|| सुभाष अवचट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अरे भावा, आकार माझ्याकडे होते, पण विचार करायला तू शिकवलेस..’ आणि ‘करुणेनं आणि सर्जनशीलतेनं आयुष्याचा शेला विणला, पण कर्तेपण कधीच स्वत:कडे घेतलं नाही..’

हे सांगू पाहणारे दोन लेख..

अर्थातच

डॉ. अनिल अवचटांसंबंधी!

ओतूरचा वाडा हे एक मोठं कुटुंब होतं. त्यात ते एकमेकांचे कोण लागतात हे मला समजत नसे. अगदी आलवणातल्या वाकलेल्या आज्या, पंत, माई, नानाकाका, निरनिराळ्या सुना, चुलत भावंडं, शेतकऱ्यांची पोरं, खांबाला पाठ टेकून बसलेले अनेक म्हातारे, येऊन जाणारे भटजी, कीर्तनकार, कंपाऊंडर, माझ्या वडिलांचे पेशंटस्, नवरात्राच्या पंगती, गुरं राखणारे नोकर, आडाचे पाणी काढणारे पाणकी, धान्याची पोती, त्यावर डोळे बंद करून बसलेली मांजरं, बोके, वाडय़ात फिरणारी पाळीव कुत्री, डोक्यावर टोपलीत भाज्या घेऊन गप्पा मारायला येणाऱ्या शेतकरणी.. सोप्यात सतत चहाचा रतीब असे. तक्क्याला टेकून सिगरेट ओढणारे कांतीशेठ, झांबरशेठ, शिकवणीला येणारे मास्तर, केस भादरायला येणारा शंकर न्हावी.. सारा वाडा पहाटेपासून जागा असे. त्यात माझी आई आणि डॉक्टर वडील, परकरातल्या, फ्रॉकमधल्या छोटय़ा मुली आणि पायजमे- हाफ चड्डय़ांतली अनेक मुलं वाडय़ात फिरत असत. माझ्या सख्ख्या बहिणी एक्झॉक्टली कोण आहेत हे कळायला मला वेळ लागला. माजघरातल्या अंधाऱ्या खोलीतून छोटय़ा मुलाचं रडणं ऐकू आलं की समजायचं की कोणीतरी बाळंत झालंय. महिन्यातून कोठलातरी एखादा म्हातारा खपे, त्यावेळी आम्हा सर्व पोरांना माजघरात बंद करून ठेवत असत. माझी आई मला अधूनमधून भेटत असे. कधी ती वाडय़ाच्या ओटय़ावर बसून गोष्टी सांगे, नाहीतर गावाबाहेरच्या कपर्दकिेश्वराच्या मंदिराला मला घेऊन जाई. शेताच्या बांधावरची फुलं दाखवायला ती विसरत नसे. माझे वडीलही फारसे भेटत नसत. दवाखाना किंवा दुसऱ्या खेडेगावात ते व्हिजिटला जात असत. पण काहीच हरकत नव्हती. आम्ही खेळण्यात, नदी, डोंगरावर फिरण्यात मग्न असू. दमलो की गाढ झोपत असू. यामुळेच की काय, सख्खा-चुलत, घरचा-दारचा हा फरक नसे. भावंडांतही नकळत हेच घडलं. कोणी प्रेमाने गहिवरून एकमेकांना उगाच मिठय़ा मारण्याची सवय तेव्हापासूनच लागली नाही. जो-तो स्वतंत्र होता आणि शेवटपर्यंत तसाच स्वतंत्र राहत गेला. रेखा, सविता, अनिल ही माझी भावंडं आहेत, हे मला उमजायला फार काळ गेला. त्याचं कारणही साधं होतं. म्हाताऱ्या आज्या, माणसं देवाघरी गेली. चुलते, भावंडं मुंबईला गेली आणि वाडा रिकामा झाला. मामा, मावश्या आल्या की सणासुदीला तो गजबजायचा.. नंतर परत रिकामा होत जायचा. त्यामुळे आम्ही सख्खी भावंडं हळूहळू जवळ आलो. त्याची एकमेकाला सवय झाली. त्यात एक माझा थोरला भाऊ अनिल होता.

लहानपणी अनिल हे एक अजब मिश्रण होतं. सारे त्याला घळ्या अथवा बावळट म्हणत. तसं त्यानं कुठल्यातरी लेखात लिहूनही ठेवलंय. त्याचे केस खराटय़ासारखे होते. शंकर न्हावी दोन्ही गुडघ्यात डोकं दाबून कटिंग करे. त्यामुळे तो आणखीच बावळा दिसे. त्याचा पायजमा लांब असायचा. त्यामुळे चालताना तो धूळ उडवीत चाले. पायजमा मातीने भरलेला असे. शर्टही अंगासरशी नसे. त्याची बटणंही खाली-वर असत. त्यात त्याला चष्मा लागला. त्या चष्म्याचीही एक नम्र कहाणी आहे. त्याकाळी वडिलांनी त्याला कोणत्या तरी डॉक्टरकडे नेलं. चष्मा कोठून विकत घेतला! ओतूरला पोहोचायला दोन नद्या पार कराव्या लागत. एखादीच एसटी गावात येई. त्यामुळे त्याचा चष्मा कोठून आणला हे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. त्याच्या चष्म्यानं सारा गोंधळ उडवून दिला होता. तो विहिरीत, नदीत जपून उडी मारे आणि चष्मा काढायला विसरे. त्यामुळे पाण्यात त्याचा चष्मा शोधणं हे मोठं कठीण काम असे. शेवटी त्या चष्म्याचे इतके हाल व्हायचे की त्याच्या काडय़ा दोऱ्यांनी बांधून तो फिरायचा. गावाबाहेरच्या पटांगणात क्रिकेट खेळण्याचा प्रसंग नेहमीच येई. त्याची बॅटिंग हा विनोदी विषय होता. बॉल मारताना त्याचे पाय पायजम्यात अडकत आणि तो धपकन् पडे. आऊट होई. असे असले तरी गावातल्या पोरांना तो जवळ हवा असे. संध्याकाळ झाली की समोरच्या वाडय़ाच्या पायऱ्यांवर सात-आठ पोरं जमत असत. त्यांच्यामध्ये बसून हा नानाविध गोष्टी रंगवत असे. पुढे आयुष्यात तो समाजातल्या अनेक थरांतल्या माणसांत, लहान मुलांत रमत असे, याची सुरुवात लहानपणी या वाडय़ाच्या पायऱ्यांवरून झाली होती. अंधार झाल्यावर आई त्याला जेवायला हाक मारी. तरीही वाडय़ाच्या दरवाजापाशी उभा राहून त्याच्या गप्पा चालूच राहात. घरात असताना त्याचे नानाविध उद्योग गुपचूप सुरू असत. त्याला अनेक गोष्टींचं कुतूहल असायचं. उकरणं, साळणं, जोडणं या छंदामुळे आई त्याला ‘नादिष्ट’ म्हणे. गजराचं घडय़ाळ डिसमेंटल करणं, पेट्रोमॅक्सची बत्ती पूर्ण उघडणं.. हे चालूच असे. त्याच्या आवडत्या वस्तू म्हणजे नेलकटर, स्क्रूड्रायव्हर, कात्री, कागद, सुऱ्या, पुठ्ठे, सुई-दोरा या होत्या. औषधाच्या बाटलीची रबरी बुचे जमवण्याचाही त्याला छंद होता. माडीवरच्या कोपऱ्यात बसून त्याचे हे उद्योग चालत. घरातल्या तुळईवर तो खडूनं श्लोकही लिहीत असे. तो आई, बहिणी, मावश्यांच्या संगतीत रमत असे. त्याला बेसिकली लाड करवून घ्यायला आवडत असे. अन्यासाठी घरात गुळपापडीचे लाडू करीत असत. त्याचा दुसरा वीक पॉइंट म्हणजे खारे दाणे. त्याच्यासाठी दाणे भाजून आई डबा भरून ठेवत असे.

आमच्या दोघांत जमीन-अस्मानाचा फरक होता. मी सतत उधळत असे. मला माळरानं, नदीचे डोह, मळे, ओतूरच्या आसपासचे डोंगर असं आऊटडोअरमध्ये रमायला आवडायचं. मला जे करावंसं वाटे त्याला मोकळीक होती. कुस्त्या, तालीम, कबड्डी या खेळांत मी रमलेलो असे. अनिलचा तालीम वगरेंशी दुरान्वयानेही संबंध नसायचा. त्याने मला धाकटा म्हणून कधी वागवलं नाही. त्याच्या मित्रांमध्ये तो मला सामील करायचा. पुढे आयुष्यभर त्याचे मित्र हे माझेही झाले. कदाचित थोरला म्हणून अपेक्षांचं दडपण त्याच्यावर असावं. त्यात वडिलांप्रमाणे त्यानेही डॉक्टर व्हावं, हेही असावं. पण मी धाकला म्हणून यातून सुटलो. गंमत अशी की त्याला जे करायचं ते करू दे, हाही एक अर्थ असावा. थोडक्यात, हा वाया जाणार हे त्यात गृहीत होतं.

अनिल मला काही प्रसंगांत अजून आठवतो. वाडय़ात नवरात्र साजरं व्हायचं. कीर्तनकार यायचे. गावकरी जमायचे. रात्री कीर्तन चालायचं. अशावेळी माझ्या मावश्या, आत्या मुक्कामाला यायच्या. अनिलला त्या कीर्तनकारासारख्या नटवायच्या. अर्थातच मोडका चष्मा त्याच्या नाकावर असायचाच. मग तो कीर्तन करे. ते दृश्य पाहण्यासारखं असे. गावकरी, मावश्या, कीर्तनकार टाळ्या मारीत त्याचं कौतुक करीत असत. तो जबलपूरच्या जाड मावशीच्या कुशीत जाऊन बसत असे. पुढे दोन दिवस त्याच पेहरावात तो वाडय़ात फिरत असे. कधीतरी दुपारी तो एकटाच गावाबाहेरच्या चतन्य महाराजांच्या देवळाकडे जाई. मी लपतछपत त्याचा पाठलाग करीत असे. चतन्य महाराजांचे छोटे देऊळ टेकडीवर आहे. तळाशी नदीचा डोह आहे. त्यावेळी चढायला पायऱ्या नव्हत्या. पायाच्या कडेला शिंदाडांच्या झाडांची गर्द राई होती. तिची, आकाशाची प्रतिबिंबं पाण्यात दाटीवाटीने उतरलेली असायची. त्यापलीकडे मुंजाबाचा डोंगर उभा असायचा. या दृश्यावर भरदुपारचं ऊन पसरलेलं असायचं. सारं स्तब्ध असायचं. अनिल बराच वेळ तिथे बसत असे. तो काय बघत असे? तो येथे का येतो? मला हे कधी समजलं नाही. मी त्याचा पाठलाग करतो आहे हेही त्याला कधी कळलं नाही. पुढे आयुष्यभर मी त्याचाच पाठलाग करीत गेलो, हे त्याला मी कधी भासवलं नाही.

मग अनिलचा ओतूर सोडण्याचा जीवघेणा प्रसंग आला. त्याला डॉक्टर व्हायचं असेल तर मोठय़ा शाळेत पाठवायला हवं असा निर्णय झाला असावा. त्याला पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये पाठवण्याचं ठरलं. तेथेच त्याच्या होस्टेलची व्यवस्था करण्यात आली, आणि त्याची बोळवण करण्याचा दिवस आला. एका भल्यामोठय़ा ट्रंकमध्ये त्याचे कपडे, लाडू, शेंगदाण्याचे डबे, टॉवेल, चड्डय़ा, युनिफॉर्म भरण्यात आले. त्याला जड, भक्कम कुलूपही लावण्यात आलं. मला नक्की आठवत नाही, पण तो किल्ली हरवेल म्हणून त्याच्या करगोटय़ाला ती बांधली असावी. आईनं त्याला ओवाळलं. मारुती नोकराने त्याची ट्रंक, वळकटी डोक्यावर घेऊन तो एस. टी. स्टँडकडे निघाला. वाडय़ाबाहेर त्याचे पायजम्यातले मित्र जमले होते. काकाचा हात धरून वाडय़ांच्या रांगांतून, बाजारपेठ पार करून, वेशीबाहेरच्या एस. टी. स्टँडवर आलो. मारुतीनं ट्रंक, वळकटी एस. टी.च्या टपावर चढवली. अनिल चष्म्यातून साऱ्यांकडे पाहत होता. काकानं त्याच्या डोक्यावर हात फिरवीत एस. टी.त बसवलं. तोच बहुदा त्याला सोडायला पुण्याला गेला असावा. एस. टी. वळण घेत, धुरळा उडवीत, डोलत डोलत निघाली. दिसेनाशी झाली. मला एकदा वाटलं, त्याचा पाठलाग मला आता कधीच करता येणार नाही. रात्रीच त्याच्या ट्रंकेत लपून बसायला हवं होतं. पुढे अनेक वर्षांनी मीही मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकायला गेलो, तेव्हा होस्टेलला जाऊन अनिल राहत होता ती खोली पाहून आलो.

लोकमान्य नगरच्या छोटय़ा फ्लॅटमध्ये अनिल, बहिणीबरोबर आम्ही एकत्र राहत होतो. आम्हाला सांभाळायला आईची आई होती. ते आठवणीत राहणारे भारावलेले दिवस होते. अनिल बी. जे. मेडिकलला, तर बहिणी एस. पी. कॉलेजला जायच्या. मी घरात हाफ चड्डीतला छोटा शाळकरी मुलगा होतो. घरात अनिलला पुण्यात भेटलेले कॉलेजचे त्याचे अनेक मित्र ये-जा करायचे. त्यात शरद त्रिभुवन, पानघंटी असे मेडिकलचा दूरचा संबंध नसलेल्या लोकांचा भरणा होता. त्यात बी. जे. मेडिकलचं आर्ट सर्कल फार प्रसिद्ध झालं होतं. दरवर्षी तिथे नाटकं, संगीताचे कार्यक्रम होत असत. जब्बार पटेल, मोहन आगाशे, निळू फुले आणि त्याचे अनेक होतकरू मित्रही गप्पा मारण्यात सामील होत. बी. जे. मेडिकलच्या आर्ट सर्कलनं तेव्हा निळूभाऊंची भूमिका असलेलं ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे नाटक केलं होतं. आर्ट सर्कलचे अनेक नामांकित प्रोग्राम होत असत. एकदा बेगम अख्तरचं गाणं होतं. अनिल मला त्या गाण्यासाठी घेऊन गेला. बेगम अख्तरांची माझी ओळख करून दिली. हाफ चड्डीतल्या मला पाहून त्या हसल्या. हिंदीत त्या काय म्हणाल्या मला कळलं नाही.

आमच्या घरात अनिलचं मेडिकलचं एक जाडं पुस्तक, थोडी इन्स्ट्रमेंट्स आणि एक स्टेथॅस्कोप सोडला तर मेडिकलचा विद्यार्थी म्हणून कोठलाही मागमूस नव्हता. मीच कानांत स्टेथॅस्कोप घालून आजीच्या पाठीला लावून तिला श्वास घ्यायला लावायचो.

आणि अचानक अनिलचे लहानपणीचे छंद- म्हणजे उकरणं, साळणं, घडय़ा घालणं असं सुरू झालं. यावेळी त्याचा नवीन छंद- म्हणजे मूíतकाम- सुरू झाला. त्याने घरातच आईनस्टाईनचा पुतळा बनविणे सुरू केले. घरभर शाडूची माती.. कोपऱ्यातल्या स्टुलावर हा बाबा आकार घेऊ लागला. पुतळ्यासाठी लागणारे- म्हणजे डोळे, कान, नाक उकरण्यासाठी लागणारे साहित्य त्याने आणलंच. दर आठवडय़ाला त्याची प्रगती पाहायला व सल्ले द्यायला पुण्यातले वेगवेगळे शिल्पकार यायचे. दोन-तीन तास चर्चा चालायच्या. ही माणसं अनिलला आदराने ‘डॉक्टर’ म्हणून संबोधायची. आजी, बहिणी घरभरातली माती काढून थकल्या आणि बऱ्याच महिन्यांनी तो आईनस्टाईन तयार झाला. तो पांढराफटक होता. रात्री झोपताना त्याच्यावर आजी टॉवेल टाकत असे. तिला त्याची भीती वाटे. शेवटी तो कुठे गेला हे आठवत नाही. पण तो कोपरा रिकामा झाला. तेथे एक कपाट मावले. नंतर त्याचा चित्रं काढण्याचा छंद सुरू झाला. तो फार त्रासदायक नव्हता. व्हरांडय़ात बसून तो ऑइल कलरमध्ये चित्रं काढीत बसे. शरद त्रिभुवन मोठा चित्रकार.. त्याला मोलाचे सल्ले देत असे. अर्थातच दोन-तीन तास चर्चा चालत. त्या महत्त्वाच्या असत. अनिलच्या या छंदाचा मी पाठलाग सुरू केला. अनिल अगदी जपून जपून चित्र काढीत असे. टय़ूब पिळून छोटे रंग पॅलेटवर घेत असे. छोटय़ा ब्रशने रंगवत असे. त्यामुळे पंधरा-वीस दिवस ते चित्र पूर्ण व्हायला लागत असे. मी त्याला म्हणायचो, ‘मोठ्ठा ब्रश घे आणि फटाफट चित्र पूर्ण कर!’ तो हसून म्हणायचा, ‘हळूहळू चित्र रंगवण्यातच मजा आहे.. वेळ कसा मजेत जातो.’

सुट्टीत आम्ही ओतूरला गेलो. त्याने रंग, साहित्य, ऑईल पेपर बरोबर आणले होते. चंदू शिंप्याकडून त्याने खांद्यावर लटकवायला मांजरपाटाची एक बॅग शिवून घेतली. माडीवर मी त्याच्या जवळ बसलो होतो. त्याने एक जाड पुठ्ठा कापला. त्यावर ऑईल पेपर क्लीपने लावला. लिन्सीड ऑईल, टरपेंन्टाईनची बाटली कागदात गुंडाळून घेतली. एक फडके, दोन-तीन बशा, पेन्सिल, खोडरबरची पेटी पिशवीत ठेवली आणि कपर्दकिेश्वराकडे आम्ही निघालो. यावेळी मी त्याचा पाठलाग केला नाही. पुढे मी जगप्रसिद्ध पेंटर सेझानचं आत्मचरित्र वाचत होतो. त्यात सेझान दररोज सकाळी पाठीला पिशवी लटकवून लँडस्केप करायला जातानाचा फोटो पाहिला. मला अचानक अनिलची आठवण झाली. अनिलचा फोटो काढणं राहून गेलं आणि ओतूरमध्ये एकही कॅमेरा नव्हता.

दुपारी ज्या ठिकाणी नदीकाठी तो बसायचा, समोरचं ते दृश्य बघत राहायचा, मी त्याला चोरून बघत राहायचो. त्यावेळी मला वाटलं नव्हतं की पुढे तो हे पेंटिंग करेल. त्याचं हे सुंदर पेंटिंग मला काही वर्षांनी मिळालं. ते मी जपून ठेवलं. नंतर त्याला भेट दिलं. त्यावेळी तो प्रेमानं हसला.. जसा ओरीगामीत एखादा प्राणी तयार केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरे.

त्याच्या नादाने मीही चित्रं काढायला लागलो. ती चित्रं शरद त्रिभुवनने पाहिली व अनिलला म्हणाला, ‘हा चांगला चित्रकार होऊ शकतो.’ अनिलने मला त्याचे रंग दिले. मी प्रथम भसकन् सारे रंग पिळून चित्र काढलं. अनिल जपून, तर मी फटकन् तयार करणारा- हा फरक दोघांत होता. त्याकाळी मी त्याच्याकडून ‘सत्यकथा’ या मासिकाबद्दल ऐकायचो. लेखकवर्गात त्याचा दरारा होता. त्याच्या मित्रमंडळींतही ही चर्चा असायची. या मासिकात मान्यवरांच्या कथा-कविता असतात. न आवडलेल्या कथा-कविता ते लेखक/ कवींना साभार परत पाठवीत. मला त्याबद्दल, मौज, भागवत, पटवर्धन, खटाववाडीबद्दल काहीही कल्पना नव्हती. पण अनिल लिहितो तर आपणही लिहावं असा पाठलाग करून मी सतरा-अठरा वर्षांचा असताना एक कविता लिहिली. त्यांच्या पत्त्यावर पाठवून दिली आणि विसरून गेलो. मला काही कवी, लेखक, चित्रकार व्हायचं नव्हतं. पण जे सहजतेनं भावतं ते करीत राहावं, ही दीक्षा मला अनिलने दिली. सत्यकथेने माझी कविता छापली हेही मला उशिरा कळलं. श्री. पुं.शी माझा ऋणानुबंध वाढला, त्याची ही सुरुवात होती.

अनिलच्या आयुष्यातला पहिला टìनग पॉइंट म्हणजे तो बिहारला गेला. सुखदेव या प्रसिद्ध डॉक्युमेंटरची बिहारवरील फिल्म त्याने पाहिली आणि त्याचं आयुष्यच पालटलं. त्याच्या ग्रुपने बिहारला जाऊन तळागाळातल्या शोषित लोकांना मदत करण्याचं ठरवलं. पसे नव्हते. ते जमवण्याचं काम सुरू केलं. त्यात मी सामील झालो. बिहारला त्याला का जायचं आहे हे मला माहीत नव्हतं. आम्ही पूनम हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. फूटपाथवर बूट पॉलिश, डेक्कन क्वीन ते खंडाळा पसे मागत फिरलो. आणि जमलेल्या पशांत ते बिहारला गेले. तो परतला तेव्हा पूर्ण बदललेला होता. त्याने डॉक्टरी सोडली आणि तळागाळातल्या लोकांना भेटून त्यांच्या परिस्थितीचं भेदक रूप जगापुढे आणलं. त्याने शेवटपर्यंत हे लिखाण केलं. जर्नालिझममध्ये नवीन पायंडा पाडला. सुनंदाशी त्याचं लग्न झालं. माझी ही वहिनी आमच्या घरात आली आणि मला तिचा सहवास लाभला. त्यात कधी तिची भूमिका आई, बहीण, वहिनी, तर कधी समजूतदार मत्रिणीची होती. माझ्या सर्व गोष्टींना तिने मजेशीर रीतीने सांभाळून घेतलं. तिच्या येरवडा मेंटल हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये मी सुट्टीत जात असे. दोघंही तिथे माझे लाड करीत असत. ती सायकिएॅट्रिस्ट असल्यामुळे तिला ठाऊक असावं की मला बंधन, उपदेश आवडत नाही. तिने तो कधीही केला नाही. माझी परीक्षा मुंबईला जे. जे. स्कूलमध्ये असायची. अनिल आणि ती- दोघंही मला परीक्षा हॉलमध्ये सोडायला, न्यायला येत असत. मी पहिला आल्यावर तिने मला चौपाटीवर भेळपुरीची पार्टी दिली होती. माझी मुलं तिची लाडकी. दररोज संध्याकाळी ती त्यांना भेटायला यायची. त्याकाळी त्यांनी सिंहगड रोडवर वडगाव हे गाव दत्तक घेतलं होतं. छोटय़ा मुलींचं आरोग्य, शेतीला मदत करण्यासाठी आम्ही मुलं तिच्याबरोबर दर रविवारी जात असू. बाबा आढावांबरोबर हमालांसाठी तिने सुरू केलेल्या दवाखान्यात, नंतर मुक्तांगणच्या सर्व प्रोग्रॅम्सना ती मला बरोबर नेत असे. माझ्या स्टुडिओचं तिला फार कौतुक होतं. तिनं रात्रीचं जेवण सोडलं होतं. त्यामुळे दोघंही चुरमुरे, फुटाणे खात असत. अनिलच्या जाकिटाच्या खिशात नेहमी पुडा असे. तिने अहोरात्र काम करून ‘मुक्तांगण’ उभारलं. तिला कॅन्सर कधी झाला, हे कळलं नाही. पण त्या दोघांची जोडी एकमेकांसाठीच होती. प्रत्येकाची क्रिएटिव्हीटी दोघांनीही समजूतदारपणे सांभाळली.

माझं अहमदाबादमध्ये शंभर फूट उंचावर एका घुमटावर चित्र रंगवण्याचं काम जवळजवळ दोन-तीन महिने चाललं होतं. एकदा कोणी कामगार वर चढून आला व म्हणाला, ‘तुमचा फोन आला आहे.’ मी उतरून खाली आलो. फोनवर अनिल होता. त्याने सांगितलं, ‘अरे, सुनंदा गेली.’ ‘मी निघतो..’ असं म्हणालो. तसं त्यानं सांगितलं, ‘घाई करू नकोस.. पहिलं पेंटिंग पूर्ण कर!’

अनिलच्या आयुष्यातला दुसरा टìनग पॉइंट म्हणजे सुनंदाचा मृत्यू. त्यानंतर त्याने पूर्णपणे कामात झोकून दिलं. मुक्तांगण, प्रवास, लिखाण, मुक्ता-यशोदा या मुलींभोवती त्याचं आयुष्य गोवलं गेलं. पण सुनंदाच्या जाण्याची पोकळी कधीच भरून आली नाही. कोमात असतानाही तिच्या नावाचा तो उच्चार करीत राहिला.

यावेळी त्याला त्याचा नादिष्टपणा उपयोगी आला. हार्मोनियम, गाणे, बासरी, ओरीगामी, छोटी छोटी लाकडी सुंदर शिल्पं, नानाविध इंट्रिकेट ड्रॉइंग्जमध्ये त्याने स्वत:ला करमवून घेतलं. साबुदाणा खिचडीवरचे प्रयोगही त्यात आले. पण बिहारमध्ये पाहिलेलं विदारक परिस्थितीचं जगाला दाखवणारं सूत्र त्याने जपलं.

हा माझा भाऊ जगभर, गावागावांत फिरला, पण कोठे हॉटेलमध्ये राहिला नाही. कुठल्याही दुकानात जाऊन स्वत:साठी कधी त्याने शर्ट-पॅन्ट घेतली नाही. आम्हालाच वाटायचं, त्याने अंगासरशी कपडे घालावेत. आम्हीच त्याच्यासाठी वेळोवेळी शर्ट, जाकिटे विकत घेत असू. मग ते घालून माझ्या घरी नटून तो दाखवायला येई. शेवटी तो समाजवादी कुटुंबात वाढला.. मीही त्याच्याबरोबर! मी त्याला म्हणायचो, ‘तू खरा काँग्रेसमध्ये जायला हवं. कधीतरी स्टार्चच्या कपडय़ांत तुला पाहायचं आहे.’ ‘साधना’ परिवारातले समाजवादी कधी व्यायामशाळेत जात नाहीत, इस्त्री केलेले कपडे घालत नाहीत. त्यातही कमाल म्हणजे आम्ही शाळकरी मुलं बाबा आमटय़ांच्या सोमनाथला पहिल्या कँपमध्ये गेलो होतो. अनिल बाबा, सुनंदाला घेऊन भर उन्हाळ्यात तेथे हनिमूनला आला. या समाजावाद्यांचं काही खरं नाही!

अनिलमुळेच माझ्या चित्रकलेत मोठा बदल झाला. त्याचं लिखाण, त्याच्यामुळे भेटलेली असंख्य माणसं, त्यांची दृष्टी आणि समाजातले अंगावर शहारे आणणारे वास्तव माझ्या शैलीत नकळत उतरत गेले. माझी शैली कधीच गोंडस स्वरूप घेऊन आली नाही. त्यातही अनेकदा जवळून पाहिलेलं वास्तव माझ्या पेंटिंग्जमध्ये आलं, तेही स्वतंत्र शैली घेऊनच. हमाल, शेतकरी, वारकरी, धारावीतील झोपडपट्टय़ा, विद्रूप वाढलेली शहरं, बकाल झालेली खेडेगावं कळत-नकळत पेंटिंग्जमध्ये आली. अनिलच्या पुस्तकांची मी केलेली कव्हर्स याची साक्ष ठरतील. माणसं, गर्द, मुक्तांगणची गोष्ट किंवा अनेक कव्हर्सवरील चित्रं चपखल होत गेली. कारण ते वास्तव मी त्याच्या डोळ्यातून पाहत आलो. तो माझ्या अनेक प्रदर्शनांत यायचा. माझ्या मोठय़ा पेंटिंग्जकडे पाहत राहायचा. दिवसभर गॅलरीत बसून बासरी वाजवीत राहायचा. मला त्याला सांगावंसं वाटे, ‘अरे भावा, ही दुनिया तर तू मला दाखवलीस. आकार माझ्याकडे होते, पण विचार करायला तू शिकवलेस.’

करोनामध्ये त्याचे जवळचे मित्र गेले. लॉकडाऊनमध्ये तो एकटा पडला. त्याच्या भेटीगाठी, चर्चा, प्रवास थांबला. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा मला ओळखायला त्याला त्रास झाला. पण नंतर लिंक लागली आणि सुरळीत गप्पा झाल्या. अनेकदा त्याचे हॉस्पिटलायझेशन झाले. त्याचा बॅलन्स बिघडला. तो पडत असे. त्याचे हातही थरथरत असत. तरीही त्याला लिहावयाचं होतं. त्याने आता थांबावं असं मला वाटलं. भरपूर काम झालं. कोठे थांबावं हा निर्णय घ्यायला हवा. त्यावर ‘विसर्जन’ नावाचा लेख मी लोकसत्तात ‘लोकरंग’मध्ये लिहिला होता. तो त्याला फोनवर ऐकवलाही होता. शेवटी अनिल सकाळी गेला. मीही पोहोचलो. तो शांत झोपला होता. त्याच्या उशाशी माझ्या पुतण्याच्या छोटय़ा पोरांनी कागदाचा पक्षी करून ठेवला होता. वैकुंठ स्मशानातही तो त्याच्या उशाशीच होता.

वैकुंठ स्मशानातून मी बाहेर पडलो आणि एकाएकी जाणवलं, ‘अरे, माझं धाकटंपण संपलं आता!’

subhash.awchat@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash awchat article little girl frock cry of a little boy from a dark room dispensary bawlat cutting akp
First published on: 06-02-2022 at 00:07 IST