|| डॉ. कीर्ती मुळीक

ज्यांनी फाळणी पाहिलेली नाही, त्यांना फाळणी म्हणजे प्रदेश आणि त्याच्या सीमारेषा यांचा मर्यादित इतिहास वाटतो. परंतु ज्यांनी फाळणी अनुभवली आहे, ते त्या शब्दानेही अंतर्बा थरथरतात. फाळणीपीडित आई-वडील, भावंडे, पत्नी, मुलेबाळे, नातलग, मित्रपरिवाराला पारखे झाले. त्यांनी आपले घर, मुलूख गमावले. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते परागंदा झाले. माणुसकी, नीतिमत्ता, जीवनमूल्ये, बंधुता, धर्म या साऱ्यांवरचा त्यांचा विश्वास उडाला. याचे दर्शन‘फाळणी : भारतीय भाषांमधल्या कथा’ या द्विखंडात्मक कथासंग्रहातून घडते. भारतीय ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या मूळ ग्रंथाचे संपादन हिंदीतील महत्त्वाचे कवी, नाटककार आणि समीक्षक नरेंद्र मोहन यांनी केले आहे. प्रा. वसंत केशव पाटील यांनी या कथा ताकदीने अनुवादित केल्या आहेत. या कथा उर्दू, पंजाबी, हिंदी, बंगाली, सिंधी भाषेतील आहेत. मराठी भाषेतील एकमेव कथा (लेखक : ना. ग. गोरे) पहिल्या खंडात आहे. आसामी, डोगरी, गुजरातीतील एकेक कथा यात समाविष्ट आहे. मोठय़ा संख्येने विविध भाषांमध्ये असणाऱ्या या कथा फाळणीने प्रभावित झालेले प्रदेश लक्षात आणून देतात. यातील बहुतेक कथा फाळणीने पीडित झालेल्यांनी लिहिल्या आहेत. या कथांतून अधोरेखित होणारे मानवी जीवनातील कारुण्य वाचकाला मुळापासून हादरवून सोडते.

Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!

प्रत्येक फाळणीग्रस्ताची वेगळी कहाणी आहे. फाळणीतील अभूतपूर्व दंगल ही घटना एकच आहे; पण तिचे पलू अगणित आहेत. ‘परदेशी मुलगी’ या कथेत १६ वर्षांच्या जम्मोला तिचे अम्मी-अब्बा फाळणीतून निर्माण झालेल्या पाकिस्तानात तिच्या आत्याकडे पाठवतात. तिथे तिचा हरवलेला पूर्वनियोजित वर सापडेल आणि तिचे त्याच्याशी लग्न होईल, या आशेवर ते आहेत. पाकिस्तानात रवानगी झालेल्या जम्मोचे हे स्वप्न तर विरतेच; पण ती आपल्या अम्मी-अब्बांना, भावंडांनाही पारखी होते. तिला त्या देशात परके वाटू लागते. आपल्या अम्मीला पत्रं लिहून ती आपल्या या भावना कळवते. अम्मीचे एक दिवस तिला पत्र येते : ‘आता तू आत्या सांगेल ते ऐकत जा. इकडे परत यायचा विचार सोडून दे. त्या देशाशी नाते जोड.’ पूर्णपणे परक्या वाटणाऱ्या देशात एकटीने कायमचे राहण्याचे दुर्दैव जम्मोच्या वाटय़ाला येते.

‘धनगर’ कथेत विद्वान पंडित असणाऱ्या वयोवृद्ध दादाजींना दंगलीमुळे आलेल्या असहायतेचा फायदा घेऊन आडदांड रानू धनगर मारहाण करतो. तो दादाजींना जबरदस्तीने आपल्या मेंढय़ा राखायला भाग पाडतो. ‘बदला’ कथेतील सरदारजीला आपल्या डोळ्यांसमोर सुना-लेकींवर बलात्कार होताना पाहावे लागते. फाळणीत तो आपले पूर्ण कुटुंब हरवून बसला आहे.

‘फाळणी’तील बहुतेक कथा आठवणी स्वरूपातील आहेत. यातनांचा भोगवटा सोसलेल्या या पीडितांकडून कल्पनारम्य कथेची अपेक्षा कशी करायची? ‘मी कोणती कथा लिहू? जेव्हा केव्हा म्हणून मी कथा लिहायचा विचार करतो तेव्हा कितीतरी कथा मला गराडा घालतात. एखाद्या कथेच्या हाताला राबराबून घट्टे पडले आहेत. एखाद्या कथेचे केस पार झडून गेले आहेत. एखाद्या कथेच्या डोक्यावर पदर नाही. एखाद्या कहाणीचा हात तुटून गेला आहे, तर एखाद्या कथेला पाय नाही. माझी कुठलीही कहाणी परिपूर्ण नाही. कुठल्याही कथेचे तारुण्य कायम राहिले नाही. सगळ्याच कथा कुरूपतेच्या गडद सावलीने झाकोळल्या आहेत..’ अशा कथनाने या संग्रहातील पहिली कथा ‘हरवलेला सुगंध’ची सुरुवात होते. ती सगळ्याच लेखकांची प्रातिनिधिक मानसिकता दर्शवते. दंगलीपूर्वीचे प्रसन्न, समृद्ध जीवन, रोजच्या व्यवहारात धर्माचा विचारही नसणारी, मुलाबाळांत आपपरभाव न करणारी माणसे, फळा-फुला-वृक्षांनी बहरलेला निसर्ग, घट्ट बांधली गेलेली नाती, आठवणींची कुपी उघडली की फक्त सुगंधच येईल अशी मत्री, मजबूत हवेल्या, मंदिर-मशीद-बागांमधून बागडणारी मुले, आदबदार देखण्या स्त्रिया, सण-उत्सव-विवाह यांत गाणी गात रमून गेलेले आबालवृद्धांचे जगणे.. एका राजकीय निर्णयशक्तीचा जबर तडाखा या सर्वाना बसतो आणि प्रलयात सापडून नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरायला व्हावे तशी उलथापालथ या सुखी-समाधानी आयुष्यांच्या वाटय़ाला येते. माणसामधला हैवान हैदोस घालू लागतो. धर्माधतेचे भूत त्याच्यावर स्वार होते. दंगली, जाळपोळ, रक्तपात, मारहाण, प्रचंड दहशत, भीती यांचा कल्लोळ माजतो. हाताला लागेल ते गाठोडय़ात बांधून, आपला कुटुंबकबिला घेऊन जो-तो ‘नव्या देशा’ची वाटचाल करू लागतो. परंतु तो देश त्याला आपला वाटत नाही. आपली जन्मभूमीच त्याला आपली वाटते. पण तिथे राहण्याचा त्याचा हक्कहिरावून घेतला गेला आहे. त्याला अनेक प्रश्न पडतात. माणसाचे माणूसपणाचे हरवलेले मुखवटे त्याला दिसतात. ‘आतापर्यंत मी जो जाज्ज्वल्य इतिहास शिकवला, तो कितपत खरा आहे? या फाळणीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा त्यात या वेदनांचा इतिहास येईल का? शांततेचे रूप असणाऱ्या बुद्धाला पुन्हा या देशात यावेसे वाटेल का?’ असे प्रश्न ‘जन्मभूमी’ कथेतील शाळामास्तरांना पडतात. ‘डाळिंबाची पाने’मधील तरुण नायिका आपली जन्मभूमी आणि संपन्न हवेली सोडून ‘आपल्या देशात’ आली आहे. तिच्या घरात आता सात घराणी नांदताहेत. हे सर्वाचे घर आहे. इथे फक्त एक नळ आहे. प्रत्येक खोलीचे छत गळत असते. तिचे अब्बा खूप थकले आहेत. ते दिवसभर शांतपणे बसून असतात. आईला आता खूप कमी ऐकायला येते. भावाचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. या नायिकेला आपल्या हवेलीच्या बागेतील डाळिंबाचे झाड आठवते आणि ती आपल्या सखीला म्हणते, ‘‘आम्ही डाळिंबाच्या डहाळ्यांवरून गळून पडलेली पाने आहोत सखी! आमचा रंग अजुनी हिरवा आहे. अजुनी आम्हाला वसंत ऋतूच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. आम्ही पिवळे होऊन स्वत: नाही गळून पडलो. आम्हाला झोडून, झोडपून डहाळ्यांवरून जबरदस्तीने झाडून टाकण्यात आले आहे. आमची गाणी डहाळ्यांवरच राहिली आहेत आणि सूर तेवढे सोबतीला आले आहेत. फुले तिथेच राहिली आहेत आणि अश्रू आमच्याबरोबर जमिनीवर खाली पडले आहेत.’’

फाळणीग्रस्त प्रत्येक स्त्रीची ही व्यथा-वेदना आहे. फाळणीने तिचे तारुण्य हरवले. वेदनांच्या काळ्याशार गडद रेषा तिच्या अंगाशरीरावर उमटल्या. अनेक अत्याचारांना तिला सामोरे जावे लागले. तिचे लग्नाचे वय उलटून गेले. प्रियजनांचा विरह सहन करत ती जगत राहिली.

राजकीय इच्छाशक्तीतून भारताची फाळणी झाली. पण या फाळणीतून कुणाचेच भले झाले नाही. या फाळणीमुळे फक्त सामान्य माणूस तेवढा भरडला गेला, हे या कथांमधून प्रकर्षांने जाणवते. सोन्याचा धूर निघणाऱ्या, समृद्ध आणि संपन्न संस्कृती असणाऱ्या, सलोख्याचे सामाजिक जीवन जगत असलेल्या आणि नंतर फाळणीमुळे काळाच्या कराल दाढेत चिंधडय़ा झालेल्या भारताचे दर्शन या कथांतूून होते. एखाद्या घटनेमुळे मानवातील दानवी शक्ती ज्वालाग्राही पदार्थाप्रमाणे कशा उफाळून वर येतात आणि एकूण एक मानवी मूल्ये पायदळी तुडवून कसा विध्वंस करतात याचे चित्रण या कथांमध्ये आहे. या कथांना कुठेही फाळणीविषयक राजकारणाचा वास नाही; मात्र त्या तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक ताणेबाणे उलगडून दाखवतात. फाळणीमुळे एखाद्या देशातील पूर्वापार चालत आलेली सामाजिक व्यवस्था व संरचना कशी कोसळते, त्यातून सामाजिक गुंतागुंत कशी निर्माण होते, माणूस त्यांच्यापुढे कसा हतबल होतो, हे या कथांमधून लक्षात येते. या कथा माणसाला भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाची जाणीव करून देतात.. त्यांच्या आरपार पाहायला प्रेरित करतात. भविष्यात पुन्हा अशी फाळणी होऊ न देण्याची विधायक दृष्टी त्या निर्माण करतात. जागतिक महायुद्धावरच्या कथांनी ज्याप्रमाणे माणसाचे डोळे उघडले, त्याचप्रमाणे या कथाही त्याच्या डोळ्यात अंजन घालू शकतील.

या कथा अनुवादित असल्या तरी उर्दू, पंजाबी कथालेखकांची तरल लेखनशैली त्यातून ध्यानी येते. कोणत्याही वेगाची फिकीर न करता निसर्ग, गाव, संस्कृती यांचे यथार्थ दर्शन घडवीत या कथा हळुवारपणे वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. हा तरलपणा तितक्याच सूक्ष्मरीत्या पकडत वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अनुवादक प्रा. वसंत केशव पाटील यशस्वी झाले आहेत.

‘फाळणी: भारतीय भाषांमधल्या कथा’

हिंदी संपादन- नरेंद्र मोहन, अनुवाद- प्रा. वसंत केशव पाटील, सायन पब्लिकेशन्स,  पृष्ठे- १०३०, मूल्य- १५०० रुपये.