फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश..
कविता लिहिली, त्या क्षणी तिचा प्रवास इतका दूरवर होणार आहे आणि असंख्य काव्यरसिकांच्या हृदयापर्यंत ती इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि इतकी खोलवर पोचणार आहे याची कणभरही कल्पना स्वत: कवीला आली नव्हती. अर्थात पुढे हे सगळं झालं याचं श्रेय त्याचं एकटय़ाचं नाही. संगीतकार श्रीधर फडके, गायक कलाकार सुधीर फडके आणि आशा भोसले, तसंच आकाशवाणी-दूरदर्शन ही प्रभावी माध्यमं आणि नंतर ते गाणं दूरवर पोचवणारे अनेक मराठी वाद्यवृंदसमूह या सर्वाचा या यशातील सहभाग फार मोलाचा आहे. अर्थात, कवितेचं गाणं झाल्यानंतरचा तो पुढचा प्रवास आहे.. पण मुळात कवीच्या नजरेतून ती त्याची केवळ व्यक्तिगत कविताच होती आणि आजही आहे. त्यामुळे एक कविता म्हणून तिचा समावेश जेव्हा शालेय पाठय़पुस्तकात झाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला आणि आनंदाबरोबरच त्या कवितेतील एक अंत:प्रवाह स्वत: कवीला नव्याने जाणवू लागला. तो म्हणजे त्या कवितेत व्यापून राहिलेल्या प्रकाशतत्त्वाला आतून लगडलेलं कवीच्या अंतर्मनातलं, मौल्यवान लोभस काळोखाचं सुप्त भान..  शालेय विद्यार्थ्यांशी या कवितेसंदर्भात केलेल्या सहज गप्पांतून ही गोष्ट कवीला स्वत:ला प्रथम जाणवली आणि नंतर पुढेही विशेषत: कुमार वयातील मुलामुलींशी बोलताना ती जाणीव तो कटाक्षाने अधोरेखित करीत राहिला.
कवितेत व्यक्त होणारी विधानं ही बहुतेक वेळी निर्विवाद सत्य नसतात. ती सापेक्ष असतात, कवितेचं मूळ सांगणं, स्पष्ट करणं हा त्यांचा हेतू असतो. ‘फिटे अंधाराचे जाळे’ ही पहिलीच ओळ त्याची निदर्शक आहे. उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई अधिक उत्कट करण्यासाठी ‘अंधाराचे जाळे’ ही प्रतिमा आली आहे. अन्यथा काळोख ही मुळीच असुंदर व अशुभ गोष्ट नाही ते विश्वरहस्यातलं एक अटळ स्वयंभू सत्य आहे. किंबहुना ते प्रकाशाचं जन्मस्थान मानायला हवं. खरं तर मूळ कवितेतल्या एका ओळीत ही जाणीव आपसूक व्यक्त झालेली दिसते. ‘झाला आजचा प्रकाश. जुना कालचा काळोख.’ हे भान जागं झाल्यावर मग जाणवलं की, आपल्या समग्र काव्य-प्रवासात हे अनोखं काळोखभान आपल्याला अखंड  सोबत करीत आलं आहे.
      शब्दांच्या काळोखात
      शब्दांना तीव्र सुगंध
      शब्दांच्या काळोखात
      शब्दांचे कूजन मंद
ही ‘शब्दधून’मधली अभिव्यक्ती ही या जाणिवेचीच वानगी..  मुलतानी ते भैरवी हा प्रवास कवितांतून उलगडत नेणारी राग-चित्रे हे तर एक अखंड काळोख-सूक्तच आहे. कारण ‘पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काजळात भिनत जाते,’ या मारव्यातून ते तिमिर सूक्त सुरू होतं, ते शेवटी ‘पहाटेचा गहिरा प्रहर सारं धूसर धूसर’ म्हणत येणाऱ्या आदिराग भैरवासोबत, प्रकाशात रूपांतरित होणाऱ्या काळोखासारखं आसमंतात विरून जातं.      
मध्यंतरी आकाशवाणी नाशिक केंद्रावर एक प्रदीर्घमुलाखत ध्वनिमुद्रित झाली. मुलाखत घेतली होती – कविमित्र किशोर पाठक आणि एक तरुण कवी या दोघांनी. बोलण्याच्या ओघात किशोरनं ‘सांज ये गोकुळी’ या कवितेला आणि विशेषत: त्यातील ‘माउली सांज.. अंधार पान्हा’ या ओळीला दिलखुलास दाद दिली. ‘चांदणे-पान्हा हे सुचू शकतं पण, अंधार पान्हा? क्या बात है’.. जिची अपूर्वाई वाटत राहावी, अशी ही दाद आणि तीही एका सहप्रवासी कवीकडून.. संतोष.. परम संतोष.. एक खरं की, अशी दाद हा स्वत: कवीला नवा शोध नसतो, पण नवी जाग नक्की असते. आपण जाता-येता प्रकाशाचे तराणे गातो, पण हृदयंगम काळोखाचे गाणे आपल्या काळजात का फुलत नाही? अशी एक दुखरी हुरहूर आत खोलवर ठुसठुसत असायची, ती एकदम निमाली. जाणवलं की, ‘सांज ये गोकुळी’ हे तर थेट काळोखाचंच तरल सुंदर गाणं आहे.
‘सावळ्याची साऊली भासणारी
    सावळी सावळी सांज
    ‘श्याम’रंगात बुडालेल्या वाटा
   काजळाची दाट रेघ तशी दूरची पर्वतराजी
   डोहातले सावळे चांदणे.
  दाही दिशांतून जमू लागलेल्या सावळ्या चाहुली .. आणि मग तो,
  सांज-माउलीचा अनावर अंधार-पान्हा
पण या कवितेपेक्षाही अधिक प्रत्ययकारी काळोख अधिक ठळकपणे एका कवितेत रेखाटला गेलाय.  
        गाई घराकडे वळल्या
        आकाश दूर दूर चालले
        सखी, सांजावले ..
त्यातला दुसरा अंतरा स्वत: कवीला विशेष भावतो.
   नागिणीने टाकावी कात.. तसे गळून गेले रंग
   नग्न काळा देह, तसे काळोखाचे अंग
   वासनेच्या लाल ज्योतींसारखे पहाडात वणवे लागले
    सखी, सांजावले
अशीच एक ‘लय’ या कवितासंग्रहातली कविता आठवतेय.
       घननीळ रान घननीळ रातिला भिडले
       सावळे डोह सावळ्या सांवल्या ल्याले
       चांदण्यात गोऱ्या भिने निळा अंधार
       दुरात दरवळे .सृजनाचा हुंकार  
 ‘आकाश केशरी होते तिन्हीसांजेच्या तीराला’ ही सांध्यवेळा आणि रात्रीचं तिच्यात विरघळणं हे अवस्थांतर कवीचं फार लाडकं.. त्याचंही एक शब्दचित्र आहेच.
   पाण्यात बुडाले बिंब.काळोख दाटुनी आला
   कशिद्याचा चमचमणारा जणू गर्भरेशमी शेला   
   रंगांचे पक्षी निजले. झोपल्या दिशाही दाही
   तो नव्हता आला तरीही, चंद्रोदय नव्हता झाला.   
चित्रपटगीत-लेखनातही काळोखाची ही गहिरी संगत सुटली नाही. रणजित देसाई यांच्या ‘बारी’ या कादंबरीवर आधारित ‘नागीण’ या चित्रपटाकरिता एक दोनच कडव्यांचं गीत लिहिलं होतं.  
भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली..
रानच्या पाखरांची रानांत भेट झाली..  
संगीतकार भास्कर चंदावरकर त्याला चाल लावणार होते. पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही.  पुढे स्वत:च संगीत दिलेल्या ‘कशासाठी-प्रेमासाठी’ या चित्रपटात ते गाणं स्वरबद्ध करताना मी त्यामध्ये तिसरा अंतरा वाढवला. घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली.  
  पानांची गच्च जाळी. काळोख दाट झाला
  काळोख गंधाळला . काळोख तेजाळला
  झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी..  
पण हे काळोख-भान नेहमीचं रमणीय, सुखद नसतं. कधी कधी ते कडवट, जहरीही होऊन जातं.
 प्रकाशाची वांझ तहान निमूट सोसणाऱ्या आंधळ्या मनाला दिसतं, जाणवतं एकच.. अनादि भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत; सुस्त अजगरासारखा अद्वातद्वा पसरलेला हा विराट काळोखच खरा.. त्रिखंडातलं हलाहल गोठून बनलंय त्याचं मन.. आणि प्रलयातील उत्पाती ज्वालामुखींची झालीय त्याची मुर्दाड त्वचा.. एवंच, तो सर्वशक्तिमान .. तो अनादी. तो अनंत.                     
 तर अशी ही अनोखी काजळ-माया आपल्या अंतर्यामी कुठून आणि कशी रु जत गेली असेल? .. हा विचार मनात आला, की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात- शालेय पाठय़पुस्तकात भेटलेल्या कवी गोविंदाग्रज तथा राम गणेश गडकरींच्या प्रत्ययकारी काव्यपंक्ती.. काळ्या रंगाच्या, ब्रशच्या जाड फटकाऱ्यातून किंवा चारकोलच्या घनदाट रेषांतून साकार झालेल्या चित्रासारखे ते शब्द माझ्या स्मरणावर कोरले गेले आहेत.                        
   काळा दरिया काळोखाचा वरती भरु नी राही
  काळ्या राईमध्ये खालती काळी कृष्णामाई  
  काळोखाचे रान माजले चंदाराणी नाही
  तिच्याचसंगे पळे तिचा तो चंदेरी दरियाही    
  काळे बुंधे खाली नुसते वरती पान दिसेना
  ठाण मांडुनी जणू ठाकली वेताळाची सेना
  त्यातून चिमणे झरे चालता झुळझुळ हळु करतात
  भुताटकीतुन जाता भिऊनी रामनाम म्हणतात
असेच दुसरे कवी, आरती प्रभू.. त्यांच्या बागलांची राईतील मठाच्या गाभाऱ्यातला तो साक्षात्कारी अंधार आणि त्याचं स्वत: कवीनं केलेलं वर्णन-
..आईनं डोळ्यात काजळ घालावं तसा तो अंधार..
आयुष्याची पहिली दोन दशकं ग्रामीण भागात गेली.. त्यामुळे काळोखाची गळामिठी म्हणजे काय, ते अनुभवतच आयुष्य कापरासारखं उडालं.. मात्र, तो अनुभव त्रयस्थ होऊन पाहता-सांगताही येऊ नये, इतका एव्हाना अस्तित्वात मुरून गेला आहे.
पण हे काळोखाचे इतके तरंग मनावर उमटत असतानाच खोल आत जाणवतं की, या सर्वाहून निराळा असा एक काळोखाचा तुकडा आपल्या फार जिव्हाळ्याचा आहे. कारण तो खास आपला एकटय़ाचा आहे.. जणू आपल्या खाजगी मालकीचा आहे. त्याची तुलना करायची झालीच, तर कदाचित; आईच्या गर्भातील उबदार, आश्वासक आणि संवर्धक काळोखाशीच करता येईल.  तो आपल्याला कधी, कुठे भेटला..?
 शोध घ्यायला हवा..  नक्कीच घ्यायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व कविता - सखी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relation of darkness
First published on: 03-02-2013 at 12:03 IST