समीर गायकवाड

एका रणरणत्या दुपारी सुनीताने कानूबाबापाशी वाढेगावला मस्क्यांच्या घरी निरोप पाठवला की, ‘‘कस्तुराला शक्य तितक्या लवकर माहेरी पाठवून देण्याची तजवीज करा.’’ आपली आई विमलबाई हिला न विचारता सुनीताने हा कारभार केला होता. दुसऱ्या दिवशी कानूबाबा सहज विमलच्या घरी आला तेव्हा गप्पांच्या ओघात त्यानं सुनीतानं दिलेल्या सांगाव्याचा उल्लेख करताच विमल चाट पडली. आपल्याला न विचारता इतका मोठा निर्णय आपल्या लेकीनं का घेतला असावा, या विचाराच्या भुंग्यानं तिचं मस्तक पोखरून काढलं. रानात खुरपणीला गेलेली सुनीता माघारी येईपर्यंतही तिनं दम धरला नाही. कानूबाबा घरातून बाहेर पडताच पायताणं पायात सरकावून धाडदिशी दारं आपटून ताडताड ढांगा टाकत ती रानाकडे निघाली. वाटेत तिच्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. सात-आठ वर्षांपूर्वीचा तो दिवस तिला अजूनही टक्क आठवत होता; ज्या दिवशी गोविंदनं आपल्याच माणसांच्या रक्तानं कुऱ्हाडीचं पातं माखवलं होतं.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 

त्या दिवशी आक्रीत घडलं होतं. सकाळ उजाडताच जो-तो आपल्या कामाला लागला होता. तरणाबांड गोविंद झपाझप पावलं टाकत रानाकडे निघाला होता. त्याच्या कपाळावरची नस तडतड उडत होती. कानशिलं तापली होती, डोळ्यांतनं लालबुंद अंगार बाहेर पडत होता. श्वासाचा वेग वाढला. लोहाराचा भाता आत-बाहेर व्हावा तसा त्याचा छातीचा पिंजरा वरखाली होत होता, मुठी गच्च आवळल्या होत्या. तटतटून फुगलेल्या धमन्यातलं रक्त तापलेलं होतं. झेंडू फुटावा तसा रसरसून निघाला होता तो. काटंकुटं, दगडधोंडं तुडवून त्याचे पाय फुफुटय़ाने गच्च भरले होते. सदरा घामानं भिजला होता. केव्हा एकदा रानात जातो आणि आपली रक्ताची तहान भागवतो असं त्याला झालं होतं. वाटेत गोरखचं शेत लागलं, नेहमी दोन शब्द बोलून जाणारा गोविंद कसल्या तरी तंद्रीत पुढं जातोय, त्याच्या हातात कुऱ्हाड आहे आणि डोळ्यात लाव्हा आहे हे पाहून गोरखला कसंसंच वाटलं. त्यानं गोविंदला हाळी देऊन पाहिली पण ऐकून न ऐकल्यासारखं करत गोविंद वेगाने पुढे निघून आला. चिंचेचा माळ ओलांडून सावल्यांच्या बेटातून चालताना त्याच्या अंगावर शिरशिरी आली, रोंरावणारा वारा त्याच्या कानात शिरला त्यासरशी त्यानं अंगाला झटका दिला, मोठय़ाने घसा खाकरला. सावध होत पुन्हा आपल्या सावजाच्या दिशेने निघाला. पुढच्या वळणावर गंगाधरतात्यांनी त्याला आवाज दिला तर त्यानं नुसते हातवारे करून, जाऊन येतो अशी खूण केली. तात्यांनाही काहीतरी अजब वाटलं. गलांडय़ाच्या वस्तीजवळची कुत्री रोज गोविंदच्या पायापाशी घुटमळत, कारण घरून रानाकडे येताना तो कुत्र्यांसाठी भाकर आणायचाच. आतादेखील काही कुत्री आणि त्यांची पिलं त्याच्या वासानं वाटेच्या कडेला उभी राहिली. तो जवळ येताच लाडानं त्याच्या पायात शिरली. रोज त्यांना कुरवाळणाऱ्या गोविंदनं आधी हाडहूड केलं पण कुत्री गेली नाहीत. त्यांच्यामुळे पावलं अडखळू लागल्यावर मात्र तो वैतागला. गाभण असलेल्या पांढऱ्या कुत्रीच्या पेकाटात त्यानं जोरात लाथ घातली. त्यासरशी ती कुत्री उडून पडली. जोरानं विव्हळू लागली. तिच्या आवाजानं सगळीच कुत्री विव्हळू लागली. एकाएकी कुत्र्यांचा गलका वाढल्यानं कालिंदीवहिनी बाहेर आली आणि गोविंदनं कुत्र्यांना हिडीसफिडीस केल्याचं पाहून ती चकित झाली. ‘‘आवं भावजी, गोविंद भावजी!’’ अशा हाका मारेपर्यंत गोविंद तिच्या नजरेच्या टप्प्यातून पुढे गेला होता. मलभर अंतर चालून गेल्यावर साळुंख्यांच्या बांधावर पोहोचताच गोविंदला आपलं शेत दिसू लागलं. काळ्या मऊशार मातीत दोन ठिपके दिसत होते. दामूअण्णा आणि त्यांचा पोरगा नाथा! त्यानं डोळे विस्फारून बघितलं. ते दोघंच असल्याची खात्री करून घेतली. कुऱ्हाडीच्या दांडय़ावरची पकड घट्ट केली आणि डाव्या अंगाने जात त्यानं आधी वस्तीची मागची बाजू गाठली. तिथून नाथाला आवाज दिला. आवाजाने चकित झालेला नाथा मागच्या बाजूला आला. क्षणाचाही विलंब न लावता गोविंदने त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. रक्ताची कारंजी त्याच्या अंगावर उडाली. झटापटीच्या आवाजानं दामूअण्णा थोडा बावरला, भास झाला असावा समजून तो पुन्हा दंडात उतरला. हातातला टिकाव बाजूला सारून दारं धरू लागला. मध्येच त्यानं नाथाला हाळी दिली. पलीकडून काहीच आवाज आला नाही. सुंसुं आवाज करत वारं वाहत होतं. ओल्या मातीचा गंध वाऱ्यावर पसरला होता, नुकतीच जागी झालेली जुंधळ्याची ताटं कावरीबावरी होऊन बघत होती. झाडांवरच्या पाखरांनी चोची उघडल्या होत्या, ढोलीतल्या होल्यांनी आळस झटकला आणि एकामागोमाग एक उडत त्यांनी आकाशात झेप घेतली. उंच आभाळात फिरणाऱ्या घारींना आव्हान देत त्यांचे थवे भिरभिरू लागले. आभाळात गलका वाढला, पंखांची फडफड वाढली आणि सावधपणे पावलांचा आवाज न करता आलेल्या गोविंदने आपल्या दामूअण्णाच्या पाठीत सपासप कुऱ्हाडीचे घाव घातले. त्याच्या फासळ्यांचे तुकडे झाले तरी तो घाव घालत होता. लाकडाची ढलपी फोडून काढावी तशी त्यानं दामूअण्णांची खांडोळी केली. दामूअण्णांच्या किंकाळ्यांनी आसमंत थरारून गेला, पाखरांचा गोंगाट अनावर झाला, झाडं गहिवरून गेली. एकाएकी मेघ दाटून आले. सूर्य झाकोळला गेला. घारी खाली येऊन घिरटय़ा घालू लागल्या. वारं जागच्या जागी थांबलं. कुसळ्यांच्या शेतातलं पाणी लालभडक झालं, मातीला शहारे आले. भुईमुगाचे कोवळे हिरवेपिवळे कोंब लाल झाले. दोन मुंडकी हातात घेऊन रक्तमाखला गोविंद स्तब्ध उभा होता!

दामू कुसळे हे गोविंदचे चुलते. नाथा हा गोविंदचा चुलत भाऊ. गोविंदचे वडील रामनाथ आणि दामूअण्णा यांची सामायिक जमीन होती. त्या जमिनीचे बरेच वाद होते. त्यावरून त्यांची अनेक वेळा भांडणं होत. रामनाथांचा कल पडतं घेण्याकडे असल्यानं ते थोरले असूनदेखील दामूच्या तोंडाला कधी लागत नसत. दामू जसा बेरकी, कपटी, स्वार्थी होता तसाच त्याचा पोरगा नाथा हादेखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून होता. विमलकाकू, सुनीता, गोविंद, कस्तुरा कुणालाही टोमणे मारताना तो वयाचा विचार करत नसे. कुचेष्टा करून फिदीफिदी हसायचा. त्याला पाहताच गोविंदचे हात शिवशिवत पण वडिलांच्या स्वभावापायी तो गप्प राही.

एका पावसाळ्यात पक्षाघाताच्या जबर झटक्याने रामनाथांचा मृत्यू झाला. सोशिक, स्वाभिमानी आणि हळव्या स्वभावाच्या रामनाथांचं एकाएकी जाणं त्या कुटुंबाला चटका लावून गेलं. सासरा वारल्याच्या दिवसापासून सुनीताचा नवरा जयवंत हा आपल्या मेव्हण्याला धीर देण्यासाठी वारंवार येऊ लागला. सुनीताला हायसं वाटलं. त्याचं वागणं बघून विमलबाईला वाटलं की आपल्याला एक नसून दोन पोरं आहेत. मात्र नंतर काही महिन्यांतच गोविंदने आपल्या चुलत्याची, भावाची निर्घृण हत्या केल्याचा जबर धक्का त्यांना बसला. गोविंद इतक्या टोकाला कधीच जाऊ शकणार नाही याची त्यांना खात्री होती मग असं कसं काय घडलं या विचाराने त्यांना छळलं. गोविंदने तर यावर एक अवाक्षरदेखील काढलं नाही. रीतसर खटला उभा राहिला, अत्यंत थंड डोक्याने खून केल्याबद्दल गोविंदला वीस वर्षांची शिक्षा लागली. गोविंदने खून केल्यावर विमलबाईने भावकी सूड घेईल म्हणून कस्तुराला तिच्या लेकरांसह माहेरी पाठवून दिलेलं. अशा वेळी विमलबाईला धीर देण्यासाठी म्हणून सुनीता आणि जयवंत त्यांच्यापाशी येऊन राहिले. काही दिवसांसाठी म्हणून आलेल्या जयवंताने तिथं कायमचंच बस्तान मांडलं. अर्थात विमलबाईला त्याची मदतच झाली.

नवरा जेलमध्ये गेल्याने कस्तुराची अवस्था वाईट झाली. माहेरी भावजयांची बोलणी खात जगण्याची पाळी आली. इकडे विमलबाई घरातून बाहेर पडायची बंद झाली. गावानं गोविंदच्या नावानं छीथू केल्यानं ती पार कोलमडून पडली. शिवाय भावकीनं संबंध तोडले. ती एकाकी पडली. शेत काही महिने तसंच पडून राहिलं. नंतर जयवंतनंच तिथं नांगरटीची कामं सुरू केली. हळूहळू त्यानं रामनाथाच्या हिश्श्याची जेवढी जमीन होती ती कसायला सुरुवात केली. पुढं जाऊन दोन सालगडी ठेवले आणि तो फक्त त्यांच्यावर नजर ठेवू लागला. वीस एकराचं रान होतं. पाटपाणी मुबलक होतं. पिकं जोमानं आली, उसाचा फड दाटीवाटीनं गच्च फुलून आला, गव्हाच्या लोंब्यांनी बाळसं धरलं. वर्षांमागून वर्षे गेली आणि जयवंतच्या खिशात पसा खेळू लागला. त्या सुखातून त्याचं बाहेरख्याली होणं सुनीताला जाणवू लागलं. एका सांजंला तिने त्याचा पाठलाग केला, म्हसोबाओढय़ाच्या पलीकडं पारूबाईच्या घरात शिरलेल्या जयवंताचं बोलणं तिनं कान लावून ऐकताच तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. ती घाईने घरी निघून आली. सकाळ होताच तिने कानूबाबाला गाठलं. कस्तुराला ताबडतोब सासरी येण्याचा सांगावा त्यांच्यासोबत धाडला.

आपल्या लेकीने इतका मोठा निर्णय आपल्या परस्पर का घेतला याचं कोडं पडलेली विमल हातघाईने वस्तीवर आली. तिला पाहून सुनीताने तिच्या कुशीत धाव घेतली. ती हमसून हमसून रडू लागली. मनात कोणताही किंतु न ठेवता सगळी कहाणी तिने आईपाशी कथन केली. ती ऐकून विमलबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या. चारेक दिवसांत आपली पोरं घेऊन कस्तुरा सासरी परतली आणि ती येण्याच्या एक प्रहर आधी सुनीता आपल्या सासरी निघून गेली. कस्तुराला काही दिवस चुकल्याचुकल्यासारखं वाटलं पण नंतर ती रुळून गेली. रात्र झाली की विमलला आपला नवरा आणि पोरगा डोळ्यापुढे दिसू लागत. डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागत, त्याच वेळी संतापाने मुठीही आवळल्या जात. पण आपल्या मुलीच्या सौभाग्यापायी ती जयवंताला तळतळाट देऊ शकली नाही. झालं असं होतं की, रामनाथ मरण पावल्यानंतर जयवंतानेच गोविंदच्या डोक्यात राख घातली होती, सूडाग्नी भडकावला होता. त्याला खून करण्यासाठी भरीस पाडलं होतं आणि नंतर शहाजोगपणाचा आव आणत जमिनीवर डोळा ठेवून तो तिथं येऊन राहिला होता. त्याचा सगळा डाव कळल्यावर सुनीता उन्मळून पडली होती. त्यामुळेच तिने कस्तुराला तडकाफडकी परत बोलवलं होतं. आपण भिकेला लागलो तरी चालेल, पण ज्याचा-त्याचा शेर ज्याला-त्याला दिलाच पाहिजे या जाणिवेने ती वागली. हा तिढा सोडवताना तिच्या काळजातला बाभूळकाटा खोल रुतून होता. डोळ्यातलं पाणी लपवत ओठावर कृत्रिम हसू आणून ती सासरी निघून गेली, कायमची!

sameerbapu@gmail.com