|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

तुम्चं ‘लेझीस्तान’ लई आवडलं बगा. वाईच जरा गावाकडे येवून जा. चावडीम्होरं पिपळाच्या पाराखाली पंदरा-बीस बाप्ये बघशिला. त्येच तुम्च्या लेझीस्तानचं फाउंडर म्येंबर. तमाखूचा बार दाढेखाली सरकवित्यात आन् दिनभर गप्पा कु टत बसत्यात. त्येन्ला ‘हाय-हेल्लो’ करायची मिश्टेक करू नगा सदाभौ.

तास-दोन तास गप्पा छाटून तुमालाच तुमच्याच पशाची चाय पाजतील. ‘तुमी शिटीवालं घडय़ाळ्याच्या काटय़ावर नाचून ऱ्हायलं न वं. म्होरल्या टायमाला जरा निवांत भ्येटा पावनं.’ हाण तेच्यायला!

काय बोलनार? गावाकडं घडय़ाळाचं काटं बिलकूल टोचत न्हाईत गडय़ाहो. पारावर बसलं की घडय़ाळ इसरून जायाचं. निवांत ऱ्हायाचं. टाईमपासला कुनी ना कुनी गावतंच. च्या-पान्याची सोय हुते. आवचित भजे, न्हाईतर मिसळ. शिरपाचं हाटील तिथंच हाई चावडीपाशी. फकस्त श्पॉन्शर तगडा पायजेल. दुपारी तिथंच वाईच जरा आडवं हुयाचं. परत दिवेलागनीपत्तुर तिथंच. जीना यहा..मरना यहा. आधी जिंदगी पारावर समाधी लावून बसनारे बहाद्दर हाईत आम्च्या गावाकडं. रिकामपन सांभाळाया हिम्मत पायजेल. तुम्च्या लेझीस्तानला असं हिम्मतवाले लोग पायजेच की! असलं गडी मस गावतील गावाकडं. गाडी भरून पार्सल पाठीवतो तुम्च्या लेझीस्तानला. कसं?

ते कालनिर्णय आम्च्याकडं परवडत न्हाई. कालच्याला उद्याचा निर्नय घेनारे आपुन कौन? कर्ताकरविता तर त्यो हाये..वर बसल्येला. उद्याचा काय भरूसा? आपून फकस्त आला दिस ढकलायचा. कल बी.. आज बी.

पुन्यांदा कल.. परसो तरसो..

आमी तिथंच.. पारावर टाईमपास करनार. तुमा लोकान्ला कामाच्या रगाडय़ात टाईम पुरत न्हाई आन् आमास्नी पुरून ऊरतो. आज कसा टाईमपास करायाचा? आमास्नी ह्यचं टेन्शन नाय. विलेक्शन, दहीहंडी, गणपती, दांडिया आसलं फेश्टीवल आलं की समय का पताही न चलता. पर आफ शीजनमंदी टाईमपासचा मोटा प्राब्लेम हुतू. रेंजच्या काडय़ा बी कदी येत्यात, कदी जात्यात. कायाप्पा आन् थोबाडपुस्तकात घडी- दोन घडी जीव रमतो; पर जिंदगीची असली मजा रिकामपनी गप्पा छाटन्यातच हाई.

सदाभौ, त्ये लेझीस्तानचं काय ते बगा बिगी बिगी. माफी असावी. आवं, लेझीस्तानच्या डिक्शनरीत घाई करून न्हाई चालनार. चुकी जाली.

तुम्च्या हिशेबानं जसं जमंल तसं धा आगष्ट शेलीब्रेटला की न्हाई सदाभौ? लेझी डेची आयडिया हजम न्हाई जाली. येवढा मोटा दिवस. आन् फकस्त येक डाव साजरा करायचा? ये कहा का इन्साफ है सदा ठाकूर? आमच्याकडं रोज रोज लेझी डे हाईती. त्येला रोज डे म्हनशीला का लेझी डे? उगा कन्फूजन नगं. आपन त्येला रोज रोज लेझी डे म्हनू. आमी काय म्हन्तो सदाभौ..? लेझीस्तानला सौताचं क्यालेण्डर पायजेल. आटवडय़ाला सात रविवार. सत्ते पें सत्ता. संडे के फंडे. लेझीस्तानमंदी पारावर लोड-तकीयांची सोय पायजेल. सालगडी श्पान्शर पायजेल. गप्पा कुटायला, पाय चपायला, तमाखू मळायला, हाजी हाजी करायला मान्सं पायजेल.

ही मान्सं आऊटसोर्सिंग करनाऱ्या कंपन्या पायजेल. पडल्या पडल्या पिंक माराया पिंकदानी आन् जेवन जालं की फींगर बावूल. दिवेलागनीनंतर मानूस डोलीतून घरला पार्सल करन्याची सोय हवी. आन् लाश्टला आपल्या जागी दुसरा कुनी परसाकडं जाईल, न्हाईतर आडोशाला धार मारून येईल आशी टेक्नालाजी डेवलप व्हायला पायजेल लेझीस्तानमंदी. ती जाल्याबिगर गावकडची लेझी मंडळी तिकडं शिफ्ट हुनार न्हाईत जनू. टेक ईट ईझी सदाभौ. बी लेझी. तुमी बी आन् आमी बी.

आळशीपनाचे लई आडव्हान्टीज हाईत- सदाभौ. दिस माथ्यावर येईपत्तुर लोळत राहनारे नेहमी आनंदाने जगत्यात. ‘‘मुडदा बशीवला तुजा.. उट की मेल्या! काही कामधंदा बगा की राजं..’’ असले डायलाग ऐकून मनं मुर्दाड हुत्यात. राग, लोब, माया, मत्सर, प्रीम याच्यापल्याड पोचतू आळशी मानूस. तो कधी चिडत न्हाई की हात उगारत न्हाई. उतत न्हाई की मातत न्हाई. शबुदाला शबुद न्हाई की आरेला कारे. भांडणतंटा न्हाई की मारामारी न्हाई. ज्या गावामंदी आळशी लोकान्चं पाप्युलेशन जादा हाई तिथं शांतता नांदती. गावाला तंटामुक्तीचं प्राईज गावतं. आळशी मानूस ऊगा धावपळ करत न्हाई. अती घाई संकटात न्हेई. त्यो आपली येनर्जी पेट्रोलवानी जपून वापरतू. त्येनी बचतीची सवय लागती. मनाची शिरमंती वाढती. त्यो निर्लज्ज, कोडगा असतू.. म्हनूनच सुखी आसतू. बायकूचं समदं ऐकून घेतू. उलटून बोलत न्हाई. सुखाचा संसार करतू.

आळशी कपलचा कदीबी काडीमोड होत न्हाई. त्यो नेहमी इतरान्ला कष्ट कराया सपोर्ट करतू. रेसमंदी सगळ्येच पळाया लागले तर मागं कापडं सांभाळाया कुनी हवं की नगं? सदाभौ, आळशी मानूस ही जिम्मेदारी इमाने-इतबारे पार पाडतू.

त्येच्या मनामंदी मत्सर नसतु. तो हमेशा दुसऱ्यान्ला पुडं जायला चान्स देतू. स्वत: मागं राहून. आजच्या जमान्यात ही कुर्बानी देनारा फकस्त आळशी मानूसच आसतु. आपला मानूस.. आळशी मानूस. दुसऱ्याच्या आनंदात तो आपला आनंद शोधतू. कोनी काम करनारा सक्शेशफूल जाला की पार्टी देतू. आम्चा मानूस मनापासून पार्टी ज्वाईन करतू.

एंजाय करतू. जलन के सिवा.

असूयेची अ‍ॅशिडिटी त्येला हुत न्हाई.

जग पुडं पुडं का जाऊन ऱ्हायलंय?

कारन आळशी मानूस मागं हाये म्हनून.

खरं सांगू का सदाभौ? आळशी मानूस जात्याच हुशार आसतु. पडल्या पडल्या त्येच्या दिमागमंदी भारी भारी आयडिया येत्यात. चालायचा कटाळा आला म्हून त्येनी गाडीची आयडिया दिली. कुनीतरी गाडीचा शोध लावला. ल्येटर लिवायचा कटाळा आला, दिली फूनची आयडिया. दोस्त हमेशा साथ पायजेल.. आलं फ्येसबुक. ही समदी आळशीपनाची करामत हाई.

स्वीगी, झोमॅटो या कंपन्या आळशी लोकान्च्या जीवावर मोठय़ा होऊन ऱ्हायल्यात सदाभौ. तो दिस दूर न्हाई- जवा समदी दुनिया लेजीस्तान हुऊन जाईल. आळशी मानूस पडल्या पडल्या दुनियेवर राज करील.

सदाभौ, आमी डिस्कवरी च्यानलवर डिस्कवर क्येलेलं हाई. कोआला नावाचा माकडासारका प्रानी  समद्यांत जास्त आळशी आसतू म्हनं. कुनी म्हन्त्यात- जंगलचा राजा शेर समद्यांत जादा आळशी हाई. आमी म्हन्तू, रिकामा मानसेच आळशी प्रान्यांचा राजा हाई. त्येच लई डेंजर. तुम्चं लेझीस्तानचं सपान सपानच ऱ्हायला पायजेल. माज्या देसाला ते परवडायचं न्हाई.

आवं, समद्यात जास्त युवा लोग माज्या देशात हाईत. युवाशक्ती रिकामी ऱ्हावून कशी चालंल? रिकाम्या हातान्ला काम पायजेल. शिक्शनाचा उपेग जाला पायजेल. कंचं बी सरकार येवू द्यात, १००% रोजगार कसा देईल?

कामाची लाज न बाळगता उद्योगाच्या नव्या आयडिया शोधाया पायजेल. भारी स्टार्टप् गावंल. सर्वशि इंडस्ट्रीत मस संधी गावत्यात. नोकरी पायजेल म्हून जोडं झिजविन्यापेक्सा दोन लोकान्ला नोकरी देन्याइतकी हिम्मत आली पायजेल. आता आळीवाचे नगं, अ‍ॅक्टिवाचं लाडू खायला पायजेल. थोडासा स्टाìटग ट्रबल हाई फकस्त.

दे धक्का.. वाईच जरा जोर लावून.

मग जाऊ दे जोरात. फोरजी, फाईव्हजी न्हाईतर फायबर आप्टिक येवू देत; मुंडी खाली घालून मोबाईलमंदी टाईमपास करनारी पोरं लेझीस्तान्ला धाडून द्या देवा. मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है? टेक्नालाजीचा, सोशलपनाचा ताठ मानेनं उद्योगधंद्यासाटी ऊपेग करनाऱ्या पोरान्चा यंगीस्तान पायजेल आमाला. यंगीस्तानला वयाचा दाखला जरुरी न्हाई सदाभौ. पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया. नवीन नवीन शिकत ऱ्हानारा, उद्योगी ऱ्हानारा मानूस कदीबी म्हातारा होत न्हाई. तवा सदाभौ, लेझीस्तानच्या नानाची टांग. इसरून जावा ते समदं. चला.

उटा.. राष्ट्रवीर होवू यात. कामाला लागू यात. जागो इंडिया जागो..

यंगिस्तान जिंदाबाद!!

तुम्चा मित्र..

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngistaan zindabad by kaustubh kelkar nagarwala mpg
First published on: 25-08-2019 at 00:10 IST