पुणे : घराच्या दरवाज्यावर लाथ मारल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला. मंगळवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकास अटक केली. नवाज नासिर खान (वय २७, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रफिया खान, नासिर खान, सलमान उर्फ टिपू शेख (सर्व रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजू माधवराव चिद्रावार (वय २५, रा. यार खान कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाज खान याने राजू चिद्रावार यांच्या घराच्या दारावर लाथ मारली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी राजू, त्यांची पत्नी मीरा आणि त्यांचा मानलेला भाऊ गणेश कांबळे नवाज खानच्या घरी गेले होते. त्यावेळी नवाज खान त्याची आई रफिया खान, नासिर खान यांनी शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली. मीरा गर्भवती असल्याचे आरोपींना माहीत होते. तिच्या पोटावर लाथ मारण्यात आली. त्यानंतर नवाजने राजू यांच्या दुचाकीवर दगड मारला. आरोपी सलमानने पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा…पिंपरी : महापालिकेचा इशारा; ‘या’ तारखेनंतर रस्ते खोदाई केल्यास फौजदारी कारवाई

मीराच्या पोटावर लाथ मारल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख तपास करत आहेत.

Story img Loader