इतरांकडून परफेक्शनचा आग्रह धरणं हा विवेकी विचार आहे, पण दुराग्रह धरणं नक्कीच अयोग्य आहे.
सत्येन- एक हुशार इंजिनीअर- एका बडय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करणारा. वय वष्रे ४०. त्याच्या घरी त्याची पत्नी सुरभी आणि दोन मुलं. अगदी पुलंच्या चौकोनी कुटुंबासारखं हेही एक कुटुंब होतं. पण पुलंचं चौकोनी कुटुंब सुखी होतं, हे कुटुंब मात्र सतत कटकट, वैताग यांनी भरलेलं किंवा भारलेलं होतं. सतत रागाचे, नव्हे क्रोधाचे चढे सूर सुरभीच्या घरात लागलेले असायचे. विशेषत: सत्येन घरात असताना. संध्याकाळी सत्येन घरी आल्यावर जरा घरात पसारा दिसला की त्याचा रागाचा पारा चढत असे. मग तो सुरभीला वाट्टेल तसा बोलत असे. तिच्या सगळ्या मागच्या चुकांची उजळणी त्याच आक्रस्ताळेपणाने व्हायची. सत्येन व्यवस्थितपणाचा पुजारीच होता. ऑफीसमधले त्याचे सहकारी तर त्याला ‘मि. क्लॉक’ म्हणूनच चिडवायचे. सगळेजण आपापली घडय़ाळंसुद्धा त्याच्या वेळेप्रमाणे लावायचे. ऑफीसमध्येसुद्धा सहकाऱ्यांच्या जरा चुका झाल्या की, सत्येनचा ‘जमदग्नी’ व्हायचाच! त्यामुळे सगळे सहकारीच काय, काही वेळा वरिष्ठही त्याला टरकूनच असायचे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. पत्नीबाबत, मुलांबाबत सत्येनने ठरवलेली एक ‘व्यवस्थित व्यवस्था’ होती. ती थोडी जरी बिघडली तरी तो इतका अस्वस्थ होई, क्रोधागारात जाई की, त्यामुळे मुलंही त्याला सतत घाबरून असायची.
पण त्या दिवसापासून असं व्हायला लागलं की, सत्येन घाबरूनच गेला. एक दिवस ऑफीसमध्ये सत्येनला चक्कर यायला लागली, डोकं जड झालं, छातीत धडधड होऊ लागली, घशाला कोरड पडली, गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. म्हणून त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं. ‘हायपरटेन्शन’चं निदान झालं. पण ईसीजी वगरे नॉर्मल होता. औषधं सुरू झाली तरी काही दिवसांनी परत तसंच! पुन्हापुन्हा तसं होऊ लागलं, पण आता बीपी नॉर्मल, ईसीजी वगरे हृदयाशी संबंधित तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल. म्हणून मग सत्येनने विचारलं की, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी मग मला ‘परफेक्ट’ का वाटत नाही? मी व्यवस्थित का नाही? तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं की, हा हार्टचा नाही तर चिंतेच्या अ‍ॅटॅकचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामागे मानसिक कारणं आहेत. म्हणून त्याला माझ्याकडे पाठवण्यात आलं.
त्याच सुमारास माझ्याकडे वीरेनही आला होता. वीरेन एक चांगल्या सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय घरातला मुलगा, व्यवस्थापन शिक्षणाचा पदवीधर. भांडवलाची कमतरता नव्हती. वडिलांजवळ (जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी) भांडवल भरपूर होतं, त्यामुळे त्यांची इच्छा होती की, वीरेनने नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय करावा. त्यासाठी ते सतत त्याच्या मागे लागलेले असायचे. वीरेन त्यासाठीच समुपदेशनासाठी आला होता. सततच्या घरातल्या वातावरणाने वीरेनला सारखं अस्वस्थ वाटायचं, अपराधीही वाटायचं, भूक लागायची नाही, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी चिडचिड व्हायची, निराश वाटायचं.
थोडक्यात, चिंता, नराश्याने तो ग्रस्त झाला होता. त्याच्याशी बोलल्यावर मग त्याने सांगितलं की, व्यवसाय चालला नाही तर.. अशी भीती वाटते. एकदा का व्यवसाय सुरू केला तर तो नीटपणे, कुशलतेने, व्यवस्थितपणे चालवता आलाच पाहिजे. नाहीतर मग काय उपयोग एवढी रिस्क घेऊन? मला यश नाहीच मिळालं तर मग बिझनेसमध्ये कशाला पडायचं? आजपर्यंत मला अपयश कधीच आलं नाही. मात्र आता ते व्यवसायात आलं तर ते मी सहन करू शकणार नाही. पण वडिलांना हे कसं पटवायचं, कसं सांगायचं, हे पण समजत नाही. सगळा गोंधळ माजलाय माझ्या डोक्यात!
सत्येन आणि वीरेन. दोघंही आले होते चिंतेचा विकार घेऊन. समस्या चिंतेची असली तरी त्याचं स्वरूप वेगवेगळं होतं. सत्येन क्रोधातून चिंतेकडे प्रवास करत होता, तर वीरेनचा प्रवास भीतीतून चिंतेकडे असा होत होता.
थोडक्यात, अतिक्रोध करता करता सत्येनला काळजी वाटू लागली होती की, एवढा मी रोज ओरडतो तरी कोणीच माझ्यासारखाच व्यवस्थितपणा का दाखवत नाही? मग ती वाढत जाऊन याचा परिणाम त्याची व्यवस्थित प्रकृती बिघडण्यावर झाला होता. ज्यामुळे चिंतेत भरच पडली होती. तर वीरेनला होती अपयशाची भीती. ती घरच्यांना कशी समजवायची ते त्याला कळत नव्हतं. त्याच भीतीतून चिंतेचा जन्म झाला होता. पण गाडीचा प्रवास वेगळ्या दिशांनी झाला असला तरी त्यांचे ‘रूळ’ एकच होते. त्यामुळे शेवटचं स्टेशन एकच झालं होतं. दोघेही ‘मि. परफेक्शनिस्ट’ होते. पण पहिल्याचा अट्टहास होता की, तो जसा व्यवस्थित आहे, तसेच इतरांनीही त्याच पद्धतीने आणि त्याच प्रमाणात व्यवस्थित राहिलेच पाहिजे. त्याने स्वत:साठी एक चौकट आखली होती. पण त्या चौकटीतच सर्वाना बसवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करायचा, मग तसं झालं नाही तर त्याचा रागाचा पारा गगनचुंबी व्हायचा, त्याच्यासकट सर्वानाच होरपळून टाकायचा. तर वीरेनने आजपर्यंत कायम यशाची चव चाखली होती आणि व्यवसाय म्हणजे रिस्क, त्यामुळे जर अपयश आलं तर, ही त्याची भीती होती.
चिंता हा दोघांवर झालेला परिणाम होता. त्यासाठी निमित्त ठरणाऱ्या आयुष्यातील घटना दोघांसाठी वेगवेगळ्या होत्या, पण मग त्यासाठी कारणीभूत होणारी अविवेकी विचारपद्धती कोणती होती? दोघांच्या केसेसचा नीट अभ्यास केला तर असं लक्षात येईल की, दोघांची विचारपद्धती एकच होती की, मी कायम परफेक्टच पाहिजे. पण त्यापुढे जाऊन एकजण त्याचा दुराग्रह इतरांवर करत होता, तर दुसरा त्यातून येणाऱ्या अपयशाच्या भीतीमुळे जबाबदारी टाळत होता. या अविवेकी पद्धतीमुळेच सत्येनच्या क्रोधाचे सतत स्फोट व्हायचे, ते वाढत जाऊन शेवट त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. अतितणाव व चिंतेचा विकार जडला होता; तर वीरेनला अपयशाची भीती वाटून तो चिंताग्रस्त झाला होता.
मग त्यांच्यासाठी ‘विवेक’ कोणता होता?  परफेक्ट राहण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे, कारण त्यामुळे माणूस आयुष्यात जास्त यश मिळवू शकतो. पण कधीतरी ही व्यवस्थितपणाची घडी विस्कटू शकते, याचीही तयारी ठेवली पाहिजे. तसंच आपल्या ‘परफेक्शनिझम’चा दुराग्रह आपण इतरांवर करता कामा नये. इतरांकडून परफेक्शनचा आग्रह धरणं हा विवेकी विचार आहे, तर दुराग्रह धरणं नक्कीच अयोग्य आहे. अर्थात दोघांना आधी चिंतेच्या लक्षणांतून औषधोपचार व हायपोथॅलॅमिक उपायांनी बाहेर आणणं माझं प्रथम कर्तव्य होतं. ते झाल्यावर मग त्यांच्या मनातली ‘अविवेका’ची बठक मोडून तिथे ‘विवेका’ची गादी बसवायची होती. असा विवेकपूर्ण विचाराचा सतत सेल्फ टॉक जर त्यांनी केला व पुढे बऱ्याच अंशी पाळला तर ते चिंतेपासून दूर राहतील हे नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of my perfect
First published on: 17-02-2013 at 01:01 IST