सव्वाशे वर्षांपूर्वीचा त्याचा डाव बुद्धिबळावरच्या प्रकाशित होणाऱ्या कोणत्याही दर्जेदार पुस्तकाला वगळता येत नाही. या खेळातील मारधाड पद्धती बदलून दाखविल्यामुळे ‘आधुनिक बुद्धिबळाचा जन्मदाता’ ही त्याची ओळख बनली. सलग ३२ वर्षे अपराजित राहिलेल्या विल्हेम स्टाइनिट्झ नावाच्या अवलियाची ही गोष्ट..

आपण आतापर्यंत आपल्या चित्रपटसृष्टीतील अनेक शोकांतिका ऐकलेल्या आहेत. ऐश्वर्यात लोळत असलेल्या नट आणि नट्या आपल्या आर्थिक अज्ञानामुळे आपली संपत्ती गमावून अखेरचे दिवस गरिबीत घालवतात. फार दूर कशाला जा, एके काळी टेनिसवर राज्य करणारा बियॉन बोर्ग किंवा २० व्या वर्षी जगज्जेता बनलेला मुष्टियोद्धा माईक टायसन- दोघेही आधीचे अब्जाधीश नंतर कफल्लक झाले होते. पहिला जगज्जेता विल्हेम स्टाइनिट्झ याच लोकांच्या मालिकेत येतो; परंतु एवढीच त्याची ओळख नाही, तर त्याला आधुनिक बुद्धिबळाचा जन्मदाता मानले जाते!

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

हेही वाचा – ‘सहिष्णुता कशी राखायची?’

ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला स्टाइनिट्झ १८८६ ते १८९४ या काळात जगज्जेता होता, परंतु आपल्या कारकिर्दीत त्यानं धडाडीनं अनेक स्पर्धा जिंकल्या. स्टाइनिट्झच्या उदयाआधी बुद्धिबळ हे अक्षरश: मारझोड पद्धतीनं खेळलं जात असे. म्हणजे एखाद्या खेळाडूनं मोहऱ्याचा बळी दिला की प्रतिस्पर्धी मागचा-पुढचा विचार न करता तो बळी खात असे. मग पुढे फक्त प्रार्थना करीत असे की, ‘‘देवा, यातून मला वाचव.’’ देवानं प्रार्थना ऐकली (म्हणजे हल्लेखोर चुकला) की तोपर्यंत मार खात असलेला खेळाडू जिंकत असे. स्टाइनिट्झनं स्वत: अशा प्रकारे अनेक आक्रमक डाव जिंकले आहेत; परंतु स्टाइनिट्झ एक कलावंत होता. त्याला अशी बेछूट आक्रमकता पसंत नव्हती. त्याचा हल्लाही अतिशय कलात्मकरीत्या केला जात असे. वाचकांना मी आवाहन करीन की, त्यांनी स्टाइनिट्झ विरुद्ध व्हॉन बार्देलेबेन हा हॅस्टिंग्स (इंग्लंड) येथे १८९५ साली खेळला गेलेला डाव नक्की पाहावा. तो कोणत्याही बुद्धिबळाच्या दर्जेदार पुस्तकात असतोच! अगदी गॅरी कास्पारोव्हनंदेखील आपल्या आधीच्या जगज्जेत्यांवर लिहिलेल्या पुस्तकात या डावाची मुक्तकंठानं स्तुती केली आहे. या डावाची गंमत अशी आहे की, स्टाइनिट्झनं एका प्याद्याचा बळी देऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याची इतकी नाकेबंदी केली की मात नक्की होणार, हे लक्षात आल्यावर हताश बार्देलेबेन पटावरून उठून निघून गेला. लोकांना वाटलं की, प्रसाधनगृहात किंवा कॉफी घ्यायला कँटीनमध्ये गेला असेल, पण महाशय थेट घरी (की दु:ख विसरण्यासाठी आणखी कुठे) निघून गेले आणि स्टाइनिट्झच्या विजयाची नोंद ‘प्रतिस्पर्धी वेळेच्या अभावी हरला’ अशी करण्यात आली.

विल्हेम स्टाइनिट्झचा जन्म १८३६ सालचा. ऑस्ट्रियामधील प्राग शहरातला. (इथे भूगोलाची चूक नाही- त्या काळी प्राग हे शहर ऑस्ट्रियन राज्याचा भाग होते; आज ते झेक रिपब्लिक या देशाची राजधानी आहे). वडील शिंपी होते आणि त्यांच्या १३ मुलांमध्ये विल्हेम सगळ्यात लहान होता. त्यामुळे आपण कल्पना करू शकता की, विल्हेम स्टाइनिट्झचं बालपण किती हलाखीत गेलं असेल याची. तो बुद्धिबळ शिकला १२ व्या वर्षी, पण खऱ्या अर्थानं त्याच्या बुद्धिबळाला लकाकी आली ती १८५७ पासून. ज्या वेळेस विल्हेम स्टाइनिट्झ व्हिएन्ना विश्वविद्यालयात गणिताचा अभ्यास करण्यासाठी गेला तेव्हा. तिथे महाशय गणितापेक्षा बुद्धिबळात जास्त रमले आणि त्यानं दोन वर्षांत आपल्या शिक्षणाला रामराम ठोकला.

तरुण विल्हेम स्टाइनिट्झ त्या वेळी इतका आक्रमक खेळत असे की, त्याला ऑस्ट्रियाचा मॉर्फी असं संबोधलं जाऊ लागलं. एकापाठोपाठ एक मोहरी बळी देणं आणि प्रतिस्पर्धी राजाचा किल्ला उद्ध्वस्त करून त्याच्यावर मात करणं हा त्याच्या खेळाचा स्थायीभाव बनला. पण जरी त्यानं गणिताच्या शिक्षणाची वाट सोडली असली तरी तर्कशुद्ध विचाराला तिलांजली दिली नव्हती. आपल्या प्रत्येक डावाचा सखोल अभ्यास करून विल्हेम स्टाइनिट्झने स्वत:चे डाव चाळून काढले आणि त्याच्या लक्षात आले की, आपल्या प्रतिस्पर्ध्यानं केलेल्या चुका त्याच्या स्वत:च्या बहुसंख्य विजयांचं कारण होतं.
ऑस्ट्रियाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला १८६२ मध्ये लंडनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली आणि त्याचा तेथे सहावा क्रमांक आला, पण त्याचा ऑगस्टस मोन्ग्रेडीयनविरुद्धचा विजय चित्तथरारक होता. त्या डावाला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट डाव ठरवण्यात आले. स्पर्धा संपल्या संपल्या विल्हेम स्टाइनिट्झनं पाचव्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या अनुभवी सेराफिनो दुबोईस याला सामना खेळण्यासाठी आव्हान दिलं. स्टाइनिट्झचा उद्देश होता की, जर सामन्यात जिंकलो तर पुढे लंडन येथे वास्तव्य करून बुद्धिबळ हेच जीवन समजून राहायचं. नाही तर चंबुगबाळं आवरून परत ऑस्ट्रियाची वाट धरायची. त्यानं सामना ५.५-३.५ असा जिंकला आणि विल्हेम स्टाइनिट्झ व्यावसायिक बुद्धिबळपटू झाला.

विल्हेम स्टाइनिट्झ हा चांगला लेखक आणि शिक्षकही असल्यामुळे त्याला लंडनमध्ये भरपूर शिष्य मिळाले. त्यामुळे त्याचा चरितार्थ उत्तम चालत होता; परंतु त्याला शिकवणं आणि खेळणं यामध्ये समतोल राखता येईना. त्यानं लागोपाठ ब्लॅकबर्न, दिकन, मोन्ग्रेडीयन, ग्रीन अशा आघाडीच्या ब्रिटिश खेळाडूंना सामन्याचं आव्हान देऊन पराभूत केलं आणि खेळाडू म्हणून आपला दबदबा लंडनमध्ये निर्माण केला. पण या काळात त्याचं त्याच्या शिष्यांकडे दुर्लक्ष झालं आणि सामने संपवून स्टाइनिट्झ लंडन क्लबमध्ये आला. तेव्हा सर्व शिष्यांनी डॅनियल हारविट्झ यांच्याकडे शिकायला सुरुवात केली होती. हारविट्झ भले स्टाइनिट्झइतका चांगला खेळाडू वा शिक्षक नसेलही; पण तो नियमित होता आणि शिष्यांना वेळ देत होता. विल्हेम स्टाइनिट्झनं १८६२ ची लंडन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या एडॉल्फ अ‍ॅण्डरसनला १८६६ साली आव्हान दिलं. या सामन्यासाठी मोठी रक्कम बक्षीस म्हणून लावण्यात आली होती. विजेत्याला १०० पौंड आणि हरणाऱ्याला २० पौंड अशी बक्षिसाची विभागणी झाली. मी चेष्टा करत नाही, पण खरोखरच हे बक्षीस दीडशे वर्षांपूर्वी प्रचंड मोठं होतं. आजच्या चलनात त्याची किंमत एक लाख पौंडपेक्षा अधिक झाली असती. असो! १४ डावांच्या या सामन्यात इतकी चुरस होती की एकही डाव बरोबरीत सुटला नाही. तरुण स्टाइनिट्झ आणि अनुभवी अ‍ॅण्डरसन यांच्यात १२ डाव संपले. त्या वेळी ६-६ अशा बरोबरीत होते, पण अखेरचे दोन्ही डाव जिंकून स्टाइनिट्झ नुसता विजेताच नव्हे तर श्रीमंतही झाला. त्याचे उसनवारी करून जगण्याचे दिवस मागे पडले.

सामने जिंकण्यात आता विल्हेम स्टाइनिट्झचा हात कोणी धरू शकत नव्हते; पण अजूनही त्याला स्पर्धा जिंकता येत नव्हत्या. १८६२ साली लंडनमध्ये येऊन स्थायिक झालेल्या स्टाइनिट्झला पहिली स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकण्यासाठी १० वर्षे लागली. १८७२ पर्यंतचे विल्हेम स्टाइनिट्झचे सर्व विजय हे जुन्या पद्धतीनं मारझोड आक्रमक प्रकारे खेळून मिळवले होते. तीच त्या काळाची फॅशन होती. त्यानंतर त्यानं १८७३ साली साक्षात अ‍ॅण्डरसनला मागे टाकून व्हिएन्ना येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. हे विजय त्याला कसे मिळाले होते? तर त्यानं आपल्या खेळाचं स्वरूप पार बदलून टाकलं होतं. हुशार स्टाइनिट्झनं एक गोष्ट ओळखली होती, की काही तत्त्वे पाळली तर आपली हार सहजी होणे शक्य नाही. उदाहरणार्थ, प्रतिस्पर्ध्याने दिलेला बळी घेतलाच पाहिजे असे नाही. त्याविरुद्ध बळी नाकारून आपली मोहरी पटापट बाहेर काढली, तर आक्रमक खेळण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यावर डाव उलटवता येतो. त्यामुळे समकालीन खेळाडूंनी स्टाइनिट्झवर सडकून टीकाही केली. त्याला भित्रा, घाबरट, पळपुटा असंही संबोधलं गेलं. विल्हेम स्टाइनिट्झ हा उत्तम लेखकही होता. आपल्या आधुनिक विचारसरणीचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यानं अनेक लेख लिहिले. त्याच्या प्रतिस्पर्ध्यानीही त्याला वर्तमानपत्रातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. असे दोन्ही बाजूंनी अनेक लेख लिहिले गेले. त्याला त्या काळी ‘शाईचं युद्ध’ असं म्हटलं गेलं. लेखांव्यतिरिक्त स्टाइनिट्झनं आपल्या आधुनिक पद्धतीनं खेळून एकाहून एक विजय संपादन केले आणि अखेर नव्या युवकांना त्याच्या शिकवणीचं महत्त्व कळलं. एका आधुनिक पद्धतीच्या बुद्धिबळ युगाचा आरंभ झाला. उगाच आपली मोहरी तयार नसताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तो अंगलट येतो. यामुळे स्टाइनिट्झ आधी आपल्या मोहऱ्यांचा व्यवस्थित विकास करत असे. त्यामुळे अकाली हल्ला करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना चांगलाच मार बसत असे.

स्टाइनिट्झ १८६२ ते १८९४ या ३२ वर्षांत एकही सामना हरला नाही, यावरून त्याची आधुनिक दृष्टी आणि आत्मविश्वास दिसून येतो. स्टाइनिट्झला आता स्पर्धा खेळण्यात काही रस उरला नव्हता आणि त्यानं तब्बल ९ वर्षे (१८७३ ते १८८२) प्रदर्शनीय सामने खेळून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. ‘द फील्ड’ नावाच्या क्रीडा मासिकात तो स्तंभ लिहीत असे. १९८२ साली व्हिएन्ना येथे झालेल्या त्या काळच्या सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेच्या निमित्तानं स्टाइनिट्झनं पुनरागमन केलं आणि विनावरबरोबर संयुक्त पहिलं बक्षीस मिळवलं. त्यानंतर विल्हेम स्टाइनिट्झनं अमेरिकेत स्थायिक होऊन चिगोरीन, गुन्सबर्ग, वाईस यांच्याविरुद्ध सामने खेळून भरपूर पैसे मिळवले आणि ते घालवलेही. अखेर त्याचा सामना ठरला इमॅन्युएल लास्करविरुद्ध! त्याची गंमत वेगळीच आहे. सुरुवातीला त्या कालच्या प्रथेनुसार दोघे प्रतिस्पर्धी एक रक्कम उभी करत असत आणि त्याची वाटणी विजेता आणि पराभूत यांच्यामध्ये ७०-३० किंवा ८०-२० अशी होत असे. सुरुवातीला लास्करनं ५००० डॉलर प्रत्येकी उभारू असं सांगितलं, पण त्याला तेही कठीण जाऊ लागलं आणि मग शेवटी प्रत्येकी २००० डॉलरवर सामना ठरला. लोकांनी या खिलाडूवृत्तीबद्दल विल्हेम स्टाइनिट्झचं कौतुक केलं, पण त्यांना ग्यानबाची मेख माहिती नव्हती. स्टाइनिट्झ आर्थिक अडचणीत होता.

हेही वाचा – ऱ्हासमय काळातील रसरशीत नऊ दशके

अमेरिकेत १८९४ साली खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्टाइनिट्झला अखेर आपल्या आयुष्यातील पहिला पराभव स्वीकारावा लागला आणि त्याच्याहून ३२ वर्षे तरुण असलेला लास्कर जगज्जेता झाला; परंतु ‘शिष्यात इच्छेत पराजयात’ या उक्तीप्रमाणे स्टाइनिट्झला एक मानसिक समाधान होतं की, लास्करनं स्टाइनिट्झच्या आधुनिक तंत्रानं खेळून हा विजय मिळवला होता.

आपल्या आयुष्यात खूप पैसे कमावूनही त्याचे योग्य नियोजन न करता आल्यामुळे आधुनिक बुद्धिबळाचा हा जन्मदाता १९०० साली १२ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावला. त्या वेळी तो अतिशय विपन्नावस्थेत होता; परंतु जाण्यापूर्वी त्यानं आपल्या खेळानं आणि दिलेल्या नव्या विचारानं बुद्धिबळाचा खेळ समृद्ध झाला.

gokhale.chess@gmail.com