अलकनंदा पाध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘राणू ए राणू.. अरे, किती हाका मारायच्या तुला?’’ राणूच्या आईने अंगणात बसलेल्या राणूच्या खांद्याला गदागदा हलवत त्याला तंद्रीतून जागे केले. त्याबरोबर राणू दचकून पटकन् उभा राहिला आणि त्याच्या मांडीवरचा रेनकोट अंगणातल्या मातीत पडला. राणूने तो पटकन् उचलून आपल्या सदऱ्याने त्यावरची माती पुसली आणि घडी घालून प्रेमाने तो छातीजवळ धरला.

‘‘अरे, वेडा झालास की काय तू त्या रेनकोटपायी?’’ आईने हसू आवरत विचारलं. त्यावर ‘असू दे’ म्हणत राणूने मान झटकली आणि ‘‘आई, पण सांग ना- आता पाऊस कधी येणार?’’ राणूने हा प्रश्न कालपासून किमान पाच-सात वेळा तरी विचारला होता.

‘‘पुढच्या हप्त्यात.. पण आजकाल पावसाचा काही नेम नाही बाबा. कदाचित महिन्याने पण उगवेल.’’ आई मस्करीत म्हणाली.

 ‘‘असं नको ना बोलूस तू.’’ आईचं बोलणं ऐकून राणू निराश झाला.

‘‘मला पाऊस यायला पाहिजे. आज.. आत्ता आला तरी चालेल. मला हा रेनकोट घालायचाय.’’ जमिनीवर पाय आपटत राणूने आईकडे आपला हट्ट सांगितला.

‘‘बरं बरं.. होईल हं तुझ्या मनासारखं.’’ कौतुकाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली, ‘‘मी आता माईंआजींकडे कामाला निघालेय. आज त्यांच्याकडे पाहुणे येणारेत.. मला तिथं थोडा उशीर होईल. तुझ्यासाठी कपात चहा गाळून ठेवलाय. तो गार व्हायच्या आत पिऊन घे. आणि संध्याकाळी आम्हाला दोघांना उशीर झाला तर दिवाबत्तीचे काम करून घे..’’ अशा अनेक सूचना देत राणाची आई फाटक उघडून पलीकडे माईंच्या घराकडे निघाली.

राणूची आई माईंच्या घरी स्वयंपाक आणि इतर कामांत मदत करायला जायची आणि त्याचे बाबा त्यांच्या बागेत माळीकाम आणि शिवाय वरकामं करायचे. गेल्या आठवडय़ात माईंचा शहरातला नातू सोहम त्याचा नवीन रेनकोट विसरून गेला होता. आता वर्षभर तरी तो माईंकडे गावी येणार नव्हता, म्हणून त्यांनी तो रेनकोट राणूसाठी पाठवून दिला होता. रेनकोट बघून राणूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आकाशासारख्या निळ्या रंगाच्या त्या रेनकोटवर टीव्हीवर दिसतात तशी कसली कसली रंगीबेरंगी कार्टून्स होती. सोहमबरोबर माईआजींच्या घरातल्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात त्याने ‘कार्टून’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. सोहमनेच त्याला नंतर त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. रेनकोटवर इंग्रजी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं. यावर्षीपासून राणूला शाळेत इंग्रजी शिकवणार असं त्याने ऐकलं होतं. पण आत्ता मात्र त्याला रेनकोटवरच्या चित्रांशिवाय काहीच समजत नव्हतं. गेल्या वर्षीच शाळेत जायला लागल्यापासून त्याने रेनकोटची आईबाबांकडे मागणी केली होती, पण बऱ्याचदा बाबाच त्याला स्वत:च्या छत्रीतून सायकलवरून शाळेत घेऊन जायचे. म्हणून अजून रेनकोट खरेदीची गरजच पडली नव्हती. पण काल मात्र प्रथमच सोहमचा नवाकोरा रेनकोट मिळाल्याने त्याला जणू लॉटरी लागली होती. काल रात्री झोपताना त्याने रेनकोटची घडी आपल्या जवळ घेतली. त्याच्या प्लास्टिकचा नवाकोरा वास दहा वेळा हुंगून पाहिला. पहिल्यांदाच नव्या रेनकोटचा वास नाकात भरून घेतल्यावर त्याला खूप मस्त वाटलं. त्यानंतर कितीतरी वेळ त्यावरच्या चित्रांवरून हात फिरवत एक-एक चित्र तो डोळ्यांत साठवत राहिला. त्याच विचारात कधीतरी तो झोपी गेला. बाहेर विजा कडकडत आहेत, मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच्या घराभोवती सगळीकडे पाणीच पाणी झालंय.. पण राणू मात्र त्याचा नवाकोरा रेनकोट घातल्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीतली आपली वह्य-पुस्तके घेऊन कोरडा ठणठणीत असा शाळेत पोहोचलाय.. अशा स्वप्नाने रात्रभर त्याचा पाठलाग केला.

म्हणूनच सकाळपासून तो रेनकोट हाती घेऊन पावसासाठी आकाशातल्या काळ्या ढगांची वाट बघत होता. आई गेल्यावर त्याने रेनकोट अंगात घालून पाहिला. पण त्यांच्याकडे माईआजींसारखा मोठा आरसा नव्हता. त्यामुळे रेनकोट घातलेला राणू त्याला पूर्ण बघता आला नाही. लवकरात लवकर पावसात भिजून त्याला नव्या रेनकोटचं उद्घाटन करायचं होतं.

त्याला एक कल्पना सुचली. घाईघाईने चहा पिऊन तो माईंच्या बागेशी पोहोचला. त्याचे बाबा यावेळी बागेला पाणी घालायचे. पावसाच्या नाही, पण पाईपातल्या पाण्याने तरी रेनकोटसकट भिजता येईल अशी त्याची कल्पना. पण बाबांना आज माईआजींच्या पाहुण्यांना आणायला जायचं असल्याने बाबांचं ते काम लवकर आटपलं होतं. तरीही निराश न होता तिथल्या आंबा-पिंपळाच्या पागोळ्यांत भिजण्यासाठी तो गेला. पण बाबांनी आज त्यांना फारसं पाणीच दिलं नव्हतं म्हणून झाडावरून पाण्याचे थेंब टपकलेच नाहीत. अखेर घरच्या मोरीतल्या बादलीतलं पाणी शिंपडून रेनकोट भिजवायची कल्पना त्याला स्वस्थ बसू देईना. तितक्यात दार उघडून आई-बाबा आले म्हणून तोही बेत फसला.

‘‘अरेच्चा! आज रेनकोट घालूनच पोट भरलंय की काय आमच्या राणूचं?’’ म्हणत आईने जेवणासाठी पानं वाढली. आजही रेनकोटची घडी आपल्याजवळ ठेवूनच झोपलेल्या राणूकडे बघताना आईला हसू आलं. मध्यरात्री केव्हातरी- ‘‘राणू, ए राणाबाळा.. अरे, उठ.. उठ.. बाहेर बघ.. सकाळी पाऊस कधी येणार विचारत होतास ना? बघ, तुला रेनकोट घालायला मिळावा ना, म्हणून पाऊस आलाय बघ तुझ्यासाठी.’’

आईच्या हाकेपाठोपाठ घराच्या पत्र्यावरच्या पावसाचा आवाज ऐकताक्षणी झटक्यात उठून राणूने रेनकोट अंगात अडकवला आणि अंगणात धूम ठोकली. नवा रेनकोट घालून ‘येरे येरे पावसा’ म्हणत आनंदाने नाचणाऱ्या आपल्या लेकाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याच्या आई-बाबांनीही अंगणाकडे धाव घेतली.

alaknanda263@yahoo.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raincoat yard soil with love the rain ysh
First published on: 17-07-2022 at 00:02 IST