परभणीच्या बोलीवर अन्य कुठला प्रभाव नाही. म्हणजे लातूर-उस्मानाबाद भागात (सीमावर्ती) जसा कानडी हेलाचा प्रभाव उच्चारणावर आढळतो तसा, किंवा हिंगोली-कळमनुरी भागात जसा विदर्भाचा आहे तशी परभणीच्या बोलीवर बाहेरची छाप नाही. निजामी राजवटीने जे शब्द दिले त्यांचा प्रभाव मात्र इथल्या समाजमनावर अजूनही आहे. काळाच्या ओघात काही शब्द अजूनही टिकून आहेत. त्यांना पर्यायी शब्द तयार झाले नाहीत आणि होण्याची शक्यताही नाही. ‘बयनामा, इसारपावती, इजलास, खुलानामा, तसब्या, फैसला’ असे कितीतरी शब्द परभणीच्या बोलीभाषेत घट्ट रुतले आहेत.
‘बनी तो बनी, नहीं तो परभणी’ ही म्हण या भागात प्रसिद्ध आहे. ‘काही करण्याचा प्रयत्न करू, नाहीच जमले तर मग आपले गाव आहेच’, अशा अर्थाने ती घेतली जाते. थोडक्यात- ‘गाजराची पुंगी..’शी साधम्र्य असणारी ही म्हण. वागण्या-बोलण्याइतका निवांतपणा पावलोपावली दिसतो. अनंत भालेराव यांनी परभणीची ओळख ‘एक बहिर्मुख आणि खानदानी गाव’ अशी करून दिलेली आहे. ‘आपल्या पिढीजात चौसोपी वाडय़ासमोरच्या भल्याथोरल्या चबुतऱ्यावर खळाखळा तोंड धुणारा आणि मुखमार्जन झाल्यावर सूर्य जणू आपल्याच आढय़ाला टांगून ठेवला आहे, इतकी समीपता गृहीत धरून त्याच्यावर पाण्याचे चार थेंब उडवून सूर्याच्या ऋणातून दिवसभर मुक्त होणार..’ अशा म्हाताऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाशी अनंतरावांनी परभणीची तुलना केली आहे. हा तपशील एवढय़ासाठीच की या ‘निवांत’ जीवनशैलीचे प्रतिबिंब इथल्या भाषेवरही उमटलेले दिसते. ‘कसा काय आलास?’ असे एखाद्याला विचारले तर तो उत्तर देईल- ‘येरीच’ (म्हणजे उगीचच). हे असे ‘येरीच’ कुठेही आढळते. ‘येरी इचारून पाहावं म्हणलं’ इथपासून ते ‘त्याला तर मी येरीच गुंडाळतो’ इथपर्यंत!
परभणीच्या बोलीवर तसा अन्य कुठला प्रभाव नाही. म्हणजे लातूर-उस्मानाबाद भागात (सीमावर्ती) जसा कानडी हेलाचा प्रभाव उच्चारणावर आढळतो तसा, किंवा हिंगोली कळमनुरी भागात जसा विदर्भाचा आहे तशी, परभणीच्या बोलीवर बाहेरची छाप नाही. निजामी राजवटीने जे शब्द दिले त्यांचा प्रभाव मात्र समाजमनावर अजूनही आहे. काळाच्या ओघातही काही शब्द अजूनही टिकून आहेत. त्यांना पर्यायी शब्द तयार झाले नाहीत आणि होण्याची शक्यताही नाही. असे काही खास शब्द येथील जीवन व्यवहाराचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. ‘बयनामा’, ‘इसारपावती’, ‘इजलास’, ‘खुलानामा’, ‘तसब्या’, ‘फैसला’ असे कितीतरी शब्द बोलीभाषेत घट्ट रुतले आहेत.
‘बंडाळी’ हा शब्द एरवी प्रमाण भाषेत ‘बंडा’साठी वापरला जातो. या जिल्ह्य़ातल्या सेलू, जिंतूर भागात तो ‘आर्थिक विपन्नावस्था’ अशा अर्थाने वापरला जातो. ‘अचानक’साठी ‘आमनधपक्या’, एखाद्याकडे मन मोकळे करण्यासाठी अश्रू ढाळणे याकरिता ‘उसरमा’, आश्चर्यचकित होण्यासाठी आणि कधी सैरभैर होण्यासाठीही ‘आयागमनी’ असे काही खास शब्द आहेत. याशिवाय नादर (चांगले), भारानसूद (भारदस्त), भायाभंग (वाताहत), दुरमड (आघाडी ), टेणा (ताठा ), पाखाड (बाजू ), खाऊंद (जखम) असे किती तरी वैशिष्टय़पूर्ण शब्द सांगता येतील. रस्त्यातल्या गटारात झालेला चिखल (डेरा), हाच जर घराच्या बांधकामासाठी केलेला मातीचा चिखल असेल तर तो ‘गारा’ होतो. भाषा बारा कोसांवर बदलते असे म्हणतात. त्यामुळे जिल्ह्य़ातल्या पालम, गंगाखेड या तालुक्यांच्या डोंगरी भागातल्या भाषेवर परभणीपेक्षाही अहमदपूर-लातूरचा प्रभाव आहे. ‘माझं-तुझं’ यासाठी काही भागात ‘मव्हं-तुव्हं’ तर काही भागात ‘मप्लं-तुप्लं’ असे बोलले जाते.
प्रादेशिक बोलीची रूपे जेव्हा भाषेत अवतरतात तेव्हा ती खास त्या भागाचा रंग आणि गंध घेऊन येतात. साधा पावसाचा जरी संदर्भ घ्यायचा झाला तरी त्यासाठी प्रत्येक वेळी नवे शब्द येतात. कमी पाऊस झाला तर तो ‘उगं शितुडे पडल्यावानी’ असतो, जरा जमीन ओली करणारा असेल तर ‘पापुडा वला केल्यावानी’ असतो, पावसाचे पाणी रानात साचले तर ‘चांदण्या साचल्या’ आणि हेच पाणी जर जमिनीत सगळीकडे दिसू लागले तर मग ‘थळथळलं’.. तडाखेबंद झालेला पाऊस म्हणजे ‘ठोक’.
म्हणी आणि वाक्प्रचारांनी या भागातली बोली समृद्ध आहे. स्त्रियांचे भावविश्व तर अशा असंख्य म्हणींनी व्यापले आहे. ‘खाली मुंडी अन् पाताळ धुंडी’, ‘बऱ्या घरी लेक देली अन् भेटीला मुकली’, ‘मानापानाची अन् दीडा कानाची’, ‘पावली तर मावली; नाही तर शिंदळ भावली’, ‘रांडव लागली आहेवाच्या पायी अन् मह्य़ावानी कव्हा व्हशीन बाई’, ‘हौसेनं केला पती अन् त्याला फुटली रगतपिती’ अशा किती तरी म्हणी सांगता येतील. एखाद्या ठिकाणी खूप गर्दी झाली असेल तर त्यासाठी ‘मचळा’ असा खास शब्द वापरला जातो आणि तीच जर बायांची कलकल असेल तर त्यासाठी ‘कोंगाडकालवा असा शब्द आहे. ‘कोंग्या’ शिवारात आवाज करीत थव्यानेच येतात हा त्यातला अनुषंग. वर सांगितलेल्या म्हणी केवळ स्त्रियांच्या वापरातल्या आहेत असे नाही, पण त्या त्यांच्या भावविश्वातले मोठे स्थान व्यापणाऱ्या आहेत. बाकी ‘मूठभर घुगऱ्या अन् रातभर मचमच’, ‘आवं जावं अन् नल्डय़ाला दावं’ अशा दैनंदिन जीवनव्यवहारातल्या म्हणी कितीतरी आहेतच. ‘येडीला माहेर कळंना अन् सासरंय कळंना’, ‘एकदा नाहाली गंगत अन् दहादा बसली सांगत’ या स्त्रियांच्या संदर्भात असलेल्या आणखी काही म्हणी.

खास या भागातले काही वाक्प्रचार आहेत. एखादा जास्तच हट्टाला पेटला असेल तर त्यासाठी ‘इतका कशामुळं अडचा-कांडय़ावर यायलास’ आणि एखादा हमरीतुमरीवर आला तर त्यासाठी ‘उगं दोन दोन पायार व्हवू नकु’ असे बोलले जाते. श्रीमुखात भडकावण्यासाठी कुठे ‘मुस्काट फोडीन’, ‘थोबाड फोडीन’ असे म्हटले जात असले तरी परभणी जिल्ह्य़ात ‘थुत्तरीत देईन’, ‘तोंड हाणीन’ यांसारखे शब्द वापरले जातात.
वाक्याच्या शेवटी जर ‘आहे’ हे क्रियापद असेल तर ते वापरण्याची गरजच नाही. आधीच्या शब्दालाच ‘य’ लावला की काम भागते. एखादा ‘येतो आहे’ तर ‘तो यायलाय’, मातीच्या घराला ओल सुटली तर ते ‘सादळलंय’, पेरलेली सरकी खराब निघाली किंवा न उगवता जमिनीतच नष्ट झाली तर ‘भंडारलीय’, ‘करत आहोत’ यासाठी ‘करायलोत’, ‘निघत आहोत’ यासाठी ‘निघायलोत’, ‘तळमळत आहोत’ यासाठी ‘तळमळायलोत’ असे शब्द क्रियापदाचे रूप धारण करतात. कधीकधी एखाद्याच शब्दातून मोठा आशय व्यक्त होतो. गावात एखाद्याचा उत्कर्ष डोळ्यात येत असेल, काहींना सलत असेल तर ‘देखवंना’ एवढा एकच शब्द पुरे झाला.
पूर्वी परभणी-हिंगोली हा एकच जिल्हा होता. तरीही या जिल्ह्य़ात भाषेची अत्यंत भिन्न रूपे आढळायची. आताही आढळतात, पण आता जिल्ह्य़ाचेच विभाजन झाल्याने हे वर्गीकरण करणे सोपे होते. परभणी, सेलू या भागांतली भाषा आजही प्रमाण मराठीच्या बरीच जवळची आहे. जिंतूर तालुक्याच्या विदर्भालगत असलेला डोंगराळ भाग या भाषेच्या बाबतीत उमटून पडतो. भाषेची ही विविधता एकाच जिल्ह्य़ात पाहायला मिळते.
राम निकम यांचा ‘चांदयेल’, गणेश आवटे यांचे ‘गणगोत’, ‘कागूद’, ‘भिरूड’; इंद्रजित भालेराव यांचे ‘पीकपाणी’, भारत काळे यांचे ‘ऐसे कुणबी भूपाळ’ यांसारख्या कथा-कादंबरी आणि कवितासंग्रहांमधून या जिल्ह्य़ातील बोलीला समर्थ असे शब्दरूप मिळाले आहे. अगदीच अनाकलनीय किंवा आडवळणाचे वाटावे असे या बोलीत काहीही नाही. बाहेरच्या माणसाला ती चटकन समजू शकते. किंबहुना, मराठवाडय़ात प्रमाण भाषेला जवळची अशी याच जिल्ह्य़ाची भाषा आहे. अर्थात बोलीचा जो नाद आणि रंग-ढंग आहे, तो मात्र वेगळा आणि स्वत्व जपणारा आहे. कृषी संस्कृतीतील सण-उत्सवांमधून आणि जुन्याजाणत्या लोकांच्या तोंडून ही बोली व्यक्त होते. आजच्या पिढीच्या तोंडून आता बोलीपेक्षा प्रमाणभाषेलाच जास्त वाव आहे. आणि हे चित्र सर्वत्रच आहे!