‘समाजस्वास्थ्य’ हे निव्वळ लैंगिकतेसंबंधात सामाजिक व वैचारिक जागृती करणारे मासिक नव्हते, तर त्यात राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील घटना-घडामोडींवरही टीकाटिपण्णी करणारे लेख प्रसिद्ध होत. स्वत: र. धों. कर्वे त्यांच्या ‘शारदेची पत्रे’ या सदरात विविध विषयांवर आपली परखड मते मांडत.
त्यातून काहीच सुटका नसल्यामुळे मला ही अनिवार्य आपत्ती सहन करावी लागली असती. त्याचा परिणाम काय झाला असता हे सांगणे जवळजवळ अशक्य आहे. पण सध्याच्या स्थितीत मला काय वाटते, ते सांगतो. लोकांनी त्यांची कितीही पूजा केली, तरी कुटुंबातील माणसांशी त्यांचे वर्तन अत्यंत कठोर आणि अन्यायाचे असते, हे जगजाहीर आहे. कस्तुरबाईंना चोर ठरवून गांधीजींनी न्यायनिष्ठुरतेबद्दल कीर्ती मिळवली, पण वास्तविक त्यांना न्यायासनावर कोणीच बसवले नव्हते आणि स्वत:चा बडेजाव वाढवण्यापलीकडे याचा काहीच उपयोग नव्हता. आपला सत्यवादीपणा दाखवण्याकरता त्यांनी आत्मचरित्र लिहिले. पण सत्याविषयी त्यांच्या बदलत्या कल्पना पाहिल्या म्हणजे त्यांच्या सत्याला किती किंमत द्यावी, हा प्रश्नच आहे. जो मनुष्य एकदा ब्रिटिश लोकांना सैन्यात भरती करायला मदत करतो, तोच नंतर अहिंसेची घोषणा करू लागला, तर तिची किंमत काय? त्यांच्या एका मुलाने तर मुसलमान होऊन आपली सुटका करून घेतली; दुसरा मुलगा ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न करण्याकरता त्यांच्या परवानगीची वाट पाहत होता, पण ती मिळवण्याकरता अखेर त्याला बंड करण्याचा धाक दाखवावा लागला! कस्तुरबाईंच्या ठिकाणी एखादी आधुनिक स्त्री असती तर पळूनच गेली असती. त्यांच्या शिकवणीत वाढलेल्या मुलांची ही स्थिती होते, तर इतरांनी त्यांची शिकवण का ऐकावी?
त्यांचा मुख्य गुण म्हणजे आग्रह. ज्या विषयात त्यांना काहीएक कळत नाही, त्यात आपण प्रवीण आहोत असा त्यांचा आग्रह असतो. आरोग्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे, पण त्यांना स्वत:ला आरोग्य बिलकूल राखता येत नाही. कदाचित त्याचे हे एक कारण असू शकेल, की कामविषयक बाबतीत लोकांना एकसारखा उपदेश करणे ते आपले कर्तव्य समजत असल्यामुळे तो विषय नेहमी त्यांच्या मनात असतो आणि असे असून ते ब्रह्मचर्य पाळतात. ब्रह्मचर्य पाळायचेच असले तर निदान त्या विषयाचा विचार तरी करू नये, हा साधा नियम अजून त्यांना समजलेला नाही, किंवा निदान उमगलेला नाही. याबाबतीत त्यांची मते फारच विक्षिप्त आहेत. एकाने जे केले ते दुसऱ्याला करता आले पाहिजे, हे त्यांचे विधान हास्यास्पद आहेच; पण एकाला जे करता येत नाही, तेदेखील दुसऱ्याला करता आले पाहिजे, असे ते धरून चालतात! उदाहरणार्थ, त्यांना कोणी सांगितले, की ‘ब्रह्मचर्याने संततिनियमन करणे शक्य नाही.’ तर ते म्हणतात, ‘त्यात काय आहे? मी नाही का केले?’ आणि यावर जर कोणी म्हटले की, ‘तुम्ही लग्नानंतर २४ वर्षांनंतर ब्रह्मचर्य पाळायला लागलात, आणि लोकांना मात्र प्रथमपासूनच पाळायला सांगता-’; तर ते म्हणतात, ‘त्यावेळी मला ब्रह्मचर्याची महती कळली नव्हती, म्हणून पाळले नाही. पाळता आले नाही म्हणून नव्हे. आता माझ्या अनुभवाचा फायदा मी लोकांना फुकट देतो, तरी लोक घेत नाहीत.’
कोणत्याही विषयाचा अभ्यास करण्याची त्यांची पद्धती पाहिली की त्यांना कोणताही विषय कळत नाही याचे आश्चर्य वाटत नाही. त्यांची पद्धत म्हणजे अशी की, अमुक गोष्ट चांगली असे पारंपरिक समजुतीवरून ठरवायचे आणि मग त्या मताचा पुरस्कार करणारी जी पुस्तके असतील, तेवढीच वाचायची. दुसरी बाजू पाहायचीच नाही. त्यांच्या मताचा एखादा कानाकोपऱ्यातला डाक्तर सापडला, की त्याचे मत आधार म्हणून सांगायचे. बरे, कोणताही आधार सापडला नाही तरी त्याची त्यांना फिकीर नसते. त्यांच्या भात्यात अनेक बाण आहेत. त्यातून ते एखाद्या वेळी ‘आतला आवाज’ लोकांच्या अंगावर फेकतात; एखाद्या वेळी त्यांना प्रत्यक्ष ईश्वरदेखील भेटतो.
काँग्रेसचे राज्य आल्यापासून तर काय त्यांना ऊतच आला आहे. आता ते लोकांना मारूनमुटकून चांगले- म्हणजे स्वत:सारखे- बनवणार. दारूबंदीने काही फायदा होतो, असे डाक्तरी मत नाही; आणि तोटे अमेरिकेत भरपूर सिद्ध झालेले आहेत. पण अमेरिकेत गांधी कोठे आहेत? हिंदुस्थानात ते असल्यामुळे दारूबंदी यशस्वी होणार, हा त्यांना भ्रम आहे. मी म्हणतो असो. सर्वानी खादी वापरली पाहिजे किंवा ब्रह्मचर्य पाळले पाहिजे, असा तर कायदा करण्याचे अजून घाटत नाही? अशा हिटलरांच्या हातात सत्ता आली म्हणजे एखाद्या वेळी तेही व्हायचे! असा कायदा अमलात आणता येणार नाही, असे कोणी म्हणेल; पण दारूबंदीचाही येत नाही असे अमेरिकेत दिसले. पण दुसऱ्याच्या अनुभवाने शिकले तर ते गांधी कसे?
मी हे सगळे आता लिहितो आहे; पण कदाचित मीही त्यांच्यासारखाच झालो असतो. काय नेम सांगावा? एकंदरीत नाही झालो, तेच बरे.
( चित्रा, दिवाळी १९३७ )
‘असंग्रहित र.धों.’मधून साभार
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2013 रोजी प्रकाशित
मी गांधींचा मुलगा असतो तर…
‘समाजस्वास्थ्य’ हे निव्वळ लैंगिकतेसंबंधात सामाजिक व वैचारिक जागृती करणारे मासिक नव्हते, तर त्यात राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक तसेच कला क्षेत्रातील घटना-घडामोडींवरही टीकाटिपण्णी करणारे लेख प्रसिद्ध होत.

First published on: 14-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R d karves shardechi patre