मुकुंद तळवलकर
अण्णा… हो, माझ्यासाठी अण्णाच! हे तुझं जन्मशताब्दी वर्षं… मनात कित्येक आठवणी दाटून येतायत… २५ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीत रामनगरमधील बोडस कार्यालयासमोर जी चाळ आहे तिथे तुझा जन्म झाला. त्या चाळीत गोपीनाथ काका व एस. एम. जोशी हे मुंबईला कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपल्या येथे काही महिने राहात होते. माझा जन्म १९२८ साली वाटवेकाकांच्या समोरच्या चाळीत झाला. आपण दोघं रेल्वे रूळ ओलांडून लोकल बोर्डाच्या शाळेत जात असू. रामनगरमध्ये तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडं होती. आता आठवलं की हसायला येतं, की आपण शाळेत जाताना रंगबेरंगी कपडे घातलेले असत. पुढे तू दादरला शिकावयास गेलास. नंतर सार्वजनिक जीवनात तू रमू लागलास. गोविंद करसन लायब्ररीमध्ये तू सेक्रेटरी म्हणून काम करू लागलास. तू निरनिराळी पुस्तके आणलीस. दिवाळी अंक आणलेस. दलालांचा ‘दीपावली’ अंक हे मुख्य आकर्षण असायचं. त्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. तसंच चित्रकलेबद्दल रुची निर्माण झाली. तू अभ्यास मंडळ स्थापन केलंस. त्यात प्रोफेसर पारीख, ह. रा. महाजनी, अशी मंडळी येत असत, स. गो. बर्वे यांच्या प्रचारात तू खूप काम केलंस. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि याचं तुला फार दु:ख झालं.
आर्थिक परिस्थितीमुळे तुला परदेशी टपाल खात्यात नोकरी करावी लागली. पुण्यात शंकर नामदेव यांच्या वर्तमानपत्रात तू काम केलंस. त्यामुळे तुला आपले काका गोपीनाथ यांचा सहवास लाभला. त्यात भरपूर वाचावयास मिळालं. श्री. के. क्षीरसागर यांची घनिष्ट मैत्री झाली. बापू पणशीकर, अत्रे, श्रीराम शिधयेच्या वडिलांशी तर तुझी घट्ट मैत्री होती. सर्वांनाच वाचनाची आवड असल्यामुळे त्यावर चर्चा चालायच्या. ठाकुर्लीजवळील खाडीजवळ बसून आपण सर्व गप्पा मारत असू. एकदा तू गणपती देवळात नाटकात कामसुद्धा केलं होतंस. तुझ्याबरोबर मी ‘मेट्रो’मध्ये अनेक इंग्लिश सिनेमे पाहिले. तुझ्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांची गाणीही ऐकता आली. केसरबाई केरकर, बिस्मिल्ला खॉं, उस्ताद अमीर खॉं वगैरे… ‘शाकुंतल’ शिकण्याच्या निमित्ताने एक शकुंतला तुझ्या जीवनात आली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. त्याकाळीसुद्धा तू रजिस्टर लग्न केलंस आणि लवकरच त्या प्रेमाच्या वेलीवर एक कळी उमलायची होती, पण ती तशीच कोमेजली. ती कळी म्हणजेच एक मुलगा होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत निरुपमा या सुंदर मुलीचा जन्म आणि त्यानंतर सुषमाचा जन्म झाला. दोघीही खूप हुशार आहेत.
निरुपमास मेडिकलसाठी प्रवेश मिळू न देण्यामध्ये राजकारण्यांचा हात होता. अखेर तिला लंडनला जाऊन डॉक्टर व्हावं लागलं. नंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. माझी अर्धांगिनी एकदा आजारी होती. बॉम्बे हॉस्पिटलच्या मोठ्या डॉक्टरांनाही काही निदान होईना. त्यावेळी निरुपमा मुंबईत आली होती. तिने रिपोर्ट बघून औषध दिलं आणि ती बरी झाली.
याच राजकारण्यांनी अग्रलेखांमुळे तुझ्या राजीनाम्यासाठी मालकांकडे तगादा लावला होता. पण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ समुहाचे अध्यक्ष, मालक अशोक जैन यांनी त्याला दाद दिली नाही. तुला अनेक पुरस्कार मिळाले. त्याची मोठी बातमी तू कधीही देऊ दिली नाही. छोटीशीच बातमी छापायचास. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा संपादक झाल्यानंतर डोंबिवलीत तुझा मोठा सत्कार झाला. त्यात मोठमोठे दिग्गज लेखक आले होते. पुलं, गदिमा, पु. भा. भावे, भालचंद्र पेंढारकर… शं. ना. नवरेंनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
तुला तुझ्या एका सहकाऱ्याने खूप मनस्ताप दिला होता. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात त्यानं दारू पिऊन गोंधळ घातला होता. व्यंकटेश माडगूळकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते तेव्हा त्या वार्ताहराने दारूच्या नशेत तो वृत्तांत दिलाच नाही. एक वार्ताहर पुण्याला राहतो म्हणून तू त्याला पुण्याला पाठवलं तर त्याने तिकडे नुसतीच मजा मारली… या सर्वांचा तुला किती त्रास झाला असेल? त्यावेळी तुझी अस्वस्थता मी पाहिली आहे. असो.
तू वाचनात इतका गुंतलेला असे की तुला भेटावयास येणाऱ्यास तुझ्याशी काय बोलावे हेच कळत नसे. कोर्टकचेऱ्या तुझ्या स्वभावात नव्हतं. दुसऱ्यांनी केलेल्या चुकांसाठी तुला माफी मागावी लागत असे.
अमेरिकेच्या दुसऱ्या टोकाला तू राहात होतास. आता तू नाहीस. तेव्हा तू सांगितल्याप्रमाणे आजही अगदी नियमितपणे न चुकता माझ्या पुतणींची चौकशी करतो…. तुझ्या जन्मशताब्दीनिमित्त या सर्व आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि मी व्यक्त झालो. बस्स एवढेच!
lokrang@expressindia.com