कालच आषाढातील पहिला दिवस होता. आषाढातील पहिला दिवस म्हणजे कालिदास, त्याचे मेघदूत आणि ‘आषाढस्य प्रथम दिवसे..’ अशा सगळ्याची आठवण जागविण्याचा दिवस. विविध वाहिन्या, वृत्तपत्रांच्या पुरवण्या, व्हॉट्स अ‍ॅपसारखी माध्यमे यामुळे हा दिवस पूर्वीच्या तुलनेत आता जरा अधिक साग्रसंगीतपणे, रंगीतपणे लक्षात येतो, लक्षात राहतो, हे खरेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढाचा महिना.. एकूणच पावसाचा कालावधी साहित्यिकांना, विशेषत: कविलोकांना जरा जास्तच प्रेरणा देणारा. त्यामागील हुळहुळी भावना जरा राहू दे बाजूला; पण याचे नेमके कारण काय असावे? म्हणजे कवितांना पूर लोटण्याचे कारण काय असावे? खरे तर तीन ऋतूंमधील हा एक ऋतू. तोही दरवर्षी येणारा. तरीही दरवर्षी नव्या दमाने पावसाच्या कविता लिहिण्याचे बळ कवींना मिळते खरे. पाऊस पडत असेल तर पावसावर, आणि पाऊस पडत नसेल तर दडून बसलेल्या पावसावर; पण कविता होणारच. कदाचित पावसाळा हा दृश्यात्मकतेच्या अंगाने इतर तीन ऋतूंपेक्षा वेगळा असल्याने, त्याची दृश्यात्मकता अधिक ठसठशीत असल्याने असे काही होत असावे. आषाढाच्या या महिन्याला कविता जशा बिलगूनच आलेल्या. तद्वत मराठीजनांसाठी या आषाढाचे एक मोठे वैशिष्टय़ म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या शहरांतून, गावांतून, खेडय़ांतून, वस्त्या-पाडय़ांवरून लोक निघतात आणि पंढरपूरला जातात. थोडीथोडकी नव्हे, काही लाखांत संख्या असते त्यांची. कुठून कुठून निघतात आणि सरतेशेवटी विठ्ठलाच्या पंढरपूरला जाऊन मिळतात.

महाराष्ट्रीय संस्कृती-परंपरेची जी वैशिष्टय़े आहेत, त्यातील आषाढीची वारी हे एक ठळक वैशिष्टय़. अशा प्रकारची ही वारी नेमकी कधीपासून सुरू झाली, याबाबत वेगवेगळे उल्लेख आढळतात. काहींचे म्हणणे : बाराव्या-तेराव्या शतकात ही परंपरा जोमाने सुरू झाली. तर काहींचे म्हणणे : अगदी चौथ्या-पाचव्या शतकातही वारीची परंपरा होती, असे सांगणारे ताम्रपट उपलब्ध आहेत. याबाबत निरनिराळ्या अभ्यासकांची निरनिराळी निरीक्षणे आहेत. ती त्यांच्या त्यांच्या जागी योग्यच.

या इथे- समासातून वारीकडे बघण्याचा मूळ उद्देश तो नाही. म्हणजे वारीचा इतिहास धुंडाळणे, त्याचे मूळ शोधणे हे हेतू नाहीत येथे. हेतू आहे तो वारीने काय साधले व काय साधता येते, हे पाहण्याचा. तर वारकऱ्यांच्या मनातील विठ्ठलाविषयीची श्रद्धा, त्याची ओढ, त्याच्या दर्शनाची आस, वारीतून साधले जाणारे सामाजिक ऐक्य, रोजच्या धबडग्यातून थोडे दूर राहिल्याने मिळणारा मानसिक निवांतपणा अशा अनेक गोष्टी आहेतच वारीशी जोडल्या गेलेल्या. त्यासोबतच एक महत्त्वाची बाब आहे ती साहित्याची. वारीसोबत, वारीच्या लाटांवर मौखिक वा अन्य स्वरूपात शतकानुशतके ओसंडत, वाहत आलेल्या रसरशीत साहित्याची! हे साहित्य म्हणजे अर्थातच अभंग, संतांच्या रचना आदी. वारीचे खूपच अधिक वय लक्षात घेतले तर मुद्रित माध्यमे नवी. समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे यांचे बळ वाढण्याचा काळ तर तुलनेने अगदीच अलीकडचा. ही अशी कुठलीही साधने नसताना मौखिक परंपरेच्या बळावर साहित्याचा.. एका अर्थाने कवितांचा इतका घसघशीत ऐवज पिढय़ांमागून पिढय़ा जिवंत राहिला, पुढे जात राहिला, लख्ख होत राहिला, ही वारीची एक मोठी देणगी. म्हणजे वारीची परंपरा नसती तरी वारकऱ्यांच्या माध्यमातून, एकुणातच मराठीजनांच्या माध्यमातून संतसाहित्य जिवंत राहिलेच असते, हे खरे. मात्र, वारीने त्यास अधिक चालना मिळाली, हे नाकारता येणार नाही.

येथे कदाचित हे असे साहित्य जिवंत राहण्यामागील प्रेरणांचा प्रश्न उभा करता येईल. संतांचे अभंग तालासुरात म्हणण्यामागे बहुसंख्य लोकांची मूळ प्रेरणा ही नि:संशय श्रद्धा, आध्यात्मिकता हीच होती याविषयी शंकाच नाही. म्हणणारे सोडाच; ते लिहिणाऱ्यांची लिहिण्यामागील मूळ प्रेरणाही आध्यात्मिक, भक्तिभावाची अशीच होती. ज्या ईश्वरावर आपली श्रद्धा आहे त्याला आपली सुखदु:खे सांगणे, ती दूर करण्यासाठी साकडे घालणे, कधी कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ त्याची आळवणी करणे, कधी त्याच्याकडे मोक्षाची मागणी करणे, कधी त्याचे गुणगान गाणे, कधी त्याच्याशी भांडणे, अगदी त्याला शिव्या घालणे, कधी सामाजिक दंभाकडे लक्ष वेधणे, त्या दंभांवर प्रहार करणे, कधी कूटभाषा वापरून आयुष्यावर मार्मिक भाष्य करणे.. असे असंख्य हेतू त्यामागे होते. मात्र, अभंग लिहिताना किंवा ते म्हणताना आपण उत्तम साहित्यमूल्य असणारे असे काहीतरी लिहीत आहोत, म्हणत आहोत याचे पक्के भान त्यातील कितीजणांना होते याची कल्पना नाही. तरीही नकळत, अजाणतेपणे या मंडळींकडून उत्तम साहित्य, अभंग लिहिले गेले, त्याचा प्रसार केला गेला.

समाजातील एक खूपच मोठा वर्ग अशा रीतीने साहित्याशी अगदी जवळून जोडला गेलेला होता, ही बाब अद्भुत आहे. मग हे संबंध दिवसागणिक पातळ का होत गेले? इतके पातळ, की साहित्य ही समाजातील मूठभर लोकांनाच आवडणारी गोष्ट आहे आणि ती मूठभरांनाच आवडणार, असे मनोमन स्पष्टपणे कबूल करण्याइतके, ते बोलूनही दाखवण्याइतके आपण बनचुके झालो. पूर्वीचा मौखिक साहित्य व्यवहार आता मुद्रित झाला, त्याच्यासाठी असंख्य माध्यमे प्रशस्त झाली. तरीही साहित्य, कविता या गोष्टी जणू या भूतलावरील नाहीतच; या गोष्टी ज्यांना भावतात ती माणसे या भूतलावरील नाहीतच, अशी काहीतरी धारणा जणू दृढच झाली.

या सगळ्यास कारणीभूत काय?

आध्यात्मिक प्रेरणा, भक्तिभाव या गोष्टी तर आहेतच; पण संतमंडळी त्या काळाची, त्या काळातील लोकांची भाषा बोलत होती, त्यांच्यातील प्रेरणांना नकळत त्यांच्या भाषेत शब्दरूप देत होती, म्हणूनच ती सामान्यांशी, समाजातील मोठय़ा घटकाशी जोडून राहिली असे म्हणता येईल. शिवाय आजच्या काळात राहून, आजच्या काळातील दृष्टीचा आग्रह धरून आधीच्या काळाकडे, त्या काळातील लोकांच्या मनोव्यापाराकडे पाहणे चुकीचे ठरेल. आजचे मापदंड लावून त्यांचे व्यवहार चुकीचे वा बरोबर ठरवणे अयोग्य ठरेल. ते मनोव्यापार त्या काळातील नजरेनेच बघायला हवेत. संतांनी त्यांच्या काळाला धरून रचना केल्या नि त्या आजही जिवंत आहेत, हे विसरता येणार नाही. आयुष्यातील वाढलेली गुंतागुंत, जगण्याचा अफाट आणि भिंगुळवाणा करून सोडणारा वेग, जगण्यातील बदललेल्या प्राथमिकता या गोष्टी आहेतच; पण सारा दोष या गोष्टींवर सोडून मोकळे नाही होता येणार आपल्याला. साहित्य व समाज यांतील नाते विरत जाण्यामागील दोषातील काही वाटा लिहित्यांचाही. प्रतिभेतील अधिक-उणे सोडा, आपण कसे सांगतोय ते सोडा; पण काय सांगतोय, हे लिहित्यांनी अधिक जागरूकपणे विचारात घ्यायला हवे. ते सांगणे कुणासाठी आहे, कशासाठी आहे, याचे अधिक भान बाळगायला हवे त्यांनी. या लिहित्यांबरोबरच दोषाचा काही वाटा वाचणाऱ्यांचाही. साहित्याच्या माध्यमातून स्वत:ला अधिक समृद्ध करून घेण्याची आसच नसणे, किंवा असलेली आस मिटत जाणे, साहित्य नामक वस्तूची महतीच माहिती नसणे, ही लक्षणे चांगली नव्हेत.

या स्थितीवर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. साहित्य हे वारीवर ओसंडून वाहू शकते, हे सिद्ध झाले आहे. आता नव्या काळास अनुसरून नव्या धाटणीची वारी बांधण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची.

rajiv.kale@expressindia.com

मराठीतील सर्व समासातून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant tukaram and sant dnyaneshwar wari palkhi yatra 2017
First published on: 25-06-2017 at 01:49 IST