scorecardresearch

महाराष्ट्रीय विचारविश्वाचे अजातशत्रू नेतृत्व

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना जाऊन आता पाव शतकाचा काळ लोटला आहे.

महाराष्ट्रीय विचारविश्वाचे अजातशत्रू नेतृत्व

|| श्री. मा. भावे

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना जाऊन आता पाव शतकाचा काळ लोटला आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वाचे निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विद्वज्जड व्यक्तिमत्त्व मात्र कधीच नव्हते. त्यांना विविध ज्ञानशाखांच्या अभ्यासात, चिंतन-मननात रस होता. त्यातून त्यांचे लेखन सर्वगामी झाले. वाईची प्राज्ञ पाठशाळा आणि विश्वकोश प्रकल्पाच्या प्रचंड कार्याची धुरा त्यांनी सहजगत्या सांभाळली.

२७ मे १९९४ या दिवशी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अगदी सहजपणे पंचत्वात विलीन झाले. त्यावेळी ते ९४ वर्षांचे होते. ‘अनायासेन मरणं, विनायासेन जीवनम्’ असे सुभाषित आहे. त्यातील पूर्वार्ध शास्त्रीजींच्या मरणाने लोकांच्या अनुभवाला आणून दिला. पण उत्तरार्ध मात्र खरा नव्हता. लहानपणी व तरुणपणी माधुकरी मागून शास्त्रीजींना पोट भरावे लागले होते. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतील सगळ्याच विद्यार्थाना भिक्षा मागूनच अन्नाची सोय करावी लागे. शास्त्रीजी पुढे सांगत असत की, माधुकरी मागायला लाज वाटे. चोरटय़ासारखे होई.

लक्ष्मण या आपल्या मुलाला त्याची हुशारी पाहून त्याचे वडील बाळाजीपंत जोशी यांनी वाईला नेले आणि ‘प्राज्ञमठ’ या नारायणशास्त्री मराठे यांनी चालविलेल्या पाठशाळेत दाखल केले. ते साल होते १९१४. पुढे १९१६ साली प्राज्ञमठाचे रूपांतर प्राज्ञ पाठशाळेत झाले. प्राज्ञ पाठशाळेतही मुख्य शिक्षक श्रेष्ठ विद्वान नारायणशास्त्री हेच होते. शाळेतील शिकवण्याची पद्धती विद्यार्थ्यांचा कस पाहणारी असे. नारायणशास्त्री व इतर शास्त्री मंडळी यांना महत्त्वाचे ग्रंथ मुखोद्गत असत. एखादा विषय, उदा. न्याय- शिकवायचा झाला की नारायणशास्त्री त्या विषयातील मुख्य ग्रंथ (उदा. ‘तर्कसंग्रह’) विवेचनाला घेत. काही टप्प्यांपर्यंत विषयाची गाडी आणून सोडत. मग विद्यार्थ्यांना सांगत की, ‘इथून पुढचे उरलेले प्रकरण तुमचे तुम्ही शिकायचे. त्यासाठी दोन आठवडय़ांचा वेळ घ्या.’ दोन आठवडय़ांनंतर ‘तर्कसंग्रहा’तील नवीन मुद्दय़ांचे सांगोपांग विवेचन विद्यार्थ्यांना करावे लागे. त्यासाठी दोन पक्ष करून त्यांच्यात वाद घडवून आणत. मुख्य आचार्याच्या अध्यक्षतेखाली हा वाद चाले. समजा, लक्ष्मणाला एखादा मुद्दा नीट विवरून सांगता आला नाही, तर त्याला त्या मुद्दय़ाचा अभ्यास पुन्हा करावा लागे व फिरून वादाला सामोरे जावे लागे. अशा रीतीने प्रत्येक विषयाची अगदी काटेकोर तयारी करून घेतली जाई.

विनोबाजी १९१७ साली वाईला आले होते आणि नारायणशास्त्र्यांकडे उपनिषदांचा अभ्यास करत होते. तेव्हा शास्त्रीजी विनोबांपाशी गीतेचा अभ्यास करीत. त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’ची फारच वाखाणणी झाली होती. शास्त्रीजी, विनोबा व पाठशाळेतील विद्यार्थी ‘गीतारहस्य’ची पारायणे करीत. एक दिवस विनोबांनी शास्त्रीजींना ‘गीतारहस्य’तील निरनिराळ्या ठिकाणची तीन वाक्ये सांगितली व ‘ही कुठल्या संदर्भात आली आहेत?’ असे विचारले. शास्त्रीजींनी पुस्तक न उघडता संदर्भ तर सांगितलेच, पण त्या वाक्यांचे उत्तम विवेचनही केले. विनोबा शास्त्रीजींवर फार खूश झाले. यावरून तिथे किती साकल्याने अभ्यास होत असे हे कळून येते.

पाच-सहा वर्षांनंतर शास्त्रीजींनी नारायणशास्त्री यांची परवानगी घेऊन वाराणसीला प्रयाण केले आणि तेथील राजराजेश्वरशास्त्री द्रविड व इतर नामांकित पंडितांच्या सहवासात राहून तर्कशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी कोलकात्याच्या एका संस्थेची ‘तर्कतीर्थ’ ही पदवी मिळवली आणि ते वाईला परत आले. त्यांनी नारायणशास्त्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठशाळेत शिकविल्या जाणाऱ्या मीमांसा, काव्य, वेदांत इत्यादी शाखांचाही अभ्यास केला. नारायणशास्त्री निवृत्त झाल्यावर प्राज्ञ पाठशाळेची जबाबदारी घेण्याची ही तयारी होती. शास्त्रीजी सांगत की, ‘पाठशाळेचा मुख्य आचार्य होण्यासाठी एका शाखेचा समग्र अभ्यास हवाच; पण इतर शाखांचीही चांगली माहिती हवी. यासाठी कमीत कमी बारा ते चौदा वर्षे शिक्षणात घालवावी लागत.’

नारायणशास्त्री यांनी १९३१ साली संन्यास घेऊन ‘केवलानंदसरस्वती’ हे नाव घेतले. त्यानंतर त्यांनी पाठशाळेतील जबाबदाऱ्या सोडल्या. मात्र, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम १९५६ साली ते समाधिस्थ होईपर्यंत त्यांनी केले. त्यांनी कार्यभार सोडल्यानंतर प्राज्ञ पाठशाळेची धुरा लक्ष्मणशास्त्र्यांकडे आली.

धर्मसुधारणा

नारायणशास्त्र्यांनी संन्यास घेतल्यानंतर लोक त्यांना ‘स्वामीजी’ म्हणू लागले, स्वामीजींनी वेद व वेदांगे यांचा तपशीलवार अभ्यास केला होता. सनातन वैदिक धर्माचा त्यांना अभिमान होता. मात्र, स्वामीजी कर्मठ सनातनी नव्हते. धर्म हा परिवर्तनशील आहे, तो स्थिर नाही; कालमानानुसार त्यात बदल झाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. स्वामीजींची ही सर्व मते लक्ष्मणशास्त्री यांना पूर्ण मान्य होती. प्राचीन शास्त्रांमध्ये सर्व धर्मसुधारणांना वाव मिळू शकतो अशी त्यांची खात्री होती.

विधवाविवाह, प्रौढविवाह, अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक सुधारणांना धर्मशास्त्राचा विरोध नाही असे या दोघांनी हिरीरीने दाखवून दिले. त्याकाळी धार्मिक परिषदा भरवल्या जात. तेथे परंपरावादी शास्त्री आणि सुधारणावादी शास्त्री यांच्यात कडाडून भांडणे होत. सभा उधळली जाण्याचा प्रसंग येई. धर्माचा निर्णय करणे साध्यासुध्या माणसाचे काम नाही असे सनातन्यांचे म्हणणे होते. त्यावर मात करण्यासाठी स्वामीजी, शास्त्रीजी, कोकजेशास्त्री आणि नागपूरचे भाऊजी दप्तरी यांनी ‘धर्मनिर्णय मंडळ’ नावाची संस्थाच काढली.

अस्पृश्यता निवारण

१९३२ साली गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ हाती घेतली. स्वामीजी व शास्त्रीजी दोघांचेही ठाम मत होते की, धर्मशास्त्रात अस्पृश्यतेला आधार नाही. गांधीजींनाही हे मत मान्य होते. अनेक सनातनी शास्त्री मंडळींशी लक्ष्मणशास्त्रींचे वाद झाले. ‘धर्मशास्त्रात अस्पृश्यतेला आधार नाही’ अशा आशयाचा जाहीरनामा तर्कतीर्थानी तयार केला व तो गांधीजींनी ‘हरिजन’मध्ये प्रसिद्ध केला.

अस्पृश्यांचा मंदिरप्रवेश हाही वादाचा मुद्दा होता. त्यासाठी सत्याग्रहही झाले. शास्त्रीजींना हे मान्यच होते की अस्पृश्यांना देवळात जायचा अधिकार आहे. पुढे १९५१ साली सौराष्ट्रातील सोमनाथाच्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हे काम करणाऱ्या समितीने देऊळ दलितांसाठी खुले ठेवले जाईल असा ठराव केला होता. त्यामुळे सोमनाथाच्या परंपरेने आलेल्या पुरोहितांनी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस नकार दिला. असा ‘भ्रष्टाचार’ त्यांना मान्य नव्हता. तेव्हा स्वामीजी आणि शास्त्रीजी सोमनाथाला गेले. त्यांनी मूर्तीची यथाविधी स्थापना केली.

धर्मसुधारणेच्या बाबतीतील पाठशाळेचे सद्धांतिक कार्य म्हणजे धर्मकोशाचा प्रकल्प. वैदिक धर्म हा परिवर्तनशील आहे हे दाखवण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथातील वचनांची कालमानानुसार यादी करून धर्माच्या निरनिराळ्या उपांगांत- उदा. सोळा संस्कार- कसे बदल होत गेले, ते सिद्ध करायचे. १९३० साली नारायणशास्त्री यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार केला. तर्कतीर्थानी त्यांच्या मृत्यूपर्यंत या अवाढव्य कोशाचे १८ भाग प्रसिद्ध केले. अजूनही हे काम चालूच आहे.

सर्वगामी विद्वत्ता

शास्त्रीजींनी स्वातंत्र्यलढय़ात उत्साहाने भाग घेतला. १९३० साली आणि १९४२ साली ते तुरुंगात गेले. तर्कतीर्थानी इंग्रजीचे पद्धतशीर शिक्षण घेतले नव्हते. स्वत:च्याच प्रयत्नांनी ते इंग्रजी वाचण्यास शिकले. तुरुंगात असताना त्यांनी मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्या मूळ ग्रंथांवरून अभ्यास केला. त्यातून ‘हिंदू धर्माची समीक्षा’ व ‘जडवाद’ हे त्यांचे ग्रंथ १९४१ साली प्रसिद्ध झाले. मार्क्‍सवादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेली हिंदू धर्माची परखड समीक्षा त्याकाळी फार गाजली.

१९५१ साली शास्त्रीजींचा ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा विख्यात ग्रंथ प्रसिद्ध झाला. भारतातील नृत्य, गायन, शिल्प, चित्र या कला; व्याकरण, काव्य यांसारख्या विद्या; विज्ञान, रसायन, गणित, खगोल ही शास्त्रे यांची बीजे वैदिक संस्कृतीत आढळतात. अवैदिक संस्कृती होती खरी; पण नंतर ती वैदिक संकृतीतच सामावून गेली, असे शास्त्रीजींचे प्रतिपादन आहे. हा एक अलौकिकच ग्रंथ म्हणावा लागेल. साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन या ग्रंथाचा गौरव केला.

खेरीज साहित्य, समीक्षा, इतिहास, धर्म, प्राच्यविद्या आणि समाजशास्त्र अशा विषयांच्या विद्वत् परिषदांना उपस्थित राहून त्यांनी आपले चिंतन वेळोवेळी पंडितांच्या समोर मांडले. शासन, विद्यापीठे, साहित्य परिषदा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा गौरव केला. ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. शासनाने त्यांना ‘पद्मभूषण’ (१९७६) व ‘पद्मविभूषण’ (१९९२) हे किताब दिले.

मराठी विचारविश्वाचे नेतृत्व

महाराष्ट्र शासनाने मराठीतील साहित्य व्यवहाराला आर्थिक साह्य़ देण्याच्या हेतूने ‘म. रा. साहित्य संस्कृती मंडळा’ची स्थापना केली. त्याचबरोबर अद्ययावत ज्ञानकोश निर्माण करावेत म्हणून ‘विश्वकोश मंडळ’ स्थापन केले. या दोन्हींचे अध्यक्षपद शास्त्रीजींनी भूषविले. या संस्थांमुळे मराठी विचारवंतांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळाले. शास्त्रीजींचा दीर्घ अनुभव, प्राचीन विद्या व आधुनिक शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांचा प्रचंड अभ्यास, त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व व वक्तृत्व आणि ही अधिकारपदे यामुळे मराठीतील विचारविश्वाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले आणि पुढे ३० वर्षे त्यांनी ते तपश्चर्यापूर्वक सांभाळले. चच्रेला उत्तम माध्यम म्हणून ‘नवभारत’ हे मासिक त्यांनी चालवले. कितीही जटिल मुद्दा चच्रेला असो; तर्कतीर्थानी केलेला समारोप सर्वाचे समाधान करून जाई.

शास्त्रीजींच्या ठिकाणी प्रथमदर्शनी परस्परविरोधी वाटावेत अशा गुणांचा मनोज्ञ मिलाफ दिसून येई. त्यांनी धर्मशास्त्रांचा दांडगा अभ्यास केला, पण धर्मशास्त्राविषयी श्रद्धा बाळगली नाही. मार्क्‍सवादाच्या सिद्धांतातील गुंतागुंतीची समजूतदार चर्चा ते करीत; मात्र भारतातील अध्यात्म हेच श्रेयस प्राप्त करून देते असा त्यांचा विश्वास होता. राजकारणाच्या धकाधकीत त्यांनी भाग घेतला आणि कठोर विरोधाला ते सामोरे गेले. तरीही यातून आपणास काही साधायचे आहे असा हव्यास त्यांनी बाळगला नाही. विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा साक्षेपी अभ्यासक या भूमिकेतच ते शेवटपर्यंत वावरले.

 

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2019 at 00:14 IST
Next Story
सावली

संबंधित बातम्या