मराठी भावगीतांच्या नव्वद वर्षांच्या प्रवासातील गाजलेली गाणी, त्यांचे सर्जनशील कर्तेधर्ते, त्या गाण्यांची वैशिष्टय़े, त्यांच्यावरील अन्य संगीताचा असलेला प्रभाव, त्यांच्या प्रसारातील आकाशवाणीचा मोलाचा वाटा इत्यादी दिलचस्प गोष्टींबद्दलचे रसीले सदर.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल यमुनाकाठी ताजमहाल’

हे शब्द वाचल्यावर गायक-संगीतकार गजानन वाटवे नजरेसमोर येतात आणि नकळत आपण हे गाणे गुणगुणायला लागतो. स्वाभाविकपणेच त्याबरोबर वाटव्यांची गायनशैली, तालासह येणारी चाल, संगीत संयोजन आणि आशय हे सारे तपशील आठवू लागतात. आणि आपणही त्यांच्याच शैलीत गाऊ लागतो. अर्थात एखादे गाणे अनुकरण करावे असे असते म्हणूनच हे घडते. मग हा शब्द असाच उच्चारला गेला पाहिजे, त्या गाण्यामधील स्वरांच्या जागा जशाच्या तशाच आल्या पाहिजेत, यासाठी आपली धडपड सुरू होते. ते गाणे मनासारखे गाता आले तर आपल्याला पराकोटीचा आनंद होतो आणि आता ते गाऊन कोणाला तरी ऐकवावे असे वाटते. त्याचे मूळ गायक, कवी, संगीतकार यांच्याबद्दल बोलावेसे वाटते. आपले म्हणणे कुणीतरी ऐकावे हा आपला हट्ट होतो. त्या सांगण्याने आपल्याला आनंद मिळतो. अर्थात मूळ निर्मितीत ती ताकद असते म्हणूनच हे होत असते. ‘यमुनाकाठी ताजमहाल’ हे शब्द समोर येताच गीतकार अनिल भारती व गायक- संगीतकार गजानन वाटवे ही नावे आठवतात. आणि आपणच आपल्याशी संवाद करतो. पं. यशवंत देवांनी याच वाटवेंना ‘मराठी भावगीताचे गेट-वे’ म्हटलंय ना? भावगीत गायनाचे जनक ते हेच ना? चौकाचौकातल्या भावगीत गायनाच्या मैफली लोकप्रिय करणारे ते हेच गजानन वाटवे ना? सोपे, पण आशयघन शब्द आणि अर्थवाही चाल हे वैशिष्टय़ जपणारे गजानन वाटवे ते हेच ना? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ‘होय’ असेच आहे. गजानन वाटवे आठवले की आपण थेट १९३५  नंतरच्या काळात जातो.

८ जून २०१६ रोजी गायक गजानन वाटवे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. यानिमित्तानेसुद्धा त्यांची गाणी आठवणे उचित ठरेल. ‘यमुनाकाठी ताजमहाल’ या गीताला अमाप लोकप्रियता मिळाली. अनिल भारती यांचे शब्द (त्यांचे मूळ नाव- शांताराम पाटील) आणि वाटव्यांचे गायन या दोन्ही गोष्टी जमून आल्या. गाण्याची चाल आणि अंतऱ्यामधील स्वरयोजनाही जुळून आली. यात आरंभीचा बासरी व व्हायोलिनचा स्वतंत्र वाजलेला, पण जोडलेला म्युझिक पीस गायनाला सुरुवात करून देणारा आहे. मुखडय़ामध्ये ‘एक विशाल’ या शब्दाच्या उच्चारणात तालाची लय मिळते. ‘विशाल’ या शब्दातील आकार लक्षात घेण्यासारखा आहे. हाच स्वच्छ आकार ‘महाल, चिरकाल पावलाने, साक्षात्कार, खुशाल’ या शब्दांमधून दिसतो. पहिल्या अंतऱ्यात ‘प्रीत’, ‘ओढून’ हे शब्द, दुसऱ्या अंतऱ्यात ‘या’, ‘वाजवू’ हे शब्द आणि तिसऱ्या अंतऱ्यात ‘हिरे’ हा शब्द हे गायनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. मुळात गीतकार अनिल भारती यांचे शब्द बादशहा शहाजहानने बेगम मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालाचे वर्णन करणारे आहेत..

‘मूर्तिमंत झोपली प्रीत अन्

मृत्युचे ओढून पांघरुण

जीवन कसले महाकाव्य हे

गाईल जग चिरकाल

नि:शब्द शांती अवती भवती

हिरे जडविले थडग्यावरती

एकच पणती पावित्र्याची

जळते येथे खुशाल

हळूच या रसिकांनो येथे

नका वाजवू पाऊल ते

दिव्य दृष्टीला होईल तुमच्या

मंगल साक्षात्कार’

तीनही अंतऱ्यांच्या आधीचे म्युझिक पीसेस छोटेखानी आहेत, पण वेगवेगळे आहेत. आपल्याला अंतरा म्हणायला सुरावर आणून सोडणारे आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हे गाणे गाऊन बघितले तर अधिक आनंद मिळेल.

गजाननराव वाटवे आपल्या आत्मकथनात लिहितात- ‘‘पहिले गाणे रेकॉर्ड झाल्यावर तो क्षण छान होता. आपलेच गाणे आपल्याला ऐकायला मिळाल्याचा आयुष्यातील पहिला क्षण! पण ते ऐकल्यावर मी सांगितले, ‘छे, छे! हे मी गायलेलं नाही. हा माझा आवाज नाही. आपण पुन्हा रेकॉर्ड करू.’ रेकॉर्डिग इंजिनीअर म्हणाले, ‘पहिल्या रेकॉर्डिगला प्रत्येक कलाकाराला असंच वाटतं.’ मग समजूत पटली. मी काव्यगायकच का झालो? कवितांचा छंद मला का लागला? याचे कारण कोवळ्या मनावरील संस्कार हे आहे. ‘नव हिंद राष्ट्र’, ‘चरखा चला चलाओ’, ‘हा हिंद देश माझा’ या प्रभात फेरीतील गीतांनी माझ्यावर संस्कार केले.’

गजाननराव स्वत:ला काव्यगायक म्हणवत असत. त्यांच्या घराच्या दारावरील पाटीवरही ‘श्री. गजानन वाटवे, काव्यगायक’ असे लिहिलेले होते. त्यांनी अभिजात कविता साध्या-सोप्या चालींत बांधली व रसिकांपुढे मांडली. भावगीताला आवश्यक अशी सर्व वैशिष्टय़े गळ्यात असल्याने त्यांचे गाणे लोकप्रिय झाले. त्यांनी कविता आणि संगीत रसिकांपर्यंत नेले. पं. यशवंत देव लिहितात- ‘सुरांची आतषबाजी करून मेहनती गळ्याचे कसब दाखवण्याचा हट्ट त्यांनी केला नाही. शब्दांमधील भाव प्रकट करीत तेवढेच सूर त्यांनी उपयोगात आणले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘गगनि उगवला सायंतारा..’

सारेसा निसारेम रेरे निसा..

जितकी अक्षरे, तितकेच सूर.’

गजानन वाटवेंबद्दल कवयित्री संजीवनी मराठे लिहितात- ‘शब्द स्पष्ट, तरीही मधुर. आवाज सुरेल, ठाशीव. चाल अर्थाला साजेशी. अभिनव, अलंकृत, तरी साधी. साथीला मागे ठेवून पुढे नेणारे गायक. काव्यात्मता व्यक्त करणारी वेधक शैली. चेहऱ्यावर नाटय़ न दाखवता ते गायनातून संपूर्ण व्यक्त करणे. एक निश्चित कलाप्रकार. एक कालखंड गाजविला.’

वाटवेंची कन्या मंजिरी वाटवे-चुनेकर लिहितात- ‘काव्यगायन हा एकच ध्यास घेऊन ते संपूर्ण आयुष्य जगले. केवळ दोन वाद्यांसह चार-चार तास भावगीते गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध करण्याचे सामथ्र्य त्यांच्या गाण्यात दिसते. त्यांनी घालून दिलेल्या वाटेने आज अनेक कलाकार मार्गक्रमण करीत आहेत.’ काही वर्षांपूर्वी वाटवेंच्या मार्गदर्शनासह आणि पं. अप्पा वढावकर यांच्या संगीत संयोजनासह दोन कॅसेट्सची निर्मिती झाली. गायिका रंजना जोगळेकर व गायक रवींद्र साठे यांनी स्वतंत्रपणे गायलेल्या त्या दोन कॅसेट्स होत्या. रंजना जोगळेकर सांगतात- ‘त्यांना कवितेची उत्तम जाण होती. नव्या नव्या कवींच्या कविता ते सतत वाचायचे व चाली लावायचे.’ रवींद्र साठे त्यांना ‘युगप्रवर्तक गायक’ मानतात.

‘यमुनाकाठी ताजमहाल’ हे गीत लिहिलेले अनिल भारती यांनी वाटवेंसाठी आणखी एक लोकप्रिय गीत लिहिले-

‘प्रीतीची आसवे पत्थरास पाझरली

तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली’

ही दोन्ही गाणी इतिहासातील घटनांवरची आहेत. गजानन वाटवेंनी मनमोहन नातू, माधव ज्युलियन, बाबुराव गोखले, वि. म. कुलकर्णी, श्रीनिवास खारकर, मा. ग. पातकर, ग. दि. माडगूळकर, राजा बढे अशा असंख्य गीतकारांची गीते स्वरबद्ध केली अन् गायली.

‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला’, ‘मैत्रिणींनो सांगू नका’, ‘बापूजींची प्राणज्योती’, ‘निरांजन पडले तबकात’, ‘मोहुनिया तुज संगे’, ‘कुणीही पाय नका वाजवू’ अशी वाटवेंची असंख्य गाणी आठवतात व गुणगुणाविशी वाटतात. वाटवेंच्या बहुतांश गायनात समाजातल्या घटना या कवितेचा विषय होत. भारतावरील चीनचे आक्रमण, महात्मा गांधींचा मृत्यू, पानशेतचा प्रलय, गोवा मुक्तिसंग्राम, एव्हरेस्ट शिखरावरील विजय अशा अनेक प्रसंगांवरील कविता त्यांच्याकडे तयार असत. कविवर्य माधव ज्युलियन यांनी त्यांची ‘आई’ ही कविता वाटवेंकडून ऐकल्यानंतर ते म्हणाले, ‘माझी ‘आई’ ही कविता इतकी चांगली आहे, हे आज मला कळले.’

हजारो रसिकांना व कलाकारांना आनंद देणाऱ्या गजाननराव वाटवे यांचे भावगीत गायनाच्या दालनात मानाचे स्थान आहे. हा आनंद मलासुद्धा मिळाला आहे. त्यादृष्टीने मी भाग्यवान आहे. २३ जून १९९७ या दिवशी त्यांनी मला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुम्हाला स्वत:च्या मार्गाच्या प्रगतीचे टप्पे बरोबर सापडले आहेत. डोळे उघडे ठेवून निरहंकारी राहून गात राहा, ऐकत राहा, आपल्याच गाण्यातून आनंद घेत राहा. माझ्यासारखा तपस्वी, तरुण म्हातारा सदैव तुमचे कौतुक करत राहील व आशीर्वादसुद्धा देत राहील.’

खरोखरच माझ्यासाठी हा ‘ताजमहाल’ आहे.

विनायक जोशी vinaykpjoshi@yahoo.com

Web Title: Famous marathi bhavgeet of last 90 year
First published on: 15-01-2017 at 04:10 IST