वाहिन्यांच्या पडद्यावरील खालच्या बाजूस येणाऱ्या सरकत्या पट्टय़ा नेहमीच माझे लक्ष वेधून घेतात. संध्याकाळी ७.०० ते ७.३० नंतर चालणाऱ्या सासवा-सुनांचे सोहळे मी पाहू शकत नाही. पण त्याहूनही गंमत वाटते ती त्या पात्रांच्या नातेसंबंधांचे प्रश्न सरकत्या पट्टय़ांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सकाळपासून वाहिन्यांवर विचारणाऱ्या निर्मात्यांची. आपल्या मालिकेचा टी. आर. पी. वाढवताना आपण आपल्या मालिकांची सवयच नाही, तर व्यसन प्रेक्षकांना लावत आहोत आणि त्यात काही गर आहे असे त्यांना वाटत नसावे. मग घरातील गृहिणी, खऱ्याखुऱ्या सासू-सुना, बँकांतील महिलावर्ग, ऑफिसेसमधील महिला-भगिनी आणि अभावाने का होईना, पुरुषही त्या मालिकांमधील घडलेल्या, घडू घातलेल्या प्रसंगांमध्ये गुंगून जातात. त्यावरून संभाषणे होतात. अनौपचारिक, तर कधी औपचारिक चर्चासत्रे होतात आणि आपण कळत-नकळत त्या कल्पनाविश्वात जगायला लागतो. मग दिवसभर मालिकेतले लग्न चालले की अनेकांना त्यांच्या घरातच कार्य असल्यासारखे वाटते. दुकानात खरेदीला गेल्यावर मग ‘प्रिया’ साडीची मागणी होते. जे जे सण समाजात येतात, ते ते त्या त्या वेळेला मालिकेत येतात. अगदी दिवाळीच्या फराळापासून होळीच्या बोंबाबोंबीपर्यंत. इथे गणपती बसतो. नवरात्र येते. गरबा होतो. आणि कळत-नकळत ही बेगडी, कचकडय़ाची खोटी दुनिया आपले आयुष्य पूर्णपणे झाकोळून टाकते. शास्त्रीय परिभाषेत बोलायचे झाले तर आपण ‘रिअ‍ॅलिटी’- ‘वास्तव’ नाकारतो आणि ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ (काल्पनिक वास्तव) स्वीकारतो.
कोणी म्हणेल की, रोजचे दु:ख, एकाकीपणाचा त्रास, टेन्शन्स विसरण्यासाठी हा अक्सीर इलाज आहे. पण माझ्या मते, सातत्याने आदळणारी, स्वीकारली जाणारी ही ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ धोकादायक आहे. ही आपल्याला भुरळ घालते. सुख-समृद्धीची दुलई पांघरते. इथे नाती दंविबदूंसारखी टवटवीत दिसतात, पण त्याची क्षणभंगुरता आपल्याला जाणवत नाही. पूर्वी िहदी सिनेमातला नायक कायम ‘बी. ए. में फर्स्ट क्लास फर्स्ट’ यायचा तसा आत्ता या मालिकांमधला नायक बिझनेसमध्ये यशस्वी होतो. घरातही टाय घालतो. त्याच्या गंजीफ्रॉकला भोके नसतात. तो निळ्या रंगाच्या पट्टय़ांचा पायजमा घालत नाही. इथे सकाळी तापवल्याबरोबर दीड लिटर दूध नासल्यामुळे त्याला तडफडत दूध केंद्रावर जावे लागत नाही. यांच्या घरात एक कायम राबणारा, मास्टर ऑफ ऑल ट्रेडस् असलेला, वंशपरंपरागत चालत आलेला विश्वासू नोकर असतो. त्यामुळे रद्दीवाल्याकडे जाणे, इन्व्हर्टरच्या बॅटरीचा प्रॉब्लेम सोडविणे, बँकांत खेटे घालणे या क्षुद्र कामांची जबाबदारी नायकावर येत नाही. छान छान कपडे घालून किंवा सूट हातात घेऊन ही मंडळी नोकरीवर जातात आणि कुटुंबातील यच्चयावत महिलावर्ग मध्यरात्रीसुद्धा उद्यापनाच्या जेवणाला सवाष्ण म्हणून जावे इतक्या साग्रसंगीत नटलेल्या असतात. मालिकांमधले डॉक्टर स्वच्छ, कडक इस्त्रीचा एप्रन घालतात. हॉस्पिटलमध्ये लक्षणीय टापटीप असते. गर्दीचा मागमूस नसतो. सर्जन आधी हॅण्डग्लोव्हज् आणि मग घातलाच तर मास्क घालतात आणि बंदुकीची गोळी छातीतून किंवा पोटातून तांदळातून खडा काढल्यासारखी काढतात. ऑपरेशन झाल्याक्षणी रुग्णाच्या जिवाचा धोका टळतो आणि त्याला फक्त आरामाची आणि ‘किसी प्रकार का स्ट्रेस न होने की’ जरुरत उरते. आय. सी. यू.. जन्म-मृत्यूच्या सीमेवरचा झगडा यातले काही या ‘व्हच्र्युअल वर्ल्ड’ला स्पर्श करीत नाही. खरे वैद्यकीय विश्व यापासून कोसो मिल दूर असते. पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. आणि या खोटय़ाचीच सवय झाल्यामुळे पोहोचले तरी पटत नाही, हे आमचे दुर्दैव आहे.
‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ हे एक शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, हे आपण जाणून घ्यायला हवे. सत्याचा आभास म्हणजे ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी.’ ज्या गोष्टी प्रत्यक्ष घडूच नयेत आणि घडल्याच तर त्यांच्यासाठी आपण उत्तम रीतीने तयार व्हावे यासाठी ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’चा वापर करायला हवा. ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ने सत्याची अदलाबदल करू नये, तर उलट सत्य स्वीकारण्याची सक्षम ताकद यावी, ही अपेक्षा. तिने दुबळेपणा येता कामा नये. मालिका बघताना ढसाढसा रडणाऱ्या, टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांच्या मानसिक स्थर्याशीच आपण खेळतो आहोत, हे निर्मात्यांनी कधीही नजरेआड करता कामा नये. होते काय, की भावनाप्रधान प्रेक्षक या भावविश्वात जगायला लागतो. त्यांचे वास्तवाचे भान सुटते. मग घरातला आपला नवरा, दीर, नणंद, सासू या त्या मालिकेतल्या नात्यांप्रमाणे का नाहीत, याची घालमेल सुरू होते. पण क्षणभंगुर पडदा आणि अक्षयी वास्तव हे शत-प्रतिशत एकमेकांसारखे कसे असणार? इथल्या भाजऱ्या प्रश्नांना पडद्यावरची मखमली उत्तरे फुंकर घालू शकत नाहीत. ते वास्तव नव्हे. एवढेच नाही, तर तेवढा त्यांचा वकुबही नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मालिका आणि त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे महत्त्व मी नाकारत नाही. त्या विरंगुळा आहेत. त्या तशाच राहाव्यात. त्यांनी व्यवहार होऊ नये. त्या संध्याकाळची दोन घटकांची करमणूक हे आपले स्वरूप बदलून जगण्याचे मापदंड होऊ नयेत, एवढेच मला काय ते म्हणावयाचे आहे. शेवटी आयुष्य हीदेखील एक लिमिटेड एपिसोड्सची मालिका आहे, हे लक्षात ठेवायला हवे. आणि विशेष म्हणजे या मालिकेला प्रायोजक लागत नाही. त्यामुळे टी. आर. पी.चा प्रश्न नाही. कारण शेवटी-
        ‘हर घडी बदल रही है रूप जिंदगी
        धूप है, कभी कभी है छाँव जिंदगी
        हर पल यहाँ जी भर जिओ।
        जो है समाँ कल हो न हो..’ हेच खरे!