जो पुन:पुन्हा चुकत राहतो, तोच माणूस’ असे बरेच पर्याय निघू शकतील. या विषयातला अस्मादिकांचा अधिकार हा एक वादातीत विषय मानायला हवा. नुकत्याच झालेल्या लंडनभेटीत ‘अतुलनीय’ विन्स्टन चर्चिल साहेबांच्या हवेलीला भेट देण्याचा योग आला. तिथल्या वस्तुभांडारातून एक ‘नेमकी’ चीज माझ्या अभ्यासिकेतील लेखन टेबलवर आली आहे किंवा ती चीज ‘नेमकी’ माझ्या(च) टेबलवर यावी ही घटनाही अर्थपूर्ण म्हणावी लागेल. एखाद्या छोटय़ाशा विटेच्या आकारमानाचा आणि त्याच रंगाचा तो एक जाडजूड खोडरबर आहे. त्याची अपूर्वाई म्हणजे त्यावर काळ्या अक्षरांत कोरलेला एक नामांकित संदेश.FOR REALLY BIG MISTAKES (केवळ, खऱ्याखुऱ्या घोडचुकांसाठीच).. चर्चिल साहेबांसारख्या उस्ताद (आणि वस्तादही) महापुरुषाकडून नेमकी असली ‘वीट’ किंवा इंग्रजी भाषेत ‘विट’ (Wit) माझ्या टेबलवर ‘फेकली’ जावी (विठ्ठला, पांडुरंगा, पुंडलिका..) हा योगायोगही अपूर्वच म्हणायला हवा. (शिवाय, या क्षेत्रातील माझ्या अधिकाराचा एक बिनतोड आणि बिनखोड पुरावाही..) पण या सर्व योगायोगाच्या मुळाशी असलेला एक योगायोग म्हणजे तब्बल चाळीस वर्षांपूर्वी, माझ्या स्वगत-संवादशैलीतील काव्यप्रवासाचा शुभारंभ करणारी माझी एक मुक्तचिंतनात्मक कविता –
क्षणोक्षणी चुका घडतात आणि
    श्रेय हरवून बसतात
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
    फार काही शिकवीत असतात

कणभर चुकीलाही
    आभाळाएवढी सजा असते
चूक अन् शिक्षा हय़ांची कधी
    ताळेबंदी मांडायचीच नसते

a man do something crazy on traffic signal by watching video you can not control laughing
“दारू प्यायली का?” ट्रॅफिक सिग्नलवर व्यक्तीने असे काही केले की तुम्हालाही हसू आवरणार नाही, VIDEO होतोय व्हायरल
Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?

एक कृती, एक शब्द, एकच निमिष
    चुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
    तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सारं घडतं केवळ
    आपण काही ‘शिकण्या’साठी
आपण मात्र शिकत असतो
    पुन्हा पुन्हा ‘चुकण्या’साठी..
ही कविता मनात उगम पावण्यासाठी काय कारण घडलं असावं हे आज आठवत नाही. किंबहुना हे न आठवण्याचा अर्थच असा आहे की, ते मूळ कारण तितकंसं तीव्र नसावं. पण तरीही त्या क्षणाचं मोल मानायला हवं की, त्यानं ही कविता माझ्याकडे पाठवली. इतकंच नाहीतर तिथूनच माझ्या व्यक्तिगत कवितांची एक साखळी सुरू झाली..
दाटून आलेल्या संध्याकाळी
    अवचित सोनेरी ऊन पडतं,
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
    आपल्या आयुष्यात प्रेम येतं..

जगण्यासाठी आधाराची खरंच
    गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो
    तो खरोखर आधार असतो का?

एक सांगशील.. आपले रस्ते
    अवचित कुठे.. कसे जुळले?
आपल्याच नादात चालताना
    हे देखणे वळण कसे भेटले?
‘स्वगत-संवाद’ हा माझा लाडका शब्द-संयोग खूप अलीकडच्या काळात माझ्या आयुष्यात आला. पण प्रत्यक्षात तो मी नकळत अनुभवू लागलो, तो माझ्या या अगदी प्रारंभकाळातील कवितांतून. ‘पक्ष्यांचे ठसे’मधील खूपच कविता या मुक्त प्रवाही गद्य स्वरूपाच्या रचनाबंधातून उलगडलेल्या दिसतील. पण आज इतक्या वर्षांनी त्या कवितांकडे पाहताना एका वेगळ्याच गोष्टीची अपूर्वाई वाटते. ती गोष्ट म्हणजे त्या काळात कवितेसाठी माझ्याकडून निवडला गेलेला हा अनोखा रचनाबंध.. तोपर्यंतचा माझा पिंड खरं पाहता छंदबद्ध आणि वृत्तबद्ध कवितांवर पोसला गेला होता. याखेरीज माझ्या परिचयाचे होते ते संगीतानुकूल गीतबंध. पण माझ्या मनाला बोलतं करण्यासाठी त्या काळी फारसं प्रचलित नसलेलं हे प्रवाही गद्यच निवडावं, असं का वाटलं असावं?..
बालपणापासूनच्या माझ्या आस्वादकक्षेत मराठी कवितांइतकाच हिंदी-उर्दू कवितांचाही समावेश होता. विशेषत: हिंदी चित्रपटगीतांतून एक गोष्ट फार तीव्रपणे जाणवायची.. मराठी भाषेत गद्य आणि पद्य या दोन्हींत एक ठळक विभाजक रेषा असायची. तर हिंदीमध्ये गद्य वाक्यांचीच पाहता पाहता कविता व्हायची. ‘यूं हसरतों के दाग मुहब्बत में धो लिये, खुद दिलसे दिलकी बात कही, और रो लिये..’ किंवा ‘उनको ये शिकायत है कि हम कुछ नहीं कहते, अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते..’ एक गोष्ट नक्की की मराठी छंद, वृत्त यांची नाद-लयीची आवर्तनं आणि त्या अनुरोधानं येणारी देखणी शब्दकळा यांची जादू अनोखीच असायची.. पण तरीही कधीकधी वाटायचं की रोजच्या वापरातली साधीसुधी प्रवाही बोलीभाषाच कवितेत संक्रमित का होऊ नये?.. असं वाटत असतानाच मला मराठी कवितेतच तुरळक का होईना, पण असे काव्यप्रयोग पाठोपाठ भेटू लागले. विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता! कोर्ट चालू आहे’मध्ये नाटय़मय स्वगत रूपात अशी एक सुंदर कविता मला भेटली..
‘‘आपले पाय चालत असतात एका अज्ञात संकटाची वाट/ लाटेमागून फुटत जाते आंधळी होऊन एक एक लाट..’’ मी हरखून जाऊन कविनामाचा शोध घेतला. त्या होत्या कवयित्री शिरीष पै. मग पाठोपाठ शिरीषताईंचाच ‘एका पावसाळ्यात’ हा सुंदर काव्यसंग्रह भेटला, जो संपूर्ण अशा प्रवाही बोलीतील कवितांनी सजला होता.. त्या मागोमाग भेटली कवी नारायण सुर्वे यांची धारदार, प्रखर, तरीही तरल कविता..
जीवनापासून पळून जावे तर जावे कोठे?
आकाशीच्या बापाशी पहिल्यापासून वैर होते
सगळे बंध तोडून उडावे इतके बळ कुठे?
अवघ्या वाटांवर ठायी ठायी पहारे होते..
बोंब मारून बोलवावा असा स्वर्ग आहेच कुठे?
ज्याच्यासाठी माझे आतडे तिळतिळ तुटत होते
ऊठ, तेवढी ती कोपऱ्यातली तलवार शोधून ठेव
एकेकाळी तिच्यावर मी माझे नशीब घासले होते..
त्यापाठोपाठ भेटली बाबा आमटे यांची ‘ज्वाला आणि फुले’..
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात
त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते

आणि सृजनशील साहसांना सीमा नसतात
 त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते..
पण या सर्वाच्या आधी आठवतात. कविवर्य अनिल.. ज्यांनी मराठी काव्यविश्वाला नवे अनोखे रचनाबंध दिले.. त्यांचा मुक्तछंद आणि मला त्याहूनही अधिक भावलेली त्यांची, नितांत सुंदर, प्रवाही दशपदी..
कितीतरी वेळ दिसत होती धरली नाही तीच वाट
तिची वळणे, तिचे हेलकावे, तिचे उतार, तिचे घाट
तिने गेलो असतो तर.. ही कदाचित मिटली असती
पण असे व्हायचे नव्हते.. हीच माझी वाट होती..
‘क्षणोक्षणी चुका घडतात’ या कवितेतून जो प्रवाही गद्याचा ओघ माझ्या काव्यविश्वात वाहू लागला. यामागे आत कुठेतरी नेणिवेत हे पूर्वसुरींचे संस्कार नक्कीच असणार.. आणखी एक गोष्ट प्रांजलपणे सांगायला हवी. क्षणोक्षणी चुका घडतात ही विशिष्ट कविता मी फार गांभीर्य पांघरून लिहिली नव्हती.. कारण, ‘दर्द-ओ-ग़म दिलकी तबीयत बन चुके, अब यहाँ आरामही आराम है’ ही जिंदादिली तेव्हाच्या अस्तित्वात अंगोपांगी मुरली होती. पण वरकरणी खेळकर दिसणाऱ्या या शब्दांच्या अंतर्यामी एक खोल दंश दडलेला आहे. हे एके दिवशी अचानक माझ्या निदर्शनाला आलं. एका मैफलीत सर्व श्रोते नेहमीप्रमाणे हसू आणि टाळ्यांनी कवितेचं स्वागत करत असताना, त्या समूहातली केवळ एक व्यक्ती जिव्हारी बाण लागावा तशी विव्हल झालेली मला दिसली आणि स्वत:च्याच शब्दाकडे मी पुन्हा जणू नव्यानं पाहू लागलो. ‘एक कृती, एक शब्द, एकच निमिष चुकतं हुकतं.. उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं.’ या साध्या विधानामागची चुभन प्रथमच तीव्रपणे उमगली. पुढच्या आयुष्यातील उन्हाळे आणि पावसाळे यांनी त्या दाहक जाणिवेचं कडू जहर एव्हाना माझ्या पूर्णपणे पचनी उतरवलंय..
शरदचंद्र चतर्जीच्या भावस्थितीतून अंकुरलेला आणि बिमल रॉयनी साक्षात सचित्र केलेला, अनवधानानं झालेल्या एका चुकीसाठी उभं आयुष्य होरपळवून घेणारा ‘देवदास’. मी ही कविता लिहिल्यानंतर बऱ्याच काळानंतर पाहिला. आजही ‘क्षणोक्षणी चुका घडतात’ ही कविता मी माझ्या त्याच मूळच्या खटय़ाळ जिंदादिल शैलीत सादर करतो. पण त्याच क्षणी खोल आत.. अस्तित्वाच्या गाभ्यात. राजेंद्रसिंह बेदींनी अक्षरबद्ध केलेला आणि दिलीपकुमारनी सदेह सजीव केलेला तो चिरवेदनेचा उद्गार झंकारत असतो..
एक छोटीसी भूल..
उसकी इतनी बडी सजा..?