महात्मा गांधी हे जगातील सर्वात आधुनिक, आठवे आश्चर्य असावे, असे मला अलीकडे वाटू लागले आहे. जगभरात त्यांच्यावर लाखभर पुस्तके लिहिली गेली आहेत, पण त्यांच्याविषयीचे कुतूहल शमताना दिसत नाही. उलट प्रत्येक नव्या पिढीला आपापल्या पद्धतीने त्यांना समजून घ्यायचे असते. त्यामुळे भारतात एकीकडे गांधीद्वेषाला उधाण येत असताना गांधींवरील पुस्तकांत सातत्याने भर पडतानाही दिसते. सुहास कुलकर्णी यांचे ‘असे होते गांधीजी’ हे नवे पुस्तक ही मराठीतील गांधी-साहित्यात मोलाची भर आहे.

हे रूढ अर्थाने गांधीचरित्र नाही, कारण गांधींच्या जीवनातील बहुसंख्य घटना आता सर्वविदित आहेत. यशस्वी प्रकाशक असणाऱ्या सुहास कुलकर्णींना विद्यार्थी व नवतरुण वाचकांना गांधींबद्दल नेमके काय जाणून घेण्याची उत्सुकता आहे, हे चांगले माहीत आहे. त्यामुळे त्यांनी दोन गोष्टींवर भर दिला आहे. एक- गांधींविषयी खोडसाळपणे प्रसृत करण्यात आलेल्या मिथकांचा सौम्य शैलीत प्रतिवाद करणे. त्यामुळे डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल व भगतसिंग यांच्याशी गांधींच्या असणाऱ्या गुंतागुंतीच्या, तरीही हृद्या नात्यांना पुस्तकात बराच अवकाश देण्यात आला आहे. दोन- गांधींच्या जीवन व कार्याचे राजकारणाशिवाय असणारे विविध पैलू चितारून त्यांनी गांधींची व्यापक प्रतिमा उभी केली आहे. त्यांची जीवनशैली, उपोषण, तुरुंगवास, आहारातील प्रयोग, भिन्न विचारांच्या माणसांची मने जिंकण्याची त्यांची हातोटी, आपल्या वेशात त्यांनी जाणीवपूर्वक केलेले बदल अशा गोष्टींची रंजक व महत्त्वाची माहिती त्यांनी वाचकांसमोर जाणीवपूर्वक मांडली आहे.

लेखकाने अन्यत्र सहज न सापडणारी माहिती (उदा. चरख्यात नवसंशोधन करण्यासाठी गांधीजींनी केलेली खटपट, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाशी संबंधित आकडेवारी (५३८ वेळा गोळीबार, ९४० लोकांचा मृत्यू, १८३० जखमी, ६०,००० लोकांना अटक, तीन शहरांत विमानातून बॉम्बहल्ले इ.), हेन्री फोर्ड गांधींनी पाठवलेल्या चरख्यावर सूत कातत असत.) पुरवली आहे. त्यातून वाचकांसमोर संबंधित विषयाचे वेगळे व भव्य चित्र उभे राहते. सिंध प्रांतात १९४२ मध्ये मुस्लीम लीगचे सरकार होते. पण तेथील गव्हर्नर अल्लाबक्ष यांनी ‘चले जाव’ चळवळीला पाठिंबा दिला, त्यामुळे लगेच त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि त्यांचा भर दिवसा खूनही करण्यात आला, अशी विस्मृतीत गेलेली माहितीही या पुस्तकातून मिळते.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने जाणीवपूर्वक चरित्रनायकाचे चित्र ठसठशीतपणे, मोठाल्या स्ट्रोक्समधून चितारण्याचे टाळले आहे. गांधीजींशी वैचारिक मतभेद असणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात लिहिताना त्याने कोणतीही भूमिका घेण्याचे टाळले आहे व निर्णय वाचकांवर सोडला आहे. गांधींसारख्या महानायकावर लिहिताना त्याने स्वत:वर घालून घेतलेली ही मर्यादा लक्षणीय आहे. गांधींचा सर्वधर्मसमभाव व हिंदुत्व या दोन विचारधारांमधील द्वंद्व हे गांधीहत्येमागील प्रमुख कारण आहे व ही लढाई आजही लढली जात आहे याचे भान लेखकाला आहे. गांधीहत्येच्या संदर्भात ३० जानेवारी १९४८ पूर्वी गांधींच्या खुनाचे सहा प्रयत्न झाले होते हे नोंदवताना हे सर्व प्रयत्न हिंदुत्व विचारधारेच्या त्याच ठरावीक व्यक्तींनी केले होते.

फाळणीचा धोका दूर-दूरपर्यंत दिसत नसताना झालेल्या या प्रयत्नांच्या मागे गांधींच्या तथाकथित मुस्लीम-अनुनयाचा राग हे कारण अर्थातच नव्हते. अस्पृश्यता निवारणातून ते हिंदू समाजातील श्रेणीबद्धतेला आव्हान देऊन सवर्ण हिंदूंना सामाजिक समतेकडे वळवत होते. त्यामुळे हवालदिल झालेले लोक त्यांना संपवू पाहत होते, हे कारण लेखकाने स्पष्ट केले असते तर गांधीहत्येमागील कारणमीमांसा वाचकांच्या नीट लक्षात आली असती. आकर्षक प्रकाशचित्रांची रेलचेल असणाऱ्या या पुस्तकाची मांडणी उत्तम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘असे होते गांधीजी’, सुहास कुलकर्णी, समकालीन प्रकाशन, पाने-१२२, किंमत-२०० रुपये.