समीर गायकवाड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्नाला एक तप उलटून दोन लेकरांची आई झाल्यावरही कामिनीच्या सौंदर्यात तसूभर फरक पडला नव्हता. आताशा समृद्धी श्रीमंतीत रुळलेल्या कामिनीचा गतकाळ वेगळा होता. कामिनी म्हणजे आटीव दुधाची ढेप होती. पाहता क्षणी नजरेत भरेल असं उफाडय़ाचं अंग लाभलेली कामिनी गिर्रेबाज कबुतरासारखी वाटे, पण वास्तव तसं नव्हतं. गावातल्या टोळभरवाची नजर तिच्यावर असायची. ती मात्र भुईवर डोळे खिळवून खालच्या मानेनं जायची. कामिनीचा बाप नावालाच साधू होता. बाकी त्याचं वर्तन विपरीत होतं. गावात जी मोजकी मंडळी दारूच्या आहारी गेली होती त्यात साधूचा नंबर बराच वरचा होता. त्याची कमाई शून्य होती, पण मुजोरी टिकोजीरावाच्या वरची होती. वरतून ‘कोण भितो कर्जाला, कर गं रांडे पुरणपोळ्या’ असा सगळा मामला होता. चार धटिंगण घरी आणायचे आणि त्यांना फुकटचे खाऊपिऊ घालायचे, फालतूचा रुबाब या त्याच्या सवयी. नशेच्या गत्रेत चिचुंद्रीच्या डोक्याला चमेलीचं तेल लावायला तयार असणाऱ्या साधूने बायकोपोरांच्या घासाची चौकशी कधी केली नव्हती. साधूने थोरल्या कामिनीच्या पाठीवर जुळ्या मुली, नंतर मुलगा आणि पुन्हा मुलगी असं लटांबर वाढवलं होतं. साधूच्या नानाविध खोडींपायी वेशीपाशी त्याला अनेकांनी कुटून काढला होता, पण त्याचा पीळ कधीच जळला नव्हता. आई वत्सलाबाईसह कामिनी रोजंदारीनं कामावर जाई. कामावर निघालेली कामिनी वाटेनं चालू लागली की गावभरच्या बुभुक्षित नजरा तिच्यावर खिळत. ज्याची वर्दी येईल त्याच्या रानात या मायलेकी जायच्या. राब राबायच्या. त्यांच्या कष्टावरच चूल पेटायची. मायलेकींना बहुत करून नरसू साळव्यांची वर्दी यायची.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal poinciana gavaksh article sameer gaikwad abn
First published on: 24-11-2019 at 04:03 IST