मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या कामाची ७५ हजार शासकीय-निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
मुंबई शहर व उपनगरात मिळून लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. मुंबईत २४ एप्रिला मतदान होणार आहे. त्याआधीपासून ते मतदान व मतमोजणीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततते पार पडण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी वर्ग लागणार आहे. मुंबई शहरात दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघात ३१११ मतदान केंद्र आहेत. उपनगरात चार मतदारसंघ असून सुमारे ७५०० मतदानकेंद्रे आहेत.
मुंबई शहरासाठी २० हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपनगरात सुमारे ५५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. भरारी पथके, स्टॅटिक सव्‍‌र्हिलन्स, अकाऊ टिंग, विडिओ सव्‍‌र्हिलन्स अशी पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये काम करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दोन-दोन दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परंतु काही ठिकाणी कर्मचारी रुजू झाले नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशिक्षण आणि नेमून दिलेल्या कामावर हजर राहण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.