राम खांडेकर

१९८९ ची लोकसभेची  निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय नरसिंह रावांनी राजीव गांधींना ठामपणे सांगितला. त्याला दोन कारणे होती. एक तर काँग्रेसमधील मूल्यात्मक बदलांमुळे, नव्या राजकीय संस्कृतीमुळे ते व्यथित झाले होते. आश्चर्य वाटेल अशी दुसरी अडचण होती ती आर्थिक! निवडणुकीचा खर्च झेपणे नरसिंह रावांना शक्य नव्हते. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीची साथ सोडणे राजीवजींना शक्य नव्हते..

मंत्रालयात विधानसभा उपाध्यक्षांसह आमदारांच्या जाळ्यांवर उड्या मुख्यमंत्री भेट देत नसल्याने टोकाचे पाऊल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Cm Eknath Shinde in Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!
CM eknath Shinde, seat allocation,
जागावाटपावर उशिरा रात्रीपर्यंत खल, समन्वयाने चर्चा सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
tirupati temple animal fat in laddoos row
चंद्राबाबू नायडूंच्या आरोपानंतरही तिरुपती मंदिरातील लाडूच्या विक्रीवर परिणाम नाही; गेल्या चार दिवसांत विकले गेले तब्बल ‘इतके’ लाडू
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
Jammu and Kashmir Assembly Elections 2024
काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नरसिंह रावांसोबत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना साधारणत: मंत्र्यांमध्ये दिसून न येणाऱ्या अनेक गुणांचा अनुभव येत गेला. पहिली गोष्ट म्हणजे ते स्वत:ची कामे स्वत:च करीत. गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर त्यांच्या खोलीत ठेवलेली सुटकेस परतीच्या प्रवासाच्या वेळी स्वत:च व्यवस्थित बंद करून तयार ठेवत. विशेष म्हणजे सकाळी केव्हाही निघायचे असो, त्यांना कधीही उठवावे लागत नसे. वेळेच्या अगोदरच तयार होऊन ते बाहेर येत. सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांच्यातील माणुसकी, गरिबी आणि गरिबांबद्दलची कणव, त्यांच्या अडीअडचणींची कल्पना हा होता.

एकदा मतदारसंघात दौऱ्यावर असताना मध्यान्हपूर्वीचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा उशिरा संपला. दुपारच्या कार्यक्रमावर याचा परिणाम होऊ नये म्हणून जेवण आटोपून लवकर निघण्याची गरज होती. नरसिंह रावांना दुपारी तासभर तरी वामकुक्षी मिळाली, की त्यांना थोडा उत्साह वाटे. परंतु त्या दिवशी ते २० मिनिटेच डुलकी घेऊन तयार होऊन गाडीजवळ आले. गाडीत बसणार तोच त्यांना सांगण्यात आले, की गाडीचालक जेवतो आहे. तो जेवण अर्धवट सोडून उठण्याच्या बेतात होता. नरसिंह रावांना ही गोष्ट सांगताच ते म्हणाले, ‘‘त्यांना पोटभर आरामात जेवण करू द्या. घाई करू नका. आपण थोडा वेळ थांबू.’’ ते परत दिवाणखान्यात येऊन बसले. राज्यातील मंत्र्यांचा अनुभव वेगळा असल्यामुळे हे दृश्य पाहून त्या चालकासह सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता.

एकदा हैदराबादच्या दौऱ्यात एका गावात नरसिंह रावांच्या मित्राकडे दुपारचे जेवण होते. सर्वाना वाढल्यानंतर जेवण्यास सुरुवात केली. मी पोळीचा तुकडा सांबारमध्ये बुडवून तोंडात टाकताच तिखटाने तोंड असे भाजले, की त्यानंतर सर्व पोळी अगदी हळूच सांबार दाखवतच खाल्ली. नरसिंह राव हे पाहत होते. शेवटी आंध्रमधील पद्धतीप्रमाणे भात व त्यासोबत आले होते साधे वरण. भूक लागली असल्यामुळे मी भात थोडा जास्तच घेतला. मी भराभरा जेवत आहे हे पाहून नरसिंह रावांनी आपले शेवटच्या घासाचे जेवण थोडे हळू करून मंडळींना गप्पांमध्ये रंगवले. माझे जेवण संपत आल्यावर त्यांनी जेवण आटोपले होते. गाडीत बसल्यानंतर त्यांनी विचारलेला प्रश्न ऐकून आश्चर्य वाटले – ‘‘खांडेकर, उपाशी राहिलात ना? इथे असेच जेवण असते.’’ या प्रसंगानंतर कोणाकडे जेवावयास गेलो, की ते तिथे गेल्यानंतर प्रथम मला साधे वरण व नसेल तर दही वाढण्यास त्यांच्या भाषेत सांगत. त्यांच्या माणुसकीचे असे किती अनुभव सांगू?

१९८५ च्या डिसेंबर महिन्यात नरसिंह राव रात्री संगणकावर नवीन शिक्षण धोरणाच्या प्रारूप मजकूर लिहित होते. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांना चहाची गरज भासली. कारण आणखी दोन तास तरी काम करावे लागणार होते. त्यांनी बझर देऊन रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यास उठवून आणण्यास सांगितले. थंडीचे दिवस असल्यामुळे कर्मचारी तयार होऊन रात्रपाळीच्या माणसाला बोलावण्यासाठी बाहेर पडला. एवढय़ात नरसिंह रावांनी बाहेर येऊन त्याला थांबवले व म्हणाले, ‘‘गादीतूनच तो सांगेल दूध नाही वा साखर नाही म्हणून, त्यापेक्षा बाहेरून चहा घेऊन या.’’

माझ्यावरील त्यांचा पूर्ण विश्वास आणि त्यांच्यातील माणुसकी यांची सांगड घालून याचा उपयोग सर्वसाधारण लोकांसाठी कसा करता येईल, याचाच मी विचार करत असे. पाच खात्यांपैकी शिक्षण खात्यात फारसे काही करण्यासारखे नव्हते. होते ते फक्त केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश. खरे तर ही शाळा काढण्याचा उद्देश हा होता की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या मुलांना केव्हाही शाळेत ताबडतोब प्रवेश मिळावा. पहिली काही वर्षे या शाळांचा दर्जासुद्धा अतिशय उत्तम होता. परंतु सरकारी मालमत्ता आपलीच आहे असेच लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे धोरण असल्यामुळे पुढे संसद सदस्यांचा कोटा, मंत्र्यांचा कोटा यामुळे वर्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर वर्षी प्रवेश दिला जाऊ  लागला. त्यामुळे या शाळा पुढे बजबजपुरीच झाल्या असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी मात्र पर्सनल स्टाफची नाराजी पत्करून या कोटय़ाच्या संख्येवर बंधन घालण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु एकदा सर्व प्रवेश पूर्ण झाल्यानंतर शाळा नियमितपणे सुरू झाल्या असताना एक सैनिक आपली पत्नी व दोन मुलांसह आला आणि एका मुलाला केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्याची विनंती करू लागला. शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी शिफारस करण्याची पद्धत नव्हती. मनात आले, एक सैनिक आपल्याकडे काय मागतो आहे, मुलाला प्रवेशच ना! मी त्याला बसवून चहा वगैरे दिला आणि नरसिंह रावांच्या कानावर ही गोष्ट घालून केंद्रीय विद्यालयांच्या अध्यक्षांना फोन केला. साहेबांचे नाव सांगून त्याच्या मुलाला प्रवेश मिळवून दिला. म्हटले, एखाद्या सैनिकाचे चांगले होत असेल तर थोडे हटके वागावयास काय हरकत आहे? माणूस नियमांसाठी नसतो, नियम माणसांसाठी असतात ना!

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिकारात सांस्कृतिक व समाज कल्याण विभाग होते. याचा उपयोग मात्र मी योग्य ठिकाणी अवश्य करून घेतला. १९८७ मध्ये ‘लोकसत्ता’तील तीन बातम्यांकडे माझे लक्ष वेधले गेले. पहिली बातमी होती एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी. त्यांच्या कार्यक्रमाचा तंबू गहाण होता. ते त्यांच्या उपजीविकेचे साधन. सर्वच दिवस सारखे नसतात ना! दुसरी बातमी होती मराठी चित्रपटांतील एकेकाळच्या प्रसिद्ध नटी शांता हुबळीकर यांच्याविषयीची. आर्थिक विवंचनेमुळे त्या वृद्धाश्रमात आयुष्य कंठत असल्याचे बातमीत म्हटले होते. तर तिसरी बातमी होती के. टी. देशमुख यांच्या अपघाती मृत्यूची. देशमुख हे नाटय़क्षेत्रात काम करीत असले तरी त्यांचा परिचय या क्षेत्रात काम करणाऱ्यांना फारसा नव्हता. त्यांचा छंद होता जुन्या नाटकांतील साहित्याचा- अगदी तिकीटे, हँडबिलपासून नाटकाच्या पडद्यापर्यंत- संग्रह करण्याचा! त्यांची आर्थिक स्थिती अगदी बेताची असूनही त्यांनी हा छंद जोपासला होता. लोकांच्या घरी अगदी माळ्यावर चढून, तर कधी अडगळीच्या खोलीत जाऊन त्यांनी जवळपास चार मोठय़ा पेटय़ा भरतील एवढे साहित्य गोळा केले होते. खरे तर हा अमूल्य ठेवा होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो महाराष्ट्र सरकारने घेतला होता. नरसिंह रावांनी हे साहित्य दिल्लीतील ‘इंदिरा गांधी कल्चरल सेंटर फॉर आर्ट’मध्ये ठेवण्याचे ठरवले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने जबाबदारी स्वीकारली म्हणून हा विचार सोडून दिला गेला.

या तिन्ही कलाकारांविषयी आलेल्या बातम्यांची कात्रणे आर्थिक मदतीच्या शिफारशीसह मी नरसिंह रावांकडे पाठवली. काही दिवसांतच प्रत्येकी दहा हजार रुपयांची (त्या काळचे) मदत त्यांना पाठवण्यात आली. जिथे अर्ज करून, वारंवार फेऱ्या मारूनही मदत मिळत नाही तिथे केवळ बातमी वाचून मदत पाठवण्याचा शासनातील हा प्रकार पाहून त्या वेळचे ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांनी नरसिंह रावांना पत्र पाठवून आश्चर्य व्यक्त केले होते आणि शुभेच्छाही दिल्या होत्या. तसे पाहिले तर हे राज्य सरकारचे काम होते.

राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा कारभार एकविसाव्या शतकाच्या दिशेने प्रगतिपथावर होता. मात्र, १९६६ ते १९८१ असा दीर्घ काळ सत्ता उपभोगलेल्या, पण १९८५ साली सत्तेचा वाटा न मिळालेल्या एका संसद सदस्याच्या नेतृत्वाखाली आणि एका ‘गॉडफादर’च्या आशीर्वादाने १९८७ साली राजीवजींना हटवण्याचा प्रयत्न सुरू झाला. एका उच्चपदस्थ व्यक्तीला पंतप्रधानपदासाठी आग्रह करण्यात आला. पाठपुरावा करूनही त्या गृहस्थांनी मान्यता न दिल्यामुळे हा बेत रद्द करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. दिल्लीत सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्यांचे भरघोस पीक आहे. त्यांना देशाच्या भविष्यासंबंधी सोयरसुतक नसते; असतो तो केवळ स्वार्थ! या कारस्थानाची माहिती फारशी कोणाला, अगदी प्रसार माध्यमांनाही कळली नव्हती. त्या गटातील एकानेच ही गोष्ट नरसिंह रावांना तेव्हा सांगितली होती. ही योजना यशस्वी झाली असती, तर मुख्यमंत्र्यांच्या पदासारखेच पंतप्रधानांचे पदही खो-खोचा खेळ झाले असते.

एक गोष्ट मात्र खरी, की राजीवजींच्या कारकिर्दीतील शेवटची दोन वर्षे फारशी चांगली गेली नाहीत. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे १९८९ च्या शेवटी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे ठरले. नरसिंह रावांनी निवडणुकीस उभे न राहण्याचा आपला निर्णय राजीवजींना ठामपणे सांगितला. त्याला दोन कारणे होती. एक तर यशवंतरावांना जे वाटत होते तेच नरसिंह रावांना वाटू लागले होते. काँग्रेसमधील मूल्यात्मक बदलांमुळे, नव्या राजकीय संस्कृतीमुळे ते व्यथित झाले होते. नरसिंह रावांसारखे असे विचारशील व्यक्तिमत्त्व काँग्रेसमध्ये पुढे निर्माणच झाले नसावे. आश्चर्य वाटेल अशी दुसरी अडचण होती ती आर्थिक. निवडणुकीचा खर्च झेपणे नरसिंह रावांना शक्य नव्हते. कारण चुकीच्या मार्गाने त्यांनी पैसा कमावलेला नव्हता. सतत अधिकारपदावर राहिलेल्या व्यक्तीचे हे कारण सर्वसामान्यांना न पटणारे आहे, पण ते सत्य होते.

नरसिंह रावांच्या इच्छेला मान देऊन त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही; पण त्यांच्यासारख्या व्यक्तीची साथ सोडणे राजीवजींना शक्य नव्हते. कारण गेली पाच वर्षे नरसिंह रावच त्यांचे खरे सल्लागार होते. राजीवजींची काम करण्याची पद्धत थोडी हटके होती. ते रात्री तीन-साडेतीनपर्यंत काम करायचे. सर्व बैठकासुद्धा याच वेळात व्हायच्या आणि अधूनमधून ते नरसिंह रावांनासुद्धा बोलावून घेत. म्हणून नरसिंह रावांच्या पोर्चमध्ये चोवीस तास गाडी व चालक तयार असे. शेवटी अर्ज भरण्यास दोनच दिवसांचा अवधी असताना ‘संपूर्ण आर्थिक मदत पक्षाकडून दिली जाईल’ असे आश्वासन देऊन त्यांना पुन्हा रामटेक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. अर्ज भरल्यानंतर तेथील आढावा घेतला तेव्हा नरसिंह रावांच्या लक्षात आले की, ‘आंध्रचे पार्सल परत पाठवा’ अशी भावना मतदारांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. तसेच काँग्रेसच्या काही आमदारांविरुद्धही जनतेत रोष होता. असे असले तरी एकंदरीत जनतेचा नरसिंह रावांना भरपूर पाठिंबा होता. याचे कारण आधीची पाच वर्षे मतदारसंघात फिरत असताना मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच ते वावरत होते आणि मतदारसंघ व मतदारांची कामे चोखपणे करीत होते. तसेच पत्रव्यवहाराने सतत संपर्क ठेवून होते.

प्राथमिक खर्चाची रक्कम माझ्या स्वाधीन करून अर्ज भरल्यानंतर नरसिंह राव पक्षाच्या कामासाठी दिल्लीत गेले. नंतर उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिवशी रात्री दोन-तीन दिवसांच्या मुक्कामासाठी ते नागपूरला परत आले. स्थानिक कार्यकर्ते, आमदारांसोबत बसून निवडणूक प्रचाराची रूपरेषा ठरवली. माझ्यासोबत खर्चाचा आढावा घेऊन रकमेचा दुसरा हप्ता माझ्या स्वाधीन केला. तीन दिवस प्रचार करून पाकिस्तानमध्ये असलेल्या एका आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी ते दिल्लीला गेले. दोन दिवसांची बैठक आटोपून दिल्लीत परतल्यानंतरही पाच-सहा दिवस ते मतदारसंघात जाण्यासाठी नागपूरला आलेच नाहीत. आमदार, कार्यकर्ते सतत ‘ते का येत नाहीत, प्रचार थंडावत चाललाय, असे कसे चालेल’ वगैरे मते नोंदवून नाराजी व्यक्त करीत होते. ते बरोबरही होते. कारणाची मला कल्पना आली होती. एकदा मागूनही कोषाध्यक्षांनी त्यांना पैसे दिले नाहीत. मात्र राजीवजींना हे कळले तेव्हा त्यांनी स्वत: व्यवस्था करून  दिली. एवढेच नव्हे, तर वाया गेलेल्या वेळेची भरपाई व्हावी म्हणून चार दिवसांसाठी हेलिकॉप्टरसुद्धा देण्याबाबत संबंधीतांना सूचना दिल्या. तसेच पुढील रक्कम कोणाकडून घ्यायची, हेदेखील सांगितले. ही रक्कम माझ्या स्वाधीन करून ते प्रचारासाठी बाहेर पडले. खरे तर निवडणुकीचा मला अजिबात अनुभव नव्हता. तसेच एवढी रक्कम कधी स्वप्नातही पाहिली नव्हती. त्याचे वाटप कसे करायचे, हेही माहीत नव्हते. परंतु पाण्यात पडले की पोहता येते, तसेच माझे झाले. थोडय़ा अवधीतच हे ज्ञान मला प्राप्त झाले. नरसिंह रावांची ही निवडणूक म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखी ठरली. इतक्या कमी पैशांत निवडणुकीचा खर्च करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे होते.

नरसिंह रावांसारख्या- मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेल्या- नेत्याला या निवडणुकीत फार कटू अनुभव आले. महत्त्वाचं म्हणजे घरासमोर गाडय़ांचा ताफा असूनही फारसे कोणी प्रचारासाठी आपली गाडी काढत नव्हते. शिवाय कनवटीचा एक पैसाही खर्च करण्याची कोणाची तयारी अशावेळी नसते. आजूबाजूच्या मतदारसंघांत गाडय़ांचे ताफे फिरत असताना मी मात्र अगदी मोजक्याच जीप्स भाडय़ाने घेतल्या होत्या आणि विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघासाठी एक जीप दिली होती. एक माझ्यासाठी ठेवून दोन इतर कार्यकर्त्यांसाठी ठेवल्या होत्या. माझी सर्व मदार कार्यकर्त्यांवर होती. त्यांना जास्तीत जास्त प्रचारसामग्री आणि मागितले त्यापेक्षा जास्त पैसे देत असे. कारण ते निष्ठेने हे कार्य करीत होते. माझ्या कामात मात्र शेवटपर्यंत दोन-तीन व्यक्तींनी सतत साहाय्य तर केलेच, शिवाय योग्य ते मार्गदर्शनही करत राहिले, सावध करत राहिले. कारण माझ्या स्वभावाला ही जबाबदारी मानवणारी नव्हती. मी नरसिंह रावांच्याही कानावर ही गोष्ट घातली. या लोकांसाठी काही तरी करण्याची त्यांची शेवटपर्यंत इच्छा होती, परंतु स्थानिक राजकारण त्यांना काही करू देत नव्हते.

काही आमदारांच्या बऱ्याच सूचना मी ऐकल्या- न ऐकल्यासारख्या केल्या. उदाहरणार्थ, कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था करणे शक्य नव्हते. यामुळे त्यांची नाराजी मला पत्करावी लागली. कार्यकर्त्यांसाठी पितळी पंजाचे बिल्ले वगैरे मी बाजूलाच असलेल्या दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवाराच्या कार्यालयातून घेऊन येत असे. कारण ते तयार करून घेणे खर्चात बसत नव्हते.

मात्र, इतक्या विपरीत परिस्थितीतही नरसिंह रावांनी भरघोस मतांनी ही निवडणूक जिंकून पक्षास बळ दिले होते. या काळात जवळपास तीन आठवडे मी केवळ एक वेळ जेवण करी आणि कसेबसे दोन तास झोपत असे. कारण रात्री सर्व लोक गेल्यानंतर हिशेब करीत बसत असे. साधारणत: रात्री दीड-दोनच्या सुमारास नरसिंह राव प्रचाराहून येत तेव्हा दिवसभरातील सभांचा वृत्तांत सांगत. मग मी त्यांना दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम व महत्त्वाच्या घडामोडी सांगत असे. आश्चर्य म्हणजे या काळात मी काय करतो आहे, कसे करीत आहे, पैसा कुठे व कसा खर्च होत आहे, याबाबत एका शब्दानेही नरसिंह रावांनी कधीही विचारले नाही. इतरांजवळ बोलताना त्यांनी माझे कौतुकच केले होते. किती मोठेपणा हा!

१९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आंध्रमध्ये आणि नंतर १९८९ मध्ये रामटेकमध्ये आलेला कटू अनुभव लक्षात घेऊन १९९१ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय नरसिंह रावांनी घेतला. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही यावर ते ठाम होते. परंतु म्हणतात ना, दैव जाणिले कोणी! नरसिंह रावांचा हा निर्णय नियतीलाही मान्य नसावा!

ram.k.khandekar@gmail.com