आनंदवन आता अडीच वर्षांचं झालं होतं. जंगलजमीन साफ करून शेतीयोग्य करणं, बैलगाडीतून माती आणून शेतात पसरणं, शेतं नांगरणं, विहिरी खणणं, झोपडय़ा उभारणं ही कामं शारीरिक श्रमांच्या बळावर आनंदवनात अखंड सुरू होती. दगडधोंडय़ांच्या भूमीला शस्यश्यामल धरणीचे रूप येत होते. बाबा आमटे म्हणत, ‘‘आपण कितीही पीडित आणि विकलांग असलो तरी प्रत्येकाने स्वत:च्या क्षमता ओळखून त्या ताणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा.’’ आपलं नेमकं ध्येय काय याविषयी स्पष्टता असेल, कामाचं व्यवस्थित नियोजन असेल आणि स्वत:च्या क्षमता पूर्ण वापरण्याची जिद्द असेल तर कोणतंही आव्हान असाध्य नाही, यावर बाबांचा ठाम विश्वास. परिणामी अपंगत्वामुळे शरीरश्रम न करू शकणारी कुष्ठरुग्ण व्यक्तीही रिकामं बसून न राहता शेतामधील पिकावर बसणारी पाखरं हाकारे देऊन हाकलत असे. कुष्ठरुग्ण सतत निर्मितीत गुंतलेले राहिले तर आपण स्वत:च्या हक्कासाठी, आनंदासाठी कष्ट करतो आहोत याची जाणीव त्यांच्यामध्ये जागृत होईल याबद्दल बाबा आश्वस्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्मनिर्भरतेच्या या वाटचालीत आनंदवनाची आर्थिक घडी बसवण्याचं मोठं आव्हानही बाबा आणि इंदूपुढे होतं. महारोगी सेवा समितीचे कार्यकर्ते म्हणून कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून त्यांना मिळणारं अल्प मानधन हेच काय ते उत्पन्नाचं साधन. याशिवाय हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा ज्या दानशूर व्यक्तींनी आनंदवनाच्या कार्याला सुरुवातीच्या काळात मदतीचा हात दिला, त्यात मी प्रामुख्याने उल्लेख करीन तो नागपूर रबर इंडस्ट्रीजचे मालक शंकरराव जोग यांचा. १९५२ साली महारोगी सेवा समितीस दहा हजार रुपयांची उदार देणगी देऊन आनंदवनाच्या धर्तीवर नागपूरनजीक एखादं उपचार केंद्र महारोगी सेवा समितीतर्फे सुरूकरण्यात यावं अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. यातून जे काम उभं राहिलं त्याचा उल्लेख पुढील लेखांमध्ये येईलच. महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, बाबांचे ज्येष्ठ सहकारी आणि तत्कालीन मध्य प्रदेश शासनात योजना आणि विकासमंत्री म्हणून कार्यरत असलेले रा. कृ. पाटील हे मध्य प्रदेश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आनंदवनाला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. गांधी स्मारक निधी संस्थेकडून आनंदवनाला साहाय्य मिळावे यासाठी मनोहरजी दिवाण यांचीही धडपड सुरू होती. पण यश येत नव्हतं. बऱ्याच प्रयत्नांती मध्य प्रदेश शासनाकडून प्रतिरुग्ण प्रतिमाह सात-आठ रुपये अनुदान मंजूर झालं. पण तेसुद्धा दफ्तरदिरंगाई आणि लालफितीच्या कारभारात कायम अडकलेलं असे.

मराठीतील सर्व संचिताचे कवडसे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leprosy patient engaged in creation of anandwan village
First published on: 14-05-2017 at 04:29 IST