नवी मुंबईतील आमच्या विद्यापीठाकडे जाताना लागणारा वाशीचा सिग्नल मला रोज छळतो. चार-पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे सिग्नलची लाल-हिरव्या-पिवळ्याची सायकल मोठी आहे. १२०.. ११९.. सेकंदांची उलटी गणती चालू असताना माझे लक्ष गाडीच्या काचेपलीकडच्या फुटपाथच्या जगाकडे.. त्या दिवशीही असेच झाले. सहा-सात वर्षांचा तो भीक मागून जगणारा उघडा पोरगा. गाडी थांबल्याक्षणी काचेवर होणारी टकटक.. पसरलेला हात.. दीनवाणे डोळे.. हाताची मूठ तोंडाकडे नेऊन वारंवार खाण्यासाठी अन्न वा पसे मागण्याची ती याचना.. पण यामुळे माझा लागलेला डोळा मोडल्यावर माझी चडफड.. चीडचीड.. आणि डाफरणे.. हे सारे सारे नित्याचेच. आज मात्र तो गाडीपाशी आला नाही. आज त्याला पावाचा एक तुकडा लाभला होता. मोठय़ा कष्टाने, काळजीपूर्वक फुंकून तो त्यावरील धूळ साफ करीत होता. पाव खाण्यापूर्वी त्याने तो हातात धरला होता. तनिष्काचा तन्मणी धरावा तसा. मग तो त्याने नाकाने हुंगला. डोळ्यांनी निरीक्षला. जिभेने चाटला. आणि पहिला तुकडा तोडतो- न तोडतो तोच एक लालसर शेरू शेपूट हलवीत त्याच्यासमोर उभा ठाकला. आपले ओलेते नाक लांब करून शेरूने तो तुकडा हुंगला. वळवळणाऱ्या शेपटीने शेरूने आपली लाचारी, याचना, भूक व्यक्त केली.. ‘‘मला देतोस का रे थोडा..?’’ त्याला बोलता आले असते तर तो बोलला असता. पण शेरूने न उच्चारलेले शब्द त्या मुलाच्या कानी पडले आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने राहिलेला सगळा पाव शेरूसाठी जमिनीवर टाकला. भूक दोघांचीही होती. आणि म्हणूनच ती एकमेकांना समजत होती. पुढचे दृश्य अधिक हेलावणारे होते.. शेरूने जमिनीवर पडलेला पावाचा तुकडा दीर्घ हुंगला. पावाच्या भाजलेल्या बाजूचे कण कण त्याच्या रोमारंध्रात श्वासातून भिनले आणि कृतार्थ डोळ्यांनी त्या मुलाचा हात चाटून शेरू तिथून निघून गेला. मुलाने पावाचा तुकडा परत उचलला. साफ केला आणि खाण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला.
या प्रसंगाने मी अस्वस्थ झालो. आज त्याला पसे किंवा डब्यातला केक द्यावासा वाटला. पण आज तो गाडीजवळ नव्हता. त्याला हाक मारावी, तर नाव माहीत नाही. शुकशुक करणे विद्यापीठाचा झेंडा धारण करणाऱ्या गाडीतून शोभले नसते. गाडी बाजूला घ्यावी, थांबावे.. या विचारांच्या गत्रेतून बाहेर येण्यापूर्वीच ५.. ४.. ३.. २.. १.. सिग्नल हिरवा झाला. गाडीने वेग घेतला. त्या सकाळनंतर तो मला दिसलाच नाही. त्याने सिग्नल बदलला असावा अशी मी माझी सोयीस्कर समजूत करून घेतली खरी; पण त्याला द्यायचे राहून गेले, हे शल्य मात्र टोचत राहिले.
रोजच्या व्यवहारात, आयुष्यात असे अनेकदा होते. कोणासाठी काहीतरी करावेसे वाटते, कोणाला काही द्यावेसे वाटते; पण आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीत अडकतो. देण्याचा विचार लांबणीवर पडतो. जसजसा काळ जातो तसतशी देण्याच्या भावनेतील तीव्रताही बोथट होते आणि ‘गेले द्यायचे राहुनि’ अशी आपली अवस्था होते. ज्याला द्यायचे योजले तो परका असेल तर नाते दृढ व्हायचे राहून जाते. आणि तो अगदी जवळचा आप्तस्वकीय असला तर नको असलेला दुरावा निर्माण होतो. पण सगळ्यात महत्त्वाचे आपण देण्याच्या आनंदाला मुकतो. दिल्याने आपण अधिक श्रीमंत होतो, हे जर खरे असेल तर आपण येणाऱ्या लक्ष्मीच्या पावलांना दरवाजा बंद करतो.
अर्थात, हे देणे म्हणजे  olx.com  किंवा quickr.com  वर लॉग-ऑन होणे नव्हे. तेथे नको असलेल्या वस्तूंचा व्यापार आहे, तर इथे आपल्यालाही हव्या असलेल्या वस्तू इतरांच्या गरजा जाणून त्यांना देण्याचा व्यवहार आहे. तेथे पशाचे आदानप्रदान आहे, इथे प्रेमाची आवभगत आहे. तुमच्याकडे असताना देणे श्रेष्ठच; पण तुमच्याकडे खूप काही नसताना देणे श्रेष्ठतम. म्हणून यापुढे मनात देण्याचा विचार आल्यावर तात्काळ देऊन हलके व्हायचे. कोण जाणे, पुढे विचार येईल- ना येईल आणि वेळ मिळेल- ना मिळेल. तेव्हा आलेल्या पहिल्या विचाराचा आणि प्रत्यक्ष कृतीचा मेळ घालण्याची उत्तम वेळ पहिलीच- हे लक्षात ठेवायला हवे. द्यायचे प्रसंग अनेक.. वाढदिवस, लग्नाची पंचविशी-पन्नाशी, मुलांचे ‘बर्थ-डे’, घरातील गत ज्येष्ठांच्या तिथी.. कधी एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांला दोन वेळच्या खाणावळीचा खर्च द्या, कधी त्याला हवी असलेली पुस्तके.. कधी एखाद्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांला त्याची गरज असलेलं रेफरन्स बुक, तर कधी अनाथालयातल्या चिमण्या पाखरांवर पांघरावयाच्या दुलई. माझी एक सर्जन सहकारी आपल्या दत्तक मुलाच्या वाढदिवसाला एका महिलाश्रमाला ५० किलो गहू-तांदूळ पाठवते. कधीतरी तिच्याकडून हे ऐकल्यावर माझ्या मनातला तिच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. आणि मनातली देण्याची भावना आणि द्यायची वेळ याचा मेळ यापुढे घालण्याचा मी निर्धार केला.
द्यावेसे वाटले मला अनेकदा, द्यायचे मात्र राहून गेले
आज तुझ्याकडे पाहताना, खपाटलेले तुझे पोट मला खूप काही सांगून गेले।
द्यावेसे वाटले की तत्क्षणी देऊन मोकळे व्हावे
देऊन दिल्यावर काय उरेल, याचे हिशेब नंतर करावे।
कारण आता घेणारा रिता अन् देणारा भरला असतो
शिंपल्यातल्या मोत्यासारखा पाण्यात राहूनही कोरडा असतो।
हार दोघांचेही होतात, मोल दोघांचेही ठरते,
शिंपला कवडीमोल, तर मोती अनमोल।
तस्मात् मोती व्हा, शिंपला नको.