आपल्या इथे ७०-७५ वर्षांपूर्वी स्त्री-पुरुष संबंधावर इतके मोठे काम रघुनाथराव कर्वे यांनी केलेले आहे हे ‘लोकरंग’ (१४ जुलै) मधील लेखांवरून कळले. अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर आल्बर्ट एलिस यांनी १९३०-५० च्या दशकामध्ये स्त्री-पुरुष संबंधांवर काम केले त्याचप्रमाणे भारतात समकालीन काळामध्ये र. धों. कर्वे यांनी काम केले आहे. त्या काळामध्ये आपल्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजच्याएवढा पुढारलेला नव्हता. स्त्री-पुरुष असमानता, बालविवाह, सती इत्यादी अनिष्ट प्रथा आणि समाजावर अंधश्रद्धेचा पगडा जबरदस्त होता. वैयक्तिक स्वास्थ्याची एकूण बेरीज म्हणजे समाजाचे स्वास्थ्य होऊ शकते. त्यामुळे व्यक्ती जर वैयक्तिक पातळीवर शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा निरामय असल्यास समाज आपोआपच सबळ होतो. म्हणजेच समाजाचे स्वास्थ्य हे व्यक्तींवर अवलंबून असल्याने समाजस्वास्थ्य या विषयावरच्या मासिकाची गरज ही कालातीत आहे.
– देवेंद्र जैन

गांधी ब्रिटिश व कॉंग्रेसच्या सोयीचे!
१४ जुलैच्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘असंग्रहित र. धों.’मधून साभार घेतलेला लेख ‘मी गांधींचा मुलगा असतो तर..’ व त्याचा शेवट.. ‘‘एकंदरीत (मी गांधींचा मुलगा) नाही झालो तेच बरे.’’ हे लिखाण महात्मा गांधींविषयी, त्यांच्या हट्टी स्वभावाविषयी बरेच काही सांगून जाते. र. धों. कर्वे हे स्त्री-पुरुष संबंध, कामजीवन इ. संदर्भात शास्त्रशुद्ध संशोधन व लिखाण करणारे सामाजिक कार्यकर्ते असल्याने व ते गांधींच्या समकालीन असल्याने त्यांचा दृष्टिकोन व निष्कर्ष वास्तवाला धरून असणार यात शंका नाही. महात्मा गांधी तेव्हा बहुतेक ‘महात्मा’ झालेले नसावेत. परंतु ते काँग्रेसचे वरिष्ठ फळीतील नेते होते. त्यांचा सोयीस्कर उपवास, आतला आवाज, मौनव्रत हे नक्कीच शंका निर्माण करणारे आहे.        द. आफ्रिकेत वर्णभेदविरोधात सार्वजनिक कार्य करणारे मवाळ नेते म्हणून ब्रिटिशांनी त्यांना उचलून धरले आणि भारतातील काँग्रेस पक्षाचे ते सर्वेसर्वा बनले. कारण ते ब्रिटिशांच्या सोयीचे होते. तेव्हाच्या काँग्रेस कार्यकारिणीत सुभाषचंद्र बोस निवडून आलेले असतानाही ‘सत्याचे प्रयोग’ करणाऱ्या म. गांधींनी त्यांची सतत उपेक्षा व अवहेलना केली. परिणामी कंटाळून बोस यांनी वेगळा मार्ग पत्करला. गांधींच्या ‘बेटा जवाहर’ऐवजी सुभाषचंद्र देशाचे सर्वेसर्वा बनते तर काही वेगळेच चित्र आज दिसले असते. गांधींनी अनुसरलेले भगवान बुद्धांचे अहिंसेचे व्रत हे मुळात बुद्धकालीन हिंसायुक्त विकृत यज्ञपरंपरेच्या विरोधात पुकारलेले निषेधतंत्र होते. म. गांधींना सर्व देश आश्रम बनवायचा होता व त्यासाठी व्यक्तिगत आचारांतली आध्यात्मिक मूल्ये त्यांनी सार्वजनिक करण्याचा आग्रह धरला; जे अत्यंत चुकीचे होते. म. गांधी सार्वजनिक प्रार्थनेला जाताना तरुण मुलींच्या खांद्याचा आधार का घेत? त्याऐवजी मुले वा काठी चालली नसती काय? हिंदू लोकांनी अतिरेकी धर्माधांसमोर मान तुकवून हुतात्मा व्हावे व अत्याचारग्रस्त हिंदू स्त्रियांनी जिभा हासडून प्राणत्याग करावा, हे खचितच अन्याय्य होते. तथापि तेव्हा गांधी नावाचे अजब रसायन काँग्रेसवाल्यांच्या सोयीचे होते.
– श्यामसुंदर गंधे

मार्गदर्शक लेख
‘लोकरंग’मधील (९ जून) ‘माझिया मना’ सदरातील ‘योग्य दिशा’ हा लेख आवडला. आम्ही सामान्य माणसे सार्वजनिक संभाषणाकडे समस्या म्हणून क्वचितच पाहतो. मानसोपचारतज्ज्ञच त्यामागची कारणमीमांसा शोधू शकतात आणि त्यावर उपचारही करतात. चार लोकांत उभे राहून नीट बोलता येणे, मुद्देसूद बोलता येणे, हे सर्वानाच जमते असे नाही. पण ते प्रयत्नाने नक्कीच जमू शकते. यात थोडा तपशिलाचा एक फरक मला जाणवतो तो हा की, वक्ता स्त्री आहे की पुरुष यावरही तिची अथवा त्याची मानसिकता अवलंबून असू शकते. स्त्रिया निसर्गत:च आपल्या दिसण्याबाबत थोडय़ा सजग असतात. पुरुष तितकेसे नसावेत. पुन्हा भाषण वा संभाषणापूर्वी आपली त्या विषयाची तयारी कितपत झाली आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या सदरात प्रत्येक मानसिक समस्येमागील ‘केमिकल लोचा’ वाचताना गंमत वाटते. आपल्या एवढय़ाशा मेंदूत इतकी उलथापालथ होत असते? कमाल आहे बुवा!
–  मेधा गोडबोले

प्रामाणिक खेळाडूंची देशाला गरज
लोकरंग (२ जून) पुरवणीतील गिरीश कुबेर आणि आ. श्री. केतकर यांचे क्रिकेट खेळाडूंचे फिक्सिंग, सट्टेबाजी आणि गैरव्यवहार या विषयावरील लेख विचाराला चालना देणारे होते. क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगलीच बदनामी झालेली आहे. म्हणूनच आज नैतिकदृष्टय़ा शुद्ध, प्रामाणिक, विश्वासू आणि चारित्र्यसंपन्न अशा खेळाडूंची देशाला आत्यंतिक गरज आहे.
– नारायण ताले, कोथरुड, पुणे.

एक अप्रतिम गद्यकाव्य
नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा ‘चिऊताई चिऊताई, दार उघडे आहे’ (३० जून) हा लेख वाचल्यानंतर माझ्या आठवणींचे एक दार  उघडले आणि त्या दारातून कवी ग्रेस यांच्या ‘चिमण्या’ फडफड करत बाहेर पडल्या. कवी ग्रेस यांच्या ‘या चिमण्यां’च्या सहवासात मी सलग १० वर्षे काढली आहेत. त्यांच्या ‘चर्चबेल’ या संग्रहातील ‘चिमण्या’ हा ललित लेख कुमारभारतीच्या इ. १०वीच्या क्रमिक पुस्तकात  १९८३ ते १९९३ या काळात समाविष्ट होता. तो मी १०वीच्या वर्गाला सातत्याने १० वर्षे शिकवला होता. हा लेख अध्यापन करताना प्रत्येक वेळी मला नव्याने काही शिकवत असे. दर वेळी मला त्यातून एक वेगळे सौंदर्य, वेगळे लालित्य जाणवत असे. माझ्या समोरच्या त्या चिमण्या विद्यार्थ्यांनाही ‘त्या चिमण्या’ भारावून टाकत असत. एक वेगळा आनंद मला ग्रेसच्या लेखाने सातत्याने १० वर्षे लाभला होता. तोच आणि तसाच आनंद मला नारायण कुलकर्णी कवठेकर यांच्या ‘चिऊताई चिऊताई दार उघडे आहे’ या लेखाच्या माध्यमातून मिळाला. चिमण्यांवरील हे दोन्ही लेख आपापल्या पातळीवर श्रेष्ठ आहेत. कितीतरी साम्यस्थळे या दोन्ही ठिकाणी आहेत. पण मांडणीतील कौशल्य वाचकांना अंतर्मुख करणारे आहे. ‘साध्या विषयातला मोठा आशय’ दोन्ही लेखांतून व्यक्त होतो. सदरचे हे दोन्ही लेख अप्रतिम गद्यकाव्य आहेत. मला कवठेकरांच्या लेखातून पुन:प्रत्यय देणारा आनंद प्राप्त झाला. माझ्याप्रमाणेच ज्या वाचकांनी ग्रेसचा ‘चिमण्या’हा लेख वाचला असेल, त्यांनाही असाच प्रत्यय आला असावा.
– सदानंद करंदीकर, बारामती.

दलित पँथर – काळाची गरज
‘लोकरंग’मधील दलित पँथरविषयी संजय पवार आणि सुनील दिघे या मान्यवरांनी मांडलेले विचार अतिशय समर्पक आणि सडेतोड आहेत. विशेषत: संजय पवारांनी स्वातंत्र्यानंतर सामाजिक, राजकीय पट उलगडला. त्यात त्यांनी उल्लेखिलेला मराठीचा मुद्दा घेऊन जन्माला आलेली वैचारिक दिवाळखोर असलेली आणि आजही ठाम अशी भूमिका नसलेली शिवसेना, तसेच नंतर वैचारिक भूमिका घेऊन निर्माण झालेली पँथर, पण अल्प कालावधीत नामशेष होऊनही  पँथर महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वातावरणात आपला ठसा उमटून गेली.
दलित पँथर फुटीला सगळ्यात जास्त कारणीभूत जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे दलित नेत्यांमधील स्वार्थ, अहंभाव आणि पदासाठीचा आचरटपणा. कारण ह्या लोकांनी संघटनाच तोडली नाही तर दलित जनतेचा जो विश्वास दलित परिवर्तनवादी चळवळीवर होता तोसुद्धा तोडला. ह्याचा परिणाम असा झाला की दलितांमधील जे शिकलेसवरले होते तेसुद्धा छोटय़ा छोटय़ा सुपर मार्केटमध्ये शोपिस बनून बसले आणि आपला स्वार्थ बघू लागले. त्यामुळे चळवळ शांत झाली आणि फुटीचे राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवायला जागा मिळाली, आणि ते ह्याच लोकांचा फायदा घेऊन राजकारण करू लागले. त्यामुळे देशात प्रादेशिकवाद वाढला आणि फुले-आंबेडकरी चळवळीला गतिरोधक लागला. पूर्वाश्रमीचे पँथर नामदेव ढसाळ, रामदास आठवले हे शिवसेनेसारख्या प्रादेशिकवादी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले, ही फुले-आंबेडकरी विचारांची खूप मोठी शोकांतिका आहे.
नामदेव ढसाळ म्हणतात की, धर्मातराने भौतिक समस्या सुटत नाहीत. पण मुळात बाबासाहेबांनी धर्मातर हे पसे मिळवण्याचे साधन म्हणून नाही तर दलित समाजात आत्मभान, आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि जो िहदू धर्माच्या जोखडात खितपत पडला त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी केले. हे  सारे ढसाळांना माहीत नाही असे नाही, पण वेळेनुसार भूमिका बदलणारे दलित नेते आता बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारावर भाष्य करायला लागले, पण बाबासाहेबांनी क्रांतीचा जो मार्ग सांगितला तो मार्ग ते विसरले. त्यासाठी आज पूर्णत: नवीन नेतृत्वाची गरज फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीला आहे, जे सध्या तरी कुठेच दिसत नाही. म्हणून वाटते की, ह्या लोकांनी पँथरसारखी चळवळ जी देशातील जातीवादी धर्माध लोकांना धडकी भरायला लावायची ती थोडय़ाशा स्वार्थासाठी फोडली.
प्रमोद गोसावी, पनवेल.