08 August 2020

News Flash

भाजपचे तिनात दोन, कॉंग्रेसचे १० त एक

१५ व्या लोकसभेतील सत्ताधारी काँग्रेसला भाजपने नुकत्याच जाहीर झालेल्या १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत चारी मुंडय़ा चीत केले. या निकालाच्या विश्लेषणानुसार या निवडणुकीत भाजपने उभ्या

| May 18, 2014 02:23 am

१५ व्या लोकसभेतील सत्ताधारी काँग्रेसला भाजपने नुकत्याच जाहीर झालेल्या १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत चारी मुंडय़ा चीत केले. या निकालाच्या विश्लेषणानुसार  या निवडणुकीत भाजपने उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ६६ टक्के उमेदवारांना विजयाची गोड फळे चाखावयास मिळाली आहेत. काँग्रेसच्या नशिबी मात्र मतदारराजाची तीव्र नाराजी आली असून, देशभरात उभ्या केलेल्या उमेदवारांपैकी केवळ १० टक्के उमेदवारांनाच विजयाची वेस ओलांडता आली आहे.
देशात भाजपतर्फे एकूण ४२८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी २८२ जणांनी आपली निवड सार्थ ठरविली. याउलट काँग्रेस पक्षाने देशात सर्वाधिक म्हणजे ४५७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
कम्युनिस्ट पक्षही आपटला
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने देशात ९८ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी केवळ ९ जागांवर त्यांना विजय संपादन करता आला. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षास ६७ जागांपैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
प्रादेशिक आणि भौगोलिक मर्यादांचे भान
आपले राजकीय सामथ्र्य ज्या सीमारेषांपुरते मर्यादित आहे, अशा राज्यांच्या सीमा ओलांडू पाहणाऱ्या ‘अति महत्त्वाकांक्षी’ पक्षांना १६ व्या निवडणुकीत ‘धक्कादायक निकाल’ पचवावे लागले. मात्र, ज्यांनी आपल्या ‘प्रादेशिक मर्यादांचे’ भान राखत निवडणूक लढवली, त्यांना मात्र मतदारांनी भरभरून यश दिले. तामिळनाडूत जयललिता यांच्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाला मिळालेल्या ३६ जागा आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या ३४ जागा ही याचीच उत्तम उदाहरणे.
‘नोटा’ला दखल घेण्यायोग्य प्रतिसाद
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मतदान यंत्रांवर अवतरलेल्या ‘नोटा’ अर्थात वरीलपैकी कोणीही नाही या पर्यायास उत्तम प्रतिसाद मिळाला. तब्बल साठ लाख मतदारांना निवडणुकीतील उमेदवारांपैकी एकही जण पात्र वाटला नाही. ‘नोटा’ या पर्यायास मिळालेली पसंती ही देशातील तब्बल २१ राजकीय पक्षांना मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
१६ व्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी झालेल्या मतदानातील १.१ टक्केमते या पर्यायास मिळाली. मात्र या पर्यायाचे ‘मतमूल्य’ फारसे नसल्याने त्याची म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही. बिहारमध्ये सत्तेत असलेले संयुक्त जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्ष असलेले शिरोमणी अकाली दल यांसारख्या मातब्बर पक्षांपेक्षा नोटाला मिळालेल्या मतांची संख्या अधिक आहे.
३१ टक्के मतदारांची भाजपला पसंती
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, बहुमताचा २७२ हा जादूई आकडा एकटय़ा भाजपनेच पार करीत काँग्रेसला अक्षरश: भुईसपाट केले. उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि प्रमुख विरोधी बहुजन समाज पक्ष यांची धूळधाण झाली. मात्र, असे असले तरी मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास मायावतींच्या बसपला भाजप व काँग्रेसनंतर तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली आहेत. परंतु त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही, हे विशेष. सोळाव्या लोकसभेसाठी ८१ कोटी मतदारांपैकी ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची ही टक्केवारी..
* भाजप : १७.१६ कोटी (३१ टक्के)
* काँग्रेस : १०.०७ कोटी (१९ टक्के)
* बसप : २.३ कोटी (४.१ टक्के)
* तृणमूल काँग्रेस : ३.८ टक्के
* सप : ३.४ टक्के
* अण्णाद्रमुक : ३.३ टक्के
* आम आदमी पार्टी : २ टक्के
* शिवसेना : १.९ टक्के
* बिजू जनता दल : १.७ टक्के
* राष्ट्रवादी काँग्रेस : १.६ टक्के
*१८ पक्षांना एक टक्का व त्यापेक्षा किंचित अधिक मते मिळाली.
* भाकप (०.८ टक्के)
१६५२ पक्षांची कामगिरी शून्य
बसपा, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासह देशातील १६५२ पक्षांना या निवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळविता आला नसल्याने त्यांची कामगिरी शून्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देशात सध्या १६८७ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. जवळपास ८२०० हून अधिक उमेदवार लोकसभेच्या रिंगणात होते त्यापैकी ५००७ उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. तर उर्वरित उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यापैकी ५४० हून अधिक जण विजयी झाले असून त्यांना ३५ विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. तर तीन जण अपक्ष म्हणून विजयी झाले. उत्तर प्रदेशात एकेकाळी सत्तारूढ असलेला बसपा, तामिळनाडूत एकेकाळी सत्तेवर असलेला द्रमुक आणि यूपीए सरकारचा घटक पक्ष असलेला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष यांना या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. त्याचबरोबर महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षालाही एकही जागा मिळाली नाही. राष्ट्रीय लोक दल आणि आसाम गण परिषद या पक्षांनाही एकही जागा जिंकता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत या वेळी केवळ तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भारतीय निवडणुकीच्या इतिहासातील हा नीचांक आहे. नभकुमार सरनिया (आसाम), विनोदवीर इनोसण्ट आणि जॉयस जॉर्ज (दोन्ही केरळ) हे तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
काँग्रेसवरील असंतोषाचा फटका आम्हालाही!
केंद्रातील यूपीए सरकारला ज्या पक्षांनी पाठिंबा दिला, त्या पक्षांना जनतेचा रोष पत्करावा लागला.केंद्रात जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी ज्या पक्षांनी यूपीएला पाठिंबा दिला त्या यूपीएच्या धोरणांविरुद्ध जनतेच्या मनात असंतोष खदखदत होता आणि त्याचा फटका आमच्यासारख्या पक्षांना बसला हे भाजपला मिळालेल्या यशावरून सिद्ध होत आहे. आपल्या पक्षाची धोरणे आणि रणनीती योग्य होती आणि दलितांची व्होटबँक एकसंध आहे; परंतु भाजप आणि अन्य पक्षांनी केलेला अपप्रचार, मुस्लीम, अन्य मागासवर्गीय आणि उच्चवर्णीय जनतेमधील संभ्रमाचे वातावरण आदी बाबी पक्षाच्या खराब कामगिरीला कारणीभूत आहेत.
मायावती, बहुजन समाजवादी पक्ष, अध्यक्षा

२२२६८ पुदुच्चेरीत ‘नोटा’ या पर्यायास मिांळलेल्या मतांची संख्या. या राज्यात टक्क्य़ांचा विचार करता सर्वाधिक म्हणजे एकूण मतदानाच्या तीन टक्के मते ‘नोटा’स मिळाली तर
मेघालयात ३०१४५ जणांची नोटा पर्यायास पसंती दिली.

३ राज्यांमध्ये एकूण मतदानापैकी दोन टक्क्य़ांहून अधिक मते ‘वरीलपैकी कोणी नाही’ या पर्यायास. ईशान्य भारतात सर्वाधिक पसंती.
२१ राजकीय पक्षांपेक्षा नोटा या पर्यायास देशभरात मिळालेल्या मतांची संख्या अधिक.
६० लाख.लोकांनी देशभरात नोटा हा पर्याय वापरला. प्रथमच हा पर्याय निवडणुकीत उपलब्ध करून देण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2014 2:23 am

Web Title: 2 out of every 3 bjp candidates won 1 in 10 for congress
Next Stories
1 भाजप सरकार रेल्वे विद्यापीठ उभारणार!
2 राहुल गांधींच्या ‘सल्लागारां’ना असंतोष भोवणार?
3 लोकसभेतील मुस्लीम खासदारांची संख्या घटली
Just Now!
X