फ्रान्सची शिष्यवृत्ती संपवून मी मायदेशी परत आले. दूरदर्शनच्या माझ्या जुन्या नोकरीत नव्या दमाने रुजू झाले. पण हा दम फार काळ टिकला नाही. मला वाटले होते की, एका प्रगत देशाच्या टी. व्ही. स्टुडिओत हजर राहून मी त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास केला याची काहीतरी दखल घेतली जाईल. पण गव्हर्न्मेंट सर्व्हिसमध्ये कुणी अमका नवा अनुभव गाठीशी बांधून आला आहे, त्याचा मायबाप सरकारला फायदाच होईल अशी धारणा नसते. तिथे नित्यनेमाने ‘मागील पानावरून पुढे’ अशी चाकोरीबद्ध यंत्रणा चालूच असते. दूरदर्शनच्या थंडय़ा स्वागताने मी नाउमेद झाले. घाण्याच्या गुराप्रमाणे रिंगणात गोल फिरत राहण्याचा आता मला मनस्वी कंटाळा आला होता. नोकरी सोडण्याचा माझा मानस अधिकाधिक बळावत गेला. माझे लक्ष मी नाटकावर केंद्रित केले. ‘नाटय़द्वयी’ ही आमची संस्था नेटाने चालवण्याचा अरुणने आणि मी निर्णय घेतला. खरे तर आमचा ‘नाटय़द्वयी’चा संसार केव्हाच सुरू झाला होता. दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़विद्यालयाची पदवी घेऊन बाहेर पडल्यावर साहजिकच स्वत:ची नाटक कंपनी काढण्याची अरुणची आणि माझी तमन्ना होती. नाटक हाच व्यवसाय करायचे आम्ही दोघांनी ठरवले होते. संस्थेला ‘नाटय़द्वयी’ हे काहीसे बाळबोध नाव बहाल करून आम्ही रणात उतरलो.
नाटय़प्रशिक्षण पूर्ण करून पुण्याला परतल्यावर आमचे ढ१ॠ१ी२२्र५ी ऊ१ें३्रू अ२२्रूं३्रल्ल चे गुरू, मार्गदर्शक आणि ज्येष्ठ स्नेही प्रा. भालबा केळकर आम्हाला प्रोत्साहन देतील, आमचे कौतुक करतील असे आम्हाला वाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र भालबांचा खोल कुठेतरी रोष असल्याचे जाणवू लागले. ‘‘आता तुम्हाला काय सांगायचं बाबा..?’’ अशा प्रकारच्या अनपेक्षित टोमण्यांनी आम्ही खट्टू होऊ लागलो. पी. डी. ए. ही हौशी नाटय़संस्था होती. ‘‘आम्ही आमच्या कलेचा बाजार मांडत नाही..’’ अशी विधाने कानावर पडू लागली. प्रत्युत्तर म्हणून ‘‘तीन र्वष खर्ची घालून एका मातब्बर नाटय़संस्थेकडून शिक्षण घेतले आहे. तेव्हा आता नाटक हेच आमचे सर्वस्व. आमची रोजीरोटी. ती फावल्या वेळची करमणूक नाही,’’ असे समर्थन आम्हीही करू लागलो. सुदैवाने या शाब्दिक विसंवादापलीकडे आमची अनबन गेली नाही. पूर्वीचा गोडवा नष्ट झाला असला तरी जुने संबंध तसे चिवट असल्यामुळे ताणले गेले तरी तुटले नाहीत. अगदी अलीकडे तीनएक वर्षांपूर्वी पी. डी. ए.चे सद्य: संचालक शशिकांत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या या जुन्या संस्थेने माझ्या ‘सख्खे शेजारी’चे जोरदार प्रयोग केले. खूप समाधान वाटले.
‘नाटय़द्वयी’च्या कारकीर्दीची मुहूर्तमेढ करण्यासाठी आम्ही नाटक निवडले ते असे तसे नाही, तर थेट विलियम शेक्सपीयरचे ‘हॅम्लेट’! नाना जोग यांनी केलेला त्याचा सुंदर अनुवाद उपलब्ध होता. अमाप उत्साह, उदंड आत्मविश्वास, बेताचा विवेक आणि व्यवहारज्ञान शून्य- अशी आमची अवस्था होती. कलाकार आणि रंगकर्मी मिळायला काहीच सायास पडले नाहीत. एन. एस. डी.चे वलय होते आणि आमचा मित्रपरिवार पण मोठा होता. शिवाय ‘बालोद्यान’ आणि ‘बालरंगभूमी’मध्ये केलेली पुण्याई आता कामी आली. तिथले बालकलाकार मोठे होऊन संधीची वाटच पाहत होते. काही तुरळक पात्रयोजना आठवते, ती अशी : हॅम्लेट- अरुण, ओफिलिया- मीना भालेराव, लेअरतीज- डॉ. विद्याधर वाटवे, होरेशिओ- कल्याण वर्दे, पोलोनियस- वसंत मालेगावकर. दिग्दर्शनाची जबाबदारी माझी होती.
नाटक अगदी वेगळ्या प्रकारे उभं करायचा माझा मानस होता. एकदम हटके! नाटकाच्या प्रत्येक अंग-प्रत्यांगामधून वेगळी अनुभूती जाणवली पाहिजे. मराठी रंगभूमीवर सांघिक रचना (ूेस्र्२्र३्रल्ल२), हालचाली, पात्रांची देवाणघेवाण, नेपथ्याचा नेमका वापर, पोषाखाची रंगसंगती, इ. गोष्टींकडे फारसे लक्ष पुरवले जात नाही. आपले नाटक ‘दृश्य’ झाले पाहिजे असा माझा अट्टहास होता. ‘हॅम्लेट’ची नेपथ्यरचना मीच केली. किंबहुना, मी बसवणार असलेल्या प्रत्येक नाटकाचे नेपथ्य डिझाइन मीच करायचे असा माझा आग्रह असतो. कारण नाटकाच्या मूळ पिंडापासून त्याची पाश्र्वभूमी वेगळी करता येत नाही. नटांच्या हालचाली ठरवताना ते कुठून येणार, कुठे जाणार, कोण कुठे बसणार, हा तपशील दिग्दर्शकाला नेमका ठाऊक असायला हवा. नाटक ज्या परिसरात फुलणार आहे, तो परिसर दिग्दर्शकच नेमका ठरवू शकतो असे मला वाटते. आडव्या लाकडी दांडय़ाला लपेटलेला, वर-खाली घरंगळत घरंगळत (क्वचित अडकत अडकत) येणारा सुरकुतलेला कापडी पडदा आता बाद झाला आहे, असं म्हणून मी अल्काझीछाप अभिव्यक्त नेपथ्य (ी७स्र्१ी२२्रल्ल्र२३्रू) कल्पिले. खूपशा पायऱ्या, एक चौथरा, एक गोलाकार खांब आणि त्यावरून सोडलेला एक सुंदर झुळझुळीत पडदा असा सेटचा काहीसा अंधुक तोंडवळा आठवतो. थोडय़ाशा कल्पक फेरफाराने दृश्य बदलल्याचे सूचित करता येत असे.
नाटकामध्ये हॅम्लेट, लेअरतीज आणि होरेशिओ यांचे तलवारयुद्धाचे प्रसंग आहेत. काही नाटकांमधून मी अगदी बेंगरुळ तलवारबाजीचे प्रदर्शन पाहिले आहे. ‘हॅम्लेट’च्या एका प्रयोगात तर एक-दोन वार केल्यावर योद्धे सरळ विंगेत नाहीसे झाले. थोडा वेळ आतून खणाखण आवाज आले आणि मग शेवटचे कोसळायला हे योद्धे पुन्हा मंचावर आले.
आमच्या वीरांची तलवारबाजी नेटकी आणि सही झाली पाहिजे, या आमच्या हट्टाखातर अरुण, विद्याधर आणि कल्याण ट्र’्र३ं१८ रूँ’ ऋ ढँ८२्रूं’ ळ१ं्रल्ल्रल्लॠ मध्ये जाऊन फेन्सिंगचे खास प्रशिक्षण घेत होते. त्यांनी केलेल्या नेत्रदीपक द्वंद्वांना प्रेक्षकांनीही दाद दिली. इतकी नजर खिळवून ठेवणारी थरारक समशेरबाजी याआधी कधी झाली नाही असे मी बिनधास्तपणे म्हणते. ‘हॅम्लेट’चा प्रयोग खूप देखणा झाला. पण नाटकाच्या आत्म्याचे काय? दर्शनी कारागिरीवर मी एवढे लक्ष केंद्रित केले होते, की नाटकाच्या मूळ वास्तूकडेच माझे दुर्लक्ष झाले. शेक्सपीयरचे समर्थ संवाद आहेत, ते आपल्या आपण प्रेक्षकांच्या अंतर्मनाचा कब्जा घेतील अशी माझी धारणा होती की काय, न कळे. ‘जगावं की मरावं?’ या अमर स्वगताची हळुवार उकल कशी करावी, याच्या चिंतनाऐवजी हॅम्लेट-लेअरतीजचे द्वंद अधिक धारदार कसे होईल, याच्या विवंचनेतच मी अडकून पडले तर दुसरं काय होणार? मंचावर एक सुंदर पोकळ डोलारा उभा राहिला. प्रचंड मेहनत घेऊन बसवलेल्या या नाटकाचे अवघे तीन प्रयोग झाले. ‘हॅम्लेट- एक शोकांतिका’! सुरुवातीलाच आम्ही एवढी उंच उडी घ्यायला नको होती.
परंतु फारसे नाउमेद न होता ‘हॅम्लेट’वर उतारा म्हणून मी लिहिलेल्या तीन एकांकिका आम्ही बसवायला घेतल्या. हलकेफुलके बुडबुडे. गोखले हॉलमध्ये त्यांचे प्रयोग झाल्याचे अंधुकसे आठवते. ‘रम्य ती पहाट’मध्ये जन्मात कधी पहाटच काय; पण सकाळही न पाहिलेल्या एका ऐदी तरुणावर भल्या पहाटे उठण्याची पाळी येते. या एकपात्री नाटिकेत कल्याण वर्देनं पाऊण तास प्रेक्षकांना हसवलं होतं. या नाटकाची प्रत आज मजजवळ शिल्लक नाही. ती काळाच्या उदरात गडप झाली आहे. दुसरी एकांकिका ‘साबणाची परी’! त्या काळात कॉलेजात शिकणाऱ्या मुलींनी ‘क्वचित विक्रेत्या’ म्हणून बिस्किटे, सौंदर्यप्रसाधनं, औषधी मात्रा, इ. माल घेऊन घरोघरी जायची टूम निघाली होती. माझ्या दोन-तीन मैत्रिणींनी हा उद्योग करून थोडीफार कमाई केली होती. अशाच एका ‘साबण विक्रेती’वर मी छोटी नाटिका लिहिली. ती जशीच्या तशी उचलून पुढे मी ती ‘चष्मेबद्दूर’ या माझ्या सिनेमात टाकली. दीप्ती नवल आणि फारुख शेख या दोघांनी तो धुलाई प्रसंग फार सुंदर रंगवला आहे. तिसरी एकांकिका काय केली, ते आता आठवत नाही.
‘नाटय़द्वयी’ची कामगिरी लिहिताना एक फार मोठी उणीव जाणवते. आठवण! पॅरिसच्या वारीबद्दल लिहिले तेव्हा हाताशी आईने जपून ठेवलेली माझी पत्रे होती. त्यानं लिहिणं फार सोपं गेलं. पण आता स्मरणशक्तीला ताण दिल्याखेरीज गत्यंतर नाही. एक तर दिल्ली, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी आम्ही नाटकं करीत असल्यामुळे थोडी दिशाभूल होत असे. हे नाटक ‘त्याच्या’ आधी की नंतर? आधी कुठे झाले? तारखा, सण, वार, नाटय़गृह, इ. तपशील धुक्याच्या पडद्याआड लपला आहे. सुदैवाने जे काही थोडे प्रयोग काही महत्त्वाच्या वैयक्तिक घटनेशी संलग्न आहेत, ते फक्त लख्ख आठवतात.
उदा. ‘इडापिडा टळो.’ माझ्या दुसऱ्या बाळंतपणासाठी मी सुट्टी घेऊन पुण्याला आले होते. प्रवासात मी नोएल कावर्डच्या ‘इ’८३ँी रस्र््र१्र३’ (ब्लाइथ स्पिरिट) या मुलखावेगळ्या मिस्कील आणि मनोरंजक नाटकाचे कच्चे भाषांतर केले. एका लेखकाची पहिली पत्नी अपघातात गेल्यानंतर काही वर्षांनी तो पुन्हा दुसरे लग्न करतो. तेव्हा पहिली पत्नी भूत होऊन अवतरते आणि नवविवाहितांना ‘दे माय, धरणी ठाय’ करून सोडते असे त्याचे कथानक आहे. खूप दिवस आम्हाला त्याला शीर्षक सुचत नव्हते, ते राममामाने (राम देशमुख) सुचवले. अतिशय समर्पक शीर्षक!
घेतलेली सुट्टी पुरती वसूल करून घ्यावी म्हणून मी नाटक बसवायचे ठरवले. हक्काच्या ताईच्या दवाखान्यात (डॉ. मधुमालती गुणे यांचे इंदिरा नर्सिग होम) ठरल्या दिवशी गौतमने एखाद्या वक्तशीर नटाप्रमाणे एंट्री घेतली.
सगळे काही ‘सुखरूप’ पार पडले होते. त्यामुळे बाराव्या दिवशी उठून मी तालमीच्या हॉलमध्ये दाखल झाले. संहितेच्या प्रती छापून तयार होत्या. सगळे.. म्हणजे पाची कलाकार हजर होते. नवविवाहित जोडी- खरोखरचे नवरा-बायको कल्याण आणि नीला वर्दे, प्लँचेट म्हणून छाछूगिरी करणारी विक्षिप्त तारकेश्वरी- मी, घरचं पाहणारी चुणचुणीत मुलगी- शैला जुन्नरकर (‘बालोद्यान’ फेम) आणि पहिल्या पत्नीच्या अवखळ भूमिकेत वंदना भोळे अशी पात्रयोजना होती. वंदना जणू तरलाचा रोल करायलाच जन्माला आली होती. त्या अवखळ भूमिकेत एखादी वाऱ्याची झुळूक फिरावी तशी ती मंचावर झुळझुळत असे. पहिल्या प्रयोगानंतर मी ज्योत्स्नाबाईंना ‘माँ से बेटी सवाई’ म्हटलं तेव्हा त्या आनंदाने गदगदून गेल्या.
या प्रयोगाच्या वेळचा एक घरगुती किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या सासरी माझे सैरभैर वागणे अतिरेकी वाटले तर नवल नाही. विशेषत: माझ्या जावांना. त्यांना मुलं झाली तेव्हा महिना महिना त्यांना घरात थांबावं लागे. शेगडीचा शेक, अंगाला तेल इत्यादी सोपस्कार रीतसर करून घ्यावे लागत.
ललिता एकदा गमतीने काकूंना म्हणाली, ‘‘आम्हाला किती बंधनं होती! सई मनाला येईल ते करते. तिला तुम्ही अडवत नाही. आम्ही सुना! ती मात्र तुमची मुलगी आहे.’’
यावर कमरेवर हात ठेवून काकू ठसक्यात म्हणाल्या, ‘‘मुलगी? अगं, काय म्हणतेस काय? माझ्या मुलीला नसतं हो मी असं वाटेल तसं वागू दिलं. सई माझा मुलगा आहे.. चौथा मुलगा.’’ आता बोला!
‘इडापिडा टळो’ पुढे आम्ही दिल्लीला संच बदलून केलं. अरुण आणि सुनीती कानिटकर हे विवाहित जोडपं आणि दया डोंगरे तरला असा बदल केला. पुण्याला आणि दिल्लीला प्रेक्षकांनी नाटक उचलून धरलं. पुढे वसंत बापटांनी ते बसवलं आणि स्वत: लेखकाची भूमिकाही केली.
इथपर्यंतचा आमचा नाटय़प्रवास तसा थांबत थांबत, अडखळत, टप्प्याटप्प्याने होत गेला. वेळ आणि संधी मिळेल त्याप्रमाणे आम्ही नाटके केली. आपापल्या नोकऱ्या आणि लहान मुलं यांच्यातून सातत्याने वेळ काढणं तसं अवघडच होतं. ‘नाटय़द्वयी’ने खरा जोर धरला ते मी पॅरिसहून परत आल्यानंतर.
पॅरिसची नशा उतरायला वेळ लागला. आठवणी ताज्या आहेत तोपर्यंत लिहावं असं मी ठरवलं. सेन नदीच्या डाव्या कुशीला पाहिलेल्या एक से बढकर एक अशा रिव्ह्य़ूज्चे मनोमनी स्मरण करून मी लेखणी सरसावली आणि पांढऱ्यावर काळे करू लागले. पण नवल म्हणजे पांढऱ्यावर काळ्याऐवजी रंगीत उमटू लागले. मी लिहू लागले आणि जणू लेखणीवरचा माझा ताबाच गेला. ती भरधाव दौडू लागली. मोठा अजब अनुभव होता तो. पाहता पाहता मसुदा तयार झाला. एकातून एक माळलेले स्वतंत्र प्रवेश गुंफून छानशी साखळी बनली. नवरा-बायकोचे सहजीवन हा अगदी सर्वसाधारण विषय होता. पण या सामान्य परिमाणामधून काहीतरी असामान्य निर्माण झाले, असे आज मी विनय बाजूला सारून म्हणू शकते.
रिव्ह्य़ू लिहून तयार झाल्यावर मी त्याचे एक अगदी खासगी वाचन केले. या वाचनाला जाणकार, दर्दी आणि नाटय़प्रेमी असे निकटवर्ती हजर होते. मुख्य म्हणजे आपली मते निर्भीडपणे (क्वचित निर्दयपणेही!) मांडण्याबद्दल ख्याती असलेले. पंचांनी दिलखुलास दाद दिली. त्या श्रोतृवृंदामधूनच रिव्ह्य़ूचे नाव निघाले : ‘नांदा सौख्यभरे.’ नाटकात चारच पात्रे होती. अधूनमधून उगवणारा उपटसुंभ ‘व्यवस्थापक’ धरला, तर पाच! सुदैवाने मित्रमंडळीतले दया डोंगरे आणि विश्वास मेहेंदळे दिल्लीलाच होते. दया डोंगरे तर ठ. र. ऊ. मध्ये माझ्याबरोबरच (अगदी माझ्या वर्गात) होती. ‘शाळा’ संपली तरी आमची दोस्ती कायम होती. विश्वास ढ. ऊ. अ. मुळे पुण्यापासून ओळखीतला. तेव्हा आम्हा चौघांचा छान संच जमला आणि तालमी सुरू झाल्या.
हा रिव्ह्य़ू म्हणजे संसाराचा कॅलिडोस्कोप होता. विविधरंगी छटा दर्शविणारा. प्रियाराधन, मधुकूजन, राग, लोभ, लाड, रुसवा, अबोला, समेट.. या सगळ्या स्थित्यंतरांना स्पर्श करून गिरक्या (आणि फिरक्या) घेत घेत पुढे जाणारा एक मजेचा खेळ. तालमीत क्वचित अरुणचे आणि माझे खरेखुरे भांडण होई. तेव्हा दयाचा आक्षेप ठरलेला : ‘ए, तुमचं स्टान्स्लाव्हस्की इथे नको हं!’
प्रयोग खूपच रंगला. दिल्लीला त्याचे पाच-सहा खेळ झाले, हे विशेष. कारण सहसा तीन प्रयोगांनंतर दिल्लीचा मराठी प्रेक्षकवर्ग संपून जात असे. आमच्या नाटकाला ते दुसऱ्यांदा पाहणारे काही शौकिन लाभले असावेत. अरुण आणि मी प्रत्यक्षात नवरा-बायको असल्यामुळे लोकांना एक वेगळीच गंमत वाटत असे. दयाच्या गाण्याचा पण रिव्ह्य़ूला छान उपयोग झाला. नटी-सूत्रधाराच्या प्रवेशात ती गाण्याला हुकमी टाळ्या घेत असे.
‘नांदा सौख्यभरे’ची वार्ता महाराष्ट्रात पोहोचली. आम्ही मुंबई-पुण्यातही प्रयोग केले. साहित्य संघातला प्रयोग विशेष गाजला. त्याला विजय तेंडुलकर, पं. सत्यदेव दुबे, वसंत कानेटकर, भालचंद्र पेंढारकर, इ. मान्यवर आले होते. माधव मनोहरांनी खूप सविस्तर आणि गौरवपूर्ण परीक्षण लिहिले. कोणत्याही मानाच्या पुरस्कारापेक्षा मला त्याचे मोल अधिक वाटले. या प्रयोगात दामू आणि ललिता केंकरे यांची छान दोस्ती झाली. चटणीभरला अप्रतीम पापलेट खाऊ घालून आमचे ललिताने खूप लाड केले.
पुण्याला पण ‘फुल्ल’ प्रयोग झाले. ‘हॅम्लेट’ची चूक आम्हाला माफ करण्यात आली.