‘मराठवाडा = टँकरवाडा’ (लोकरंग- १० फेब्रुवारी) हा सुहास सरदेशमुख यांचा ‘आँखो देखा हाल’ वर्णन करणारा लेख वाचला आणि सुमारे २० वर्षांपूर्वी पाण्याविना अनुभवलेला मराठवाडा आजही त्याच कारणाने तडफडत असल्याची तीव्र जाणीव झाली. बँकेच्या सेवेत असताना बीड जिल्ह्य़ातील धारूर गावी शाखा व्यवस्थापक म्हणून १९९१ मध्ये माझी बदली झाली होती. त्या गावातील पहिला दिवस मी विसरणेच शक्य नाही. मुंबईहून निघालेली एसटी धारूरला पोहोचताच तहान भागवण्यासाठी मला उसाचा रस प्यावासा वाटला. दुकानात जाऊन बाकडय़ावर बसताच ऑर्डर द्यायच्या आधीच ग्लास भरून उसाचा रस समोर आल्याचे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. कदाचित नवख्या गावातील वास्तव्याबद्दलची माझ्या चेहऱ्यावरची भीतीयुक्त काळजी लक्षात आल्याने हा पाहुणचार केला गेला असावा असे वाटले. मी रस प्यायला सुरुवात करताच रस गोड लागत नाही, म्हणून तक्रार केली. तेव्हा दुकानाचे मालक म्हणाले, ‘अहो, हे पाणी आहे. आता बोला- हाफ की फुल?’ तिथली पुढची चार वर्षे मी या गढुळ पाण्यासोबतच काढली. एकदा तर तलावात गाढव मरून पडल्याची बातमी पसरली आणि तीन दिवस पाण्याचा एक थेंबही मिळाला नव्हता. पाण्याचे भयानक दुर्भिक्ष्य असल्यामुळे गाळासोबत तळाचे पाणी हेच इथल्या लोकांचे ‘जीवन’ आहे याचा तेव्हा प्रत्यय आला. या दुष्काळग्रस्त अभागी लोकांच्या डोळ्यांतील अश्रूदेखील आटले आहेत. ‘अठराविश्वे दारिद्र्य पाहायचे आहे? चला मराठवाडय़ात!’ अशी सहल एखाद्या ट्रॅव्हल कंपनीने काढली तरी कुणी आश्चर्य मानू नये. पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देताना मानवी चेहरे धारण केलेली, परंतु मराठवाडय़ातील दुष्काळाची सदैव शिकार झालेली माणसे पाहिली आणि दु:ख काय असते हे तीव्रतेने जाणवले. घराच्या कोपऱ्यात असलाच तर एखादा दिवा; पण त्याही परिस्थितीत आमचे यथाशक्ती स्वागत करणारे ते गावकरी, गावचे सरपंच पाहिले आणि गरिबीतले ऐश्वर्यही अनुभवले. मुलीला १२ वीत ९५ टक्के गुण मिळाले म्हणून ढसाढसा रडणारा बाप मी इथेच पाहिला. कारण कमी गुण मिळाले असते तर मुंबईच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश न मिळता जवळच्या अंबेजोगाई वैद्यकीय कॉलेजमध्ये मिळाला असता आणि हॉस्टेलचा खर्च तरी वाचला असता. अशा अनेक दर्दभऱ्या कहाण्या ऐकत, पाहत, अनुभवत मी चार वर्षांनी पुन्हा मुंबईला परतलो. पण अजूनही अधूनमधून मन मराठवाडय़ातल्या त्या दु:खद आठवणींनी कळवळते. जगण्याची तीव्र आकांक्षा असलेली इथली चिवट माणसे ही ‘टँकरवाडा’ असलेल्या या मराठवाडय़ाची शान आहेत. इथल्या लोकांनी कितीही शारीरिक हालअपेष्टा सहन केल्या तरी मनाचा तोल मात्र कायम शाबूत ठेवलेला आहे. निसर्ग कितीही कोपला तरी दारिद्र्याच्या गंगोत्रीला काबूत ठेवण्यासाठी त्यांच्याकडे तोच एक रामबाण उपाय आहे यात शंका नाही. तथापि या दुष्काळी भागात राजकारण्यांचे पीक मात्र अमाप कसे येते, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘टँकरवाडय़ा’तील विजिगीषु माणसे
‘मराठवाडा = टँकरवाडा’ (लोकरंग- १० फेब्रुवारी) हा सुहास सरदेशमुख यांचा ‘आँखो देखा हाल’ वर्णन करणारा लेख वाचला आणि सुमारे २० वर्षांपूर्वी पाण्याविना अनुभवलेला मराठवाडा आजही त्याच कारणाने तडफडत असल्याची तीव्र जाणीव झाली. बँकेच्या सेवेत असताना बीड जिल्ह्य़ातील धारूर गावी शाखा व्यवस्थापक म्हणून १९९१ मध्ये माझी बदली झाली होती.
First published on: 24-02-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of tankarwada