|| प्रभाकर काका

ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर कारेकर यांनी नुकतीच (४ जुलै) वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. त्यांचा अमृतमहोत्सव सोहळा मुंबईत १३ जुलै रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने  पं. शौनक अभिषेकी यांनी त्यांच्या गायकीचा घेतलेला वेध..

प्रभाकर कारेकर काका हे माझ्या वडिलांचे- पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य. म्हणजे एक प्रकारे माझे गुरुबंधूच. बाबांचे पहिल्या फळीतील जे काही शिष्य होते, त्यातील कारेकर काका हे एक. ते माझ्या जन्माआधीच बाबांकडे शिकायला येऊ लागले होते. मी लहान असतानाही ते बाबांकडे शिकत होते. खरे तर मी जन्माला आलो तो त्यांच्या समोरच.

आम्ही शिवाजी पार्कला राहायचो.. बालमोहन शिक्षण मंदिराच्या बाजूला. तिथेच कारेकर काका बाबांकडे शिकत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये माझी आणि त्यांची भेट व्हायची. कधी कधी ते घरी यायचे. त्यावेळच्या त्यांच्या खूप आठवणी आहेत. मुख्य म्हणजे माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले तेव्हाही प्रभाकरकाका बाबांकडे शिकत होते. आणखीही दोन-तीन शिष्य होते बाबांचे. सुखटणकर, बोबडे, चोडणकर आदी शिष्यमंडळी त्यांच्याकडे येत असत. आई मला प्रभाकरकाका आणि इतर शिष्यांबद्दल खूप सांगत असे. कारण हे सारे शिष्य आमच्याकडे घरच्या सदस्यांसारखेच राहायचे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर विनामोबदला संगीतविद्या शिकवली. गुरुकुल पद्धतीने ते शिकवायचे. त्यामुळे शिष्य मुलासारखेच घरी वास्तव्याला असत. त्या काळात- म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच्या साधारण दहा वर्षांच्या काळात प्रभाकरकाका बाबांसोबत जवळजवळ २४ तास असायचे. बाबांच्या मफिलींमध्ये ते त्यांना साथ करायचे. माझ्याकडे काही रेकॉर्ड्स आहेत त्या काळातल्या. त्यात प्रभाकरकाकांनी बाबांना साथ दिलेली आहे. कारेकर आणि बोबडे हे बाबांचे फार नावाजलेले शिष्य. त्यावेळी बाबांची ही अग्रगण्य शिष्यजोडी होती. साथीला पुरुषोत्तम वालावलकर आणि नाना मुळे ही जोडी असायची. बाबांबरोबर त्यांचा हा ठरलेला ग्रुप होता. त्या काळात त्यांनी खूप कार्यक्रम गाजवले.

मी थोडा मोठा झाल्यावर मला कळायला लागले, की बाबांच्या अग्रणी शिष्यांपैकी प्रभाकरकाका हे एक आहेत. त्यावेळी प्रभाकरकाकांचे नावही झाले होते. त्यामुळे त्यांच्या शास्त्रीय आणि नाटय़संगीताच्या बऱ्याच रेकॉìडग झाल्या होत्या. त्या क्षेत्रात त्यांचे खूप मोठे नाव होते. हे सर्व माझ्या आजूबाजूला घडत होते. ते बाबांबरोबर मफिली करत असत. एखाद्या मफिलीमध्ये बाबांच्या आधी ते गायचे. किंवा संगीत संमेलनांमध्ये कधी कधी बाबांबरोबरही ते गात असत. मी सोबत गेलेला असलो की प्रभाकरकाकांची भेट व्हायची. गप्पा व्हायच्या.

मला त्यांचे खूप सारे किस्से आठवतात. गोव्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने फार मोठे संमेलन व्हायचे. अजूनही होते. गोव्यात कवळे म्हणून ठिकाण आहे. तिथे शांतादुग्रेच्या मंदिराजवळ हे संमेलन होते. प्रभाकरकाका या संमेलनाचे आयोजन करायचे. दरवर्षी त्यात एक वर्षांआड बाबांचे गाणे असायचेच. मला स्पष्ट आठवते की त्यावेळी बाबांचा तंबोरा लावून देणे वगैरे काम प्रभाकरकाका करायचे. बाबांची स्टेजवरील सगळी व्यवस्था ते बघायचे. मी नंतर गाणे शिकायला लागलो आणि मफिलींनाही जायला लागलो. त्यात प्रभाकरकाकांची मफील असेल तर ती आम्ही कधीच सोडत नसू. कारण ते बाबांचे अग्रगण्य शिष्य होते. आणि दुसरे म्हणजे मला स्वत:ला त्यांचे गाणे खूप आवडायचे.. अजूनही आवडते.

त्यांचा गाण्याप्रति असलेला भाव, त्याची तयारी, त्यांनी केलेली साधना हे सगळं माझ्या डोळ्यांसमोरच घडलेलं आहे. त्या काळात मी आवर्जून त्यांचे गाणे ऐकायला जात असे. प्रभाकरकाकांचा एक गायक म्हणून आमच्या पिढीवर खूप प्रभाव होता. शास्त्रीय संगीतात ते जेवढे पारंगत होते, तेवढेच नाटय़संगीतातही होते. तेवढेच ते अभंग संगीतातही निपुण होते. प्रभाकर कारेकर, अजित कडकडे ही त्या काळातली आघाडीची नावे. त्यावेळी आम्ही होतकरू गायक होतो. त्यामुळे त्यांचा आमच्यावर खूपच प्रभाव होता. प्रभाकरकाकांच्या बाबतीत मी हेही पाहिले आहे की सगळ्याच कलाकारांशी त्यांचे एकदम चांगले वैयक्तिक संबंध होते.. आजही आहेत. कसं असतं, की दोन कलाकारांना परस्परांच्या गोष्टी नेहमी पटतीलच असे नाही. बाबांचा तर त्यांच्यावर आशीर्वाद होताच, पण पं. भीमसेन जोशी, पं. जसराजजी, पंडिता किशोरीताई आमोणकर, पं. कुमार गंधर्व या सगळ्यांनाच प्रभाकरकाकांबद्दल त्यांच्या मनात प्रेम असलेले मी पाहिले आहे. त्यामुळेच गोव्याचे संगीत संमेलन ते यशस्वीरीत्या आयोजित करायचे. तिथे कुठलाही कलाकार कुठलीही अपेक्षा न ठेवता येत असे. प्रभाकरकाकांनी फोन केला की लोक लगेच येतात. हे कलाकारांचे त्यांच्यावरील प्रेम आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यापासून ते सर्वच आघाडीचे कलाकार केवळ प्रभाकरकाकांच्या आमंत्रणावरून या संगीत संमेलनाला येतात. त्यांचा इतका मोठा लोकसंग्रह आहे- आणि हे मी स्वत: अनुभवले आहे.

संगीत मफिलीमध्ये मी त्यांना अनेकदा ऐकले आहे. त्यांचे गाणे पुण्यात असले की आम्ही शिष्य लोक सायकलवरून पोहोचायचो. आमच्या घराण्यातील बाबांचे शिष्य म्हणून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटत असे. त्याचबरोबर आम्हाला त्यांचे गाणेही आवडायचे. त्यामुळे त्यांचे गाणे कुठेही असले तरी आम्ही तिथे आवर्जून पोहोचत असू. पुढे मी व्यावसायिक कार्यक्रम करायला लागलो. माझे जाहीर कार्यक्रम व्हायला लागले तेव्हा प्रभाकरकाकांनी मला खूप पाठिंबा दिला. म्हणजे जिथे जिथे माझे नाव सुचवणे शक्य असेल, तिथे ते माझे नाव सुचवायचे. ‘याचे गाणे ठेवा. आमच्या अभिषेकी बुवांचा मुलगा आहे,’ असे सांगायचे. त्यांनीही काही कार्यक्रम आयोजित केला तर तिथेही ते आवर्जून मला बोलवायचे. त्यांच्यासोबतही मी काही कार्यक्रम सादर केले. कोकणात दोन-तीन ठिकाणी, गोव्यात!

तसं एकत्र असे आम्ही कधी गायलो नाही. ते आम्हाला खूप ज्येष्ठ होते. आमचे गायन झाले की मग ते गायचे. आम्ही शास्त्रीय संगीतात तेवढी शिस्त पाळतो. आमच्यापेक्षा ते खूपच ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही गात नाही. त्यांची पंच्याहत्तरी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर साजरी होत आह याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण कलेच्या क्षेत्रात सातत्याने पंचवीस वर्षे, पन्नास वर्षे, साठ वर्षे टिकून राहणे ही फार अवघड बाब आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पन्नास वर्षे टिकून राहणे आणि संगीताचे काम सातत्याने करणे हे प्रभाकरकाकांसारख्या माणसाला जमले आहे, ते त्यांच्या साधनेमुळे! गाण्याप्रति असलेली त्यांची आस- यामुळेच ते हे करू शकले. गुरूंचा आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी आहेच. भविष्यातही त्यांचा आवाज उत्तम राहो आणि त्यांची शंभरी आम्हाला बघायला मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

त्यांनी नाटय़संगीताची खूप सेवा केली. एचएमव्हीसारख्या कंपनीतर्फे त्यांच्या रेकॉर्ड्स निघाल्या. ‘प्रिये पाहा..’सारखे गाणे त्यांनी अजरामर करून ठेवले आहे.त्यांच्या ‘प्रिये पाहा..’चा मोठाच प्रभाव आम्ही शिकत असताना आमच्यावर होता. मला आठवते की श्रोते त्यांना ‘प्रिये पाहा..’ गायल्याशिवाय सोडत नसत. अगदी आरडाओरडा करायचे. सवाई गंधर्व महोत्सवामध्येही त्यांचा कार्यक्रम झाल्यावर लोक त्यांना ‘प्रिये पाहा’ गायला लावत. त्याशिवाय त्यांना ते उठूच देत नसत. त्यामुंळे आम्हाला बरं वाटायचं, की ते आमच्या घराण्याचे गायक आहेत! त्यांचा भूप राग मी ऐकला आहे. तो चांगल्या खेळीमेळीच्या मूडमध्ये ते सादर करायचे. त्यांचे शास्त्रीय संगीतामध्ये जेवढे योगदान आहे तेवढेच नाटय़संगीतातही आहे. ते नाटय़संगीत सादर करायचे. मला वाटत नाही- त्यांनी संगीत नाटकांमध्ये कधी काम केले असेल. नाटय़संगीत गाऊन आणि मफिलींत सादर करून त्यांनी ते सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचवले. हे त्यांचे फार मोठे योगदान होय.

प्रभाकरकाकांनी आता पंच्याहत्तरी ओलांडली आहे. त्यांच्या सौभाग्यवती- म्हणजे आमच्या काकूंचा त्यांच्या या यशात फार मोठा वाटा आहे. कलाकाराला घरातून भक्कम पाठिंबा नसेल- त्यातही खासकरून पत्नीचा आधार नसेल, तर तो त्याच्या क्षेत्रात एवढे मोठे योगदान देऊ शकणार नाही. कारण तो कार्यक्रमानिमित्ताने सतत बाहेर फिरत असतो. आपल्या साधनेमध्ये मग्न असतो. अशा वेळी संसार चालवायचा तर पत्नीही तितकीच कार्यक्षम असायला हवी. हा आधार त्यांना काकूंकडून खूप छानपैकी मिळाला. त्यांची मुलेही आज संगीतात आहेत. त्यांचा मुलगा अमित जरी गाणं सादर करत नसला तरी तो एक चांगला संगीत संयोजक आहे. या क्षेत्रात त्याने नाव कमावले आहे. प्रभाकरकाकांचा परिवार संगीताच्या क्षेत्रात मार्गक्रमणा करतो आहे, हे पाहून मला फार बरे वाटते. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!!