परवल: परवलाची फळे तोंडल्यासारखी असतात. उत्तरेत काशी, अलाहाबाद, दिल्ली इकडे या भाजीची फार चलती आहे. पथ्यकर भाज्यांत परवलचा क्रमांक फार वरचा आहे. मोठय़ा आजारांत, जेवणावर नियंत्रण असते, लंघन चालू असते, आहार मर्यादित असतो. अशा अवस्थेतून प्रकृती सुधारण्याकरता आहार वाढवण्याकरिता परवल भाजी खाऊन सुरुवात करावी. जेवणातील इतर पदार्थ खाण्याकरिता परवल उकडून खावे. परवल पचायला हलके, रुचिप्रद व निर्दोष आहे. सततचे पडसे, सर्दी, ताप या विकारांत परवलाची भाजी खावी. भूक लागते. हे विकार पुन्हा उद्भवत नाहीत.
भोकर: भोकरास ‘श्लेष्मान्तक’ म्हणजे कफ दूर करणारे फळ अशा अर्थाचे संस्कृत नाव आहे. जीर्णज्वर, जुलाब, लघवीची तिडीक, छातीत कफ होणे या विकारांत नुसती भाजी म्हणून नव्हे, तर औषध म्हणून जरूर वापर करावा. भोकरांची भाजी किंवा पिकलेली फळे खाऊन आतडय़ांना जोम येतो. वजन वाढते.
फ्लॉवर: फ्लॉवर किंवा फुलगोबी दीर्घकाळाच्या आजारानंतर ताकद मिळण्याकरता उपयुक्त आहे. फ्लॉवरमध्ये कीड असते. ती काळजी घ्यायलाच पाहिजे. फ्लॉवर पचावयास जड आहे. पोटांत वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, पोट दडस होते त्यांनी फ्लॉवर टाळावा. कच्चा फ्लॉवर चवीला चांगला लागतो. पण ज्यांची जीभ अगोदरच जड आहे, त्यांनी कच्चा फ्लॉवर खाऊ नये. फ्लॉवर नेहमी खाल्ल्यामुळे घसा जड होतो. तहान वारंवार लागते.
बटाटा: बटाटा, पिंडाळू, गोलालू या नावानी ओळखली जाणारी ही भाजी वैश्विक; सर्व जगभर बहुसंख्य लोक खात असलेली आहे. आपल्याकडे बटाटय़ाचा तुलनेने ‘पर कॅपिटा’ वापर कमी आहे. बटाटा शीतल, मधुररस गुणाचा, मलावष्टंभक आहे. ताकदीकरिता बटाटा खावा. स्काव्र्ही या विकाराच्या रुग्णांकरिता बटाटा आवश्यक अन्न आहे. सालासकट बटाटा खाण्याने दात बळकट होतात. भाजल्यावर बटाटा उगाळून त्याचे गंध लावावे. फोड येत नाहीत. बटाटा स्तन्य आहे. बाळंतिणीनी दूध वाढण्याकरता व तोंड आलेल्या रोग्यांनी बटाटा उकडून खावा. बटाटय़ाच्या पानांत जवखार आहे. लघवी अडल्यास बटाटय़ाच्या पानांचा रस घ्यावा.
कच्चा बटाटा दाह निर्माण करणारा आहे. बटाटा बद्धकोष्ठ वाढवतो. सतत सर्दी, शिंका यांचा त्रास असणारांनी बटाटा खाऊ नये. बटाटा जास्त खाल्ला तर अग्नी मंद होतो. मधुमेही व रक्तांत चरबी वाढलेल्या स्थूल व्यक्तींनी बटाटा पूर्ण वज्र्य करावा. शरीरात सर्वत्र सूज आली असताना बटाटा वज्र्य करावा. वारंवार जुलाब, पोटदुखी तक्रार असणाऱ्यांनी बटाटय़ाच्या वाटेस जाऊ नये.
भेंडी: भेंडी नुसतीच पथ्यकारक किंवा म्हाताऱ्याकरिता भाजी नसून शुक्रवर्धक आहे. भेंडीचे ब्राह्मणप्रिय असे वर्णन केले जाते. सुलक्षणी ललनांच्या सुंदर बोटांसारखी मऊ लुसलुशीत म्हणून तिला ‘लेडीज फिंगर’ असे इंग्रजी नाव आहे. आहारात अशी कोवळी मऊ, हिरवी, लुसलुशीत भेंडीच हवी. शरीरातील सार्वत्रिक दाह, गालगंड, आवाज बसणे, रुक्ष त्वचा, मलावरोध, खडा होणे, स्वप्न दोष, दीर्घ आजारातील दुबळेपणा याकरता भेंडी उत्तम आहार आहे. ताकाबरोबर भेंडी बाधत नाही. मूतखडा, जुलाब या विकारांत भेंडी खाऊ नये.
बीट: आपल्या महाराष्ट्रात बिटाचा वापर कमी आहे. क्वचित सलाडबरोबर किंवा इतर भाज्यांना रंग यावा म्हणून बिटाचे चार तुकडे मिसळण्याचा प्रघात आहे. बीट ही भाजी पाश्चिमात्यांची भारताला देणगी आहे. ऊस पुरेसा मिळेनासा झाला की काही साखर कारखान्यांना साखर बनवण्याकरता बिटाचाच आश्रय घ्यावा लागतो. असो.
बीट कच्चे उकडून त्याचा रस विविध प्रकारे वापरता येतो. घशांतील जळजळ, आम्लपित्त, पित्त होणे, मूळव्याध, रसक्षय, विलक्षण थकवा, हातापायांची ताकद जाणे, वजन घटणे, दीर्घकाळचा पांडू विकार या तक्रारीत बिटाचा रस किंवा कोशिंबीर जरूर खावी. कच्चे बीट तरुण माणसाने जरूर खावे. कोणतेही श्रम सहन करण्याची टिकाऊ ताकद येते. चवीकरता शेंगदाणे, आले, कांदा यांची योजना करावी. गाजरासारखाच बिटाचा हलवा किंवा शिरा उत्तम होतो. तुलनेने साखर कमी लागते. बीट वाळवून त्याचा कीस केल्यास त्यांतील शरीरास बळकटी आणणारे गुण कमी होतात. बीट नेहमी ताजेच खावे.
भोपळी मिरची: भोपळी मिरची ही फार औषधी उपयोगाची नव्हे, पण मेदस्वी, मधुमेह, कृमी विकारग्रस्तांकरता उपयुक्त आहे. ज्यांना तिखटाशिवाय चालत नाही, पण मिरची खाऊन मूळव्याध, पोटात आग पडणे, भगंदर इत्यादी त्रास आहे, त्यांनी नेहमीच्या मिरचीऐवजी भोपळी मिरची खावी. भोपळी मिरचीमुळे तोंडाला चव येते. भोपळी मिरचीबरोबर बटाटा, टोमॅटो वापरावा म्हणजे त्रास होत नाही. आम्लपित्त, उन्हाळी लागणे, पोटदुखी, अल्सर, वारंवार खाज सुटणे या विकारांत भोपळी मिरची वज्र्य करावी. भोपळ्या मिरचीचे पंचामृत एक उत्तम तोंडीलावणे आहे.