scorecardresearch

पुनरागमनाय च

२०१४ चा आणि पर्यायाने ‘जनात-मनात’चा हा शेवटचा लेखांक. आज आपल्या साऱ्यांचा निरोप घेताना संपूर्ण वर्षांचा पट डोळ्यांसमोर उलगडतो आहे.

२०१४ चा आणि पर्यायाने ‘जनात-मनात’चा हा शेवटचा लेखांक. आज आपल्या साऱ्यांचा निरोप घेताना संपूर्ण वर्षांचा पट डोळ्यांसमोर उलगडतो आहे. ‘लोकसत्ता’साठी लिहायचे हे सहावे वर्ष होते. आणि ‘जनात-मनात’ ही खऱ्या अर्थाने तुम्हा वाचकांची लेखमाला होती. तिला विषयाचे बंधन नव्हते, वैद्यकाचे कुंपण नव्हते. तिचे विषय मला रोजच्या जीवनात आजूबाजूला सापडायचे. कधी दूरचित्रवाणीच्या जाहिरातींमध्ये, तर कधी रस्त्यावरच्या सिग्नलपाशी. 

आपले सर्वाचे रोजचे आयुष्य अतिशय नाटय़मय झाले आहे. अनिश्चितता हा तिचा पाया झाला आहे आणि अतक्र्यता हा तिचा स्थायीभाव. मुद्दा एवढाच आहे की, रोजच्या धकाधकीमध्ये थोडेसे थांबून घडणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींवर विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही, किंवा खरे तर आपण त्यादृष्टीने lok05प्रयत्नच करीत नाही. ‘जनात-मनात’ने हे तुमचे-माझे आयुष्यातले हच्चे गुणाकार-भागाकारात स्पष्टपणे मांडले. कुठे अधिक उत्तर आले, तर कुठे उणे. पण गोष्टी आपल्या सर्वाच्या हृदयाजवळच्या होत्या. या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इंटरनेट, व्हॉटस्अ‍ॅप या माध्यमांमधून तात्काळ मिळणारा वाचकांचा प्रतिसाद मला रविवारी गुंतवून ठेवीत असे. सकाळी उठताना ऑस्ट्रेलिया, जपानहून येणारी ई-मेल्स आणि रात्री झोपताना अमेरिकेची वाचकपत्रे यांनी माझे हे वर्ष समृद्ध केले. अनेकांची मते जुळायची, काहींचा सूर टीकेचा असायचा. काही नव्या कल्पना, नवे विषय सुचवीत आणि माझे विचारचक्र पुढे चालू होई.
‘जनात-मनात’चा मूळ उद्देशच विचारांची पेरणी, जोपासणी करण्याचा होता. तो बहुतांशी सफळ झाला असे वाटते. समाजात आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर बोलावे, लिहावे, विचार व्यक्त करावेत असे वाटते. पण कधी व्यासपीठ नसते, तर कधी वेळ. माझ्या मते, या दोन्ही गोष्टी लंगडय़ा आहेत. खरं तर तो विचार आपल्या मनात क्षणक येतोही; पण आपण त्याला खतपाणी घालत नाही. It is neither perennial nor a priority. आणि नेहमी इथेच आपली गफलत होते. मंथन करावयाचे तर मनोनिग्रह करणे आवश्यक. ‘जनात-मनात’ने मला ती सवय लावली आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला त्याचा फायदा झाला. टीकाकारांच्या ई-मेल्स मी जपून ठेवल्या. त्यांचेही आभार मानले. कारण त्यांचा हल्ला व्यक्तीवर नव्हता, विचारांवर होता. फारकत घेतलेल्या विचारांना सन्मान देणे, हीच तर प्रगल्भ लोकशाहीची खूण आहे.
या वर्षांत देशात, जगात, वैज्ञानिक विश्वात घडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांनी ‘जनात-मनात’ला आकार दिला. दुष्काळातही मोठय़ा शहरांतली लग्नं-जेवणावळ मला अस्वस्थ करायची, तर निवडणुका आणि नंतरच्या नाटय़मय घडामोडींनी मी दिङ्मूढ व्हायचो. राजकीय भूमिका मी घेत नाही, असा काही वाचकांनी आरोपही केला; पण माझ्या दृष्टीने ते ‘जनात-मनात’चे उद्दिष्टच नव्हते.
‘जनात-मनात’ घराघरात पोहोचले, मराठी मनाचा आरसा झाले याचे मला खूप समाधान लाभले. भिडेबाईंच्या लेखाने अनेकांना आपल्या शाळेतील शिक्षिका आठवल्या. हा लेख वाङ्मयचौर्य असल्याचा आरोपही दोन परदेशस्थ ज्येष्ठ भारतीयांनी केला. मी त्याचे विनयपूर्वक खंडन केले. व्हॉटस्अ‍ॅपवरून येणाऱ्या काही कल्पना इतक्या सुंदर असायच्या, की त्यांना लेखाचा विषय करावयाचा मोह व्हायचा. जेथे जेथे मूळ लेखकाचे किंवा सूचना करणाऱ्या वाचकाचे नाव माहीत होते, तेथे तेथे त्यांना लेखातून पोच देण्याचा माझा नियम होता. पण काही अनामिक विचार ‘नदीचे कूळ आणि ऋषीचे मूळ..’ असल्यासारखे वाहत यायचे आणि गंगोत्री मात्र सापडायची नाही. पण असा एखादा अपवाद वगळता लोकांनी प्रचंड प्रेम दिले. भाजी मार्केट, नाटय़गृहात, सभा-संमेलनात लोक आवर्जून पोचपावती द्यायचे. फोटो काढायचे. मी ओशाळायचो.
..अनेक पत्रे आली. त्यापकी डोईफोडेंचे कायमस्वरूपी लक्षात राहिले. डोईफोडे व्यवसायाने ट्रक-ड्रायव्हर. ट्रकच्या मागे लिहिल्या जाणाऱ्या वाक्यांवरचा तो लेख होता. डोईफोडेंनी तो वाचला आणि ट्रक चालविण्यात उभी हयात खर्च करणाऱ्या त्या भल्या माणसाने मला त्यांच्या आयुष्याला साहित्यात स्थान दिल्याबद्दल धन्यवाद दिले होते. पत्र वाचल्यावर माझे डोळे भरून आले आणि ‘जनात-मनात’चे सार्थक झाले.
..आता निरोप घेतो. थोडा वेगळा अभ्यास आणि स्वतंत्र पुस्तके लिहिण्याचा संकल्प सोडलाय. तो पूर्ण करावा म्हणतोय. आपले प्रेम आहेच; आशीर्वाद द्या आणि म्हणा.. ‘पुनरागमनाय च।’
(समाप्त)

मराठीतील सर्व जनात…मनात ( Jagatmanat ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will come back

ताज्या बातम्या