‘आपण कविताच लिहितो,’ असा सुप्रसिद्ध कवयित्री उषाताई मेहतांचा असा समज होता. पण अचानक त्यांना त्यांचे वेगवेगळ्या वेळी लिहिलेले पेटाराभर लेख सापडले आणि आपल्या हातून गद्यालेखन झाल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या शोधातून स्वत:लाच नव्याने भेटत त्यांनी त्या लेखांचं आकर्षक जोडचित्र ऊर्फ ‘कोलाज’ नावाचं संकलन केलं. त्या जोडचित्राची सुरुवात उषाताईंपासूनच होते. त्यांचं राष्ट्र सेवा दलाच्या छायेतलं आणि तरीही फुलपाखरासारखं बागडणारं, स्वच्छंद बालपण, त्यांच्या छळवादी मनाच्या आत्मशोधातून जन्मलेल्या त्यांच्या अतिशय खासगी कविता… त्यांचे ‘आभास’, ‘अप्रूप’, ‘निरंतर’ हे संग्रह, ‘मितवा’ ही मालिका कविता आणि त्यांचं दिनकर गांगल, विजयाबाई राजाध्यक्ष, अवधूत परळकर यांसारख्या मान्यवरांकडून झालेलं स्वागत आणि कौतुक यांच्या हकिकतीतून आपली उषाताईंशी मैत्री होते. उषाताईंच्या सांगण्यातून विजयाबाईंच्या निगर्वी मोठेपणाची जाणीव होते, हात जुळतात. त्यानंतर वसंत बापट, विंदा आणि पाडगावकर या दिग्गजांवरचे, निरनिराळ्या कारणांनी निरनिराळ्या काळात लिहिलेले प्रत्येकी दोन-तीन लेख सलगपणे दिले आहेत. त्यामुळे त्याच कवीच्या कवितांच्या भिन्न पैलूंचा लखलखाट कालातीत दृष्टिकोनातून अनुभवता येतो. जीवनानंदाचा आविष्कार काव्यातून घडवणारे वसंत बापट, शब्दांनी नादावणारे आणि गाणं गाऊन दाखवावं तसं जगणं मरणाला देऊन चिरंतन फुलत राहिलेले पाडगावकर, वाचकाच्या व्यक्तिगत मर्यादा आणि सादर होणारं कवितेचं स्वरूप यांच्या संवादातून काव्यानंद निश्चित होतो म्हणणारे फणशी स्वभावाचे विंदा हे सारे उषाताईंच्या नजरेतून दिसतात. त्या तिघांच्या कवितांच्या तीन तऱ्हा, काव्यवाचनाची वेगवेगळी ढब, त्यांनी एकमेकांना दिलेल्या कोपरखळ्या हे प्रत्यक्ष ऐकल्या-पाहिल्याचा आनंद कोलाज वाचताना मिळतो.

मग शिरीष पै, शांताबाई, सरोजिनीबाई आणि शंकर वैद्या ही मराठी मनांची दैवतं गाभारा सोडून उषाताईंचे मित्र म्हणून भेटतात. मनातच, पूर्ण नीरवतेतच वाचाव्या अशा ग्रेस-कवितांशी हृदयसंवाद होतो. काही तरी समजल्याचा आभास निर्माण होतो.

हेही वाचा…विळखा काजळमायेचा!

षांताराम पवारांच्या ‘त्रिकाल’ कविता आणि मुखपृष्ठावरची चित्रकविता, तुमच्या-आमच्या संवेदनांचा एक्सरे काढणाऱ्या श्रीधर तिळवेंना न पाठवलेलं पत्र, भाजी-आमटीत मीठ भुरभुरवताना दांडीयात्रावाल्या म्हाताऱ्याची आठवण काढणाऱ्या धीरूबेनच्या, तळठाव नसलेल्या विहिरीच्या, स्वयंपाकघराच्या कविता अशी साहित्यसफर पुढे जाते. तुरुंगातही हास्यातून चांदणं सांडणाऱ्या प्रमिलाताई दंडवते, काव्य- कला- साहित्य- संगीत साऱ्यांत पारंगत असणारी सुबक वासंती, बहुनिष्ठ मैत्रीवाल्या बन्सीधर निर्मलाबाई, गाण्यांच्या चालींची अकरावी दिशा शोधणारे यशवंत देव, जिज्ञासूंना ‘शब्दानंद’ देणाऱ्या सत्त्वशीला सामंत, अद्भुत ओलंचिंब वातावरण कॅनव्हासवर बंदिस्त करणारा सुरेश गायकर वगैरे असामान्य मंडळींशी उषाताई आपली ओळख करून देतात.

ती ओळख केवळ तोंडओळख नाही. त्या नृत्य- नाट्य- चित्रांचे बारकावे, मोठेपणा, सौंदर्य यांचं रसग्रहण उषाताई आपल्याला शिकवतात. जोडचित्राचा शेवट आणीबाणीच्या क्लेशकारक काळाच्या शब्दचित्राने होतो. काव्य- शास्त्र- कलेच्या रम्य स्वप्नात अचानक भयस्वप्न सुरू होतं. जागेपणीही पिच्छा पुरवतं. हे एका समर्थ कवयित्रीने लिहिलेलं गद्या आहे. त्याचा गाभा काव्यमयच आहे. ‘प्लेगच्या साथीतलं पुंगीवाल्याने ओस पाडलेलं गाव’, ‘तंतुवाद्यासारखं अत्यंत संवेदनशील असलेलं बापटांचं मन’, ‘मनातल्या फुलाची पाकळीपाकळी उमलून परिमळत राहायची’… अशा सुंदर वाक्यांची या पुस्तकात रेलचेल आहे. हट्टाग्रही, चुंफून, धुमसून, अभ्यासाचा झक्कू अशा हटके शब्दांनी या कोलाजला दागिने घातले आहेत. या पुस्तकाला सतीश भावसारांनी सुरेख सजवलं आहे.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: आनंददायी दृश्य-व्यायाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोलाज’ वाचताना वि. द. घाट्यांचं ‘दिवस असे होते’, शांताबाई शेळकेंचं ‘वडीलधारी माणसें’ वगैरे प्रभावी पुस्तकांची आठवण येते. या पुस्तकात उषाताई स्वत:बद्दल फारसं बोलत नाहीत, पण लेखांतून त्यांचं व्यक्तिमत्त्व समजत जातं. त्यांचं बालपण, मैत्रिणी, मराठी साहित्यातल्या नामवंतांशी असलेलं मैत्रीचं नातं, अनेक चळवळींशी नातं जुळवणारा त्यांचा सत्यशोधक स्वभाव हे सारं जवळून बघायला मिळतं. हे पुस्तक हा उषाताईंच्या आत्मचरित्राचा नकळत लिहून झालेला, संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा आस्वादावा असा तुकडा आहे. हा कोलाज आहे. त्याचा प्रत्येक भाग वेगळ्या रंगछटा दाखवतो. त्यांचा एकत्रित परिणाम मोहून टाकतो. पण ती एका मोठ्या भित्तिचित्राची चुणूक आहे हेही जाणवत राहतं. ते संपूर्ण, भव्य भित्तिचित्र पाहायची ओढ लागते. त्यासाठी उषाताईंनी आता आत्मचरित्र लिहायचं मनावर घ्यावं आणि तो सुंदर अनुभव वाचकांना द्यावा. ‘कोलाज’, – उषा मेहता, मॅजेस्टिक प्रकाशन, पाने-३४२, किंमत-५०० रुपये.ujjwalahd9@gmail.com