‘यांत्रिकाच्या सावल्या’ या पुस्तकात लेखिका प्रज्ञा जांभेकर यांनी आपल्याच परिवारातल्या चार असामान्य जांभेकरांची कारकीर्द मांडली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाचे पहिले इंजिनीअर आणि पहिले व्यवस्थापकीय संचालक शंभोराव जांभेकर हे मुख्य नायक असले तरी त्यांच्या पत्नी गंगाबाई, मुलगा म्हणजे कम्युनिस्ट नेते रामकृष्ण जांभेकर, सून सुहासिनी चट्टोपाध्याय (स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सरोजिनी नायडू यांच्या बहीण) यांचे कार्यकर्तृत्वही पुस्तकात येते. हे दोघेही स्वातंत्र्यसैनिक आणि कम्युनिस्ट नेते, मार्क्सतवादी विचारवंत आणि साहित्यिक, स्फूर्तिदायक वक्ता, राजकीय स्तंभलेखक, चित्रकार, व्यंगचित्रकार म्हणूनही ते ज्ञात होते.
लेखिका या शंभोरावांच्या थोरल्या बंधूंच्या चौथ्या पिढीतल्या आहेत. प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे, ‘हे त्रिमितीय कौटुंबिक चित्र आहे. त्यात औद्योगिक इतिहास आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे. कौटुंबिक स्नेहसंबंध आहेत तसंच स्वातंत्र्यचळवळीचा, उद्योजकतेचा संदर्भ आहे.’
सांगली जिल्ह्यात कुंडलरोडशेजारच्या वैराण माळावर लक्ष्मणराव किर्लोस्करांनी महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली ती १९१० मध्ये. त्यांना ज्या मूठभर लोकांनी सुरुवातीपासून साथ दिली त्यात त्यांच्या ज्येष्ठ बहिणीचा मुलगा शंभोराव जांभेकर यांचेही प्रचंड योगदान होते. त्यांना यंत्रांची पारख अचूक होती आणि त्यांच्या कामगाराभिमुख धोरणांमुळे ते लोकप्रिय होते.
गंगाबाईंनी स्त्रियांना मदत म्हणून सुईणीचे काम सुरू केले. मग नर्सिगचे रीतसर प्रशिक्षण घेऊन साडेतीन हजार बाळंतपणं शंभर टक्के यशस्वी केली. त्यांनी किर्लोस्कर मासिकात संपादक म्हणून स्त्रियांचे पान चालवले. अष्टपैलू रामकृष्ण जांभेकर महाविद्यालयीन जीवनात स्वातंत्र्याच्या चळवळीने आणि साम्यवादी विचारसरणीने प्रेरित झाले. १९२९ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. ब्रिटिश राजवटीत त्यांनी तुरुंगवास भोगला. एका संपासाठी झालेल्या वाटाघाटीत कामगार प्रतिनिधी म्हणून रामकृष्ण आणि मालकांतर्फे शंभोराव होते.
या पुस्तकातील छोटय़ा छोटय़ा गोष्टी कधी आश्चर्य वाटायला लावतात तर कधी विचार करायला भाग पाडतात. बंगालमधील लहान मुली विकण्याची प्रथा, फ्रेंड्स ऑफ सोविएत युनियन ही संस्था आणि त्याचे भारतातील अस्तित्व, आयटकचे प्रतिनिधी म्हणून बीजिंगला गेले असताना रामकृष्ण जांभेकर यांच्या माओ आणि चौ एन लायबरोबर झालेल्या भेटी, शंतनूराव किर्लोस्करांच्या लग्नात रामकृष्ण जांभेकरांनी संपादक म्हणून काढलेली अंतरपाट विवाह पत्रिका, पंडित नेहरूंनी किर्लोस्करवाडीला दिलेली भेट, रामकृष्ण जांभेकरांची सुंदर अक्षरातील भावपत्रे, केशवपनाची कुप्रथा अशा गोष्टींमध्ये वाचक गुंतत जातो.
या पुस्तकात अनेक दुर्मीळ छायाचित्रे आहेत. आकर्षक मांडणी आणि सजावट, नावाला आणि मजकुराला साजेसं मुखपृष्ठ यामुळे पुस्तकाचे देखणेपण वाढलं आहे.
‘यांत्रिकाच्या सावल्या’, प्रज्ञा जांभेकर
प्रकाशक- सदामंगल पब्लिकेशन,
पाने- १२४, किंमत-२५० रुपये.
निकुंब यांच्या साहित्याचे यथोचित विश्लेषण
‘घाल घाल पिंगा वाऱ्या..’ या काव्याची भुरळ न पडणारा मराठी माणूस सापडणे कठीण. कवी कृ. ब. निकुंब यांचं हे काव्य. निकुंब यांनी कविता, भावकाव्य, खंडकाव्य, समीक्षा, संपादन आणि काव्येतिहास असे वैविध्यपूर्ण लेखन केले. त्यांच्या लेखानाचा सखोल वेध डॉ. शुभदा शहा यांनी ‘घाल घाल पिंगा वाऱ्या..’ या पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सुरुवातीला कवी निकुंब यांचा जन्म, बालपण, शिक्षण याविषयी माहिती दिली आहेच; तसेच त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास लेखिकेने केला आहे. लेखिकेने निकुंब यांचे सुंदर व्यक्तिचित्रही शब्दांकित केले आहे. या पुस्तकातील कवी निकुंब यांच्या रसाळ कवितांविषयीचे विश्लेषण अधिक भावते. त्यांच्या वैविध्यपूर्ण काव्य प्रकारांचे यशोचित वर्णन रसाळ भाषेत लेखिका करते. त्यांच्या कवितांमधील तरल भाव, त्यांच्या काव्यावर अन्य कवींचा जाणवणारा प्रभाव आणि तरीही त्यांच्या काव्यात असलेले वेगळेपण याचे विश्लेषण वाचनीय झाले आहे. कवी निकुंब यांचा सर्वागीण परिचय या पुस्तकातून मिळतो. त्यांच्या काव्याची आवड असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक पर्वणीच आहे. परंतु साहित्याच्या अभ्यासकालाही ते उपयुक्त ठरणारे असे आहे.
‘घाल घाल पिंगा वाऱ्या..’, डॉ. शुभदा शहा,
ओमेगा पब्लिकेशन्स, बेळगाव, पाने-२२०, किंमत- ३५० रुपये. ½