सारंग आणि संगीता दोघेही माझे चांगले मित्र. ते औषधाला येतात तेव्हा माझी मोठीच परीक्षा असते. दोघंही आपापले आजार कधीच सांगत नाहीत, एकमेकांचे सांगतात. त्याची कारणं शोधताना एकमेकांबद्दल तक्रारींचे पाढे वाचता येतात ना! आणि बोलताना मधूनच दोघंही एकाच समेवर येत असतात. सारंग म्हणतो, ‘तू कायम संगीताची बाजू घेतेस.’ संगीता म्हणते, ‘तू तुझ्या लाडक्या मित्राचीच बाजू घेणार.’
यावेळी ते सहा महिन्यांनी तरी आले असावेत. ‘संगीता.. अगं, किती खराब झाली आहेस तू?’ तिला बघूनच मला चिंता वाटली.
‘मी हैराण झाले आहे जाम. अगं, झोपच येत नाही मला रात्रीची. गेले तीन महिने झाले- रात्र रात्र झोप नसते मला. नुसती या कुशीवरून त्या कुशीवर..’ संगीता सांगत होती.
‘आणि मग दिवसभर गात असते-‘करवटे बदलते रहे सारी रात हम..’’ सारंगला कधीही चेष्टा सुचते.
‘याचं काय जातंय चेष्टा करायला? हा घोरत असतो जोरजोरात. बायकोला झोप लागली/ नाही लागली- याला काय त्याचं?’ संगीता फणकारली.
‘नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुला झोप येत नाही हा, की सारंगला येते आणि तो घोरतो हा?’ मीही सारंगच्या चेष्टेच्या सुरात सूर मिसळला.
‘तसं नाही गं..’
‘म्हणजे मला म्हणायचंय की, याच्या घोरण्याच्या आवाजानं तुला झोप येत नाही का?’ मी सारवासारव केली.
‘त्याचं घोरणं आजचं नाहीये गं. कित्येक र्वष झाली त्याला. मला आता सवय झाली आहे त्या आवाजाची..’ संगीता म्हणाली.
‘त्याबाबतीत तिची अवस्था ‘पुष्पक’मधल्या कमल हसनसारखी आहे. एकदा मला दाखवायला पुरावा म्हणून हिनं माझ्या घोरण्याचा आवाज मोबाइलवर रेकॉर्ड केलाय. मी फिरतीवर असलो की उशाला लावून झोपते. त्याशिवाय तिला झोप येत नाही,’ सारंग हसत म्हणाला.
‘हो, पण इतकी झोप उडायला झालंय काय अचानक? काही तणाव, आर्थिक समस्या, मुलांची समस्या, तुमचं भांडण, कुणाचं मोठं आजारपण.. काय झालं?,’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘यातलं काहीच नाही. काय झालंय, तेच तर समजत नाही मला.’
‘आणि तू तर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहेस ना?’ – मी.
‘हो ना!’
‘मग करतेस काय दिवसभर?,’ मी विचारलं.
‘तशी घरातली सगळी कामं असतातच सकाळी साडेपाचपासून. वेळ मिळतोच कुठे?’ – संगीता.  
‘दुपार तर मोकळी मिळत असेल ना?’
‘हो. ते नशीबच. रात्री झोप लागत नाही म्हणून मी दुपारी झोपते. तेवढी तरी विश्रांती.’ रुग्णाकडे वकिली मुद्दे तयार असतात.
‘किती वेळ झोपतेस दुपारी?’
‘तीन- साडेतीन तास होते फक्त. सई यायची वेळ होते तोपर्यंत..’ संगीता निरागसपणे म्हणाली.
‘फक्त?!’ माझ्या भुवया उंचावल्या. ‘दुपारी इतकं झोपल्यावर रात्री झोप कशी लागेल?’
‘तरी रात्रीच्या झोपेपेक्षा कमीच होते ना?’  संगीताचा भाबडा प्रश्न.
‘आणि जेवणखाण काय चालू आहे?’ माझी तपासणी सुरू झाली.
‘तेच सांग तिला समजावून.’ सारंगने तक्रारीसाठी तोंड उघडलं. ‘अगं, ही घरी बसायच्या आधी कंपनीत हिच्या काही तपासण्या झाल्या. फुकटची डोकेदुखी आहे यार ती. त्यात हिचं  cholesterol- towards upper लिमिट निघालं. म्हणजे आहे नॉर्मलच; पण वरच्या आकडय़ाच्या जवळ. त्याहीपेक्षा मी म्हणेन खालच्या आकडय़ाला लांब. तर मॅडमनं सगळ्या घरादाराच्या खाण्यावर बंधनं आणलीत. तळलेले पदार्थ तर लांबच; पण तेल, तूप, संध्याकाळचा भात, गोड पदार्थ- सगळ्याला रेशन लागलंय. आणि स्वत:चा तर काय अवतार करून घेतलाय तू बघतेच आहेस. घरी राहून वजन वाढू नये म्हणून जेवण कमी केलंय हिनं.’
‘हो. पण मग आम्ही सगळे सारखंच जेवण जेवतो ना? तरी यांना सगळ्यांना लागतात की झोपा! सागरला तर शाळेतही झोप येते म्हणतो तो. पुढे तेच सांगायचंय तुला, की सारंग आणि सागर यांना भयंकर झोप येते, त्यासाठी औषध लागेल.’
संगीता एका मोठय़ा चक्रव्यूहात अडकली होती खरी. आहारात काही महत्त्वाचे बदल आणि थोडे औषधोपचार यानं ते पूर्ण कुटुंब या चक्रव्यूहातून लवकरच बाहेर पडलं.
अनिद्रा, खंडित निद्रा किंवा अतिनिद्रा या तक्रारी आजकाल बऱ्याचजणांमध्ये आढळतात. प्रत्येक मनुष्याची भूक आणि झोप यांचा एकमेकांवर थेट परिणाम होत असतो, हे लवकर लक्षात येत नाही.
ताणतणाव, चिंता, एखादा आजार, तीव्र वेदना, खूप आनंद, असुखकर बिछाना ही कुठलीही कारणं नसतानाही नीट झोप लागत नसेल तर आहार तपासून बघावा लागतो. भुकेपेक्षा कमी जेवणं, रूक्ष आहार, भूक लागलेली असताना जेवायची टाळाटाळ करणं, चहा-कॉफीचं अतिसेवन ही झोप कमी होण्याची मुख्य कारणं आहेत. झोप नाही म्हणजे रात्री जागरण. ‘रात्रौ जागरणं रूक्षमे.’ रात्रीच्या जागरणाने पुन्हा शरीरातली रूक्षता वाढते.. की झोपेचं दुष्टचक्र चालूच  राहतं. त्यातून पुढे अंगदुखी, डोकं जड होणं, जांभया, अपचन, अभ्यास ग्रहण न होणं, चक्कर, वेगवेगळे वाताचे आजार निर्माण होतात. (आजची लहान बाळं रात्री उशिरापर्यंत जागतात ते किती घातक आहे बघा.) निद्रानाशाच्या रुग्णांनी आहारात तेल आणि तूप यांचा योग्य वापर करायला हवा. जेवणात गहू, तांदूळ, जायफळ आणि वेलदोडा घालून केलेल्या विविध प्रकारच्या खिरी, नारळी भात, दही आणि खडीसाखर, पांढऱ्या कांद्याची दह्य़ातली कोशिंबीर, दह्य़ातल्या अन्य कोशिंबिरी यांचा समावेश ठेवावा. रात्री झोपताना अर्धा कप म्हशीचं दूध आणि एक चमचा तूप घ्यावं. रात्री उशिरा जेवलं तरी झोप नीट लागत नाही. पण बऱ्याचजणांच्या हे लक्षातच येत नाही. किंबहुना, झोप लागणार नाही, या भीतीनं कितीही उशीर झाला तरी पोटभर जेवण घेतलं जातं. ते टाळायला हवं. शरीराला व्यायाम नसेल तर भूक आणि झोप दोन्ही बिघडतात. त्यामुळे अनिद्रेच्या रुग्णासाठीही व्यायाम आवश्यकच आहे. प्रमेह, हृदयरोग अशा कारणांमुळे ज्यांना वर सांगितलेले आहारातले बदल करता येणार नाहीत त्यांना मात्र मसाज, शिरोधारा, मात्राबस्ती असे बाह्य़ उपचार करावे लागतात.
झोपेसंबंधित दुसऱ्या प्रकारचे रुग्ण असतात अतिनिद्रेचे. त्यांना कधीही, कुठेही, कितीही झोप येते. तशी ती पहिल्या बाजीराव पेशव्यांनाही यायची म्हणे. पण ते पेशवे होते. त्यांची झोप त्यांच्या आज्ञेबाहेर नव्हती. त्यांच्या हुकमानं यायची आणि त्यांच्याच हुकमानं उडायची. आपल्या आजच्या तरुण पिढीला मात्र अतिनिद्रेनं ग्रासलं आहे. (असं त्यांच्या पालकांचं मत असतं.) ‘जवानी निंदभर सोया’ अशीच अवस्था आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसाकाठी किमान सहा ते आठ तास झोप आवश्यक असते. रात्री अशी पूर्ण झोप होऊनसुद्धा दिवसा झोप येत असेल तरच तिला अतिनिद्रा म्हणता येईल. अतिनिद्रेत घाईघाईनं वर सांगितलेले पदार्थ बंद करण्याचा निर्णय नाही घ्यायचा. कारण गहू, तांदूळ, गायीचं तूप हे पदार्थ विद्यार्थीदशेत मुलांना आवश्यकच असतात. बंद करायचं ते म्हशीचं दूध, आईस्क्रीम, कॅडबरी, केक, चीज, पिझ्झा, मांसाहार, मिठाई इत्यादी पचायला जड पदार्थ.  
ताक, लाह्य़ांचा चिवडा, लाहीपीठ, गायीचं दूध असे पचायला हलके पदार्थ त्यांना द्यावेत. शहरी विद्यार्थ्यांचा व्यायाम बंद, बैठा उद्योग आणि पोषक आहाराचा मारा ही झोप वाढण्याची कारणं आहेत. ती टाळायला हवीत.
याउलट, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना कष्टाच्या मानानं तेवढा पोषक आहार मिळत नाही. मग आवश्यक पोषण आणि बळ मिळविण्यासाठी शरीर स्वत:च झोपेचा मार्ग स्वीकारतं. उपाशी मुलं शाळेत हमखास झोपतात. या मुलांना पोषक आहार दिला तर त्यांची झोप कमी होऊ  शकते.
तात्पर्य- योग्य आहार पोटी, तर नको झोपेची गुटी.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sleep doesnt come
First published on: 07-12-2014 at 12:51 IST