वाढदिवस हा यशवंतरावांकरता त्यांच्या व्यस्त जीवनातील विरंगुळा असे, तर वेणूताईंकरता मुंबई सोडल्यामुळे नातेवाईकांसोबत दोन-तीन दिवस घालवल्याचा वेगळा आनंद होता. या कार्यक्रमांचा यशवंतरावांच्या सरकारी कामावर मात्र काही परिणाम होत नसे. एक मात्र खरंय, की यशवंतराव सत्तेवर असोत वा नसोत; सत्तेवर असताना जे नातेवाईक त्यांच्या वाढदिवशी मुंबई-सातारा-कराडवरून येत, तेच ते सत्तेवर नसतानादेखील येत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ जानेवारी १९६३ हा यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाल्यानंतरचा दिल्लीतील पहिला प्रजासत्ताकदिन! या दिवसाची तयारी साधारणत: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होते. परंतु यावेळी डिसेंबर अर्धा झाला तरी तयारीची काहीच सुरुवात झालेली नव्हती. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली. चीनबरोबरच्या युद्धाच्या जखमा ताज्या असल्या तरी सुतकी चेहऱ्याने हा दिन साजरा न करता वरकरणी उत्साहाने का होईना, राजपथावरील समारंभ करण्याचे यशवंतरावांनी ठरवले होते. सीमेवरील सैन्याचा आणि शस्त्र-अस्त्रांचा विचार न करता जवळपास जे काही उपलब्ध होऊ शकेल त्याचे राजपथावरील परेडमध्ये प्रदर्शन करण्याचे ठरले. सैनिकी तुकडय़ासुद्धा मोजक्या असल्यामुळे एनसीसी कॅडेटस्, लोकनृत्य कलाकार, तसेच बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था वेळेअभावी करणे शक्य नसल्यामुळे दिल्ली व आसपासच्या शाळांना, एनआरआय संस्थांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.

यशवंतरावांची विचारशक्ती नेहमी नावीन्याकडे धाव घेणारी होती. त्यांच्या मनात विचार आला, की जनतेला सहभागी होण्यासाठी बोलावतो आहोत तर लोकप्रतिनिधींनीही या सोहळ्यात भाग घेतल्यास ते अधिक सयुक्तिक होईल. त्यांचा हा विचार नेहरूंनाही पटला. आणि  प्रजासत्ताकदिनी राजपथावर सैन्याच्या तुकडय़ा गेल्यानंतर नेहरूंच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष, संसद सदस्य यांचा जथ्था विजय चौकातून निघून सलामी मंचासमोरून इंडिया गेटपर्यंत गेला. पहिल्या रांगेत नेहरू, यशवंतराव, मोरारजी देसाई, बाबू जगजीवनराम, सिन्हा, लोकसभा अध्यक्ष असे नऊ-दहाजण (पैकी काही राष्ट्रध्वज घेऊन होते.) आणि त्यामागे इतर केंद्रीय मंत्री व संसद सदस्य. अशा प्रकारे सर्वाना एकत्र पाहण्याची ही पहिली व अखेरची वेळ ठरली. लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त जंगी स्वागत केले. त्यांच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण होता. नेहरूंनी यशवंतरावांकडे पाहून आपला आनंद व्यक्त केला. मात्र, जनतेच्या सहभागाचा परिणाम असा झाला, की दीड तास चालणारा हा कार्यक्रम तीन तासांहून अधिक लांबल्याने कंटाळवाणा झाला. यशवंतरावांना या पहिल्या प्रजासत्ताकदिनाची आठवण सदैव राहिली.

फेब्रुवारीमध्ये यशवंतरावांना ‘१, रेसकोर्स रोड’ हा नवीन बंगला मिळाला. दिल्लीत हा एकच बंगला होता- ज्यात ऑफिस रूमच्या मागे १५०-२०० लोक सहज बसतील एवढा मोठा हॉल होता. याचे कारण इथे आधी अ‍ॅटर्नी जनरल एम. सी. सेटलवाड राहत. त्यांची लॉची लायब्ररी इथे होती. यशवंतरावांनी या हॉलच्या एक- तृतीयांश भागात पाहुण्यांसाठी बेडरूम तयार करून घेतली. तिथे त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार व प्रदेश अध्यक्ष विनायकराव पाटील उतरत. तो काळ असा होता की महाराष्ट्रातील बहुतेक महत्त्वाचे निर्णय ‘१, रेसकोर्स रोड’वर घेतले जात. मंत्रिमंडळाची रचनासुद्धा इथेच निश्चित होत होती. परंतु यशवंतरावांनी आपल्यावरील विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी एकाही नातेवाईक वा मित्रांचा अपवाद वगळता समावेश केला नाही.

बंगल्यातील उर्वरित दोन-तृतीयांश हॉलचे भाग्य फार थोर होते. कायद्याच्या रटाळ पुस्तकांपासून त्याला मुक्ती मिळून नवजीवन मिळाले होते. यशवंतरावांकडील संगीताच्या मैफिली, कथावाचन, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम, कलाकार-संगीतकार-साहित्यिक यांच्याशी गप्पांचे कार्यक्रम पाहण्याचे भाग्य या हॉलला मिळाले. वेणूताईंच्या निधनापर्यंत यात कधी खंड पडला नाही. साधारणत: १९६४-६५ नंतर सकाळी जवळपास तासभर इथे महाराष्ट्राचे दर्शन घडे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून दिल्ली पाहण्यासाठी आलेले लोक यशवंतरावांना भेटून मगच दिल्लीदर्शनासाठी जात. या लोकांना यशवंतरावांबद्दल इतका आदर होता, की हॉलमध्ये खुच्र्यावर न बसता सगळे जण खाली गालिच्यावरच बसत. वयस्कर स्त्रिया तर देवासमोर बसतात तसे हात जोडून बसत. इथे सर्वाच्या मनमोकळ्या गप्पा होत. यशवंतराव सर्वाची विचारपूस करीत. यात काही ओळखीचेही लोक असत. त्यांच्या कुटुंबाची यशवंतराव चौकशी करीत. गप्पांच्या ओघात अनेकदा त्यांना त्यांच्या मित्रांच्या अडीअडचणी कळत. नंतर एक समूह छायाचित्र घेतले जाई. चारच्या सुमारास फोटोग्राफर या छायाचित्रांच्या प्रती नेऊन देत असे. ही छायाचित्ररूपी स्मृती आजही अनेकांच्या घरात दिसेल. यशवंतराव दिल्लीत असेतो दिल्लीत अशा प्रकारे महाराष्ट्र दर्शन होत असे. महाराष्ट्रातील इतर कुणा केंद्रीय मंत्र्याकडे असं वातावरण वा प्रथा असल्याचे मला तरी कधी आढळले नाही. म्हणूनच मी म्हणतो : महाराष्ट्रातील जनता सदैव यशवंतरावांच्या पाठीशी राहिली. लोक त्यांना शेवटपर्यंत अत्युच्च आदर्श मानत राहिले. त्यांचा आदर करत राहिले. त्यांच्याबद्दल आदराची ही भावना आजही दिसून येते.

बंगला राहण्यास योग्य झाल्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात यशवंतराव नवीन बंगल्यात राहायला गेले. बंगल्याच्या आवाराचा दोन-तृतीयांश भाग समोर आणि एक- तृतीयांश भाग मागे.. ज्यात फळझाडे व भाज्यांसाठी खूप जागा होती. शिवाय, १२ सर्व्हट्स क्वार्टर्स होती. त्यातील चारांमध्ये निवासी खासगी सहाय्यक- जे पुढे सचिव झाले- त्यांनी आपल्यासाठी काही सुधारणा करून राहण्याची व्यवस्था करून घेतली.

यशवंतरावांचे खरे कौटुंबिक जीवन सुरू झाले ते इथे. या वास्तूने यशवंतरावांचे राजकीय, साहित्यिक, सांसारिक जीवन पाहिले. सुख पाहिले, दु:खाच्या छटाही पाहिल्या. उतार-चढाव पाहिले. आनंदाश्रू पाहिले. तसेच यशवंतरावांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या गंगा-जमुना पाहण्याचे दुर्भाग्यसुद्धा अनुभवले. चव्हाण कुटुंबात दसरा-दिवाळीपेक्षा तीन सणांना अधिक महत्त्व होते. पहिला महत्त्वाचा सण होता- मकर संक्रांत! यशवंतरावांकरता हा सण महत्त्वाचा होता. त्यांच्यासाठी हा सण म्हणजे सुख-दु:खाचे मिश्रण होता. यशवंतराव या दिवशी अतिशय महत्त्वाचे काम असले तरच दिल्लीबाहेर जात. त्यास कारणही तसेच होते. २ जून १९४२ रोजी लग्न झाल्यानंतर १३ जानेवारी १९४३ ही चव्हाण कुटुंबातील नवीन सुनेची पहिली संक्रांत. जरीची पांढरे ठिपके असलेली काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी मढवून सुनेची पहिली संक्रांत साजरी करण्याचा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आनंद काही वेगळाच असतो. परंतु त्या दिवशी वेणूताई तुरुंगात पोलिसांचा त्रास सहन करीत होत्या. सासूबाईंना न राहवून त्यांनी पुरणपोळ्यांनी भरलेला जेवणाचा डबा घेतला आणि त्या वेणूताईंना भेटायला गेल्या. परंतु तुरुंगाच्या आत जाऊन सुनेला पाहण्याचे धाडस न झाल्यामुळे त्यांनी बाहेरूनच तो डबा अधिकाऱ्यांकरवी आत पाठवला. ‘डबा पूर्ण संपवला तरच मी घरी जाईन..’ या निरोपासह! आपल्यामुळे वेणूताईंवर हा प्रसंग आला होता याची रुखरुख यशवंतरावांना होती. म्हणून या दिवशी यशवंतराव वेणूताईंच्या आनंदात सहभागी होत.

संक्रांतीच्या दिवशी वेणूताई सकाळी पाच-साडेपाचला उठत. सुगडांची (दरवर्षी त्या सुगड मुंबईहून घेऊन येत.) पूजा करीत. यशवंतरावही पूजेत सहभागी होत. पूजा झाली की बंगल्यातील सर्व सवाष्णींना- अगदी झाडूवाल्याच्या पत्नीलासुद्धा- बोलावून त्यांना त्या एकेक सुगड देत. सोबत हलवा व तीळगूळही वाटत. आश्चर्य वाटेल, पण त्या त्यांच्या पायाही पडत. यावरून वेणूताई किती सोज्वळ होत्या हे दिसून येतं. नंतर तीळगूळासोबत एकेक सुगड त्या माझ्याकडे व दुसरे सहकारी जोशी यांच्याकडेही पाठवीत. कार्यालयीन कामकाजाशिवाय यशवंतराव त्या दिवशी दुसरे कुठले काम ठेवत नसत.

वेणूताईंकरता मोठा सण होता- १२ मार्च.. यशवंतरावांचा वाढदिवस! यशवंतराव तयार होऊन आले की त्या त्यांना ओवाळत. नंतर उभयता दिवाणखान्यात येत. तोपर्यंत दिल्लीतील चमचे आणि भाटांनी दोन्ही दिवाणखान्यांत, लॉनवर गर्दी केलेली असे. ही मंडळी स्वत:च्या मुलांचे वाढदिवस एक वेळ विसरतील, पण नेत्यांचे नाही. ही मंडळी नेमकी कोण आहेत, हे समजण्यास मार्ग नसे. या दिवशी नेत्यासोबत काढलेले छायाचित्र ते सत्तेवर असेपर्यंत त्यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवी. आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाही, इतके मोठे भांडवल हे छायाचित्र या लोकांसाठी असे. दिल्लीची हीसुद्धा एक संस्कृती होती. आजही असावी. त्यातल्या निवडक लोकांना यशवंतराव थांबवून ठेवत. गर्दी कमी झाली की मग ते त्यांच्याशी गप्पा मारत. त्यावेळी इतके मोकळे वातावरण असे, की स्त्रियांनाही यशवंतरावांशेजारी बसण्यात वा त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यात कधी गैर वाटले नाही. वेणूताईंनाही यात काही गैर वाटत नसे. त्यावेळची ती संस्कृती होती. संस्कार होते. अनेक नेत्यांचे चारित्र्य स्वच्छ असे. कसल्याही डागाचा लवलेश नसलेले अनेक नेते, राज्यकर्ते त्याकाळी होते. यशवंतराव अशा नेत्यांपैकी होते. महाराष्ट्राने असा सर्वगुणसंपन्न नेता देशाला दिला याचा आजही अभिमान वाटतो.

वाढदिवस असला तरी यशवंतरावांची कार्यालयात जाण्याची वेळ टळत नसे. दुपारी घरी जेवायला मुंबई-कराडहून आलेली नातेवाईक मंडळी, मी व खासगी सचिव डोंगरे असत. गोडधोड व मटणाचा बेत असे. सगळा स्वयंपाक वेणूताईंच्या देखरेखीखाली होत असे. विशेष म्हणजे त्या दिवशी बंगल्यातील सर्व नोकरवर्गाला कुटुंबासह जेवण असे. तेही सर्वासाठी केलेलेच! सायंकाळी ऑफिसातून परत आल्यावर भेटीगाठीचा सकाळसारखाच कार्यक्रम असे. मला एका गोष्टीचे मात्र वाईट वाटे. मंत्र्यांना वाढदिवशी दिलेले बुके नंतर कचऱ्यात फेकले जातात. त्यावर उगाचच पैसे खर्च करण्याऐवजी एक फूल देऊन शुभेच्छा देता येणार नाहीत का, असा विचार मनात येई. आपल्या नेत्यावर मनापासून श्रद्धा असली म्हणजे झालं. मंत्र्यांना खरंच त्याचं काही वाटत नाही. त्यांची काही अपेक्षा नसते.

हा दिवस कसा सरला, हेच कळत नसे. पती-पत्नीचा दिवसभराचा आनंद टिपून ठेवण्यासारखा असे. वेणूताईंसाठी यशवंतराव मंगळसूत्राचे धनी होते, तर यशवंतरावांसाठी वेणूताई या गृहलक्ष्मी होत्या.

तिसरा सण होता- त्यांच्या लग्नाचा वाढदिवस! हा कुटुंबातील सदस्यांपुरताच सीमित असे. या दिवशीसुद्धा यशवंतरावांना ओवाळले जाई. एक मात्र खरं, की यशवंतराव सत्तेवर असोत वा नसोत; सत्तेवर असताना जे नातेवाईक मुंबई-सातारा-कराडवरून येत, तेच ते सत्तेवर नसतानादेखील येत. जेवणाचा बेत दोन-तीन दिवस अगोदरपासून ठरलेला असे. त्याची तयारीदेखील तशीच असे. वेणूताईंचा २ फेब्रुवारी हा वाढदिवसही तितक्याच उत्साहाने घरगुती वातावरणात साजरा होत असे.

वाढदिवस हा यशवंतरावांकरता त्यांच्या व्यस्त जीवनातील विरंगुळा असे, तर वेणूताईंकरता मुंबई सोडल्यामुळे नातेवाईकांसोबत दोन-तीन दिवस घालवल्याचा वेगळा आनंद होता. या कार्यक्रमांचा यशवंतरावांच्या सरकारी कामावर मात्र काही परिणाम होत नसे. ऑफिसला जायची वेळ तीच. रात्री जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सरकारी फाइलींचं वाचन. सगळं जसंच्या तसंच.

थोडय़ा अवधीतच यशवंतरावांनी संरक्षण मंत्रालयात आदराचे स्थान मिळवले. या खात्यातील अपप्रवृत्तींना तिलांजली देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भरघोस यश आले. एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. योग्य व कुशल नेतृत्व असलेला मंत्री मिळाल्याबद्दल सर्वानाच अभिमान वाटत होता. अधिकारी काम करतात ते त्यांच्या मंत्र्याच्या योग्यतेनुसार, कर्तृत्वानुसार. यशवंतरावांचे काम पाहून नेहरूंना यशवंतरावांबद्दल असलेल्या आपुलकीत, जिव्हाळ्यात, विश्वासात भरच पडली होती. एकदा सायंकाळी नेहरू आगाऊ न कळवताच यशवंतरावांना भेटण्यासाठी बंगल्यावर आले होते. दिवाणखान्यात मी आणि वेणूताई गप्पा करीत होतो. पोर्चमध्ये मोटारसायकलचा आवाज आला म्हणून (त्याकाळी पायलट म्हणून मोटारसायकलस्वार असे.) बाहेर आलो तर पंतप्रधानांची गाडी! आम्ही आश्चर्यचकित झालो. काहीसे भांबावलोही. भानावर येऊन मी त्यांना ‘या..’ म्हणालो. म्हटलं, ‘साहेब दौऱ्यावर गेले आहेत. वेणूताई आहेत.’ परंतु नेहरू गाडीतून न उतरताच म्हणाले, ‘मी येऊन गेल्याचं यशवंतरावांना सांगा.’ आणि ते निघून गेले. यशवंतरावांकरता तो गौरवाचा दिवस होता.

१९६४ सालात पं. नेहरूंमध्ये नित्याचा उत्साह लोप पावला होता. जवळच्या लोकांना ते जाणवत होतं. पण कोणी बोलत नव्हतं. यशवंतरावांनी घरगुती बोलण्यात एक-दोनदा नेहरूंनी चीनचं आक्रमण मनाला फार लावून घेतल्याचं ओघाओघात सांगितलं होतं. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं.

त्यांच्या सहकाऱ्यांच्याही हे नजरेस आलं होतं. एक मात्र खरं, नेहरू कितीही उत्साह दाखवत असले तरी आतून ते खचले असावेत. गेली चार-पाच वर्षे ‘नेहरूंनंतर कोण?’ याबाबत सतत चर्चा होत होती. त्यासंबंधी पुस्तके, लेख प्रकाशित होत होते.

अखेर देशालाच नाही, तर जगाला दु:खाच्या खाईत लोटणारा तो काळा दिवस उगवलाच. तो दिवस व तारीख होती..

ram.k.khandekar@gmail.com

मराठीतील सर्व सत्तेच्या पडछायेत.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about birthday celebrations of yashwantrao chavan
First published on: 24-06-2018 at 01:01 IST