रा जा-राणीच्या सुरस कथा हा बहुतेकांच्या बालपणातील मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतो. त्याचा शेवटही अर्थात, ‘- आणि त्या दोघांनी दीर्घ काळ सुखानं राज्य केलं,’ असाच असतो. पण वास्तवात अनेकदा अशा राजा-महाराजांना किंवा सम्राटांना आपलं राज्यच नव्हे, तर अस्तित्वसुद्धा टिकवण्यासाठी निकराचा संघर्ष करावा लागतो. काहीजण त्यात नशीबानं आणि कर्तबगारीमुळे यशस्वी होतात. पण काहीजणांची अखेर अतिशय क्लेशदायक आणि करुणाजनक असते. भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये (पूर्वीचा ब्रह्मदेश) एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गादीवर आलेल्या थिबा राजाचा या दुर्दैवी यादीमध्ये समावेश होतो. तो केवळ ब्रिटिशांशी लढाई हरला नाही, तर जेमतेम सात र्वष राजेपद भोगलेल्या थिबाच्या नशिबी ऐन तारुण्यात विजनवास आला आणि एकूण आयुष्यापैकी निम्म्याहून जास्त काळ (३३ र्वष) त्याच अवस्थेत घालवून या जगाचा निरोप घ्यावा लागला. अर्थात ही सर्व वाटचाल इतकी सरळ नव्हती. त्यामध्ये राजघराण्यात शोभतील अशी कट-कारस्थानं, शह-प्रतिशहाचं राजकारण, सवतीमत्सर आणि संभाव्य स्पर्धकांचा शिरच्छेद हे सारं काही होतं. पण ब्रिटिशांनी या साम्राज्यावर ताबा मिळवल्यानंतर थिबा राजाची तिथून उचलबांगडी झाली आणि कुटुंबकबिल्यासह भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील काहीशा अप्रसिद्ध, दुर्लक्षित रत्नागिरी शहरात त्याची रवानगी झाली. अशा या दुर्दैवी राजाच्या तहहयात विजनवासाची कहाणी सुधा शाह यांनी ‘द किंग इन एक्झाइल (द फॉल ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ बर्मा)’ या संशोधनपूर्ण ग्रंथाद्वारे वाचकांपुढे मांडली आहे.
तत्कालिन ब्रह्मदेशातील कोनबाँग या राजघराण्यात जन्मलेल्या थिबाच्या जन्मापूर्वी १८२४-२६ आणि १८५२-५३ अशा दोन वेळा या राजघराण्यावर इंग्रजांशी युद्धाचा प्रसंग आला. त्यानंतर १८५७ मध्ये थिबाचे वडील राजा मिन्डॉन यांनी आपली राजधानी मंडालेला हलवली. त्या ठिकाणी १ जानेवारी १८५९ रोजी थिबाचा जन्म झाला. तो अवघा दहा वर्षांचा असताना राजघराण्यातील अंतर्गत यादवीमध्ये राजा मिन्डॉनच्या अन्य दोन मुलांनीच वडीलांविरुद्ध बंड पुकारलं. त्यामध्ये राजा बचावला, पण त्याने वारसदार म्हणून निवडलेला भाऊ युवराज कानाँग मारला गेला. या राजाला त्याच्या अनेक राण्यांपासून झालेले एकूण ४८ मुलगे होते. त्यापैकी काही मरण पावले, तर काहीजणांनी बंड केलं. यातून उरलेल्या २२ मुलांमधून मिन्डॉनला आपल्या वारसदाराची निवड करायची होती. त्या दृष्टीने थिबाचा त्याने कधीच गंभीरपणे विचार केला नव्हता. किंबहुना, तो राजा झाला तर अल्पकाळातच आपलं राज्य लयाला जाईल, असं त्याचं (पुढे खरं ठरलेलं)भाकित होतं. पण त्याची महत्त्वाकांक्षी बायको सिम्बुमाशिन हिने राजा गंभीरपणे आजारी पडल्यावर अन्य काही मंत्रीगणांच्या साथीने थिबाच्या निवडीवर मोहर उमटवायला लावली. अर्थात यामागेही, थिबाच्या प्रेमापेक्षा दुबळा राजा आपल्या मुठीत राहील, हाच विचार प्रबळ होता. त्यामुळे १८७८ मध्ये थिबाला राजाचा वारसदार म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात राजा मिन्डॉनचा मृत्यू झाला आणि ऐन तारुण्यात, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी युवराज थिबा मंडालेच्या सिंहासनावर आरूढ झाला. त्यापूर्वीच राजघराण्यातील सुपायालत या युवतीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते आणि थिबा राजा झाल्यानंतर ती त्याची पट्टराणी बनली. अर्थात हे सारं इतक्या सहजपणे घडून आलं नाही. त्यासाठी खास दरबारी डावपेच आणि क्लृप्त्या लढवल्या गेल्या. पण ते मूळ ग्रंथातूनच तपशीलानं वाचण्यासारखं आहे.
अशा प्रकारे तरुण राजा-राणीचे ऐन सुखाचे दिवस आले असतानाच जगात आपल्या साम्राज्याचा पसारा वाढवू पाहणाऱ्या ब्रिटिशांच्या आक्रमणाला तोंड देण्याची वेळ थिबावर आली. याची चुणूक आधी सुमारे तीन वर्षांपासूनच येऊ लागली होती. त्यामुळे १८८५ च्या सुरुवातीला ब्रिटिशांना टक्कर देण्यासाठी फ्रेंचांशी हातमिळवणी करण्याचाही प्रयत्न झाला. पण तो अंगलट आला. त्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिटिशांनी शरणागतीसाठी निर्वाणीचा इशारा दिला. अशा वेळी शरण जाऊन नामधारी राजा बनून राहणं किंवा युद्धाला तयार होणं, हे दोन पर्याय थिबा राजापुढे होते. त्याच्या मंत्रिगणामध्ये यावरून टोकाची भिन्न मतं होती. घराण्याचा वारसा आणि इज्जत राखण्यासाठी राजाने दुसरा पर्याय स्वीकारला. अननुभवीपण आणि युद्धकलेच्या दृष्टीने प्रगत नसल्यामुळे प्रत्यक्षात मात्र ब्रिटिशांचं आक्रमण तो थोपवू शकला नाही. जेमतेम पंधरा दिवसांत त्याला दारुण पराभव पत्करावा लागला. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. त्यानंतरचा भविष्यकाळ त्याच्या हातात राहिला नाही. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट भारतात, रत्नागिरीला रवानगी केली.
या अतिशय अल्पकालीन राजवटीची शाह यांनी विविध ऐतिहासिक कागदपत्रं आणि संदर्भाच्या आधारे तपशीलवार माहिती दिली आहे. राणी-राजाचं धार्मिक आणि दानशूर जीवन, दिनक्रम, दरबार, राजघराण्यात घडलेली अभूतपूर्व कत्तल, तत्कालिन ब्रह्मी परंपरा, अंधश्रद्धा, महत्त्वाकांक्षी सुपायलात, त्या मानाने फारसा नीटनेटका न राहणाऱ्या थिबा राजाची दुष्ट, अकार्यक्षम, दारुडय़ा अशी चुकीची प्रतिमा हे सारं त्यातून प्रभावीपणे उलगडलं आहे.
मद्रासमध्ये सुमारे चार महिने राहिल्यानंतर १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाचं आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्नागिरीत आगमन झालं. रत्नागिरीचे तत्कालिन ज्येष्ठ मुलकी आणि पोलीस अधिकारी त्याच्या स्वागतासाठी बंदरावर उपस्थित होते. पण पहिल्या दिवसापासूनच थिबाने रत्नागिरी शहराबद्दल तक्रारी करायला सुरुवात केली. मायदेशातील गावांच्या तुलनेत हे शहर अजिबातच सुखावह नव्हतं आणि साप-विंचूंचा सर्वत्र सुळसुळाट होता, अशी तक्रार त्याने लगेच व्हॉईसरॉयकडे केली होती. आपल्याला केवळ काही महिन्यांसाठी इथे आणलं असल्याचा त्याचा सुरुवातीला समज होता. पण लवकरच त्याचा भ्रमनिरास झाला आणि तो निराशेच्या गर्तेत बुडाला. ब्रिटिशांनी राजाची चांगली बडदास्त ठेवली होती. राहण्यासाठी प्रशस्त बंगला, दरमहा खर्चाची तरतूद, नोकर-चाकर हे सारं काही त्याला पुरवण्यात आलं होतं. पण त्यात राजा-राणी सुखी नव्हते. याबाबत त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी केलेला पत्रव्यवहार आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा तपशील इथे पानोपानी वाचायला मिळतो. रत्नागिरीत प्रारंभी त्याला दरमहा तीन हजार रुपये मानधन आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पण त्यावर त्याचं कधीच भागलं नाही. मानधनापेक्षा किमान हजार-बाराशे रुपये जास्त खर्च होत असे आणि त्यासाठी राजा बिनदिक्कतपणे आपल्याकडील मौल्यवान वस्तू गहाण टाकून कर्ज काढत असे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात हे मानधन पाच हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं. पण तेही कायम अपुरंच पडलं. कैदेत असूनही आपलं राजेपण आणि राजमहालातील जीवनशैली तो विसरू शकत नव्हता, तर ब्रिटिशांच्या दृष्टीने तो केवळ अतिमहत्त्वाचा कैदी होता. त्यातून वेळोवेळी निर्माण झालेले तणाव पुस्तकामध्ये उत्तम प्रकारे सादर झाले आहेत.
रत्नागिरीत आल्यानंतर थिबाला देण्यात आलेला बंगला जुना आणि अपुरा वाटू लागल्यामुळे नवा बंगला बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेला बंगला १९१० मध्ये बांधून पूर्ण झाला. वास्तुशांतीचे परंपरागत उपचार पूर्ण करून थिबा सहकुटुंब इथे राहू लागला. आजही हा बंगला म्हणजे त्याचं रत्नागिरी शहरातील भव्य, पण डागडुजीची गरज असलेलं स्मारक आहे.   
या नव्या वास्तूचा थिबा राजा फार काळ उपभोग मात्र घेऊ शकला नाही. १९१६ च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरीतील सुमारे ३३ वर्षांच्या या वास्तव्यात फारसे चढ-उतार नव्हते; कौटुंबिक कार्यक्रम वगळता फारशा नाटय़मय घटना-घडामोडीही नव्हत्या. त्याला झालेला एकुलता मुलगा बालपणीच आजारानं मरण पावला. त्यानंतर चार मुली झाल्या. त्यांच्यासह थिबाने रत्नागिरीत वास्तव्य केलं. दुर्दैवानं या चौंघीचंही वैवाहिक जीवन फारसं सुखाचं झालं नाही. त्या प्रत्येकीच्या जीवनातील गुंतागुंत लेखिकेने संशोधनपूर्ण तपशीलासह मांडली आहे. रत्नागिरीत थिबा राजाचं दफन करण्यावरूनही त्याच्या कुटुंबियांशी ब्रिटिश अधिकाऱ्यांचं वादंग झालं. अखेर कुटुंबियांना ब्रिटिशांचा निर्णय मान्य करावा लागला आणि त्यानंतरच पत्नी सुपायलातची तीन मुलींसह १९१९ मध्ये ब्रह्मदेशात रवानगी करण्यात आली. खरं तर इथे पुस्तक पूर्ण करणं शक्य होतं. पण लेखिका शाह यांनी राजाच्या या कुटुंबियांच्याही जीवनाचा मानवी दृष्टिकोनातून शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ थिबा राजाबद्दल कुतूहल असलेल्या वाचकांना कदाचित त्यामध्ये फारसा रस वाटणार नाही. पण राजघराण्यातील कुटुंबियांना दुर्दैवाचे फेरे अखेपर्यंत कशा तऱ्हेने छळत राहिले, याचं भावनापूर्ण चित्रण या उत्तरार्धात आहे.
राजाच्या चार मुलींपैकी एकीनं इथल्या वास्तव्यात गोपाळ सावंत नावाच्या स्थानिक नोकराशी प्रेमसंबंध जुळवले होते. त्याच्यापासून तिला मुलगीही झाली. त्यामुळे त्याच्या ओढीपायी ती आपल्या मुलीसह पुन्हा रत्नागिरीत परतली आणि अखेपर्यंत इथेच राहिली. तिची मुलगी टू टू या नावानं प्रसिद्ध होती. शंकर यशवंत पवार नावाच्या सामान्य माणसाशी तिने लग्न केलं. सात मुलांची आई असलेल्या टू टूला आर्थिक ओढगस्तीपायी गोधडय़ा शिवणं, कागदी फुलं तयार करून विकणं, शेणाच्या गोवऱ्या थापून विकणं अशी विविध कष्टाची कामं करावी लागली. पण त्यात तिने कधीही कमीपणा मानला नाही. उलट आपल्या मुलांबरोबर अनाथ मुलांचाही प्रेमानं सांभाळ केला. गेल्या शतकाच्या अखेरीस, २४ ऑक्टोबर २००० रोजी ९४ वर्षांची जख्खड म्हातारी होऊन टू टूने या जगाचा निरोप घेतला आणि थिबा राजाच्या तिसऱ्या पिढीचा अस्त झाला. तिला पाहिलेले लोक आजही रत्नागिरीत आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लेखिका शाह यांनी राजघराण्यातील वंशजांना सहन कराव्या लागलेल्या हालअपेष्टांची तपशीलवार नोंद केली आहे.
अन्य तीन मुलींपैकी सर्वात धाकटी अतिशय महत्त्वाकांक्षी होती. आपण राजघराण्यातील असल्याचा तिला केवळ सार्थ अभिमान नव्हता, तर ब्रह्मदेशात परत गेल्यानंतर या घराण्याचं पुनरुज्जीवन करण्याचंही स्वप्न तिनं पाहिलं. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांची तिच्यावर शेवटपर्यंत नजर होती.
एखाद्या राजघराण्याचा सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपासूनच्या वाटचालीचा, कौटुंबिक घडामोडींचा, मानवी नातेसंबंधांचा मागोवा घेताना या दीर्घ काळात या घराण्याच्या संपर्कात आलेल्या असंख्य छोटय़ा-मोठय़ा व्यक्तींची नोंद, हयात असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती आणि उपलब्ध माहितीच्या पुष्टीसाठी संबंधित सर्व स्थळांना भेटी, कागदपत्रं, छायाचित्रांचं संकलन हे निश्चितच अवघड काम होतं. आपल्याकडे अशा तऱ्हेच्या लेखी नोंदींची फारशी परंपरा नसल्यामुळे हे जास्त आव्हानात्मक ठरतं. पण लेखिका सुधा शाह यांनी ते यशस्वीपणे पेललं आहे. या सुमारे साडेचारशे पानांच्या कादंबरीमय इतिहासकथनामध्ये अनेक रंजक उपकथानकं आहेत. विविध माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीचे तुकडे एकत्र करून तत्कालीन व्यक्ती आणि घटनांचं सुसंगत, प्रामाणिक कथन इथे वाचायला मिळतं. त्याचबरोबर तत्कालीन ब्रह्मदेश आणि रत्नागिरी शहराच्या राजकीय-सामाजिक इतिहासाचेही संदर्भ आढळतात.
एके काळी सोन्याची पिकदाणी वापरणारा आणि हिऱ्या-माणकांची उधळण करणारा राजा थिबा ते शेणाच्या गोवऱ्या विकणारी त्याची नात टू टू पर्यंतच्या सर्व पात्रांच्या जीवनात आढळून येणारा एकमेव समान धागा म्हणजे, ही सर्व जण ऐन तारुण्यापासून अखेपर्यंत परिस्थितीशी झुंजत, झगडत, प्रसंगी जुळवून घेत जगत राहिली आणि शेवटी त्यापुढे हतबल होऊन शरण गेली. या आयुष्यात त्यांच्यावर नियतीने सोपवलेल्या भूमिकांसाठी ती क्वचितच योग्य ठरली आणि या अपात्रतेची शिक्षा त्यांना आयुष्यभर भोगावी लागली. सुधा शाह यांच्या या पुस्तकामुळे त्या काळाच्या रंगमंचावर ही पात्रं पुन्हा एकदा आपल्यापुढे साकार होतात आणि एका अभिजात शोकांतिकेचा अनुभव देतात.  
द किंग इन एक्झाइल- द फॉल ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ बर्मा- सुधा शाह, हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया, नवी दिल्ली, पृष्ठे : ४५६, मूल्य: ७९९ रुपये.