अमेरिकेतील ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ या संस्थेने अलीकडेच (जानेवारी २०१३) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली आहे. तर त्यांचेच ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे जगभर लोकप्रिय असलेले उच्चांकी खपाचे मासिकही येत्या ऑक्टोबर महिन्यात १२५ वषर्ं पूर्ण करेल. हे औचित्य साधून नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने २६ फेब्रुवारी ते २१ मार्च यादरम्यान  भौगोलिक आश्चयेर्ं मानल्या जाणाऱ्या जगातील काही स्थळांच्या ठिकाणी ‘जेट एक्सपिडिशन’चे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने पृथ्वीवरील भूगोलीय वैशिष्टय़ांचा तसेच जगभरातील वैविध्यपूर्ण संस्कृती, इतिहास, वास्तु आदींचा सातत्याने वेध घेणाऱ्या नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकाविषयी..
मी भूगोलाचा अभ्यासक आहे हे समजल्यावर मला दोन वाक्ये हटकून ऐकायला मिळत- ‘शाळेत माझा भूगोल हा आवडता विषय होता..’ आणि ‘मी अधूनमधून ‘नॅशनल जिओग्राफिक’ चाळतो. मला त्यातली छायाचित्रे फार आवडतात.’ भूगोलाबद्दल अशी सलगी दाखवली तरी मला जाणवायचे की, यांना भूगोल म्हणजे केवळ देश, नद्या, शहरे अशा भौगोलिक वैशिष्टय़ांची जंत्रीच वाटते आहे.
सुमारे २५० वर्षांपूर्वी ‘भूगोल’ या विषयाने कात टाकली आणि भूगोलशास्त्रात प्रामुख्याने भूपृष्ठवर्णनाचा समावेश झाला. हे भूपृष्ठवर्णन कधी नैसर्गिक भाग पाडून, कधी भौगोलिक भाग पाडून- जसे देश, कोकण, तर कधी राजकीय भाग पाडून- जसे भारत, चीन वगैरे- केले जाऊ लागले. भूगोलशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर हे ‘प्रादेशिक भूगोलशास्त्र’ होते.
भूगोलशास्त्राचा दुसरा घटक म्हणजे माणूस व पर्यावरण यांतील परस्परसंबंधाचा अभ्यास होय. यात एखादी प्रणाली- जशी शेती, त्यावर कोणत्या घटकांचा कसा, किती परिणाम होतो, इत्यादीचा अभ्यास करण्यात येतो. गेल्या १०० वर्षांत प्रादेशिक भूगोलशास्त्राच्या बरोबरीनेच रचनात्मक भूगोलशास्त्राचाही विकास झाला आहे.
भूगोलशास्त्राचा आवाका, त्यामधील विविध घटकांची व्याप्ती, अभ्यासादरम्यान प्रयोग करताना येणाऱ्या मर्यादा, न पाहता येणाऱ्या (जसे दूर देशातील वनस्पती) गोष्टींचे आकलन न करता येण्याची मानवी बुद्धीची मर्यादा या व अशा विविध कारणांमुळे भूगोलशास्त्राचा अभ्यास करणे अवघड होते. कदाचित अन्य कोणत्याही विषयांपेक्षा भूगोलशास्त्र समजून घ्यायला अधिक साधने लागत असावीत. म्हणूनच भूगोल प्रादेशिक असो वा रचनात्मक- नकाशे, आलेख, आकृत्या, चित्रे, छेद यांसारख्या साधनांचा भूगोलशास्त्राच्या अभ्यासात मोठय़ा प्रमाणात वापर करावा लागतो. १८८८ पासून ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिक हे या साधनांचा अखंड स्रोत ठरले आहे. आपल्या ‘भूगोला’मधील अनेक वैशिष्टय़ांचा ओघवत्या, सोप्या भाषेतील अभ्यासपूर्ण मजकूर त्यात अंतर्भूत असतो. त्यासोबत असतो  आगळ्यावेगळ्या माहितीचा खजिना. ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या मुद्रित आवृत्तीबरोबरच आता त्याची इलेक्ट्रॉनिक आवृत्तीही आपल्याला संकेतस्थळावर पाहता, वाचता येते. मल्टीमीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करून माहितीचा जणू महास्फोटच त्याने घडवून आणलेला आहे.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक ऐतिहासिक घटना-घडामोडींनी जग बदलू लागले होते. आफ्रिकावगळता अन्य प्रदेशांमध्ये युरोपियन वसाहतवाद्यांनी आपले साम्राज्य स्थापन केले होते. लोहमार्गाच्या रूपाने वाहतुकीचे नवे साधन उपलब्ध झाले होते. त्यामुळे प्रवास सुलभ आणि जलद झाला. अमेरिकेत यादवी युद्धानंतर पुनर्वसनाच्या योजना अमलात आणल्या गेल्या. त्यामुळे अमेरिकेचा आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मानवी इतिहासाच्या प्रारंभापासूनच माणसाला संशोधन (एक्सप्लोरेशन) करण्याची आवड होती. तशात आता त्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्यावर त्याला प्रोत्साहन न मिळते तरच नवल.
अशात पृथ्वीतलावरील नानाविध भूगोलीय वैशिष्टय़ांबद्दल आस्था आणि कुतूहल असणाऱ्या ३३ संशोधक व वैज्ञानिकांनी जानेवारी १८८८ मध्ये ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. ‘लोकांना पृथ्वीचे संवर्धन करण्यास प्रोत्साहित करणे’ हे या संस्थेचे ध्येय होते. त्यासाठी भौगोलिक माहिती मिळवणे व तिचे प्रसारण करणे हे उद्दिष्ट ठरविण्यात आले. या संस्थेद्वारे पृथ्वीतलावरील विविध भूभागांतील नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक साधनसंपत्तीचे जतन करण्यावर सोसायटीने भर द्यायचे निश्चित केले. सुरुवातीच्या काळात या उद्देशांसंबंधात काही मतभेदही झाले. काही प्रसंगी अभ्यास भूगोलशास्त्राच्या अंगाने न जाता पुरातत्त्वशास्त्र, इतिहास अशा गैरभौगोलिक अंगाने जात आहे, असे आक्षेपही घेतले गेले.
गार्डिनर हबर्ड हे अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध वकील, फायनान्सर आणि समाजचिंतक होते. सुप्रसिद्ध संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल हे त्यांचे जावई. बेल यांच्या कंपनीतून व अन्य आर्थिक व्यवहारांमधून मिळालेल्या पैशांतून  हबर्ड यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांना मदत केली. नॅशनल जिओग्रफिक सोसायटीची स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते.
हबर्ड यांचे स्वप्न त्यांच्या काळात तसेच पुढेही त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात आणले. त्यांत अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलही होते. ते सोसायटीचे दुसरे अध्यक्ष. आपण भूगोलतज्ज्ञ नाही हे बेल यांनी जाणले आणि त्यांनी आपला जावई गिल्बर्ट ग्रोसनव्हर यांना सोसायटीच्या ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकाचे संपादक नेमले. तेव्हापासून या मासिकाला निश्चित अशी दिशा मिळाली.
भूगोलाच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, भूगोलविषयक संशोधनाला आर्थिक मदत करणे, नियतकालिक, पुस्तके, नकाशासंग्रह, शाळांकरता उपयुक्त साहित्यांचे उत्पादन, इतर प्रकाशने, वेब व फिल्मस्ची निर्मिती याद्वारे सोसायटीने आपली उद्दिष्टे गेल्या सव्वाशे वर्षांत सर्वार्थाने साध्य केली आहेत. याबरोबरच सोसायटीचे वॉशिंग्टन येथे स्वत:चे एक वस्तुसंग्रहालयही आहे.
‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिक हे नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या वॉशिंग्टनस्थित संस्थेचे अधिकृत नियतकालिक आहे. ते ऑक्टोबर १८८८ मध्ये ‘द नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन’ या नावाने  प्रकाशित करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी १२ अंक, अधिक नकाशांच्या चार पुरवण्या आणि क्वचितप्रसंगी खास अंक असे या प्रकाशनाचे स्वरूप राहिले आहे. १९४५ साली मासिकाच्या नावातला ‘मॅगझिन’ हा शब्द गळला. तर १९६० मध्ये ‘द’ या शब्दाचे विसर्जन झाले. तेव्हापासून ते ‘नॅशनल जिओग्राफिक’ या नावाने प्रकाशित होत आहे.
‘नॅशनल जिओग्राफिक’मध्ये सर्वसाधारणपणे भूगोलशास्त्र, विज्ञान, जगाचा इतिहास, विविध जनसंस्कृती, चालू घडामोडी या विषयांवर लेख असतात आणि त्यांना नकाशे, आकृत्या आणि नितांतसुंदर छायाचित्रे यांची जोड दिलेली असते. कधी अंतराळविज्ञान, कधी पुरातत्त्वशास्त्र, कधी नामशेष होणाऱ्या वनस्पती वा प्राणी अशा विविध विषयांचा त्यात समावेश असतो. जाहिराती असतात; पण त्या अन्य  भूगोलशास्त्राच्या नियतकालिकांसारख्या साहसी प्रवास, ट्रेकिंग, प्रवासी उपकरणे, राहण्याच्या सोयी यांच्या नसतात. कॅमेरा, घडय़ाळे यांच्या जाहिराती मात्र अनेक वर्षांपासून आहेत. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलच्या जाहिराती गेली काही वर्षे दिसू लागल्या आहेत. या मासिकातील वाचकांचा पत्रव्यवहारदेखील वाचनीय असतो. क्वचित चुकीची दुरुस्तीही त्यात असते. (आम्ही चुका करायला मोकळे!)
या सर्वात खरी मजा आणतात ती यातली विषयानुरूपी अप्रतिम छायाचित्रे. या मासिकातील त्या- त्या विषयाचा वेध घेणारी गुळगुळीत आर्ट पेपरवरील अप्रतिम, आकर्षक व पूरक छायाचित्रे हजार शब्दांपेक्षा जास्त बोलकी असतात. अनेकदा फोटो आणि नकाशे दोन सलग पानांवर पसरलेले असतात. पण त्यात औषधालाही अव्यवस्थितपणा नसतो. त्यामुळे समुद्राचे किनारे दंतुर होत नाहीत, किंवा लष्करी मोहिमांचे मार्ग खंडित होत नाहीत, अथवा मासेही डोळे मिचकावत नाहीत. फोटो जर्नालिझमचे ते सवरेत्कृष्ट नमुने असतात. अर्थात या मासिकाच्या प्रकाशकांनी छायाचित्रणाची अत्याधुनिक तांत्रिक अंगे आत्मसात करून ती वापरात आणली त्यालाही याचे श्रेय जाते.
‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकाच्या मांडणीत कालानुरूप वेळोवळी बदल होत गेला, हे वेगळे सांगायला नकोच. पांढऱ्या मुखपृष्ठावर अनुक्रमणिका पद्धत १९६२ मध्ये संपली. मुखपृष्ठावरची पिवळी चौकट दिसते, तिची सुरुवात १९४२ मध्ये झाली. (फेब्रुवारी १९८१ च्या अंकात ही चौकट नव्हती.) रंगीत पाश्र्वभूमीवरची मुखपृष्ठे (अगदी नोव्हेंबर १९८५ च्या अंकावरील प्राचीन मानवाची कवटीदेखील!) लहानशा अनुक्रमणिकेबरोबर आकर्षक दिसतात.
वर नकाशांच्या पुरवणीचा उल्लेख केला आहे. अशी पहिली नकाशा पुरवणी मे १९१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. त्यावेळी अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली होती आणि सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संदर्भासाठी युरोपमधील पश्चिम युद्धआघाडीचा नकाशा त्यावेळी मासिकात प्रसिद्ध केला गेला होता. अमेरिकन शासनानेही म्हणे या मासिकाच्या नकाशासंग्रहांचा काही वेळा उपयोग केला होता. सहज वाचता येणारे, सूची-संदर्भ असा फापटपसारा नसणारे, सहज कळणारे यातले रंगीत नकाशे पाहताना नकाशाला शीर्षक हवे, प्रमाण द्यायला हवे, चौकट हवी- हे व्याकरण विसरायला होते.
‘नॅशनल जिओग्रफिक’चं बहुमोल योगदान हे की, त्याने विविध देशांतील वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्टय़ांचा वेगवेगळ्या अंगाने अभ्यास करून त्यासंबंधीची माहिती, छायाचित्रे आपल्या वाचकांना सातत्याने उपलब्ध करून दिली आहेत. काही काही बाबतींत त्यांनी पुनर्आढावा घेऊन दरम्यानच्या काळात काय काय बदल झाले, याचीही माहिती मासिकाने काही वेळा प्रसिद्ध केली आहे. प्रादेशिक भूगोल आणि रचनात्मक भूगोल या दोन्ही अंगांनी एखादा देश वा प्रणाली यांचा विचार करून त्यासंबंधातली परिपूर्ण, सर्वागीण माहिती देण्याची कामगिरी या मासिकाने केली आहे.
‘नॅशनल जिओग्राफिक’ इंग्रजीत प्रथम १८८८ मध्ये प्रकाशित झाले. पण अन्य स्थानिक भाषांमध्ये येण्यासाठी त्यास १९९८ साल उजाडावे लागले. प्रथम जपानी भाषेत ते १९९५ साली प्रकाशित झाले. फ्रेंच, जर्मनमध्ये ते त्यानंतर आले. आज हे मासिक जगभरातील ४० भाषांमध्ये प्रकाशित होत असते. एकटय़ा इंग्रजीतच त्याचा तब्बल ५० लाख प्रतींचा खप आहे.
‘नॅशनल जिओग्राफिक’मध्ये भारत अनेकदा डोकावला आहे. धारावी, कोलकात्याचे रिक्षावाले, विधवा, कुपोषित मुले अशा विषयांबरोबरच गंगा आदी नद्या, वनसंपदा, सांस्कृतिक घटना, भारतीय रेल्वेव्यवस्था, भारतीय कला आदी विषयांची भुरळ ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या लेखकांना पडली आहे. १९८२ साली या मासिकाचा मुंबईवरील विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सीमा ही प्रकाशकांना नेहमीची डोकेदुखी असते. या मासिकात प्रसिद्ध केलेल्या नकाशांतील भारताच्या सरहद्दी अधिकृत नाहीत, असा आक्षेपही अनेकदा घेतला गेला आहे.
भूगोलतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी मात्र या मासिकाला वाळीत टाकलेले दिसते. कारण कोणत्याही शोधनिबंधांत मला या मासिकाचा संदर्भ अद्याप तरी सापडलेला नाही. विद्यार्थ्यांना कदाचित इंग्रजी भाषेचे दडपण येत असेल. पण तज्ज्ञांना कसले दडपण? यात फार सोपे लिहिलेले असते, हेच तर त्यामागचे कारण नसावे? कदाचित जडबंबाळ म्हणजे विद्वत्ता- असा त्यांचा ग्रह असावा.
‘नॅशनल जिओग्राफिक’ची मुद्रित आवृत्ती चांगली की ऑनलाइन, या वादात न पडता आपण एवढेच म्हणू की जेथून जे, जसे, जितके मिळेल ते आपण घ्यावे. ‘नॅशनल जिओग्राफिक’ने भूगोलाबद्दलची जाणीव वाढवली. पण काही वेळा ते तरी किंवा लोक तरी भूगोलशास्त्र समजून घेण्यात कमी पडले. ग्रां-प्री टेनिस स्पर्धेतील चार वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या वेळी होतात, यामागे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध यांतील ऋतूंचा फरक आहे, हे फार कमी लोकांना माहीत असते. क्रिकेट हा खेळ मुख्यत्वे थंडीच्या दिवसांत अंगावर ऊन झेलण्याकरता खेळला जातो, हे हल्ली रात्रीचे क्रिकेट बघताना आपण साफ विसरलो आहोत.
ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकरांनी ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावर त्यांनी एक लेखही लिहिला होता. हा लेख लिहीत असताना त्यांची आठवण येत आहे.