रवींद्र दामोदर लाखे

एकूण मराठी साहित्यात साठून राहिलेल्या शिळेपणाने बधिर झालेल्या वाचकाला त्याच्या कल्पनेपलीकडील वातावरणात नेल्याने, त्याच्या मेंदूतील पेशी न् पेशी आपला शिळेपणा टाकून देतील; नि तो आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहील यासाठी मज्जारज्जूचे कार्य नव्या घडीत कसे बसेल असा विचार करणारा हा नवा लेखक आहे. तो कल्पित वास्तव रचून आजचे राजकारण, समाजकारण आणि माणसाच्या मनोविश्वावर नवे भाष्य करतो..

आपण जागच्या जागी आहोत, पण आपला आपल्याला पत्ता नाही, अशा अवस्थेत आपण किंवा आजचं सर्व जग जगत आहे. आपल्याला कुणी तरी पत्ता शोधण्याच्या कामाला लावतो आणि तो पत्ता मात्र आपल्याला मिळता मिळत नाही. ज्या प्रदेशात आपण राहतो तो प्रदेश नक्की आपलाच आहे का, असा संभ्रम निर्माण व्हावा असं भवताल सतत बदलत राहतं आहे. स्वप्निल चव्हाण याच्या ‘रज्जूत मज्जा’ या शोधक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतला प्रदेश हा आपल्याला अनोळखी आहे किंबहुना अज्ञात आहे. वाचकाला ते तसंच अज्ञात वाटावं असा प्रयत्न लेखकाने हेतुत: केला आहे.
स्वप्निल चव्हाण याचा पिंड कवीचा. येथील नाटय़संस्थेशी संलग्न असल्याने त्याने काही नाटके आणि एकांकिका लिहिल्या. लिहिण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने पूर्णवेळ टीव्ही मालिकांचे लेखन केले. यादरम्यान त्याच्याकडून काही विलक्षण कथा लिहिल्या गेल्या, ‘रज्जूत मज्जा’ संग्रहात त्या एकत्रित झाल्या आहेत. या एकूणच कथासंग्रहातील कथांमधलं वातावरण, माणसं, एकूण सामाजिक हालचाली या आपल्याला अपरिचित असल्या तरी आजच्या युगातल्या काही परिचित वस्तू सामाजिक हालचाली आणि इतर संदर्भ या कथेत लेखकाने पेरलेले आहेत. एखाद्या मिथक कथेप्रमाणे प्रत्येक कथा पुढे पुढे जात राहते.

‘पोंचिकी’ ही या संग्रहातली पहिलीच कथा आपल्याला सांगते की, हा कथासंग्रह वाचायचा असेल तर वाचकाने त्यांच्या वाचनाच्या सवयीच्या वाटा आणि जगण्याचा तोच तो परिसर सोडायला हवा. कुठल्याही मोहिमेवर जाणाऱ्या निरोप्याचा पलंग सांभाळण्याची प्रथा नसते. या कथेतील पाब्लोला जो पत्ता शोधायचा आहे तो पत्ता त्याला सापडेल केव्हा, तर तो स्वत:चा पत्ता विसरेल तेव्हा; तो स्वत: हरवून जाईल तेव्हा. असा काहीसा ध्वनी मला ऐकू येत राहिला या कथेतून. तो म्हणतो शोध एकटय़ाचा असतो. एकमेकांवर अवलंबित्व आले की यातली शोधायची ओढ नष्ट होते. एकटा रस्ते शोधणारा माणूस एखाद्या ध्यानस्थ योग्यासारखा असतो. कदाचित पाब्लो प्रत्येक युगातला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ही वेळ येतेच की लिफाफा महत्त्वाचा की आपण, हे ठरवण्याची. लिफाफा म्हणजे आयुष्य आणि आपण म्हणजे ज्याचं ते आयुष्य तो.

एकूण मराठी साहित्यात साठून राहिलेल्या शिळेपणाने बधिर झालेल्या वाचकाला त्याच्या कल्पनेपलीकडील वातावरणात नेल्याने त्याच्या मेंदूतील पेशीन् पेशी आपला शिळेपणा टाकून देतील नि तो आपल्या आयुष्याकडे नव्याने पाहील यासाठी मज्जारज्जूचे कार्य नव्या घडीत कसे बसेल असा विचार करणारा हा लेखक कुंडलमुखी आहे. तो कल्पित वास्तव रचून आजच्या राजकारणावर (कथा : खानसामा), आजच्या समाजकारणावर, आजच्या माणसाच्या मनोविश्वावर नवे भाष्य करतो आहे. सत्तेसारखी मुक्ती नाही, असं म्हणणारा हा लेखक जागृत कुंडलिनीचे लक्षणही सांगतो. जयपराजयाची भाषा करताना त्या भाषेचा अंत:प्रवाह आत्मशोधाच्या ध्वनीसारखा संवेदनशील वाचकाच्या मनात गुंजत राहील याला आपण भाषाकौशल्य म्हणू शकत नाही, कारण लेखकाच्या जगण्याला सापडलेला हेतू शोधकाचा आहे. ‘खानसामा’ कथेत तो एके ठिकाणी म्हणतो की, ‘हे रामराज्य नाही; हे मदांध, जात्यांध, सत्तांध लोकांचे राज्य आहे.’ आजच्या भारत देशातील परिस्थितीचे हे अचूक वर्णन आहे.

‘जांभूळ काळी’ या कथेत एक वाक्य येतं की, विचार क्लॅरिटी नासवतात. आत्महत्या करण्याचा विचार आणि प्रत्यक्ष आत्महत्या करणं या दरम्यान विचार आले तर आत्महत्या करणं हा एक विचार होऊन बसतो. या कथेच्या नायकाला आत्महत्या करायची आहे; पण त्याला असंही वाटतं की, जगात कुठलंही दु:खं परमोच्च नसावं, की ज्याचं रूपांतर आत्मघातात होऊ शकेल. मेल्यानंतरही जगणं सुरू राहण्याची भीतीही त्याला वाटते. प्रत्यक्ष या क्षणाला आपण सामोरे जाऊ की नाही? जुनून मेंदूत असला की तिथं कुठलाही विचार नसतो आणि तो रेल्वेगाडीसमोर उडी घेतो; पण ती उडी घेतानाच स्वत:ला वाचवायचा विचार प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे येतो आणि त्याची आत्महत्या अयशस्वी होते. त्याला पूर्ण मरण येत नाही. पूर्ण मरण येत नाही हेच तर आहे मानवी जगण्याचं सर्वात मोठं दु:ख. अल्बेर कामूच्या ‘कॉलिग्युला’ या नाटकात एक वाक्य आहे, की माणसं मरतात, पण ती मरताना सुखी नसतात. अर्धवट मेलेल्या अवस्थेत त्याला जगावंसं वाटतं. त्याला वाटतं की वेदना हा फार हलका शब्द आहे. वेदना मेल्यानंतरच शरीराला काळीजांभळी बधिरता येते. देहजाणीव नष्ट झाल्याशिवाय गवसत नाही आत्मा ज्याची हत्या करायची आहे. या सगळय़ा जगात सर्व गोष्टी उष्टय़ा आहेत. नवीन गोष्ट आहे ती आत्महत्या; परंतु जीवनेच्छा प्रबळ असते आत्महत्येपेक्षा.

आजवर इतकं टोकाचं क्रौर्य आणि बीभत्स रस कुठल्याही मराठी कथेत, कादंबरीत आलं नाहीय ते या संग्रहातल्या ‘कश्यपकांड’ या कथेत आलेलं आहे. (अपवाद : दामोदर प्रभू यांच्या लेखनात बीभत्स रस ठासून भरलेला असला तरीही..) दुसऱ्याचा विचार न करता जगणं किंवा प्राणी पाळून त्यांना माणसाळवणं या दोन्ही गोष्टी टोकाच्या क्रौर्याचे निदर्शक आहेत. तसं पाहिलं तर या कथेचा नायक आहे कासव. पिट्टी नावाचं कासव, जे विप्लवने पाळलेलं आहे. विप्लवचे वडील रमाकांत प्राणी घरात असण्याच्या विरुद्ध आहेत, कारण ते घरात निरनिराळे रोग आणतात. या प्राण्यांवरचा सूड म्हणून पाळलेला पोपट शिजवून खा किंवा हत्तीच्या मुंडक्याचं सूप पी अशी क्रूर कृत्ये तो करतो. त्याचं म्हणणं या हत्तींनी किती तरी शेतकऱ्यांची शेतं उद्ध्वस्त केली असतील. या कथेचं सूत्र आहे निसर्गचक्रात ढवळाढवळ करणं आणि कालप्रवाहाच्या आड येणं हे सर्वात मोठं क्रौर्य आहे. या कथेतलं कासव आपला आकार वाढवत नेतं आणि आपलं विश्वरूप धारण करतं. विष्णूने कूर्मावतार घेतला होता या पुराणकथेचा लेखकाने घेतलेला आधार आशयसंपन्न आहे. ही कथा म्हणजे मानवी मनाचं मंथन आहे आणि या कथेची रचना एक पर्वत आहे, जो की या कथेतल्या कासवाने पेलला आहे. या कथेतल्या कासवाच्या विश्वरूपाने धरती खाली धसते, त्यातून कासव खाली जातं आणि पृथ्वी आपल्या पाठीवर घेऊन रात्रंदिवस पहारा देऊ लागतं. ज्याने धरतीचा भार आपल्या पाठीवर पेलला आहे त्याला आपण पाळीव प्राणी म्हणूच शकत नाही. या वाक्याने कथेचा दार्शनिक शेवट होतो. एक आकलन असेही वाचकाला व्हायला हवे की, हे पशू, पक्षी, कृमी, कीटकच पृथ्वीचं, पृथ्वीवरील निसर्गाचं संरक्षण करताहेत आणि त्यायोगे मानवाला पाळताहेत.

‘मनगमन’ या शब्दात ‘वेश्यागमन’ या शब्दाचा ध्वनी आहे. या कथेचा नायक उत्पल हा मनगमन करणारा आहे. मनातल्या मनात तो वाइल्ड होऊन सेक्सचे स्वप्नवत विचार भोगणारा आहे. याउलट या कथेची नायिका वैशू ही वास्तवात जगणारी आहे. कुठल्याही कलाकृतीत कलाकाराचं वैयक्तिक ऑब्सेशन घुसलं, की त्या कलाकृतीचा तोल जातो. त्या कलाकृतीच्या रचनेत आवश्यक असलेली अलिप्तता हरवली जाते. बरेचदा हे कलाकाराच्या नकळतही घडते. ‘मनगमन’ या कथेत हे घडलेलं आहे. सेक्सविषयक मूलभूत समस्या किंवा मीमांसक प्रश्न कुठेही लेखक या कथेत उपस्थित करू शकला नाहीय. त्यामुळे कथेच्या भाषेचा लहेजा संयम हरवून बसलेला आहे.

‘पाळख’ या कथेत आज समाजात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ओळखशिडीच्या वापराचा कुठल्याही सरळमार्गी जगणाऱ्या तरुणाला होणारा त्रास अत्यंत तीव्रपणे आपल्या मनाच्या भिंगाखाली धरला आहे. समाजातलं आपलं अस्तित्व समाजावर किंवा समाजातल्या एखाद्या व्यवस्थेवर राज्य करू शकतं, या सृजनच्या भावनेचा कचरा केल्याच्या ऑड-मिशनच्या निमित्ताने त्याला पाहावा लागतो. जगातला एकूण काळ कॉन्स्टंट असतो. कुठेही रांगा लावणं टाळण्यासाठी वशिला लावला तरी हा कॉन्स्टंट काळ ओलांडता येणं अशक्य आहे हे त्याचं रिअलायझेशन म्हणजे त्यानं नॉर्मल होणं आहे. शर्वरी म्हणजे सृजनची मैत्रीण म्हणते, आपण नॉर्मल आहोत ही जाणीव यायला लागणं हीच तर मॅच्युरिटी आहे. एखादा दिवस मनाविरुद्ध गेला, एखाद्या प्रसंगात आपल्याला हरावं लागलं तरी इट्स ओके. सृजनला आपल्या आयडेंटिटीचा एक वेगळाच शोध ‘पाळख’ या शब्दात (पाळख या शब्दात मला ‘पारख’ या शब्दाचा ध्वनी ऐकू येतो.) लागतो की लोकांनी आपल्याला ओळखण्यापेक्षा आपण आपल्याला ओळखणं महत्त्वाचं. या कथेत येणारी वर्णनपर विधानं मात्र रसभंग करतात. उदा: शर्वरी म्हणते एखादं नातं घट्ट होण्यासाठी असे हिरोईक प्रसंग लागतातच. पुरुष धडाडीचा नसेल तर पुरुष कसला? इत्यादी.
पोंचिकी हा प्रदेश एखाद्या वास्तवाप्रमाणे कथेत येतो. पुढे अँटीमॅटर कथेत तोच प्रदेश युटोपिअन संकल्पनेप्रमाणे येतो; एखाद्या स्वप्नाप्रमाणे येतो. स्वप्न हे असंज्ञ मनातलं असतं आणि वास्तव हे संज्ञ मनातलं असतं. विश्वनिर्मितीच्या वेळी मॅटर आणि अँटीमॅटर दोघेही अस्तित्वात आले. भौतिकशास्त्राच्या खोलात अधिक न शिरता मॅटर म्हणजे पिंड आणि अँटिमॅटर म्हणजे प्रतिपिंड असं आपण म्हणू या. कथात्म साहित्याचा विचार करताना वास्तव जग हे एक पिंड आहे आणि कल्पनासृष्टी किंवा कल्पित जग हा एक प्रतिपिंड आहे. पिंड आणि प्रतिपिंड जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा ते दोघेही एकमेकांना नष्ट करतात आणि त्यातून एक ऊर्जा निर्माण होते. स्वप्निलच्या म्हणण्याप्रमाणे ही ऊर्जा म्हणजेच न-कथा. ‘पोंचिकी’ ही कथा आहे आणि अँटिमॅटर ही एका न-कथेकडे जाण्याची प्रक्रिया आहे. स्वप्निलच्या कथेतील सर्वच पात्रं कुठल्या तरी न-कथेच्या शोधात निघालेली आहेत. किंबहुना असंही म्हणता येईल की, लेखक स्वत: न-कथेच्या शोधात निघालेला आहे. अखेरच्या कथेत तो म्हणतो, माणसाला पाठ असते, कारण त्याची पाठ फिरताच गोष्टी तयार होणार असतात. कथा मिळणार असतात. या कथा म्हणजे एक स्मरणसाखळी असते किंवा भूतकाळ असतो. अशा कथांना समकालीनत्व प्राप्त देता येत नसतं. स्वप्निलच्या या कथासंग्रहामध्ये आलेलं समकालीनत्व उत्स्फूर्त आहे.

कवी आणि नाटय़दिग्दर्शक म्हणून पहिली ओळख. मिती-चार या कल्याणमधील नाटय़संस्थेचे संस्थापक. अवस्थांतराच्या कविता, जिव्हार, संपर्क क्षेत्राच्या बाहेर हे कवितासंग्रह लोकप्रिय. आरभाट नोंदीचे प्रकरण आणि नाटकाबद्दल वैचारिक लेखन असलेले गद्यलेखन. ‘रीलया’ हा कथासंग्रह आणि ‘स्वप्नासारखा उजेड’ नावाची कादंबरी प्रकाशित.