रफिक सूरज यांच्या या कथासंग्रहात मुस्लिम समाजातील माणसांच्या विलक्षण वेदना आहेत. तसे तर ही सारी माणसे अगदी सामान्य, कुणाच्याही नजरेत न भरणारी; पण त्यांच्या जगण्यातील झगडय़ाने ती कथेच्या पटलावर आली आहेत. माणसे ‘बेबस’ होतात. त्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असली तरीही त्यांचा ‘आतला’ आवाज त्यांना जगण्यापासून दूर करत नाही. म्हणूनच ‘कमाई’ या कथेमधील दस्तगीर काहीच काम करत नाही म्हणून त्याची बायको लला चिडचिड करते. स्वत: कामाला जाते आणि ‘तुमारा भी संसार को जरा हात लगाया असता तो मैं आसमान को हात लगाई अस्ती,’ हे तिचे बोलणे तसे दस्तगीरची बूज राखूनच आहे. ‘मेरे तकदीरच खोटे’ हे सूत्र जणू तिने काळजावर गोंदूनच घेतले आहे. मुलाण्याचे काम करण्यास ती त्यास प्रवृत्त करते. त्याच्यापोटी मिळालेली पाचाची हिरवीगार नोट त्याचाही आत्मविश्वास वाढवते. ती नवऱ्याचे अस्वस्थपण दूर करते.
या संग्रहातल्या सगळ्याच कथांमधील  स्त्रिया कष्टाळू आणि सोशिक आहेत. जगण्याचे अपरिहार्यपण त्या नाकारीत नाहीत. ‘खिडकी’ या कथेतील हमिदा अविस्मरणीय ठरते. नवरा दारुडा म्हणून बेफिकीर. हमिदाची लाचारी परिस्थितीने आलेली. याच कथेतील जैतूनही दुर्लक्षित. कामावरून घरी आल्यावर भावजय साधा चहाही करत नाही. जैतून माहेरी आली ती नवऱ्याच्या जाचातून सुटण्यासाठी. पण एका आगीतून ती दुसऱ्या आगीच्या डोंबाळ्यात पडते. तिचे हसन आणि मोहसीन हे भाऊ भांडतात. घरात शांतता नाही. बापाची घरातली पत शून्य आहे, हे जैतूनला कळते आणि भिजलेल्या ओल्या लाकडागत ती धुमसत राहते. मेले तरच यातून सुटेन, असे तिला वाटते. मोहसीनला नोकरीसाठी लाख रुपये भरायचे असतात, नाहीतर तो घर सोडून जाण्याची धमकी देतो. जे सासरी, तेच माहेरी सोसणारी जैतून तिच्या भविष्यातील तरतुदीसाठी ठेवलेले प्रॉव्हिडंड फंडातील लाख रुपये त्याला देण्याचे कबूल करते. तिकडे नवऱ्याने तिला टाकले, सवत आणली, तरीही तिथे बांधलेल्या घराच्या कर्जाचे हप्ते ती प्रामाणिकपणे भरत राहते.  
माणसांचे हे ‘बेबस’ होणे जसे व्यक्तिगत पातळीवर आहे तसे ते सामाजिक पातळीवरही आहे. ‘बेबस’ या कथेतील गाववास्तव फार टोकदार आहे. खेडय़ातील मशिदीच्या बांधकामाचा तिढा कारण नसताना गरसमजातून वाढत जातो. सुभाना जाधव आणि बाबालाल यांची बालपणासूनची मत्री धोक्यात येते. गाव अस्वस्थ होते.  कुणीही उठावे असतील नसतील ती कारणे शोधावीत, हवे तसे अर्थ लावावेत आणि गावाला वेठीस धरावे, हे समाजवास्तव फार भयानक आहे.
या कथांमधल्या माणसांच्या साध्या साध्या मागण्याही पूर्ण होत नाहीत. ‘धुरळा’ कथेतील आप्पाजानला नातवंडांबरोबर राहायचे आहे. तिला चष्मा दुरुस्त करायचाय. विशाळगडाच्या दग्र्यात जाऊन नमस्कार करायचाय. पण यातले काहीही होत नाही. कमावता मास्तर मुलगा, सून दुरावतात. म्हातारी झालेली आई म्हशीमागे धावत राहते.
‘घुसमट’ कथेतील बानूचे दु:ख तर फार जीवघेणे आहे. शतक कुठलेही असले आणि जग कितीही पुढे गेले, तरीही ‘बानू’च्या जगण्यात काहीच फरक पडत नाही. नवऱ्याने टाकून दिलेली बाई किती आत्मक्लेश करून घेते, याचे टोक म्हणजे ही कथा आहे. मुलगी झाल्यानंतर नवरा तिला सोडून देतो. ती स्वत:ला घरातल्या अंधारात बंद करून घेते आणि खंगत जाते. अपंग होते. मध्यस्थांनाही फारसे यश येत नाही. मुलीला मोठय़ा हिमतीने आईच्या भेटीला आणतात. तेवढेच दहा-पंधरा दिवस बानूच्या आयुष्यातील जगण्याचे दिवस असतात. इच्छा नसतानाही मुलगी जाते आणि पुन्हा बानू अंधारात पडून राहते. मौन बाळगते. मात्र स्वत:शी बोलते, भांडतेही. ‘मला माझं म्हणणं मांडण्याचा अधिकार नाही. मी सर्वासाठी गरसोयीची आहे. मला माझी सोय बघता येत नाही.’ ही तिची हतबलता आहे. समाजात अशा किती बानू कुढत असतील याचा अंदाज करायला ही कथा भाग पाडते.
हमिदा, आपाजान, लला, बानू या एकापेक्षा एक दु:खी, अस्वस्थ, तरीही सोशिक बायका आहेत. कथाकार सुचवतो की, यातले वास्तव भविष्यकाळात कधीही बदलणार नाही हे ठाऊक असूनही यदाकदाचित हे बदलेलच, याच आशेवर त्या जगत आहेत. अन्यथा तसे जगणे जणू त्यांच्यासाठी यातनेचा महासागरच आहे.
रफिक सूरज यांच्या कथांचे बलस्थान म्हणजे त्यांची सहजसुंदर भाषा. मुसलमानी बोलीतील आंतरिक गोडवा त्यातून सहजपणे प्रकट होतो. हा कथासंग्रह वाचताना कौटुंबिक वातावरणातील घरगुती भाषा फार दिवसांनी वाचायला मिळाल्याचा आनंद होतो. फार प्रयोगाच्या नादी न लागता जगणे पकडून ठेवणाऱ्या या कथा लक्ष वेधून घेतात.
‘बेबस’ – रफिक सूरज, दर्या प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १४४, मूल्य – १५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restless family stories bebas by rafic suraj
First published on: 20-07-2014 at 01:04 IST