‘संगीत संगती’ हे डॉ. अशोक दा. रानडे यांचं नवं पुस्तक. हे संगीत-विद्यार्थ्यांनी व संगीतरसिकांनी आवर्जून वाचावं, असं मलपृष्ठावरचा ब्लर्ब सांगतो आहे. पण मी म्हणेन ते पुस्तक साऱ्यांनीच वाचायला हवं. ज्यांना संगीत कळतं त्यांच्या वैचारिक धारणा ते पुस्तक विस्तारेल. ज्यांना संगीत कळत नाही, पण आवडतं त्यांना संगीताकडे बघण्याचे नवे आयाम कळतील. ज्यांना संगीत मुळीच आवडत नाही, त्यांनाही   एकवार वाचून एखादं शास्त्र पूर्ण अभ्यासांती सहजतेच्या पातळीला कसं आणता येतं, हे बघावं अशी शिफारस मी करेन. संपादकांनी संपादकीयामध्ये- ‘‘अर्थात एका निश्चित दर्जाचे वाचन करण्याची वाचकास सवय हवीच!’’ असं म्हटलं आहे. मी म्हणेन, उलट तशा नसलेल्या वाचकांनी तर हे पुस्तक जरूर वाचायला हवं. ‘निश्चित दर्जा’ म्हणजे काय, हे एकतर विवाद्य ठरू शकतं. शिवाय हे पुस्तक काही शोधनिबंधांचा समूह नाही. रानडेंनी वृत्तपत्रामध्ये १९९४-९६ च्या दरम्यान ज्या लेखमाला चालवल्या त्याची वेगळी मांडणी करून सादर केलेलं हे पुस्तक आहे. आणि आपण हे लिखाण जनसामान्यांसाठी करत आहोत; विद्यापीठीय चर्चासत्रांसाठी नाही, याचं पक्कं भान खुद्द लेखकाकडे आहे. किती सहज सुंदर भाषा आहे अशोक रानडे यांची! सगळा अभ्यास कसा नटून-थटून हौसेनं, आनंदानं, नाचत-बागडत त्या लिखाणात उतरतो. कधी विनोद, कधी तुलना, कधी सरळ-थेट वाचकांना उद्देशून संवाद, कधी दैनंदिन आयुष्याचे संदर्भ; आणि अत्यंत अवघड संकल्पनाही गाण्यातून तान सहज सुटावी तशा तऱ्हेने समजावत गेलेले शब्द आणि ‘वाघिणीचे दूध’ या प्रकरणाची सुरुवातच अशी आहे. ‘माफ करा, पण मजकूर सैद्धान्तिक होणार, मराठी भावगीताने काय घेतले व नाकारले ते कळून घ्यायचे, तर थोडय़ाफार सैद्धान्तिक लिखाणाचे लोखंडी चणे खायला हवेतच (दगडांचा देश आणि लोखंडी चणे- काय जोडी आहे!’ ही सुरुवातीची तीन वाक्ये मी अशासाठी उद्धृत केली, की त्यामुळे लेखक-वाचकाचा या पुस्तकामधला Symmetrical Discourse  (उभयपक्षी चर्चाविश्व) ध्यानात यावा. पहिल्याच विधानात जे ‘माफ करा’ येतं ते एकाचवेळी वाचकाला सावध करणारं आणि तरी आश्वस्त करणारं आहे. तिसऱ्या वाक्यात तर विनोदनिर्मितीमुळे वाचक अधिकच आश्वस्त होतो. थोडा जड विषय असला तरी लेखक आपल्याला ते सारं नीट समजावून सांगेल, हा विश्वास वाचकाला वाटतो. रानडेंच्या भाषाशैलीमधलं वाचक-लेखक समसमान संवादाचं तत्त्व हे अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आहे. (ते त्यांच्या शोधनिबंधामध्येही दिसतं, आढळतं हे अजूनच आश्चर्य. संगीत-नाटक अकादमीच्या जर्नलमधला पॉप्युलर संगीतावरचा इंग्रजीमधला एक निबंधही आता माझ्या पुढय़ात आहे आणि त्या भाषेतही ही लोकशाही लेखनशैली शाबूत आहे.) अशोक रानडे हे संगीतज्ज्ञ आहेत हे अनेकांना ठाऊक असतं, पण त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत एम.ए. केलेलं होतं हे अनेकांना ठाऊक नसतं, तो भाषाभ्यास त्यांच्या शैलीला वजन देतो.
शैली हे एक नाणं असतं संगीत समीक्षेचं- आणि महत्त्वाचं नाणं. कारण सुरांची शब्दांमधून समीक्षा करणं यामध्येच एक विरोधाभास असतो. शब्दांची समीक्षा शब्दांनी होते, सुरांची सुरांनी व्हायला हवी! पण जेव्हा शब्दाद्वारे लेखक ती करणार असतो, तेव्हा भाषेचा खूप जाणीवपूर्वक विचार त्याला करावा लागतो. अशोक रानडेंनी अर्थातच तसा केलेला आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा असतो लेखकाचा नवविचार, त्याची दृष्टी, त्याचा इतर कलाक्षेत्रांशी असलेला परिचय. अशोक रानडे हे त्यांच्या काळामधल्या संगीततज्ज्ञांपेक्षा विचारांनी खूपच तरुण होते असं पुस्तक वाचताना जाणवत राहतं. पुस्तकाच्या शेवटी त्यांची मुलाखत छापलेली आहे. त्यामध्ये तर विशेषच. मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांचं सारं लेखन हे तरुण आणि तरी परिपक्व वाटतं, तसंच अशोक रानडेंचं आहे. एम.टी.व्ही. आणि तत्सम संगीतावर बोलताना त्यांनी फार मार्मिकपणे जुन्या-नव्या पिढीचा सांगीतिक अभिरुचीचा संघर्ष मांडल्यानंतर म्हटलं आहे, ‘‘विचारलेच तर या संगीताचा बराचसा भाग मला रुचत नाही, हे मी लगेच सांगेन. पण हे संगीत नव्हे, असे म्हणणे मला जमणार नाही. कारण तसे मला वाटत नाही. त्याचप्रमाणे या संगीतावर लोभ म्हणजे सांस्कृतिक ऱ्हास मानणे मला अवाजवी वाटते..’’ किती स्वच्छ, व्यापक लेखकाची नजर आहे! अगदी मागच्या वर्षीही ‘लयपश्चिमा’ वाचून अनेक वाचकांची पसंतीची पत्रं आली तरी काही निवडक, मासलेवाईक पत्रं- ‘काय हा धांगडधिंगा आणि काय हे त्याचं उदात्तीकरण’ या स्वरूपाची मला आलेली होती. १९९४ साली वीस वर्षांपूर्वी भारतात पुढे येऊ घातलेल्या नवसंगीताची नाडी रानडेंनी अचूक ओळखली होती असं म्हणायला हरकत नसावी, असं या पुस्तकात ठिकठिकाणी जाणवतं. पॉप संगीत, फ्युजन प्रयोग या साऱ्याविषयी ते मोकळे आहेत आणि त्यामुळे संगीत ‘बिघडेल’ अशी धास्तीही त्यांना वाटत नाही! याचं एक कारण वृत्तीमध्ये असलं तरी महत्त्वाचं कारणं रानडेंनी संगीताचं पाच ‘कोटीं’मध्ये (कोटी=प्रकार) जे वर्गीकरण केलेलं आहे त्यात आहे. जन-संगीत (चित्रपट, जिंगल्स ई), आदिम संगीत (यात ते रॅप आणि डिस्कोला बसवतात), भक्ती-संगीत, लोकसंगीत आणि कला-संगीत अशा पाच संगीताच्या कोटी रानडे मांडतात. त्यांची ही थिअरी अर्थातच भारतीय संदर्भात आहे. खेरीज साधारण सगळय़ांना सगळय़ा संगीत-कोटींमधलं गाणं कमी अधिक आवडतं असंही त्यांना वाटतं. (माझ्या मते, प्रत्येक माणसाच्या (निदान भारतातल्या) व्यक्तिमत्त्वातच जणू हे पाच थर वा पातळय़ा असतात आणि त्या त्या पातळीला ते ते संगीत आवाहन भिडते- पृष्ठ १६.) यासंबंधी थोडं बोलू या, पण मागाहून.
आधी पुस्तकांमधल्या विषयांची शीर्षकं ऐकवून मी तुम्हाला गार करणार आहे! संगीताकडे किती किती तऱ्हांनी बघता येतं, याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे! लेखक कधी गायकांच्या हावभाव-हातवारे यांच्यावर लिहितो, कधी भारतीय संगीत आणि वृद्धत्व यासंबंधी पुरावे मांडतो, वाहवा-दाद देण्याच्या बदलत्या पद्धतींवरही रानडेंनी किती सजगतेनं लिहिलं आहे. पश्चिमेत आणि भारतात दक्षिणेत ‘वाहवा’ असं म्हणून दाद देत नाहीत व उत्तरेत देतात- ती का, त्याचं स्वरूप, महत्त्व, गायकावरचा परिणाम या साऱ्यांविषयी एखादा लेखक जेव्हा दोन-तीन पानात सखोल, पण सुगम लिहितो तेव्हा पुस्तकाअंती लेखकाच्या ओळख पानावर नावाआधी असलेली ‘संगीताचार्य’ ही पदवी किती यथार्थ आहे हे कळतं. नाही तर, संगीतामध्ये स्वघोषित उस्ताद, पंडितांची संख्या काही कमी नाही. सर्वात मोलाचा विचार पुस्तकातला असा आहे की संगीतामधल्या माणसांनी संगीतावर लिहायला हवं (आणि त्यासाठी संगीताचाच नव्हे, साहित्याचाही अभ्यास करायला हवा) खेरीज, संगीताबाहेरच्या अभ्यासकांनी गाण्यावर लिहायचं ठरवलं तर त्यांनाही गायला नव्हे, पण समजून घ्यायला- प्रत्यक्ष गाणं शिकायला हवं. केवळ ‘कॉमेंटस’च्या चटकदार साहाय्याने फेसबुक गाजवणाऱ्या समीक्षकांच्या जमान्यात, रानडेंच्या अटी भलत्याच अवघड वाटल्या, तरी त्याची अपरिहार्यता मला तरी समजू शकते.
या पुस्तकाचं संपादन चैतन्य कुंटे यांनी उत्तमरीत्या केलेलं आहे. अनेक लेखमालांचा क्रम व वर्गीकरण सूत्रबद्धपणे त्यांनी केलेलं दिसतं. मुखपृष्ठावरचं ‘सं’ हे अक्षर चंद्रमोहन कुलकर्णीच काढू जाणोत! पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा तो ‘सं’ संगीताचा आहे, संगतीचा आहे आणि सकारात्मकतेचाही आहे. अत्यंत सकारात्मक वैचारिकता मांडणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठामध्ये ठाशीव रंग-आकार असावेत, आतल्या मांडणीत रानडेंच्या स्वच्छ-सरळ तार्किक विचाराइतक्याच स्वच्छ लालसर- नारिंगी रेषा असाव्यात हा योगायोग नव्हेच. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी संगीताची आणि साहित्याची या पुस्तकात असलेली संगत दृश्य-कलेलाही मिळवून-भेटवून टाकली आहे!
२०११ साली रानडे यांचं निधन झालं. आज ते हयात असते तर पुस्तक वाचल्यावर उठणाऱ्या अनेक प्रश्नांचं निरसन त्यांनीच (काही ओळख नसताही) केलं असतं. तरी काही विचार इथे अभ्यासकांसमोर मांडले पाहिजेत. पहिला प्रश्न रानडेंच्या संगीत-कोटीविषयक जगभर  axiomatic triangle च्या संकल्पनेत कला-संगीत, जन संगीत आणि लोक संगीत हे तीन घटक आहेत. अनेकानेक संगीत समीक्षक हे तीनही प्रकार जागतिकीकरणानंतर वेगाने एकमेकांत मिसळून जात आहेत असं सध्या मांडतात. रानडेंच्या पाच-कोटी आजही तितक्या स्वतंत्र, अभेद्य आहेत का? दुसरा मुद्दा आदिम संगीताबाबत. रानडेंनी डिस्को, रॅप आदी आदिम संगीतामध्ये टाकलं आहे. आज ‘ग्लोरी’सारख्या गाण्यात जे-झी रॅपमध्ये बाळाला बघून भरून आलेलं बापाचं मन उलगडतो- ते संवेदन : सांगीतिक आणि वैचारिक दोन्ही अर्थानं ‘आदिम’ म्हणता येईल का? (म्हणजे ते आदिबंधात्मक आहेच, पण ‘आदिम’ आहे का?) चालींच्या चोरींबद्दल रानडेंनी विस्तृत मांडणी मोकळेपणाने केलेली आहे. पण कधीकधी खरोखरच दोन संगीतकारांच्या चाली आपसूकही जवळजवळच्या तयार होतात हे संगीत निर्मिणाऱ्यांना ठाऊक आहे. रानडेंच्या लेखात यावर विस्ताराने ऊहापोह असता तर काय मजा येती! पण लेखक निवर्तल्यावर पुस्तक प्रकाशित झालं, की अशी हळहळ मागे राहतेच! सुदैवानं, लेखक पुढय़ात बसून प्रत्यक्ष आपल्याशी बोलल्याचं वाचकाला पुष्कळदा हे पुस्तक वाचताना जाणवत राहतं आणि ती जाणीव त्या हळहळीवरच अपुरासा, पण तरी नेमका तोडगा असतो.
‘संगीत संगती’
डॉ. अशोक दा. रानडे,
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे : ३०७, किंमत  : ३२५ रुपये.