‘सूर व्यवस्थित लागला पाहिजे, एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे जाण्याचा अमुक मार्ग आहे, त्या ठिकाणी नेमके पोचले पाहिजे, योग्य जागी योग्य तोच स्वर लागावा, त्या स्थानी ढाल्या, चढा किंवा नाजूक स्वर लागता कामा नये, शब्दांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध हवेत, रागाची चौकट सोडू नये..’ अशा सर्व गोष्टींना गाण्याच्या भाषेत ‘तालीम’ म्हणतात. शिष्य चुकत असेल तर हे पुन:पुन्हा सांगणे आवश्यक आहेच. तालमीत संगीतातील सर्व घटकांचा विचार असायला हवा. स्पष्ट उच्चार, उत्तम आविष्कार, आलापी, बोलतान, तानांची फिरत आणि त्यानंतर सर्व स्वरांना स्पर्शून जाणारी तीन सप्तकी तान हे सारे तालमीत शिकता येते. मग जे शिकले ते आविष्कारात आपोआप येतेच. शिवाय त्या काळातील विशिष्ट संगीताचा परिणामही दिसतोच. १९३१ नंतरचा काळ हा शास्त्रीय संगीत आणि नाटय़पदांच्या प्रभावाचा होता. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे भावगीतगायनाच्या या आरंभकाळात अनेक शास्त्रीय गायकांची भावगीते रसिकांसमोर आली. त्यावेळी गायकाने गायली आहे ती रागाची बंदिश आहे की भावगीत, असा प्रश्न श्रोत्यांना पडे. उत्तम शब्द, काव्यातील उत्कट कल्पना आणि शास्त्रीय रागाचा आधार हे सर्व या युगात जमून आले. या गीतांमध्ये कविता आहे आणि रागविस्तारही आहे, हे पाहून श्रोते चकित होत. अशा गायकांचे गाणे साहजिकपणेच लोकप्रियही होऊ लागले. या गायकांनी भावगीतांच्या दुनियेत आपला वेगळा ठसा उमटला. या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गायक जे. एल. रानडे अर्थात् जनार्दन लक्ष्मण रानडे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले.

याच काळात अल्लादिया खाँसाहेबांचे सुपुत्र मंजीखाँसाहेब मैफलीत माधव ज्यूलियन यांची ‘ऐकव तव मधुबोल’ किंवा गडकरींची ‘बजाव बजाव मुरली’ या कवितांचे गायन करत. कविता व गायन यांचे सूर जुळू लागले होते.

कवी सदाशिव अनंत शुक्ल हे ‘कुमुदबांधव’ या नावाने काव्यलेखन करीत. रंगभूमीचा उत्कर्ष, बोलपटांचा प्रारंभ, रेडिओचं आगमन, भावगीतांचा आरंभीचा काळ, ध्वनिमुद्रण ही सर्व मन्वंतरे स. अ. शुक्ल यांनी पाहिली. गायक जे. एल. रानडे यांनी स. अ. शुक्ल यांचे हे गीत गायले व भावगीतात एका वेगळ्या गायनशैलीचा ठसा उमटला.

‘अति गोड गोड ललकारी

सोड बुलबुला प्यारी तव न्यारी।

कशी लोपत माया गिरिधारी

झुरते राधा मनांत भारी

आता घे धाव क्षणी मुरारी

हा संदेश सांग सुखकारी।’

प्रारंभी भीमपलासी स्वरांची छोटी आलापी गीताच्या चालीत नेऊन सोडते आणि या रागात हे गीत बांधले आहे हे क्षणात कळते. पहिल्या ओळीतील ‘गोड गोड’ हे दोन्ही शब्द ऐकतानासुद्धा गोड वाटावेत अशी त्याची स्वरयोजना आहे. ‘तव न्यारी’ ही स्वरांनी सजविलेली खास जागा ऐकायलाच हवी. ध्रुवपदात ‘ललकाऽऽऽरी’मध्ये बोल आलापी आणि मुखडय़ावर येण्यासाठी अवरोही स्वरांची आलापी दाद देण्यासारखी आहे.

अंतऱ्यामध्ये ‘गिरिधारी’ या शब्दाच्या ‘इ’कारातील आलाप व आळवणी आणि त्यात छोटय़ा तानेची जागा यामुळे गीतसौंदर्य निश्चितच वाढले आहे. त्यापुढची ओळ ‘झुरते राधा मनांत भारी’ ही एकूण ११ वेळा गायल्यामुळे त्यातली भावना व आर्तता वाढली आहे. मधे फक्त दोन वेळा फॉलो म्युझिक पीस आहे. रागविस्तारासह शब्दांना न्याय दिल्यामुळे ही ललकारी प्रभावी ठरली आहे. अंतऱ्यामधील तिसरी ओळ ‘आता घे धाव क्षणी मुरारी’ ज्या उत्तम पद्धतीने तालात येते, त्यात गायक-संगीतकाराची प्रतिभा दिसून येते. म्हणूनच पुरेपूर रियाज करूनच हे गीत गाणे गरजेचे आहे. मुळात  भीमपलास रागातले गंधार व निषाद हे कोमल स्वर व रागाची पकड ‘ललकारी’ या भावगीतात स्पष्ट दिसते. या गीताने श्रोत्यांच्या मनाची पकड घेतलीच; शिवाय रेकॉर्डिग कंपनीनेही त्यांची दखल घेऊन या गायकाच्या अनेक रेकॉर्डस्ची पुढे निर्मिती केली.

गायक जे. एल. रानडे यांचा जन्म १९०५ साली इचलकरंजीत झाला. त्यांची आई पौराणिक कथांमधील गीते गात असे. ते बाळकडू छोटय़ा जनार्दनास मिळाले. तसेच शालेय अभ्यासक्रमात संगीत हा विषय होताच त्यांना. मोरोबा गोंधळी या नावाचे गुरुजी सायंकाळी नित्यनेमाने त्यांना शास्त्रीय गायन शिकवू लागले. तेव्हा वडिलधाऱ्या मंडळींना शंका यायला सुरुवात झाली, की हा मुलगा पुढे नाटक कंपनीत तर जाणार नाही ना? पुढे कोल्हापूरहून सांगलीत आलेले गुरू दि. रा. गोडबोले यांच्याकडे रानडे यांना शास्त्रीय गायन शिकण्याची संधी मिळाली. या गुरूंकडे त्यांचा भातखंडे संगीतपद्धतीचा सखोल अभ्यास झाला. परंतु पुढे संगीताचाच व्यवसाय करावा अशी घरातली परिस्थिती नव्हती. त्यामुळे नोकरी शोधणे भाग झाले. कोर्टामध्ये कारकुनाची नोकरी मिळाली खरी; पण संगीतविश्वाच्या तुलनेत तिथले वातावरण खूपच रुक्ष आहे हे त्यांना प्रकर्षांने जाणवू लागले. नंतर पुण्यात आठवडय़ातून एकदा पं. विनायकराव पटवर्धन यांच्याकडे शिकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून रानडे यांचे गायन फुलू लागले. तेही या विषयात रुची असणाऱ्या काहींना गायन शिकवू लागले. ग्रामोफोन कंपन्यांकडे आपले गायन पोहोचावे यासाठी रानडे धडपडू लागले. त्यासाठी मान्यवर गायकांची शिफारसपत्रे मिळाली. १९३३ मध्ये आकाशवाणीवर रानडेंचा पहिला कार्यक्रम झाला.

जे. एल. रानडे यांना ग्रामोफोन कंपनीने आमंत्रित केले. जुलै १९३४ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. एक लोकप्रिय गायक म्हणून ते नावारूपाला आले. गायन मैफली होऊ लागल्या. त्यांच्या मैफलीच्या विविध प्रकारे जाहिराती होऊ लागल्या. जाहिरातींत गायकाचे भरपूर कौतुक केलेले असे. ‘रसिकांचे आवडते गायक’ किंवा ‘गायनाचा अपूर्व जलसा’ असा उल्लेख होत असे. वृत्तपत्रांतून रेकॉर्डची जाहिरात करताना ‘या रेकॉर्डचा खप मोठय़ा प्रमाणावर होईल अशी अपेक्षा आहे. कारण श्री. रानडे यांची ही रेकॉर्ड बऱ्याच कालावधीनंतर बाहेर पडत आहे,’ असे म्हटलेले असे. १६ ऑक्टोबर १९५१ या दिवशीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकातील ‘संगीतसुधा’मध्ये नवीन रेकॉर्डस्च्या जाहिरातीत गायक जे. एल. रानडे यांच्या ‘घायाळ मी शिकारी’ व ‘डोळे तुझे शराबी’ या गीतांचा उल्लेख आहे. या माहितीकरता रेकॉर्ड कलेक्टर्स बुलेटिनला दाद द्यायला हवी. रेकॉर्ड कंपन्याही अशी जाहिरात करत- ‘विशेष माहितीसाठी आमचा कॅटलॉग पाहा अगर आम्हास लिहा. रेकॉर्ड आमच्या व्यापाराच्या दुकानी मिळतात.’ या जमान्यात जे. एल. रानडे यांनी भावगीतांत चांगलेच नाव कमावले. एच. एम. व्ही. कंपनीने १९३४ ते १९५२ या १८ वर्षांच्या कालखंडात या गायकाच्या पन्नासहून अधिक ध्वनिमुद्रिका काढल्या. त्यांची शास्त्रीय रागांच्या बंदिशींसह असंख्य भावगीते श्रोत्यांना आवडली. ‘नवल ही बासरी हासरी’, ‘तू अन् मी करूनी निगराणी’, ‘तू लिहावी प्रेमगीते’, ‘हासत नाचत ये’, ‘बाई आम्ही लपंडाव मांडला..’ अशी त्यांची अनेक भावगीते लोकप्रिय झाली. जे. एल. रानडे या गीतांना ‘भावपदे’ म्हणत.

हिंदुस्थानी संगीतातील स्वरप्रमाण व २२ श्रुती या विषयावरील सांगलीतील रावसाहेब कृष्णाजी बल्लाळ देवल यांचा प्रबंध, सप्रयोग व्याख्यान, सातारा येथील त्यावेळचे न्यायमूर्ती व पाश्चिमात्य संगीत अभ्यासक इ. क्लेमंट्स व फिलहार्मोनिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना या घटना गायक जे. एल. रानडे यांनी जवळून अनुभवल्या होत्या.

आजच्या कलाकारांनीही जे. एल. रानडे यांची भावपदे आवर्जून ऐकली पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. भावगीतांतील एक वेगळे नाव म्हणून त्यांचे गाणे ऐकायला हवे.

रेकॉर्ड कलेक्टर्स सोसायटीचे मानद सचिव सुरेश चांदवणकर यांची एक मार्मिक टिप्पणी मला भावली. ते म्हणतात, ‘गजानन वाटवे, जी. एन. जोशी व जे. एल. रानडे या तिघांच्या गाजलेल्या गाण्यांत- म्हणजे ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘वारा फोफावला’ व ‘गोड गोड ललकारी’ यांत वायु(तत्त्व) समान होते.’

गायक जे. एल. रानडे यांनी सांगलीमध्ये पुढे बंगला बांधला. आणि त्या बंगल्याचे नावही त्यांनी ‘ललकारी’च ठेवले. यातच भावगीतांची अफाट लोकप्रियता दिसून येते.

विनायक जोशी – vinayakjoshi@yahoo.com

मराठीतील सर्व स्वरभावयात्रा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Classical singer janardan laxman ranade
First published on: 05-02-2017 at 01:01 IST