श्री. दा. पानवलकर
मराठी साहित्याच्या भूमीत कबुतर नादावर एकामागोमाग आलेल्या दोन कथा प्रचंड गाजल्या. त्यातली पहिली जीएंची ‘चंद्रावळ’ आणि दुसरी श्री. दा. पानवलकरांची ‘मोतीचूर’. पुढे अट्टल कबुतरप्रेमी पानवलकरांनी ८ मार्च १९६४ च्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘गुटुर्रघुम्म’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या शब्दश्रीमंत लेखाला प्रतिसाद म्हणून दुर्गा भागवतांनी या पाखरांवर संताप व्यक्त करणारे टिपण लिहिले. मुंबईत कबुतरखान्याचा प्रश्न सध्या उग्र झालाय. ते असावेत की नसावेत, बंद करण्यात आल्यानंतर कपोत संप्रदायाचे काय होईल, याची चर्चाही जोरकस केली जातेय. पण तिचा आरंभ साठच्या दशकापासून जराही बदलला कसा नाही, याचा दाखला दिग्गजांच्या या खगमंथनातून डोकावेल…

‘गुटुर्रघुम्म’ हा फिरकीवजा गिर्रेबाज शब्द म्हणजे वट्टात एक बोली. ही एकाच शब्दाची. मुंबैकरांना नित्य परिचयाची होऊन राहिलेली. या बोलीत लडिवाळपणाची लटक, गिर्रेबाज हरकती, मुरक्या दिसू-ऐकू येतात. यात मानेचा डौल तसा गळ्याचा फुगवा आहे. मुंबैत कुठंही जा. भारताच्या महाद्वारापासून तो तहत वांद्य्राच्या उघड्या बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत, तसेच त्या बाजूला मुलुंड-ठाण्यापर्यंत या बोलीचा कडकडाट सहज नजरेला येतो. फोर्ट, गिरगाव, काळबादेवी, ठाकुरद्वार इथल्या कुठल्याही इमारतीच्या अगर वाड्या-चाळींतल्या वळचणीला ढुंकून पाहा, चौपाटीवरच्या कॉस्मॉपालिटन पुळणीवर चक्कर टाका किंवा राजभवनाच्या आडअंगाच्या कडेकपारीत जा, वा फॉकलंड, फोरास, ग्रँट वगैरे रोडांच्या अगर गोलपिठ्याच्या वळणावरच्या बोळकांडातल्या बेचक्यात जाऊन धुंडा. न डोकावतासुद्धा सहज नजर टाकली तरी ही बोली कानावर पडेल, लगटून गोल गोल भरीव घुमाराही ऐकू येईल. दुनिया गेली भाड में. ‘गुटुर्रघुम्म’.

या एका बोलीत अखिल जागतिक कपोत संप्रदायाचे गुंजनात्मक व्यामिश्र व्यवहार चाललेले आढळून येतात. यात त्यांचे वाद, विवाद, संवाद, परिसंवाद, साद, प्रतिसाद सतत चालू असतात. या बोलीच्या अर्थांची भावपूर्ण वलयं मोजावी तेवढी थोडी. राग, लोभ, समजावणी, गमजावणी, आळवणी, अनुनय, इशारे यांच्या नाना परी. अशा या अर्थ व आशयगर्भ मुलायम बोलीला स्वत:चा नाद नसेल असं कसं शक्य आहे? मात्र हा नाद आत्मगत असतो. यात म्हटला तर ख्याल आहे. पण त्याला बोल नाहीत.

सुरावळीत क्वचित पंचम, किंचित ऋषभ चमकतो, तर क्वचित गांधार आणि लवभर धैवतही चिकटलेला दिसतो. मधूनच सुईच्या अग्रावर राहील न राहील एवढा कणसर मध्यमही जमून गेलेला कानावर येऊन जातो. अशी ही ‘पंचकल्याण’मधली बंदिश माणसाला जाग आणते. लय लागली तर कुणीही अवाक् व्हावे असा त्यात दर्दही आढळाला येतो. अंगठ्यावर उडवलेल्या बंद्या रुपयाचा छन्कार (बुचडा छाप राणीचा), नर्तिकेच्या (खजुराहोछाप अप्सरेच्या) चंचल पायांतल्या चाळांचा छनन्कार किंवा एखाद्या अनामिक जाज्वल्य भगताचा दबलेला ओंकारसुद्धा त्यात झळकून गेलेला लक्षात येतो. केवळ अनाघातातून उमळलेला म्हणून विश्वात असूनही अविश्वसनीय असा हा लोलुप नाद. हे एवढं समग्र नादब्रह्मांड या एकशब्दी विलोल बोलीत सामावलेलं ऐकू-दिसू आल्यास कुणी तोंडात बोट घालायला नको. कारण ते आहेच तसं. म्हणून.

या बोलीची मोडच करावयाची तर ती नजाकतीनं करावयास हवी. तर जेव्हा एकुलता कुठं तरी बसून ‘गुटुर्र’ करतो तेव्हा ‘आता काय करणं इष्ट आहे?’ असा एकांतिक कर्तव्यपरायण विचार व्यक्त करीत आहे असं जाणावं आणि जेव्हा नरमादी एकत्र येऊन ही भाषा करतात तेव्हा दोघंही सुराला सूर लावून ‘आपल्याला फार काही करायला हवं अं! म्हणजे प्रेमापासून पिलांचं लालनपालन करण्यापर्यंत सगळं काही इत्थंभूत केलं पाहिजे’ असं चंचुपुटातल्या पुटात जपणुकीचं हितगूज केलेलं ऐकू येतं. यात वाच्यता वा बभ्रा, बोभाटा केलेला दिसून येत नाही. सर्व काही आपापल्यांत. समजा केवळ मादीनंच स्वत:भोवती पिंगा घालून गर्रकन् ‘गुटुर्र’ केलं तर, ‘… आता कुठं जाल? म्हणजे कुठंही उडत जाऊ नका.

इथल्याशिवाय कुठंही फडफडायचं नाही.’ अशी सवतीमत्सरात्मक होकाराची धर्मकर्मयुक्त सूचना व्यक्त केल्याचं आढळून येतं. एरवी पिसं तुटेपर्यंत भांडणं, झटेझपाटे, दमदाट्या करतानाही ही बोली सरसहा वापरली जाते. मुळात ही एकच शब्दांची बोली असल्यानं तिला अनेक सूचनात्मक कंगोरे लाभले आहेत. आवाजात चढउतार करून घुमाऱ्याची नेमकी फेकफिरकी साधली जाते. पिसं उभी राहतात. बऱ्याच वेळा स्वत:वर नितांत खूश असल्याची मौनगर्भ सूचनाही बीजरूपानं केली जाते.

अशा वेळी मूक अर्थांची अनेक वलयं एकाच वेळी उगम पावून पसरत असताना दिसतात. त्यांत असंख्य वलयांकित लालित्यं भरलेली असतात. या एकूण नादानुकूल गोलंकारी प्रकारालाच ‘पाखरूबोली’ असं संबोधलं जातं. यात ‘पाखरू’ हा शब्द पक्षिविशेष म्हणून कबुतर या अर्थी किंवा मानवविशेष म्हणून ‘अलबेली नार’ (संदर्भ तपासून) विशेषत्वानं वापरला जातो. कुणी मानो वा न मानो. अशा या ‘पाखरू’ शब्दाला वरील अर्थाने दुर्दैवानं विश्व, संस्कृती, शब्द वा अमर इत्यादी जडजंबाल कोशांनी अनुल्लेखानं ठार ‘मा निषाद’ केलंय.

मात्र काहीही कसंही असलं तरी पब्लिकला या कबुतर-जमातीचा तसा ताप नाही; आणि असलाच तर तो पाहणाऱ्याच्या दृष्टीत वा कानांत. तुम्ही त्यांच्याकडे पाहू नका. काहीही बिघडणार नाही. तुमचं आणि त्यांचंही. मात्र नीट बघत आणि ऐकत राहाल तर तुमचंच रक्त फुका तापेल. दाब वाढल्याचीही भावना होण्याचा संभव आहे. त्यातून एखाद्यानं ताप करून घ्यायचाच असं ठरवलं तरीही हरकत नाही. सगळा खुल्लंखुल्ला मामला.

खुद्द भारताच्या त्या महाद्वारावर हमेशा उदंड पाखरं घुमताना दिसतील. एकोणीसशे चौदा सालापासून द्वाराच्या चिरेबंदी नक्षीदार वळचणीत ‘गुटुर्र घुम्म… टक टक टक गुटुर्र…’ करून कबुतर-घराण्याच्या कैक पिढ्यांनी आपापले संसार थाटले. कुरुंदाचे कमानदार बुलंद पत्थर शिटशिटून चुनेरी केले. पण त्या महाद्वारानं कुणाचाही राग धरला नाही. मुक्त आसरा दिला. सगळं काही उघड्या डोळ्यांनी पाहत अंगावर होऊ दिलं. कुणी केलं असतं असं? साक्षच काढायची झाली तर राजमाता जिजाऊसाहेबांच्या उद्यानात बेवारशी खितपत पडलेल्या लॉर्ड हार्डिंजसाहेबाला जाऊन विचारा. हा साहेब पूर्वी या द्वारावरच खडा होता.

जवळजवळ पन्नास वर्षं त्यानं हे उभ्याउभी भोगलं, सोसलं, पाहिलं. एक दिवस काळ उलटला आणि साहेबालाच तिथून उठवला आणि बागेत फेकून दिला. त्याचं एक सोडा, पण आता सध्या महाद्वाराच्या समोर छातीवर हात बांधून उभ्या असलेल्या स्वामीजींना किंवा भायखळ्याच्या खड्या पारशाला जाऊन पुसा. केव्हाही पुसा. त्या दोघांच्याही भव्य भालप्रदेशाखालच्या कमानदार भुवयांमधून नाकापर्यंत गंधासारखा उभा ठळक नाम उमटलेला दिसेल. ‘काय करायचं ते त्यांना खुशाल करू द्या हो. पाखरंच ती. मुकी बिचारी.’ असं ते मनातल्या मनात म्हणत असतील. अश्वारूढ छत्रपतींच्या जिरेटोपावरच्या तुऱ्यावर बसून या पाखरांनी गुटुर्रघुम्म करत अहर्निश ओल्या गंधाक्षता टाकल्या. घोड्याचे कान भरले. छत्रपतींनासुद्धा क्षणभर कसंसंच झाल्याची भावना झाली असावी. ‘गुटुर्र…’ आता बोला.

तसं पाहू जाता कबुतर-मंडळी माणूसघाणी दिसत नाहीत. उलट माणसंच त्यांना घाणेरडी, डोक्यावर बसणारी जात समजून पदोपदी हाशहुश्श करतात. बगळ्याच्या पंखासारखे पांढरे फेक कपडे करून भटकताना केव्हा तरी कोथिंबिरी रंगाचा बत्ताशाएवढा ठपका माणसाच्या धाकट्या मेंदूवरच्या कवटीवर ठपकतो. क्वचितप्रसंगी कपाळावर अष्टगंधाची शान आणतो. पण केव्हा तरी. कधी तरी. अधूनमधून. माकूनचुकून. अशा वेळी भाग्य फळफळणार या भावनेनं वेळ मारून न्यायची.

थोडा वेळ पोझिशन पंक्चरल्यासारखं वाटतं. बरं, हा ठपका कुठून ठपकला म्हणून वर तोंड करून पाहायची घाई केलीत तर पातळ सरबरीत मिश्र रसायन श्रीमुखावर पडतं. ना धड आत, ना बाहेर. दमसास होऊन वमनाचा भडाड सुरू होतो. पण हे क्वचित. तुम्हाला वर तोंड करून बघायला सांगितलं कुणी? पण कुतूहलापोटी हे घडतं खरं. पण त्यासाठी थोडी किंमत मोजावी लागते. म्हणून फुटपाथवर उभे असताना एखाद्या ‘आदर्श’ फरसाण मार्टच्या बोर्डाच्या बेचक्यात मादीच्या मोरपंखी गळ्यात तो चोच खुपसून तर गुर्रगळा फुगवून निवांत बसलेला असतो, अगदी अंतर्मुख होऊन, तेव्हा त्याला तसाच बसो द्यावा. तोंड वर करू नका म्हणजे झालं. नाही तर ओम्फस.

एकूण सहज निरीक्षण केल्यास असं समजून येतं की, या पाखरू-जमातीतही वर्णभेद असावेत. कारण असं दिसून येतं की, कबुतरं आपल्या शुभ्र मुलायम, मोतिया, किरमिजी रंगारूपांवरून स्वत:ला भलतीच उच्चकुलस्थ समजत असावीत. म्हणून ती कबऱ्या, राखाडी, पारव्या वर्णाच्या आपल्या जातभाईंना आपल्याहून नीच मानतात. जसे चित्तपावन देशस्थांना, चां. का. कुडाळदेशस्थ पाठारे परभांना वा त्वष्टा कासारांना मानताना दिसतात. कबुतरं जशी उडत्या स्पर्धात उतरताना दिसतात तशी पाखरं सहसा आढळत नाहीत. कबुतर लोकांचा असा दावा आहे की ‘त्यांचे पूर्वज आंतरराष्ट्रीय गुप्तपत्रव्यवहार नेआणीचा उडता कारभार पाहत असत; शिवाय आजच्या जगातही नवी पिढी एका पानाची ओली काडी चोचीत धरून शांततेच्या राजकारणाचं उडतं शुभ प्रतीक म्हणून मिजाशीत भराऱ्या मारताना दिसते. यात पिढीपरत्वे त्यांचा अभिमान आक्रमकता, अस्मिता पिसापिसांनी फुलारून आलेली आढळते.

पण पारवळ जमातीत या सर्व गोष्टीकडे तुच्छ नजरेनं पाहिलं जातं. तसं वागणं, करणं, फडफडणं हलक्या दर्जाचं, हीन अभिरुचीचं काम म्हणून सहसा वर्ज्य, त्याज्य मानलं जातं. म्हणजे कुणाच्या तरी चिठ्याचपाट्या कुठं तरी कुणाकडेही भरकटत नेऊन परत सुरळी करून घेऊन आणावयाच्या. याला काय काम म्हणायचं? शुद्ध भाडोत्रीपणा अथवा पिसाट चमचेगिरीचा एक नमुनेदार नीच निर्लज्जपणा आणि कसल्या तरी शांततेचं स्वत: चित्र बनून सफेदझूटपणा करत जगाला उडती शोभा दाखवायची यापरते नीचोत्तम काम कोणतं असू शकेल? हे सर्व पारवळांच्या एरवी नम्र (पारव्या रंगामुळे) पण प्रसंगी मानी स्वभावात बसणारं कसं असणार? त्यावर कबुतरांचा शहाजोग, पण पूर्वग्रहदूषित तिरका दृष्टिकोन असा दिसतो की केवळ काळ्याकबऱ्या रंगामुळे पारवळ जमातीला या अशा हमखास विश्वासू व मौलिक कामात सामावून घेणं इष्ट नसतं.

शिवाय पडक्या बुरुजावर नाही तर जुनाट विहिरींच्या सांदीत घुमत राहणाऱ्यांना आक्रमक पवित्रे माहीत नसतात किंवा तो त्यांचा स्वभावही नव्हे. केवळ आपला न्यूनगंड लपविण्यासाठी पारवळांनी कबुतरासंबंधी उठवलेली ही वर्णभेदाची व चमचेगिरीची धादांत घुमारेवजा खोटार्डी आवई आहे. या परस्परातील अंतर्गत किल्मिषामुळे या दोन्ही खग जमातींत (वस्तुत: एकच) बनावे तसे बनले नाही याचा सूड म्हणूनच की काय पारवळ नरांनी गोऱ्या, गोमट्या, मोतिया कबुतर-माद्या फूस लावून उडवल्या. कब्बूरनं मोतियाला घुलवली तर काळ्या लाल्यानं गोऱ्या फटक झटकलला फितवली म्हणून अलीकडच्या काळात पाहावं तिकडं एकच वर्णसंकर माजलेला आढळतो.

उगाच मधे खुपसायला कुणाची चोच नाही की तडजोडीला वाळकुटी शुष्क, निष्पर्ण फांदी गवसत नाही. आता पारवळ आणि कबुतरं एकच जात, जमात, सांप्रदाय होऊ पाहत आहे. काळच बदलला तेव्हा या वर्णसंकराला सौम्य सुधारकी स्वरूप आलं. हायब्रिड प्रत्यक्षात गावोगाव दिसू लागलं. मग दोन्ही जमातींनी ऐक्याची कल्पना मांडून बहिरी ससाण्याला एक नंबरचा शत्रू म्हणून ठरविण्यात आलं. नंबर दोनचा शत्रू घारूटी ऊर्फ मार्जार कंपनी. असं असूनही अंतर्गत कार्यकारणात दोघांनी आपापली अस्मिता शाबूत ठेवल्याचं दिसून येतं. एरवीच्या वरवरच्या कुरबुरी, फडफडाट हे जिवंतपणाचं लक्षण मानलं जावं अशीही त्या कल्पनेत तरतूद केली गेली. एक वेळ पाखरांचे स्वभाव बदलतील पण वर्ण कसा बदलणार? शुभ्र ते पांढरेफेक आणि काळे ते काळेकभिन्न.

कबुतरांना पाळायची टाप आहे, पण पारवळांना स्वतंत्रपणे आम्ही पाळतो असं म्हणायची माणसांची टाप नाही. त्यातून एखाद्यानं पारवळं पाळलीच तर तो बहिरी ससाण्याच्या अवलादीचा आहे असं खुश्शाल समजावं असं पारवळांचं म्हणणं. कबुतरं पाळणारी माणसं अनेक. हौस, मौज, शोभा, शर्यतीसाठी म्हणून. शांततेची प्रतीकं म्हणून उडवायची खानदानी कबुतरं खास दरबारी गोटात पाळली जातात. कबुतरांचं आणि माणसांचं तसं बरं असतं. आता गंमत अशी की, कबुतरखाना म्हणून मुंबईत ज्या जागा ओळखल्या जातात तिथं जादा करून उभयान्वयी जमात आढळते. कबुतरं, पारवळं यांचं जणू काही अद्वैतच तिथं नांदत असतं. कारण तिथं दोघांचा कॉमन इंटरेस्ट गुंतलेला असतो. एखाद्या लिलीबेननं उधळलेले दाणे अख्खा दिवसभर टिपायचे आणि दानाची पुण्याई तिच्या ओटीत घालायची. आम्ही मागितलं नाही आणि तुम्ही मात्र भरभरून दिलं. वर सोय अशी की कबुतरखाना तसा उघडावागडाच असतो. उडके आव, उडके जाव. एकदम खुल्ला. रोटीबरोबर बेटी व्यवहारही जमला तर जमून जातो. वाटलं टिपावं तर आले इथं. नको तर गेले उडत शहाजोगपणे. कसं? गुटुर्रर्र.

तसा या खगलोकांचा स्वभाव मिस्कीलच. जी.पी.ओ.समोरच्या प्रमेयात्मक तारांवर तिकीट काढल्यासारखे हारीनं, रुबाबात बसून पोटाच्या पाठीमागं धावणाऱ्या कर्मचाऱ्याकडे मनातल्या मनात गुटुर्र हसून ते नजरेच्या लाल गुंजा फेकतात. धावत्या माणसांच्या टाळूवरचे केस मोजू बघतात. एखादी बेलबॉटम वा बॅरलबॉटम पोरगी भलतीच चिकनी दिसली तर एका शिटात तिचा नखरा पार खलास करून टाकतात. पण या माणसांतही एखादा अवलिया भेटतो. तो आपल्या गळ्यात अडकवलेल्या डबड्याची कळ कच्कन दाबून या पाखरांची छबी उतरवतो आणि पेपरात चक्क छापवून आणून जगाला दाखवतो. पाहा हे ‘पाखरांचं प्रमेय’. डावीकडून उजवीकडे (ठोकून देतो.)

श्रीयुत लालू, श्रीमती मयूरी (पिसांत चोच खुपसून लगटून बसलेली.) चि. बाबूल (एका पायावर डोळे मिटून.) मागील रांग सौ. झंटकल, कुमारी गिरजी, कु. तुरतुरे, आजोबा लामतोरे (चोचपडके); अगदी पाठीमागे उडणारे खगेश, बहिरीकंदन वगैरे.

मुंबईच्या माणसांचं एक असतं. त्यांना म्हणे कामं फार. खाजवायला म्हणे फुरसत नसते. नेहमी नऊ एकूणसाठ, पाच छप्पन्नशिवाय वार्ता नाही. बघावं तेव्हा कोण तरी कुणाच्या मागं धावत असतो. इतकं असूनही वर नित्य नव्या कुणाबद्दलही काही तरी तक्रारी करत राहायचं. वेळ नाही असं एकीकडे म्हणायचं मग ही वचवच कशाला? जाता-जाता, बसता-बसता, पडल्या-पडल्या तोंड वाजवतील भें xx या मुंबईत कबुतरं वारेमाप. जावं तिथं फडफडतात. सारखा गुटुर्र गुटुर्र र्रर्र आवाज मारतात. सगळ्या साल्या पाखरांना बंदुकीच्या गोळ्यांनी फटाफट टिपलं पाहिजे. तो निषाद काही वेड xx नव्हता. या साल्यांनी त्याच्या झोपडीचं प्रसूतिगृह करून ठेवलं असेल म्हणून त्यानं एका सकाळी वरच्या वर एक टिपलं. करणार काय? पहिल्यांदा हाशहुश्श करून पाहिलं असेल तरी गुटुर्र र्रर्र र्र… ‘च्यामायला’ करून निषादानं मग बाण हाणला. मरा. त्याला काय ठाऊक, नर कुठला, मादी कुठली? ऋषीच्या बाचं काय जातंय ‘मा निषाद’ म्हणायला आणि क्रौंच झाला तरी काय? सत्ययुगातील ते सोवळं कबुतरच गुटुर्रर्र. शिवाय ही साली जिथं तिथं शिटशिंटून घाण करतात.

सुट्टीच्या दिवशी दुपारी निवांत डोळ्याला डोळा लागला तर यांचं आपलं गुटुर्रघुम्म चालूच. कामाच्या दिवशी ऑफिसात आढ्यावर तेच.’ अशा लाखो तक्रारी ऐकू येतील. वास्तविक अशा तक्रारीत तसा दम नसतो. मुद्दाम त्रास द्यावा अशी कबुतर मंडळीची इच्छा नसतेच मुळी. शक्य तर खोलीत किंवा कुठंही गुंजभर कसली हालचाल नाही याची बालंबाल खात्री करून घेऊनच आढ्यावरच्या बेचकीत निवांत थोडंफार हितगूज केलं तर काय बिघडलं? म्हणजे असं पाहा : ठाकुरद्वारला त्याच्या एका आडवाडीतल्या होस्टेलच्या पाचव्या मजल्यावरच्या एका खोलीत ऐन दुपारी त्रेपन्नसिंग – स्पेअरपार्टवाला दारं-खिडक्या सताड उघड्या टाकून आ करून पहुडला होता. पंखांचा शक्य तर फडत्कार न करता लालू आपल्या मयूरीसह खोलीतल्या आढ्याच्या कोनात जाऊन बसला.

चारपाच गुंजा नजरेच्या इकडं-तिकडं टाकून त्रेपन्नसिंगाचा अंदाज घेतला. तो जाम गोळी लागल्यासारखा पडला होता. म्हणून एकदोन गिरक्या घेऊन लालूनं मयूरीला इशारा केला आणि हितगूज आरंभलं. गुटुर्रर्र…र्रऽऽऽ. थोडी फडफड, धडपड उडाली. चार पिसं हवेवर तरंगली. धूळ पसरली. तत्क्षणी निद्राभंग पावलेला सरदारजी दाढा करकचून केकाटला, ‘‘…ए त्तेरी भेणकी छोऽरी. आऊट गेट यू बगर्स…’’ पण लालूनं न टरकता ‘गुटुर्र…’ केलं. म्हणजे न कळल्यासारखं. ‘आय बेग युवर पार्डन’ केलं अन् वर गिर्रेबाज गिरकी मारली. त्यासरशी सरदारजी उखडला. चेकाळून उठला आणि रावणानं जटायूचा वध केला त्या पवित्र्यात त्यानं एका दांडक्यानं नेम धरून फटका मारला. पिकलं फळ देठापासून पडावं तशी मयूरी घायाळ होऊन लवलव करत धरणीवर कोसळली. ‘मा निषाद’ म्हणायच्या आत सरदारजीच्या दुसऱ्या टिपिऱ्यात लालू सापडला. त्यालाही त्यानं झडपून पाडलं. दोन केविलवाण्या फडफडी झाल्या थोडा वेळ. त्या गतप्राण पाखरांकडे पाहून सरदारजीचं जिव्हालौल्य बळावलं.

बादलीभर गरम पाण्यात थोडा वेळ भिजत घालून त्यानं दोन्ही पाखरांची पिसं सोलून काढली. मग दोन लाल लाल गोळे धारदार सुरीनं साक्षेपानं चिरून काप काढले. विजेच्या शेगडीवर खरपूस भाजून मीठ-मसाल्यात घोळले. मग तब्येतीनं काटा-चमच्यानं पावाबरोबर मटकावले. तृप्त होत्सात्या त्या नर-ससाण्यानं हीऽ एवढी ढेकर दिली. स्वत:ची बोटं चाटली. आता काय म्हणावं या कर्माला? केवढं हे क्रौर्य! हा अघोरी दुष्टावा त्या निषादाच्या तर सोडाच, पण चौदा चौकड्यांचं राज्य करणाऱ्या त्या रावणाच्याही अंगी नव्हता. राक्षसाच्याही मनात माणूस कुठं तरी दडून असतो अन् माणसाच्या मनात अक्राळविक्राळ राक्षस दबून बसलेला असतो हे सत्य म्हणायचं का? जटायूचा वंश संपला हे ठीकच. एरवी ‘तंदुरी फ्राय जटायू’ ही टेसदार डिश एखाद्या पंचतारांकित हॉटेलात मेन्यू कार्डावर फडकली नसती का?

याउलट गिरगावातल्या एका बसक्या चाळीत आगळाच प्रकार घडला. कबुतरांच्या गिर्रेबाज नादावल्या स्वभावानं बबनराव एक दिवस भलताच स्फुरण पावला. गृहस्थ विलक्षण रसिक हे खरंच. तो या कबुतरावर भडकला तर नाहीच, उलट लोभावला. त्यानं सरळ कपडे केले. आणि पोष्टात जाऊन सासुरवाडीला बायकोच्या बापाला डबल एक्स्प्रेस तार ठोकली. ‘अंथरुणाला जाम खिळून आहे. चंचलेला असेल तशी धाडा.’ या तारेला उलट एक्स्प्रेस तार आली. ‘दाराला आतून बोल्ट लावला नाही तरी भागेल. खिडक्यांना जाळ्या मारून घ्या. – चंचला.’

एकदा काय घडलं : ऑपेरा हाऊसला एका नामवंत मासिकाची कचेरी आहे. तिथं दुपारच्या निवांत वेळी संपादक महाशय मजकुराचा गठ्ठा बाजूला ठेवून एक एक करून लिखाण वाचत बसले होते. त्यांच्या हातात ग्रामीण कथा असावी. कामाला लय लागली होती. अधूनमधून संपादकांची कळी खुलत-मिटत होती. पानं उलटता उलटता अचानक वरच्या आढ्यावरून छान कवडशाएवढा हिरवट पांढरा लोचदार ठपका कथेवर पचकला. कथेतील आशयाला ढका लागला. ती कथा धूसर, दुर्बोध वाटू लागली. त्यासरशी संपादकांनी आढ्याकडे कटाक्षानं पाहिलं आणि ‘च्या आयलाऽऽ’ असा उद्गार काढला. अन् हातातल्या कथेची चवड होती तशीच आढ्याच्या दिशेनं भिरकावली. फडफडाट झाला. पिसं पसरली. धुरळा उडाला. त्यातून उत्तर आलं ‘गुटुर्रर्र…’ म्हणजे ‘कथा ग्रामीण असली तरी तद्दन ग्राम्य व गर्हणीय आहे. निखालस अश्लील. सा. प.’ आणि ती पाखरं खिडकीवरच्या शटरमधून तिर्यक गतीनं भरारत पसार झाली.

तर एवंगुणविशिष्ट मुंबईतली कबुतरं. त्यांची बोली ज्याला जशी हवी तशी एकाच नादमय गिर्रेबाज शब्दाची. ती जशी वैतागदायी आहे तशीच चोखंदळ टीकास्वरूपही. वेळप्रसंगी एखाद्याला स्फुरण पावायलाही लावणारी. अधूनमधून ती तापदायी वाटली तरी खुद्द कबुतरं कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असतात. आणि जर कदाचित तशी ती असतील तर क्वचित केव्हा तरी बत्ताशाएवढ्यापुरतीच. काही शौकीनबाज लोक त्यांना लाडेलाडे ‘पाखरू’ म्हणून संबोधत असतील; पण वेळवख्ताला फार तर जिवाला जीव देऊन राहतील. इतकी ती लाघवी अन् उपकारशील मनाची आहेत. इतकंच नव्हे तर ती अचूक औषधीही आहेत. हे कवणाच्याही ठाऊकी नसावं हे महदाश्चर्य. चरकानं अतिप्राचीन आयुर्वेदांग संहितेत अर्धांगकारिका लिहून ठेवली आहे. ‘कपोतरसर-शितलोहिमालावण्येना – (लावणे या अर्थी. इथं आर्षप्रयोग संभवतो.) तिगुणसंवर्धकोऽ-र्धांगपीडानाशकश्च लंघयतेचाऽपि…’ हे किती होमिओ वा अॅलोपथीवाल्यांना माहीत आहे?

अनुमानधपका नव्हे तर प्रत्यक्षप्रमाण म्हणून मिरजेच्या अर्धांगवेदविद्याभूषण पंचानन बुवा बाळेकुंद्रीकर यांनीच निर्वाळा देऊन ठेवला आहे. पंचानन बुवांचा गेली साठ वर्षं कपोत संप्रदायाशी जुना आणि जाणिता रक्ताचा संबंध आहे. त्यांनी ठाण्याच्या प्रभो गंडभीराचं दोन वर्षांचं अर्धांग तेरा दिवसांत ठिकाणावर आणून त्याला ‘लंघयते गिरिम्’ करून सोडला. प्रभो गंडभीराला जेव्हा झटका आला तेव्हा बाळेकुंद्रीकर शास्त्र्यांना मिरजेहून आणवण्यासाठी खास टेम्पो धाडला. आल्याआल्याच ‘‘नाडी कसली पाहता? ताबडतोब काळबादेवीला जाऊन कबुतरांच्या दोन शुभ्रवर्णी जोड्या आणवा.’’ म्हणून फर्मावलं.

दोन जोड्या आणल्या. शास्त्री बुवांनी झटक्यानं उपचार आरंभले. पिसं न उपटता एक जोडी (जोडपं) साक्षेपानं उलगडून शीर धरून चिरली अन् प्रभोच्या माथ्यावर लाल चबचबीत रक्तासह थापटली. त्यावर चुनखडीच्या पाकात मुरवून ठेवलेली आळवाची तीन पानं पसरून करकचून बांधली. बराच वेळ प्रभो धाय मोकलून ठणाणला. पण इलाज नव्हता. हाच एक अक्सीर इलाज होता. असा हा कोर्स सतत तेरा दिवस अथक चालला होता. चौदाव्या दिवशी प्रभो गंडभीर काहीच्या बाहीच ताळ्यावर आला. पंधराव्या दिवशी ताठ बरा झाला. आणि सोळाव्या दिवशी कोटात आपल्या कामावर रुजू झाला.

जसे आले तसेच निघून जाताना अर्धांगवेदविद्याविभूषणांनी स्वत: गुदुर्रर्रर्र…घुम्म असा आवाज केला. याचा गर्भितार्थ असा की, आयुर्वेदाङ्गासंहितेत अर्धांगकारिकेला जो पुरवणीवजा शुद्ध पाठ जोडलेला आढळून येतो तो पंचानन शास्त्री बाळेकुंद्रीकरकृत होय. तो पाठ असा :

…तथापिच खण्डित नरौ वा माद्यौप्यवलिप्येन एकानुकारित्वात् हानिकारकौ रक्तभेदात् दोषास्पदश्च न तु एकोऽपि कपोतदाम्पत्यखण्डितेनैव लावण्येन कामधुक् भवत्येति।

म्हणजे कापायची जोडी नर आणि मादी असावयास हवीत. दोन्ही नर वा दोन्ही माद्या एकाच वेळी चिरल्यास त्यांच्या रक्ताचे ग्रुप बदलल्यानं व कुणाही एकाच्या विरहतापानं अचूक गुण येईलच याची हमी देता येणार नाही.’

असा साक्षात्कार पंचानन शास्त्रीबोवांना एका भल्या उष:काली, पाखरूबोलीचा सखोल अभ्यास केल्यामुळे, ती नीट उमजू लागल्यावरच झाला. गुटुर्रर्रऽऽ.

इति पाखरूप्रमेयात्मक फलश्रुती जाणावी.

(‘संजारी’मधून साभार.)

‘गुटुर्रघुम्म’ या ‘लोकसत्ता’तील लेखामध्ये भर घालून पानवलकरांनी ‘पाखरांचं प्रमेय’ हा लेख लिहिला.

lokrang@expressindia.com