रत्नाकर मतकरी हे सर्जनशील कलावंत आहेत आणि असामान्य रसिकसुद्धा! एखादी श्रेष्ठ कलाकृती पाहताना स्वत:तला कलावंत आणि रसिक या दोघांना ते सजग ठेवतात आणि या दोन्ही पातळ्यांवर ते कलाकृतीचा आस्वाद घेतात. ‘रसगंध’ या आपल्या पुस्तकात त्यांनी काही श्रेष्ठ कलाकृतींचा आस्वाद या दोन्ही पातळ्यांवर घेतलेला आहे. एखादी कलाकृती कलावंताच्या दृष्टीने कशी आहे आणि रसिकांच्या दृष्टीने कशी आहे याची सुरेख सरमिसळ वाचकाला वेगळाच आनंद देते. आणि हा आनंद हेच या पुस्तकाचे यश आहे.
मतकरींना ज्या कलाकृती सर्वच बाजूंनी महत्त्वाच्या वाटल्या त्या कलाकृतींची आस्वादक समीक्षा म्हणजे ‘रसगंध’! या पुस्तकाची चार भागांत विभागणी केलेली आहे- ‘नाटक’, ‘चित्रपट’, ‘साहित्य’ आणि ‘चित्रकला’. या चारही कलांमध्ये मतकरी यांचे योगदान तर आहेच, पण या चारही कलांमधील श्रेष्ठ कलाकृतींकडे रसिकाने अधिक डोळसपणे पाहावे अशी त्यांची तळमळ आहे.
‘नाटक’ या विभागामध्ये मराठी, भारतीय आणि जागतिक श्रेष्ठ नाटय़कृतींचा आस्वाद घेतलेला आहे. या विभागातील दहा लेखांमधून मराठी नाटक कुठे कमी आहे आणि कुठे सरस आहे याची वेळोवेळी नोंद केली आहे. ‘राहिले दूर घर माझे’ या मराठी नाटकाबद्दल मतकरी भरभरून लिहितात. त्यातील जागा नेमकेपणे दाखवून देतात. ते नाटक का महत्त्वाचे आहे हे आवर्जून सांगतात. लगेच दुसऱ्या लेखात ‘जी शबनम बिबी’ या हिंदी नाटकाच्या मर्यादा स्पष्ट करून सांगतात. कलाकृतीतील उणिवाही मतकरी स्पष्टपणे दाखवून देतात.
राष्ट्रीय नाटय़महोत्सवातील अनुभव व मुंबई मराठी साहित्य संघातील नाटय़ानुभव मतकरींनी अतिशय तन्मयतेने मांडले आहेत. या विभागात ‘मी पाहिलेल्या ‘सुंदरा’’ हा लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. मतकरींनी रंगमंचावर आतापर्यंत ज्या वैशिष्टय़पूर्ण ‘सुंदरा’ पाहिलेल्या आहेत त्यांच्याविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी लिहिले आहे.
जर्मन दिग्दर्शक नॉबर्ट मायर यांच्या अभिनयाच्या कार्यशाळेवरील ‘मायरगुरुजींचा वर्ग’ हा लेख भारावून टाकणारा आहे. हा लेख वाचताना आपण प्रत्यक्ष मायरगुरुजींच्या कार्यशाळेत आहोत असा अनुभव येतो. आजच्या धडपडणाऱ्या तरुण कलाकारांना मायरगुरुजींच्या वर्गात जाता येणार नाही, पण हा लेख वाचल्यावर प्रत्यक्ष त्या वर्गाचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळतो, हे नक्की!
प्रत्येक नाटक गांभीर्याने पाहावे अशी मतकरींची भूमिका आहे. म्हणून नाटकाच्या बाबतीत ‘राष्ट्रीय नाटय़शाळेचा महोत्सव आणि मराठी नाटक’ या लेखात ते लिहितात-
‘‘नाटक म्हणजे फॅशन नव्हे. ती एक मनाला भिडण्याची गोष्ट आहे. नाटक म्हणजे वातानुकूलित थिएटरात शाली पांघरून किंवा सूट घालून प्रत्येक प्रवेशानंतर टाळय़ा वाजवण्याची गोष्ट नसून तो झापांच्या थिएटरमध्येही आणि ऐन उकाडय़ातसुद्धा आपण कुठे आहोत हे विसरायला लावणारा एक रंगतदार अनुभव आहे!’’
याच भूमिकेतून मतकरी चित्रपटांकडेही पाहतात. ‘चित्रपट’ विभागातही एकूण दहा लेख आहेत. यामध्ये जर्मन, इराणी, हंगेरियन, अमेरिकन आणि फ्रेंचमधील श्रेष्ठ चित्रकृतींबरोबरच काही मराठी व हिंदी चित्रकृतींचा आस्वादक आढावा घेतला आहे. ‘रन, लोला रन’ या जर्मन चित्रपटाला एक गती आहे. हा चित्रपट प्रचंड धावत असतो. या चित्रपटाची समीक्षाही मतकरींनी अशी धावती, गतिमान लिहिली आहे की वाचणारा थक्क होतो. जणू चित्रपट आपल्या डोळ्यांपुढे धावू लागतो आणि चित्रपट न पाहताही पाहिल्याचा अनुभव येतो.
परीकथांवर आधारलेल्या चित्रपटांचा जागतिक धांडोळा ‘पंख छाटलेल्या परीकथा’ या लेखात मतकरीघेतात. जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ परीकथा कशा मांडल्या गेल्या, याबरोबरच आपल्याकडच्या हिंदीतल्या परीकथा कशा फसल्या याबद्दल अतिशय बारकाव्यासहित या लेखात मांडले आहे. हिंदीतले यशस्वी दिग्दर्शक शांतारामबापू व राज कपूर हे परीकथा मांडणीमध्ये कसे फसले हे सोदाहरण स्पष्ट केले आहे. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या परीकथेची सांगोपांग चिकित्सा मतकरीकरतात. ते वाचून वाचकांना चित्रपट बघूनसुद्धा तो आणखी एकदा -म्हणजे तो कसा फसला हे बघावेसे वाटते. पाहिलेले चित्रपट पुन्हा पाहावेसे वाटणे हे या विभागातल्या लेखांचे यश आहे.
‘काळाच्या भूमीत गाडलेला चित्रखजिना’ हा लेख म्हणजे मतकरींच्या मराठी चित्रपटांबाबतच्या तळमळीची साक्ष आहे. मराठी चित्रपटामध्येही ‘मास्टरपीस’ चित्रपट आहेत. पण ते काळाच्या भूमीत गाडले गेले आहेत. त्यांना गतवैभव मिळावे अशी मतकरींची इच्छा आहे. ते नुसती इच्छाच व्यक्त करीत नाहीत, तर त्यासाठी एक कृतीकार्यक्रमच ठरवून देतात. चित्रपटांची यादी देतात  आणि हे काम कोणी करावे, हेही सुचवतात! आणि हे सर्व ते आत्मीयतेने करतात.
‘चित्रपट’ विभागामध्ये ‘फुलझाड आणि हात’ नावाचा एक लेख आहे. हा एक लघुपट आहे. पण त्याचे नाव मतकरींना आठवत नाही. त्याची ते समीक्षाही करत नाहीत. फक्त सरळसरळ कथाकथन करतात. तसेच ‘पुलं महोत्सव.. ’ हाही फक्त माहितीवजा लेख (यादी?) आहे. हे दोन्ही लेख नसते तरी चालले असते.
‘साहित्य’ विभागामध्ये सात लेख आहेत. यात गंगाधर गाडगीळ, चिं. वि. जोशी यांच्या साहित्यावर, तर ‘माय अंकल ओस्वाल्ड’, ‘मनाच्या कोपऱ्यात तिच्यासाठी’, ‘नर्मदे हर हर’, ‘सोनबा’ या पुस्तकांवर प्रकाश टाकला आहे. ‘माय अंकल ओस्वाल्ड’ ही रोआल्ड डाल या इंग्रज लेखकाची जगप्रसिद्ध कादंबरी अश्लील नाही, परंतु अश्लीलतेकडे झुकणारी आहे. या कादंबरीची संयत अशी समीक्षा मतकरींनी केली आहे. संपूर्ण कथा तर ते सांगतात, पण कुठेही तोल ढळत नाही. ‘सोनबा’ या दुर्लक्षित लघुकादंबरीविषयीदेखील मतकरींनी मनापासून लिहिले आहे.
‘चित्रकला’ विभागात सहा लेख आहेत. गोपाळराव देऊसकर, रायबा, माधव सातवळेकर, सुधीर पटवर्धन व एम. एफ. हुसेन या चित्रकारांबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल आणि रसिकांच्या चित्रज्ञानाबद्दलही मतकरींनी भरभरून लिहिले आहे. आपल्या चित्रकलेच्या ज्ञानात यामुळे निश्चितच भर पडते.
या सर्व लेखनामध्ये मतकरींची तळमळ आहे. एक सांस्कृतिक जाणीव आहे. या कला लोकांपर्यंत पोहोचाव्यात, त्या जिवंत राहाव्यात अशी तळमळ आहे, आणि या अभिजात कला जोपासल्या जाव्यात अशी धडपडही आहे. एका हरहुन्नरी कलावंताने लिहिलेली ही आस्वादक समीक्षा वाचकांसाठी एक प्रकारे खजिनाच आहे. ही खऱ्या अर्थाने जनसमीक्षा आहे. वाचकाला न पाहिलेल्या कलाकृती आणि पाहिलेल्या कलाकृतीही पुन्हा पाहाव्याशा वाटणे, हे या समीक्षेचे वेगळेपण आहे.
‘रसगंध’ – रत्नाकर मतकरी, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २०८, मूल्य – ३०० रुपये.